स्मृतीगंध
तुफानाला पेलण्याचं सामर्थ्य अंगी आले तर वाऱ्याची भीती वाटत नाही.
फक्त स्वतःला स्वतःच्या क्षमतेपेक्षा पुढे खेचता आले पाहिजे.
ट्रेक नंबर ६
चंदन वंदन गड
सह्याद्रीच्या कुशीत वसलेली दोन जुळी भावंडं अशी ओळख असणारे किल्ले चंदन आणि वंदन साताऱ्यापासून अगदी ३० – ३५ किमी अंतरावर स्वराज्याची साक्ष देत उभी आहेत.
गडावर जाण्याच्या अनेक वाटा आहेत… राऊतवाडी….बेलमाची….. अरबवाडी….आणि… बनवडी मार्गे.
सातारा फलटण रस्त्यावरून जाताना लागणारे अंबवडे गाव आहे तिथून ५ ते ७ किमी अंतरावर असणाऱ्या बनवडी मार्गे गडाची चढाई करणे खूप सोपे आहे…..पण जर काही दुर्ग प्रेमींना थोडा रोमांचक अनुभव घ्यायचा असेल तर त्यांनी…भुईंज मार्गे…किकली….आणि मग बेलमाची….तिथे पायथ्याला आपली वाहने लावून चढाई सुरु करावी.. सुरुवातीला भैरवनाथाचे असणारे छोटे मंदिर आहे त्याचं दर्शन घेऊन पुढचा प्रवास करावा.
चढाई पुढची असली जरी सोपी…तरी भटकंतीचा अनुभव असणाऱ्या दुर्ग प्रेमींनी….वंदन गड बेलमाची मार्गे चालून पहिल्यांदा चंदन गडाकडे… कपारी ची बाजू आहे तिथून चालावे…
मग जाणवेल….नावाने चंदन वंदन असणारे हे दुर्ग कसे हृदयाचे स्पंदन वाढवतात.
पूर्वी ह्याच गडांची नावे शुरगड आणि संग्रामगड अशी होती..नंतर छत्रपती शिवाजी राजांनी ही नावे बदलून चंदन वंदन ठेवली असे पुरावे आढळतात.
चंदन गडावर गेले की सुरुवातीलाच एक महादेवाचे मंदिर लागते….तिथे २ पंचलिंगी शिवलिंगे दिसतील…तिथे नतमस्तक होवून…स्वराज्याला….शिवरायांना…आणि एकनिष्ठ मावळ्यांना आठवून मग मन भरून येते….पुढे दर्गा….नंतर दगडी विहीर….आणि मग लागते ते दारूगोळ्याचे कोठार……आजही त्या भिंती भक्कम उभ्या आहेत….दुर्लक्षित अवस्थेत अडकलेल्या काट्यांच्या वेढ्यात अडकुन देखील ही दारूगोळ्यांची कोठारे आजही स्वतःच्या अस्तित्वाचे तेज दाखवत आहेत….तिथून दिसणारा वंदन गड हा अगदीच मोहून टाकतो….
पावसानंतर दिसणारे हिरवे रूप नक्कीच मनाला मोहून टाकत राहील….पण गडांची ही दौलत पहायला….मनात ओलावा असला की गडाची हिरवळ नाही तर पानगळ सुध्दा नव्याने प्रेमात पाडते….आज पर्यंत गडांवर फिरताना माकडे अनकेदा पाहिली….आपण सर्वांनी ती पाहिली असतीलच….पण इथे थोडा वेगळा अनुभव आला….काही ठिकाणी….माणसांना बघून पळून जाणारी माकडे पाहिली……तर बऱ्याच ठिकाणी…आपल्या हातात काय खायला आहे ते खेचून पाहणारी माकडे पाहिली……ह्यात त्यांचा काही दोष असे मला नाही म्हणायचे…पण इथे निवांत बसलो असता…..जवळ येणाऱ्या माकडांनी….काही असे केलेच नाही की.. त्यांना ओढून काही खायचे आहे असे पण जाणवले नाही…..निवांत न घाबरता फक्त शेजारी येवून बसणारी ही मंडळी…..मनाला अजूनच आनंद देवून गेली….. स्वार्थापोटी जवळ येणारे… आणि….भीतीपोटी पळणारे…असे खूप लोक आपल्या जीवनात येत जात असतात……पण कोणत्याही अपेक्षेविना…फक्त मायेने जवळ येणारे कायम मनात राहतात. असाच काही अनुभव आम्हाला तिथे मिळाला.
