रात्री ७ वाजल्यापासून विविध मराठी वाहिन्यांवर रडक्या मालिकांचा रतीब चालू असतो. हे मालिका काढणारे या मालिकांच्या माध्यमातून काय समाजप्रबोधन राहू द्या, पण मनोरंजन तरी काय करत असतात? कौटुंबिक द्वेष, मत्सर, सूड आणि रडारडीच चालू असते.
त्यात भर म्हणून मराठी मालिका म्हटलं की एकदम गावंढळ भाषा असायलाच हवी असा काही नियम आहे का? तो एक जमाना होता, जेंव्हा ती भाषा बोलली जात होती. पण ग्रामीण महाराष्ट्र आता २०-२५ वर्षांपूर्वीचा राहिला नाही. तुम्ही जी भाषा दाखवता तशी भाषा आता बोलली जात नाही. ग्रामीण महाराष्ट्रात ही आता शुद्ध मराठी भाषा बोलतात.
पण मुंबईत बसून कथानक लिहिणाऱ्यांना कदाचित हे माहिती नसावे म्हणून ते अशी भाषा मालिकेत दाखवत असावेत. ना दर्जा, ना कथानक लोकांच्या माथी काहीही मारलं जातं आणि परत मराठी प्रेक्षक मराठी चित्रपट, मालिका बघत नाहीत म्हणून बोंब मारली जाते. मराठी चित्रपट, मालिकांच्या पुरस्कार सोहळ्यातही मराठी गाणी सोडून हिंदी गाण्यांनाच प्राधान्य दिले जाते. तुमच्या भाषेचा तुम्हालाच आदर आणि अभिमान नसेल तर इतर भाषिकांना तरी तो कसा असेल?
किशोर बोराटे