*****आणि लोखंडे काका ढसा ढसा रडले.

*…….आणि लोखंडे काका ढसा ढसा रडले*

सकाळी जेवण करून ११ वाजता ऑफिसमध्ये आलो. केबिनचा दरवाजा उघडला, तर आत लोखंडे काका बसलेले दिसले. मी नमस्कार केला. काय काका, बऱ्याच दिवसांनी आलात. तर बोलले मी नेहमीच येतो रे, पण तुझे पाय कुठं एका जागेवर असतात. अगोदर सगळा महाराष्ट्र फिरायचास आणि आता मुंबईत जाऊन राहिलास. मी म्हटलं कधी आलात? निरोप पाठवला असता, तर मग मी लवकर खाली आलो असतो. अर्धा तास झाले तुझ्या ऑफिसमध्ये बसलोय. बाकी श्रीमंतांच्या घरातली आणि हातातली घड्याळं शोभेसाठीच असतात म्हणा. असू दे, असू दे मला तरी कुठं काय काम आहे? एवढं बोलून सकाळी सकाळी काकांनी मला क्लिन बोल्ड केले. मी म्हटलं काय काका, काय बोलता? मी आणि श्रीमंत?

काका बोलले ते जाऊ दे, मी काय म्हणतो ते ऐक, म्हटलं बोला काका. तसा काकांना हुंदका आला आणि काका चक्क रडायला लागले. हे असे अचानक घडल्याने मी हडबडून गेलो. काका नक्की का रडताहेत काहीच कळेना. मनात नको नको त्या शंका यायला लागल्या. पण बोलणार कसे? मी म्हटलं काका, काका काय झालं काका? हुंदका आवरत, डोळे पुसत काका बोलले. सकाळी सकाळी ती भंडाऱ्याची दुर्घटना बातम्यांतून समजली. १० तान्ही बालकं, नुकतीच जन्मलेली, गुदमरून……पुढचं वाक्यही त्यांच्या तोंडून बाहेर पडले नाही.

देव तरी किती निष्ठुर असेल रे, मारायचेच होते, तर जन्माला का घातले? मी म्हटलं काका, आता दोष तरी कुणाला द्यायचा? देवाला, व्यवस्थेला की नशिबाला? काका बोलले मानवाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडली आहे. यात कोण दोषी आहे, कोण नाही, याची चौकशी होईल. कुणावर तरी जबाबदारी ढकलून कुणाला काही काळासाठी सस्पेंड केले जाईल, ते सगळे सोड. आपल्याला आज समजले आपण अजून दोन दिवस अश्रू गाळत बसू. पण त्या, त्या आई-बापांचे काय रे?

अरे घरच्या दावणीवरील कालवड जन्माला आल्यानंतर थोडे दिवसांत गेली, तर तुझ्या काकीला आणि मला अन्न गोड लागत नव्हतं. आजही आठवलं तरी तुझ्या काकीच्या आणि माझ्या डोळ्यात पाणी येते. मग त्या तान्हुल्यांच्या आई-बापाचे काय होत असेल रे? कसं हे दुःख ते सहन करीत असतील? आईने ९ महिने पोटात वाढवलं. सगळी काळजी घेतली. चांगलं-चुंगल खाल्लं. स्वतःसाठी नाही रे, मी खाल्लं तर माझ्या बाळाला चांगलं पोषक दूध मिळेल. काय करायचं काय रे, तिने त्या दुधाचे? छाती पिळून ते दूध काढून रस्त्यावर ओतून द्यायचे? अरे तिला किती यातना होत असतील रे? बाळाचे ते मऊ लुसलुशीत ओठ कधी छातीला स्पर्श करतेत असे तिला झाले असेल आणि काळाने तिच्यावर असा आघात करावा?

बातमी पाहिली आणि नाही राहवलं बघ. काकीला काही बोललो नाही, डोळे आणि उर भरून आला म्हणून थेट तुझ्याकडे आलो. एवढा वेळ मी फक्त शांत बसून काकांचे ऐकत होतो. निःशब्द झालो होतो. काय बोलावे तेच कळत नव्हते. काका बोलत होते, तसे प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभे राहत होते. जगात कोण कुणाचे दुःख हलके करतो? बातमी मी पण वाचली होती. मलाही दुःख झाले होते. पण ज्या भावनिकतेने काकांनी ती बातमी घेतली, त्यामुळे मी निःशब्द झालो होतो.

काकांची अगतिकता मला कळत होती. पण मी ही अगतिक झालो होतो. काय बोलावे तेच समजत नव्हते. मी म्हटलं काका, सर्वच गोष्टी आपल्या हातात नसतात. काळ सगळ्या जखमा भरून काढतो. आपण काय करू शकतो? संवेदना प्रकट करणे आणि देवापुढे हात जोडणे. यापेक्षा आपल्या हातात काही नाही. काकाही बोलले परमेश्वराची इच्छा. मग मी कॉफी सांगितली. काकांनी आणि मी कॉफी घेतली आणि काका निघून गेले. पण मी मात्र अजूनही हळहळतच आहे. त्या १० माता-पित्यांच्या किंकाळ्या ऐकू येताहेत आणि हतबलता दिसून येतेय. हे खंडेराया त्या बालकांच्या आत्म्याला शांती दे आणि त्या अभागी माता-पित्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती दे. तसेच लवकरात लवकर त्या बालकांना परत त्यांच्या पोटी जन्म दे. एवढी प्रार्थना करून मी पुढील कामासाठी निघून गेलो.

-किशोर बोराटे