वासोटा एक विलक्षण अनुभव

सह्याद्री भ्रमंती एक अविस्मरणीय अनुभव

वासोटा…..! वासोटा….आणि…..सातारकर एक विलक्षण अबोल असं नातं.आज लिहताना विचार आला आपल्याच माणसांना आपल्याच खजिन्याची नव्याने काय माहिती देणारं.खर तर हा लिखाणाचा सारा प्रपंच आपल्या सह्याद्रीची माहिती देण्यासाठी नाहीच मुळी.मला थोड वेगळं बोलायचे आहे.
१५०० पर्यटक जर एकाच दिवशी एकच अद्भुत अनुभव घ्यायला जमत असतील तर नक्कीच हा सह्याद्री एक जादूगार तर नसेल ना…? ज्याने आपल्या सौंदर्याचं वेगळंच जाळं गुंफून सर्वांना त्यात ओढण्याचं एक तंत्र जाणलं नसेल ना..? असे प्रश्न उभे राहतात.
मला अभिमान वाटतो मी सातारकर असल्याचा.ह्या सह्याद्रीच्या कुशीत जन्म घेतल्याचा.घनदाट जंगल, भक्कम कडे,निर्मळ पाणी आणि पक्ष्यांचा किलबिलाट ह्यात फिरण्याचा अनुभव हा कोणताही ३डी सिनेमा पाहण्यापेक्षा कैक पटीने मनाला आनंद देणारा नक्कीच आहे असे मी म्हणेन.
सह्याद्री…..शिव छत्रपती…..मर्द मराठी मावळे……आणि अंगावर शहारे आणणारा सारा इतिहास……ह्याची नव्याने माहिती मी काय देणार….
रविवार एक सुट्टीचा दिवस…मित्रांची संगत….आणि एक छोटासा ट्रेक….असे सारे नियोजन करून बामणोली गाठले…..
ट्रेक मध्ये आवडलेली विलक्षण गोष्ट म्हणजे हा प्रवास फक्त २० ते ४० चे तरुण न्हवते तर अगदी लहान मुले आणि म्हातारी मंडळी पण सोबती होते.तरुण तरुणींना अशा गड मोहिमेत पाहून मनाला समाधान मिळत होतं.कुठेतरी डेटिंग, सिनेमा किंवा एखाद्या नेहमीच्या नावाजलेल्या ठिकाणी जावून फोटोशूट ह्याच्या पलीकडे उठून निसर्ग न्याहाळायला आलेली ही मंडळी आणि म्हातारपणात गुडघेदुखी ,डायबिटीस, ब्लड प्रेशर, ह्यांना पायी तुडवत गड सर करणारे म्हातारे….खर तर त्यांचा उत्साह पाहून त्यांना म्हातारे म्हणण्यापेक्षा कुठेतरी आपल्या पेक्षा ३० – ४० वर्ष जास्त अनुभवी तरुण असेच म्हणावे लागेल.लहानगे पाय इतिहासाच्या वाटांवर चालताना गर्व वाटतो की हीच चिमुकली पावलं आत्ताच जर पावन धुळीने माखली आणि शरीरं घामाने न्हाहली तर अंगात मावळ्यांचीच रग नक्की येणार.
अजुन गर्वाची गोष्ट म्हणजे कानी येणारे हिंदी बोल……म्हणजे आपल्या सह्याद्रीने फक्त मराठी मावळ्यांनाच नाही तर बाहेरून येणाऱ्या लोकांना पण वेड लावले आहे…. हे वेड लावणारा भक्कम सह्याद्री अगदी दिमाखात उभा आहे.
ह्या विशाल सह्याद्रीला कॅमेऱ्यात साठवण्याचा थोडा प्रयत्न आपण सारे करतो.त्या पेक्षा जास्त तो नजरेने साठवतो….पण तरीही आपल्या विचारांच्या पलीकडे विस्तारलेला हा पसारा मनात नक्कीच धडकी भरवतो.ते विशाल कडे,आणि अरुंद वाटा सांगून जातात आपण ह्या निसर्गापुढे किती खुजे आहोत.
हा निराळा अनुभव कोणी शब्दात मांडेल कोणी फोटो आणि व्हिडिओ मधून मांडेल पण प्रत्यक्ष येणारा अनुभव हा नक्कीच त्यावरून विलक्षण असेल.जे गेले असतील त्यांनी ते अनुभवले असेलच.जे गेले नसतील त्या सर्वांना सांगणे हेच की एकदा का होईना सारी कामे बाजू ठेवून ह्या अभेद्य रांगाना अवश्य भेट द्या.
माझे बोलणे इथेच थांबत नाही.सांगायच आहे ह्या प्रवासात भेटलेल्या हनुमानाची….हो हनुमानच….बोटिंग ला सुरुवात झाली ते आमचे मार्गदर्शक श्री.मारुती जाधव ह्यांच्या सोबत.वय फक्त ६५.. किरकोळ पण रांगडा बांधा.संपूर्ण प्रवासात गडाची माहिती त्यांनी दिली ही गोष्ट जेवढी महत्वाची.त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे हे सह्याद्रीचं पाखरू रोज हा प्रवास करतेय.गेली ३०-३५ वर्ष ह्याच कड्या कपाऱ्यांमध्ये काम करतेय…..ना कोणता आजार ……ना कोणता त्रास…..मग हा प्रश्न मनाला पडतो की खरा श्रीमंत कोण….? लाखो रुपये कमवून आजाराशी झुंजत राहणारे की भले ४ पैसे कमी असले तरी आनंदी जीवन आणि उत्तम शरीरस्वास्थ्य लाभलेले वयाची पासष्ठी‌ पार केलेले मारुती नावाचे हे जुने खोड.
सिनेमे कोणाला आवडत नाहीत.आपण सारेच पाहत असतो.ती कला एका बंधिस्त खोलीत मोठ्या पडद्यावर पाहताना मिळणारा आनंद हा पण उत्तमच.पण आपण पाहतो ते एका दिग्दर्शकानं एका उत्तम कलाकाराला सोबत घेवून त्याच्या विचारांनी बनवलेली कलाकृती.पण ह्या मोकळ्या रांगा मध्ये फिरताना आपण स्वतःच एक दिग्दर्शक आणि स्वतःच एक हिरो असल्याचं नक्कीच अनुभवालं असे मी म्हणेन.
निलेश बाबर
शब्दसारथी