हाच विचार करत जात असताना सहज लक्ष गेले ते एक वयस्कर शांत बसलेल्या माकडाकडे….सोबत घेतलेली एक कॅडबरी…सहज त्याच्या हातात दिली…..पण असे शांतपणे खाणाऱ्या त्या जीवाला….कॅमेऱ्यामध्ये…. कैद करण्याचा मोह नाही आवरता आला….असे विनाकारण खाऊ देवून फक्त फोटो साठी केलेला हा खटाटोप न्हवताचमुळी…..पण निर्विकारपणे त्यांनी सोबत बसणे मनाला खूप विलक्षण अनुभव देवून गेले.
बोलण्याच्या ओघात विषय बदलून गेला खरा….पण सांगू वाटला हा सगळा अनपेक्षित अनुभवलेला सारा पसारा.
चंदन गडाची सफर झाली की पुन्हा परतीचा प्रवास करत वंदन गडाकडे पाऊल वळतात…..स्वागताला उभी असलेली कमान…त्यावर कोरलेली गणपतीची मूर्ती…..त्या कमानीची भव्यता…. आणि त्यावरील कलाकुसरीची…जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमी…तिथून आत जाताना दुसरी कमान लागते…त्यातून आत गेल्यावर दिसणारे जे द्वार आहे त्यावर लिहलेले फारशी भाषेतील शब्द नाहीत वाचता येत…पण तिथे दिसणारी ही वाड्याची ठेवणं…रचना….मनाला खूप स्पर्श करून जाते…..मग येतो तो शेवटचा टप्पा…..तिथे दिसतात पुन्हा ३ दारूगोळ्यांची कोठारे….चंदन गडावर असणाऱ्या कोठरांपेक्षा ही तिन्ही कोठारे सुस्थितीत वाटतात….तसेच पुढे गेले की पाण्याचे तळे दिसते….आणि बाजूलाच आहे तो सूर्ख अब्दालसाहब दर्गा….. आणि काही अंतरावर आहे ते छोटेसे शिव वंदनेश्वर मंदिर…तिथे असणाऱ्या शिवलिंगाचे दर्शन घेवून सुरू होतो मग परतीचा प्रवास.
एकाच दिवशी केलेल्या हया जोडून असणाऱ्या दोन गडांच्या प्रवासाने….शरीर थोडे थकले तरी..मनाला नक्कीच एक ऊर्जा मिळेल…..रोजच्या धावपळीच्या जीवनात सगळेच जण व्यस्त आहेत..कामाचा ताण…जबाबदारीची ओझी…आणि कर्तव्याची जाण…ह्यात आपण सगळेच एवढे गुरफटले गेलो आहोत की… स्वतःचं मन ओळखणे ह्या साठी पण मानसोपचार तज्ञांचा सल्ला लागत आहे….जगणं खुप सोप आहे….पण व्यर्थ गोष्टींमध्ये अर्थ शोधण्याचा प्रयत्न करण्यात आपण सारे एवढे गर्क झालो आहोत की सगळे काही मिळवण्याच्या ओघात मनात स्वार्थ कधी जागा होतो आणि जगण्याचा अर्थ कसा बदलून जातो…
हेच कळत नाही….पण एक म्हण आहे …”लोहा ही लोहे को काटता है”….हे वाक्य अगदी योग्यच आहे…कारण…अशा काही दुर्ग दर्शनातून…..स्वतःला स्वतःच्या मर्यादेपेक्षा जास्त खेचू शकलो…तर रोज वाटणारी कामाची ओढाताण खूप कमी वाटेल…कारण…..रोज वाटणारा कामाचा डोंगर…. हा असे काही इतिहासाने रंगलेले डोंगर अधून मधून चढ उतार करू लागलो की ….नक्कीच स्वतःच्या विचारांची मर्यादा आभाळाहून मोठी झालेली जाणवेल.
शब्दसारथी
निलेश बाबर