स्मृतीगंध…..ट्रेक नंबर ५……खिंडवाडी…सूर्यपाठ मार्गे…. अजिंक्यतारा

स्मृतीगंध

प्रवास आयुष्याचा जरी असे खडतर
तरी दुःखास तुडवून पायी व्हावे वरचढ

ट्रेक नंबर ५

खिंडवाडी….सूर्यपाठ….उंटाच्या मानेचा डोंगर…..दक्षिण दरवाजा मार्गे अजिंक्यतारा

काहीतरी नवीन करू ….यापेक्षा काहीतरी जुने अनुभवू…..असा विचार केला ना की बऱ्याच नव्या गोष्टी पण सापडत जातात.
लहानपापासूनच चंद्राला मामा आणि सूर्याला देव..असे म्हणत आलो.या आधी देखील हा मामा आणि देव एकावेळी पाहिले आहेत.पण क्षणचित्रात कैद करण्याचा योग काल आला.
परवा असणारी पौर्णिमा यामुळे काल देखील सकाळी चंद्राचे पूर्ण शीतल रूप पाहायला मिळाले….दक्षिणेकडे तोंड करून सूर्यपाठ डोंगरावर उभे राहून… मान पूर्वेकडे वळवली की उगवता सूर्य आणि पश्चिमेकडे मावळता चंद्र पाहिला.
ते दृश्य फारच विलोभनीय वाटले… जस जशी सूर्याची दाहकता वाढत गेली….चंद्राचं अस्तित्व मिटत गेलं……हे खर नवीन नाही….ह्यात काही मोठं विज्ञान मी सांगणं… हे पण शोभत नाही……पण मी जरा वेगळा विचार करत गेलो…..काही जण म्हणत असतात आपलं हे नश्वर शरीर पंच महाभूते आहेत त्यांनी बनले आहे..ह्यात विलीन तर होणार ….पण निसर्गात असणाऱ्या ह्या शक्ती बराच बदल शरीरावर घडवत असतात…..
काही माहित नाही… ह्यात किती तथ्य आहे….कारण तेवढा माझा काही अभ्यास नाही….पण ह्यातून मला जे काही वाटले ते तुमच्या सोबत बोलून मन मोकळे करू वाटले एवढच काय ते आजच्या लेखाचे निम्मित….
माणसाच्या आयुष्यात तरी काय वेगळे आहे. सूर्यासारखं तेज असावं म्हणले जाते…..चंद्राची शीतलता अंगी असावी असं देखील बोलतात….पण बघा ना ह्या दोघांचं कधी पटत का..?
कारण सूर्याचे तेज हे ठराविक काळचं सहन केले जावू शकते…नाहीतर वाढणारा पारा चंद्राचं अस्तित्व संपवूनच…गप्प बसतो.
खुल्या आसमंतात मग हा एकटाच राजा आपली हुकूमत दिवसभर गाजवून….सांज वेळेला परतीचा प्रवास करतो….दिवसभर डोळे भिडवू न शकणारे आपण मग त्याचे मावळते रूप आनंदाने कैद करतो…
शेवटी काय तर त्याचा तापटपणा…..संसाराचा पसारा सावरायला…..जीवांना ऊर्जा द्यायला असेल गरजेचा….पण सोबत कोणाला हवी असते ह्या तप्त भास्कराची….?
तेच उलट पाहिले तर बघा ना…भले जीवनात अंधार असेल….भले एकटेपणाचा काळोख दाटला असेल….त्यात थोडासा प्रकाश घेवून येणारा चंद्र….आपल्या शितलतेमुळे….असंख्य तारकांना आपलासा वाटतो…..कारण फक्त एकच त्याच्यात तेज असते….पण दाहकता काहीच नसते….
