*आईची तेलपोळी*
-डॉ. स्मिता दातार
मी माहेरची सीकेपी. चांद्रसेनीय कायस्थ प्रभू. दिसायला देखणी, वागायला पराक्रमी आणि स्वयंपाकात सुगरण समजल्या जाणाऱ्या या विशिष्ट ज्ञातीतला माझा जन्म. आईच्या हातचे सुरेख पदार्थ खातच लहानाची मोठी झाले .तिचं करणं फारच निगुतीच. सीकेपी सुगरणींची स्पर्धा घेतली तर त्यातही अव्वल ठरेल असं रांधणं. प्रत्येक पदार्थाचा रंग ,गंध, रूप सगळ्यांची काळजी घेऊन केलेले तिचे पदार्थ. तिने केलेल्या मोदकाच्या नाजूक पाकळ्या, एकसारखा आकार आणि तो इतका पातळ की त्यातलं सोनेरी सारण बाहेरून चमकावं. सीकेप्यांचे खास पदार्थ रुमाली वडी ,शेवळांची वडी, वालाच बिरडं खावं तर तिच्या हातचं. तिने केलेले सामिष पदार्थ ..कोलंबीचे पॅटीस, सोड्याचं कालवण , चिंबोरीच कालवण, कोलंबीची खिचडी, तळलेले बोंबील, सुरमई या पदार्थांची यादी इथे मावणार नाही .तिने केलेले कानवले..( हो सीकेपी माणूस करंजीला ‘कानवला’ म्हणणार आणि रोजच्या गव्हाच्या पोळीला ‘चपाती’ . असं म्हटलं नाही तर ते त्यांच्या ‘शान के खिलाफ’ असतं.) तर तिने केलेला कानवला. प्रत्येक पापुद्रा उलगडत आपले बहारदार रंग दाखवणार आणि जिभेवर ठेवताच त्याचं अस्तित्व विरघळून खाणाऱ्याला ब्रम्हानंद देणार. तिने केलेले जाळीदार कुरकुरीत अनारसे, सोनेरी लोण्यासारखा मऊ बेसनाचा लाडू ते थेट तिने केलेली सुक्या बोंबलाची मिरवणी ( मिरे वाटून घालून केलेलं कालवण ).आईकडे वारंवार जावस वाटण्याची ही अनेक कारणं.
त्या दिवशी अशीच दुपारी चक्कर मारायला गेले .गप्पाटप्पा करताकरता आई-बाबांचं जनरल चेकअप करण, डॉक्टरच्या डोळ्यांनी त्यांना बघण ,हाही उद्देश असायचा. वय वर्ष 75 च्या मासाहेब म्हणाल्या ,’बस जरा .आज तेलपोळ्या करायला घेतल्यात. गरम-गरम खाऊनच जा .’
अजूनही साठीची दिसणारी, व्यायाम आणि घरकामांनी आपला अटकर बांधा राखलेली आई चपळाईने तेलपोळी करायला उभी राहिली. (सीकेपीं साठी पुरणपोळी म्हणजे पिठावर लाटलेली पुरणपोळी आणि तेलपोळी म्हणजे सीकेपी पद्धतीची पुरणपोळी .) समोर धम्मक सोनेरी रंगाच वाटलेलं पुरण होत, त्यातल्या केशर जायफळाचा घमघमाट सुटला होता.एकीकडे गव्हाचं पीठ आणि मैद्याची भिजवलेली कणिक तेलात पूर्णपणे बुडवून ठेवली होती. आता नावच तेलपोळी त्यामुळे तेलाचा हा सचैल अभिषेक हवाच. तिने पोळपाटावर ब्राऊन पेपर पसरला. त्याच्या चकचकीत बाजूवर पोळीला आसन म्हणून तेल पसरल. माझ्याशी बोलता बोलता पातेल्यातल्या तेलात बुडालेल्या मऊ कणकेचा लिंबाएवढा गोळा हलकेच काढला. हातावर जरा वळून त्याची गोल पारी केली. शेवटच्या घासापर्यंत पुरण लागलं पाहिजे म्हणून त्यात आकंठ पुरण भरून पारीच तोंड बंद केलं.वरची जास्तीची उरलेली कणीकही काढून टाकली. आणि गुळगुळीत कागदावर तो गोळा लाटण्याने लाटायला लागली .जाहिरातीतल्या कॅडबरीच्या आतलं चॉकलेट हळूहळू पसरत आनंद वाढवत नेतं तस ते पुरण कणकेच्या आत हळूहळू पसरत होतं. अगदी सहज वाढणारी ती तेलपोळी माझ्यासमोरच लहानाची मोठी झाली. अतिशय पातळ लाटलेली तेल पोळी आणि कडांपर्यंत पसरलेल पुरण ही तेल पोळी यशस्वी झाल्याची पहिली पायरी. समोर बिडाचा भलामोठा तवा तापला होता. हा तवा सुद्धा तिचा संसारा एवढाच जुना झाला होता. तिने ब्राऊन पेपर त्या पोळी सकट तेल लावलेल्या गरम तव्यावर उलटा घातला. तिच्याकडच्या बाजूने पोळीला उजव्या हातातल्या कालथ्याने तव्यावर अंथरत, डाव्या हाताने हलकेच पेपर सोडवून घेतला. हे सगळं ती अगदी गप्पा मारत सहज करत होती. मंद गॅसवर दोन्ही बाजूंनी तेलपोळी खमंग भाजली. भाजली एवढीच की तिचा मऊसूतपणा तर कायम राहील मात्र ती खुसखुशीत होईल. मग गोल पोळीला दोन्हीकडून दुमडून तिची उभी घडी घालून ती तलम, सोनेरी ,सुकुमार तेलपोळी माझ्या ताटात वाढली .त्यावर तिच्या प्रेमासारखी कणीदार तुपाची धार धरली. बाजूला नारळाच्या दुधाची वाटी. मी जीभेवर विरघळलेल्या या अद्भुत रसायनाला दहा मिनिटात माझ्या पोटात समाधी दिली. तोवर तिची एक तेलपोळी तव्यावर आणि लाटलेली तेलपोळी पोळपाटावर होती .मी म्हटलं, ‘अगं, कितनी नाइन्साफी है ये.. या तेल पोळी साठी पुरण शिजवण्यापासून पोळी तव्यावर पडेपर्यंत पाच सहा तास तू राबलीस. मी ती पोळी पाच मिनिटात संपवली. अशीच निरनिराळे पदार्थ करत राहतेस आणि सगळ्यांसाठी धडपडत राहतेस .आय एम फिलींग गिल्टी.’
पोळ्या लाटता लाटता ती म्हणाली, ‘अगं , हा देह नष्ट होणार हे माहीत असूनही आयुष्यभर या देहासाठी मेहनत करतो आपण …मग कुणाला आनंद देण्यासाठी काही क्षण कष्ट केले तर काय बिघडलं ? मला तुझ्यासाठी तेलपोळी करताना आनंद झाला. तुला खाताना आनंद मिळाला. झालं तर मग..’
आयुष्याचं तत्त्वज्ञान समजून सोपं करून जगलेली ही माणसं किती ग्रेट आहेत. तिच्या लाटण्याबरोबर तिचे अनुभवी हात लयबद्ध हलत होते. नव्या तेलपोळीला मोठं करण्यात ती गुंगून गेली होती आणि मी तिच्या हातावरच्या फुगून आलेल्या हिरव्या शिरांकडे ओलसर डोळ्यांनी पहात राहिले.
***************