स्मृतीगंध
खुणावती पाऊलखुणा….करता प्रवास हा जुना…..आठवे त्या निरागस बालपणा….
ट्रेक नंबर ४
खिंडवाडी… जानाई मळाई डोंगर.
रविवार म्हणजे कुठेतरी निसर्गाच्या सोबती घालवू वाटणारा दिवस…..मित्र परिवार सोबत असेल तर त्या दिवसाची मजाच न्यारी…पण सगळेच कामात व्यस्त असल्याने….लांब कुठे जाणे शक्य नाही हे जाणवले…..पण थोड्याच वेळात पूर्ण होईल….आणि मनाला आनंद देईल….असं आठवणीत येणारं ठिकाण म्हणजे माझ्या गावचे दैवत…. जानाई मळाई देवस्थान….पण मग जर फिरायचे आहे….तर नेहमीच्या पाऊलवाटा कशाला हे ठरवून…..प्रवास केला… खिंडवाडी गावातून सुरू होणाऱ्या डोंगर रांगातुन…. अशाच भटकंतीला सध्या आपण ट्रेक म्हणतो…
काही क्षणचित्रे आहेत ज्यातून प्रवास मार्ग कळेलच….पण चालताना मनात विचार आला…..ह्याच त्या वाटा….हाच तो मार्ग जिथे आज बॅग…पाणी….शूज…मोबाईल….हा सारा लवाजमा….सोबत घेवून निघालो.
त्याच वाटांवर मित्रांसोबत…पायात साधी चप्पल… हाप चड्डी….शर्ट…हातात लगोर…..असा शिकारी बाणा…घेवून…मधाची पोळी शोधणे…..आणि उगाच जास्त मोठे शिकारी असल्याची ऐट आणत… पक्ष्यांची शिकार करायला निघणे…. हा सुट्टीचा रोजचा क्रम…शाळांना दिवाळी…उन्हाळा सुट्टी लागली….आणि दिवसा घरी थांबलो असेल ते फक्त शक्तिमान पाहायला…..ते संपले…की त्याच्या सारख्या घिरक्या घेत…घरातून काढता पाय घ्यायचा…ते संध्याकाळीच माघारी……मग रानात……बोरे ,जांभळे,करवंदे,कैऱ्या….आणि गोड मध खावून पोट भरायचे…. आणि ह्याच डोंगरात स्वतःला हरवून द्यायचे….आज त्याला ट्रेक म्हणतोय….
हरवले ते दिवस…..जिथे मोबाईल न्हवते…..पण मित्र कायम जवळ होते….कोणालाच नियोजन माहित नसायचे….पण कधी दिवस खराब जायचा नाही…..रोज नव्या आठवणी साठवल्या जायच्या….मग रात्री त्या गप्पा…मला आधी दिसले म्हव..म्हणजे मधाचे पोळे बरका….मग ते काढले कसे….मध किती मिळाला…..ह्याला लय… गोड बोर घावली…माझी आंबट होती…आज वाचलो आंबे काढताना घावलो असतो…बर झाल…ह्याला राखणीला ठेवलेला…आता असे करू…उद्या ह्यापेक्षा जास्त म्हवं काढू…लय करवंदे गोळा करू…असल्या त्या गप्पा…मधून एखादा म्हणणार….सुट्टीचा दिलेला घरपाट(गृहपाठ…होमवर्क बरका.) झाला का…मग त्यावर चर्चा….असा काय तो दिनक्रम….. खोराडी,दिवाणमाळ,भक्तिन जाळी,वाघाची खोरी,हत्तीचा पाय, गोवळ झरा, भोसल्याची ताल, बाबराची खोरी,अमल्याचा माळ ही असली आमची हिंडायची ठिकाणे….आणि आमचा स्विमिंग पूल म्हणजे पाझर तलाव…जिथे आमच्या सोबती असायच्या म्हैशी….मग ते गढूळ पाणी कसे स्वच्छ वाटायचे देव जाणे….पण आता मिनरल पाण्यात पण बारीक नजर पडते….काही घान तर नाही ना हे पाहायला…. पण आज हे सगळे आठवणीतच राहिले….कधी…कसे….आणि का मोठे झालो….कळलेच नाही…..वय वाढले….मित्रांच्या आवडी बदलल्या….आणि ह्या जुन्या वाटा…कायमच्या मनातच बंद झाल्या…आज आपण सगळे फिरतो….वेगवेगळे….पिकनिक स्पॉट शोधतो….. भले तिथं गर्दी असेल….पण त्या गर्दी मध्ये एकांत शोधतो….कारण….मनात असते ना….आज सुट्टी…मग आज एंजॉय….आज दूर फिरायला जायचे….पण अशी दूरची ठिकाणे…आपल्याला कधी जवळची वाटू लागतात….कळतच नाही…कारण…कोणतरी तिथे गेलेला असतो…काही क्षणचित्रे पाहिली असतात….मग त्यानुसार…आपसूक आपण देखील तिकडेच खेचले जातो….
पण आज असे झाले नाही….आज प्रत्येक पाऊल मला माझ्या बालपणात घेवून जात होता….अरे इथे…. मसाले भाताची पार्टी केली होती…इथे पोहे बनवले होते….इथे ह्याची त्याची हाणामारी झाली होती…ती भांडणे पण क्षणिक असायची….कारण तेव्हा मने साफ होती…
सांगायचं फक्त एकच आहे…..कधीतरी तुम्हीही हरवून बघा ना…अशाच काही क्षणांमध्ये…..जिथे जगाला दाखवावी अशी सुंदर दृश्य नाहीत….काही कोणती कलाकुसर नाही…..तिथे काय सांगणार ह्या ट्रेक बद्दल….पण असा ट्रेक असावा..जिथे आपले बालपण गेलेलं असते..कारण तिथे कोणती…कलाकुसर नाही मिळत पाहायला….पण आपण कसे घडलो….कसे बिघडलो….कसे वाढलो….ह्या आठवणी आपसूक जाग्या होतात….आणि आठवतात आपली ती जुनी सारी मित्रमंडळी…जी ह्या जगाच्या स्पर्धेत….स्वतःला सिद्ध करायला वेगवेगळ्या ठिकाणी गेलेली…..पैसा कमवून भविष्य सुरक्षित करायला गेलेली….ह्याच भविष्याच्या विचारात….कधी हा गोड भूतकाळ….मनाच्या खोल कप्यात दबला जातो कळतच नाही.
त्या आठवणी विकत नाहीत मिळत…त्या अनुभवणे हाच असतो एक विलक्षण आनंद….आता विकत मिळतातं त्या वस्तू असतात….आणि त्या सोबत असतो तो फक्त मोजेलेल्या नोटांचा तपशील….
निलेश बाबर
शब्दसारथी.