जीवनाच्या प्रवासात ह्यातून एक गोष्ट नक्की शिकावी…..आपल्या नोकरीचा भाग…..आपल्या कर्तव्याची जाण…..ह्यात वरून अगदी रुश्ठ रहावं लागतं असेल……काही पदांवर काम करताना ….. खूप काही गोष्टी ह्या आपल्या जवळच्या व्यक्तीला पण न सांगता…..जीवन जगावं लागत असेल…..पण जसे सूर्य त्याची दाहकता देवून धरतीचे जीवन सुखमय करत असतो….तसेच आपण देखील जबाबदारी पार पाडावी…..पण सांजवेळ येईल तेव्हा नक्कीच आपल्या परीजणांना…..आपल्या आतून असणाऱ्या रंग छटांनी…त्यांचे जीवन कसे मोहक बनवता येईल हे पहावे.
आणि ज्यांच्या जीवनात कधीही वरुन रागाने वागणे….हे कधी गरजेचे नसेल… त्यांनी….नक्कीच त्या चंद्राचा विचार करावा….त्याचे अस्तित्व तरी काय…जो रोज एका अवस्थेत दिसू शकत नाही…कलेकलेने वाढणे….आणि पुन्हा… ढळणे…..हेच ज्याच्या नशिबी…असा हा चंद्र…आपल्या आतील असणाऱ्या शांत ऊर्जेने….साऱ्या तारकांना मोहून सोडतो…..असेच तर असावे आपले जीवन…. भले सुखाच्या काही गोष्टी आज कमी पडतील….उद्या मिळतील….रोज भले…..जीवनात करावी लागत असेल अस्तित्वाची लढाई….पण मनाचं स्थैर्य ढळू नाही दिले पाहिजे…..
असा जर जगण्याचा आनंद घ्यायला जमला तर…? तर कशाला होईल जीवनाची फरफट…..फक्त स्वत्व शोधता यायला हवं….नाहीतर … दूनियेने आखलेल्या मार्गावर चालत बसून सुख शोधत असाल तर लक्षात ठेवा….त्या मार्गावरून जाताना हिरवळ सापडणे जरा अवघडच असते…
कारण आपल्या पुढे असणारे…..ते सारे लुटत निघून गेलेले असतात….मागे राहते ती फक्त एक पायवाट….जी तुम्हाला जीवनाच्या अंतापर्यंत घेवून जाते…मग मागे वळून पहाल तेव्हा जाणवेल….अंत तर जवळ आला पण जीवन जगणे राहून गेले.
म्हणून आमचा आजचा हा वेगळा प्रवास खूप काही शिकवून गेला…..खिंडवाडी….सूर्यपाठ….मार्गे अजिंक्यतारा करताना एक विलक्षण अनुभव आला….रोज डोळ्या समोर दिसणारी टेकडी….त्यावर फडकणारं…भगवे निशाण….सारे पाहून जरी असलो तरी…वाट कधी वाकडी पडली नाही….हायवे वरून ये जा करत सुरू असणारा रोजचा प्रवास…फक्त दिवस ढकलणे…हेच काय ते शिकवत होता….सुख शोधायला….मग कुठं हॉटेल मध्ये जेवण..तर कधी….नावाजलेल्या ठिकाणी क्षणचित्रे गोळा करणे….ह्या पलीकडे काही घडतं न्हवते….
पण ह्या मार्गे प्रवास करत अजिंक्यतारा गाठला त्यात वेगळाच अनुभव आला…..काही ठिकाणी धडकी भरवणारी चढण….तर काळजाचा ठोका चुकवणारी उतरण…पण ओढ होती ती पटकन दक्षिण दरवाजा गाठून…राजधानी वर मनाला विसावा द्यावा….
मग प्रवासात सापडले बिबट्याच्या पावलाचे निशाण…. मोर…लांडोर…आणि एक सुखाचा प्रवास.
अजिंक्यतारा आपण सर्वांनी अनुभवला आहेच….त्याबद्दल काय वेगळे सांगणार……पण त्याच्या सभोवती पसरलेल्या ह्या रांगातून स्वच्छंदी फिरण्याचा आनंद आपण नक्कीच घ्यावा अशी एक प्रेमळ अपेक्षा.

निलेश बाबर
शब्दसारथी