ध्यानेश्वराची गाथा

*_🔴अध्याय दहावा समाप्त🔴_*
🌹 *ठाणे प्रतिनिधी श्री सचिन शिंदे*
🍃 *सार्थ ज्ञानेश्वरी*
🌹 *विभूती योग*
🍃 *अध्याय दहावा*
🌹 *ओवी ३२३ पासून*
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳⛳
*🔥जी चंद्रबिंबाचा गाभारां ।रिगालियावरीही उबारा ।परी राणेपणें शारङ्गधरा ।बोला हें तुम्हीं ॥३२३॥*
देवा! चंद्रबिंबाच्या गाभार्‍यामध्ये म्हणजे मध्यभागी शिरल्यानंतरही उकडू लागेल काय? पण देवा! स्वामीपणाने नात्याने हे तुम्ही बोलत आहात.
*🔥तेथ सावियाचि परितोषोनि देवें ।अर्जुनातें आलिंगिलें जीवें ।मग म्हणे तुवां न कोपावें ।आमुचिया बोला ॥३२४॥*
अर्जुनाचे भाषण ऐकून भगवंताला खरोखर आनंद झाला व त्यांनी अर्जुनाला प्रेमाने आलिंगन दिले. नंतर भगवान म्हणतात, अर्जुना! माझ्या बोलण्याचा राग मानू नकोस.
*🔥आम्हीं तुज भेदाचिया वाहाणीं ।सांगितली जे विभूतींची कहाणी ।ते अभेदें काय अंतःकरणीं ।मानिली कीं न मनें ॥३२५॥*
आम्ही भेदाला धरूनच तुला जो विभूतीचा विस्तार सांगितला, तो अभेदपूर्वक तुझ्या अंतःकरणात ठसला की नाही.
*🔥हेंचि पाहावयालागीं ।नावेक बोलिलों बाहेरिसवडिया भंगीं ।तंव विभूती तुज चांगी ।आलिया बोधा ॥३२६॥*
हे पाहण्याकरिताच असे मी थोडेसे बाह्यात्कारी बोललो; पण तुला विभूतीचा बोध उत्तम प्रकारे झाला हे समजून आले.
*🔥येथ अर्जुन म्हणे देवें ।हें आपुलें आपण जाणावें ।परी देखतसें विश्व आघवें ।तुवां भरलें ॥३२७॥*
हे ऐकून अर्जुन म्हणतो, देवा! आपले आपण जाणा; पण सर्व जगात तूच एक व्यापून भरला आहेस, असे मात्र मी पाहत आहे.
*🔥पैं राया तो पांडुसुतु ।ऐसिये प्रतीतीसि जाहला वरैतु ।या संजयाचिया बोला निवांतु ।धृतराष्ट्र राहे॥३२८॥*
संजय म्हणतो, राजा धृतराष्ट्रा! तो पंडुसुत अर्जुन असा अभेद आणि अद्वैताचा अनुभव घेऊ लागला; परंतु संजयचे भाषण ऐकून धृतराष्ट्र स्तब्धच राहिला.
*🔥कीं संजयो दुखवलेनि अंतःकरणें ।म्हणतसे नवल नव्हे दैव दवडणें ।हा जीवें धाडसा आहे मी म्हणें ।तंव आंतुही आंधळा ॥३२९॥*
हे पाहून, संजयला धृतराष्ट्राविषयी थोडे दुःख झाले व तो म्हणू लागला की भगवंताचे मुखाने असा अद्वैताचा उपदेश ऐकण्याचे सद्भाग्य प्राप्त होऊनही, हा त्या भाग्याला दूर लोटतो हे आश्चर्य नव्हे काय? हा धृतराष्ट्र आंधळा आहे; पण अंतःकरणातून आंधळा नसेल असे मला वाटत होते, परंतु तो आतही आंधळाच आहे- म्हणजे त्याच्या अंतःकरणात ज्ञानसूर्याची किरणे शिरत नाहीत असे मला आता वाटू लागले.
*🔥परी असो हें तो अर्जुनु ।स्वहिताचा वाढवितसे मानु ।कीं याहीवरी तया आनु ।धिंवसा उपनला ॥३३०॥*
पण असो. याचे आपल्याला काय करायचे आहे. अर्जुन मात्र आपले वाढते आत्मकल्याण करून घेण्याची इच्छा करू लागला; कारण यानंतरही त्याच्या अंतःकरणात दुसर्‍या गोष्टीविषयी भरंवसा वाटू लागला.
*🔥म्हणे हेचि हृदयाआंतुली प्रतीती ।बाहेरी अवतरो कां डोळ्यांप्रती ।इये आर्तीचां पाउलीं मती ।उठती जाहली ॥३३१॥*
संजय म्हणतो हा ह्रदयातील अनुभव बाहेर डोळ्याला प्रत्यक्ष दिसावा अशा इच्छेच्या पावलाने त्याची बुद्धी उसळू लागली.
*🔥मियां इहींच दोहीं डोळां ।झोंबावें विश्वरूपा सकळा ।एवढी हांव तो दैवाआगळा ।म्हणऊनि करी ॥३३२॥*
अर्जुन हा थोर भाग्यवान होता, म्हणूनच याच दोन्ही डोळ्यांनी भगवंताच्या विश्वरूपाला मिठी मारावी अशी थोर हाव करीत होता.
*🔥आजि तो कल्पतरूची शाखा ।म्हणोनि वांझोळें न लगती देखा ।जें जें येईल तयाचि मुखा ।तें तें साचचि करितसे येरु ॥३३३॥*
प्रस्तुत अर्जुन कल्पतरूंची फांदी होता, म्हणूनच तिला वांझ फूल लागत नव्हते. जी जी इच्छा त्याने बोलून दाखवावी ती ती भगवान पूर्ण करीत असे.
*🔥जो प्रल्हादाचिया बोला।विषाहीसकट आपणचि जाहला।तो सद्‍गुरु असे जोडला ।किरीटीसी॥३३४॥*
जो प्रल्हादाच्या शब्दासाठी विषही आपण झाला, तो श्रीकृष्ण भगवान, अर्जुनाला गुप्तरूपाने प्राप्त झाला होता.
*🔥म्हणोनि विश्वरूप पुसावयालागीं ।पार्थ रिगता होईल कवणें भंगीं ।तें सांगेन पुढिलिये प्रसंगीं ।ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा ॥३३५॥*
म्हणून अर्जुन आता विश्वरूपाच्या दर्शनाकरिता कोणत्या रीतीने प्रश्न करील हे निवृत्तिनाथांचे श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पुढील अध्यायात सांगणार आहे.
*🚩ॐ तत्सदिति श्रीमद्‍भ्गवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्र श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः ॥ १० ॥*
*🚩इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां दशमोऽध्यायः ॥*
*🌸श्रीसद्गुरुकृपेने श्रीज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायाचा मराठी अनुवाद संपन्न झाला तो श्रीसद्गुरुचरणीं समर्पण असो*.
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳⛳
🚩 *॥जय जय रामकृष्ण हरि॥*
🚩 *अध्याय दहावा समाप्त*
🚩 *अध्याय अकरावा उद्यापासून*
🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸

श्री सचिन शिंदे