शिक्षणातील यशोगाथा: डॉ. अनिल कुलकर्णी

शिक्षणातील क्रांतीचं पाऊल :ग्राममंगल
डॉ.अनिल कुलकर्णी.
कोणत्याही नवीन शैक्षणिक धोरणाची खूप चर्चा होते, त्याच्यावर लेख छापून येतात पण आपल्या मुलांना कशां प्रकारचे शिक्षण कसं, केव्हा, कधी, कुठे, द्यायचं या बबतीत स्वातंत्र्य कुठे आहे?.बहूतेक पालक शिक्षण प्रक्रिये बद्दलअनभिज्ञ असतात. मुलांना फक्त शाळेत घातलं की झालं, पालकांनी नुसती प्रगतीपुस्तकावर सही करणं
आता अपेक्षित नाही. मुलं किती शिकली, काय शिकली, केव्हां शिकली, हे पाहणे आवश्यक झालं आहे. कोव्हीड ने ऑनलाइन, ऑफलाईन दोन रस्ते ठरवून दिले. दोन्हीचे टोल वेगवेगळे. ज्यांच्याकडे पैसा आहे ते ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. ज्यांच्याकडे तंत्रज्ञान नाही, असले तरी ते वापरायचं ज्ञान नाही,त्यांतही तंत्रज्ञानाला नेट नसेल तर ते धूळखात पडतं, आणि ग्रामीण भागात हीच परिस्थिती आहे.
प्रचंड फिस भरायला पालक तयार आहेत, पण कटकट नको, मुलांचं काय करायचे ते शिक्षकांनी करावं, शाळेने करावं, पण आता असं चालणार नाही, पालकांनाही शिक्षण प्रक्रियेत सहभाग घेणे क्रमप्राप्त झाले आहे. प्रत्येक घर आता learning home व प्रत्येक शाळा learning school होणे आवश्यक आहे.
घाण्याच्या बैलाप्रमाणे मुलाला अभ्यासाला जुंपले जात आहे, अगदी लहान वयापासूनच पुस्तकांचा भडिमार, लिहून घेण्याचा सराव,अशा परिस्थितीत आमचे चिमुरडे शिक्षण घेत आहेत. पाच नाजुक बोटें विकसित व्हायच्या आधीच त्यांच्यावर ताण दिला जातोय.पाच नाजूक बोटांचे कौशल्यच आयुष्याचा गुलमोहर किंवा निवडुंग करतात.
कागदावर खूप छान चित्र रंगवलं आहे, प्रत्यक्षात पाटी कोरीच आहे. शिक्षक शिकवतात, मुलं शिकतात असं चित्र भासवलें जात आहे, पण कोणत्याही प्रकारची कौशल्य शिकत नाहीत, हेच आजच्या शिक्षण व्यवस्थेचे दुर्दैव आहे.शिक्षण प्रमाण भाषेतूनच दिलं जातं पण, अनेक भागात मुलें बोलीभाषेत विद्यार्थी बोलतात, त्यांना प्रमाण भाषा कळत नाही, त्याचं काय? सध्याच्या शिक्षण पद्धतीत मुलं खेळत नाहीत, मुलांमध्ये संवाद नाही, असतो तो फक्त गोंधळ. प्रचंड विद्यार्थी संख्ये मुळे, मुले गटात काम करत नाहीत, गटात सामूहिक काम नसल्यामुळे, पर्यायाने शिक्षक नसतील तर विद्यार्थ्याला कोणतीच कृती करायला वाव नाही आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना सांभाळणं एक जिकरीचं काम सध्यां शाळें मध्यें असतं.
ग्राममंगल च्या शाळा पाहण्याचा नुकताच योग आला. डहाणू तालुक्यातील ऐना, पालघर तालुक्यातील विक्रमगड, पुण्यातील ग्राममंगल अशा शाळांमधून विद्यार्थी घेत असलेले शिक्षण पाहण्यात आले, आणि खूप समाधान वाटले. ग्राममंगलने नेमके केले काय? तर त्यांनी आधी विद्यार्थ्यांना गुंतवण्यासाठी लागणारी शैक्षणिक साधने तयार केली, कायम स्वरूपात विद्यार्थी वापरू शकतील अशी, ती वर्गातच कपाटात ठेवण्यात येतात. गटात कृती होत असल्यामुळे संबोध स्पष्ट होतात व ग्रहपाठाची तशी गरज पडत नाही. त्यामुळे पाठीवरचे ओझे ही कमीच असते.
ग्राममंगल ने यापूर्वी शैक्षणिक साधन निर्मितीची अनेक प्रशिक्षणे घेतली आहेत, तसेच शैक्षणिक साधने विक्री साठी ही त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.
या शाळेत विद्यार्थ्यांना बसायला बाक नाहीत, खालीच विद्यार्थी बसतात, सामूहिक गटात विद्यार्थी काम करतात आणि शिकतात. खऱ्या अर्थाने
वर्गावर पहिली, दुसरी चौथी पाचवी, नववी, दहावी अशा पाट्या नाहीत तर विषयानुसार नांवे दिलेली आहेत. मराठी, इतिहास, गणित, भूगोल, विज्ञान. त्या त्या वर्गात विद्यार्थी प्रत्येक तासाला जातात, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची ही शारीरिक हालचाल होते व थोडा बदल ही होतो आणि विद्यार्थ्याला कंटाळा येत नाही.शाळेला तुम्ही केव्हाही भेट दिली तर शांतपणे काम चाललेलं असतं, कुठेंही गडबड नाही, गोंधळ नाही, शिक्षक फक्त मार्गदर्शकाची भूमिका निभावतात.
योग्य वयातच अवयवांची वाढ झाल्यानंतरच त्याच्या हातात पेन्सिल पेन दिलं जातं, इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं अक्षर सुंदर आहे.
शिकवण्याचा एक तर्फे मारा बंद झालां तरच विद्यार्थी शिकतील.
कवितेच्या तासात कविता ही करायची असतें हे सहावीतल्या मुलाकडे पाहून कळाले, त्याने अतिशय छान कविता बोर्डावर लावल्या होत्या.
भाजीपाला शाळेत लावल्यामुळे,शिकता शिकता त्याचा हिशोब करायला मुलं शिकतात. अनेक गोष्टी या कृती व अनुभव यावर आधारित आहेत आणि शिक्षक त्यांना मार्गदर्शन करतात.
खरंच सगळ्या शाळेतून असं होऊ शकतं का? शहरात चर्चा, गट, समूह कार्य होऊ शकणार नाही कारण पहिले डेस्क हलवायला पाहिजे, जागा भरपूर असेल आणि विचार करायलाही वाव भरपूर असेल तर काहीही करता येतं.
खेळाची साधने बागेतच पाहायला मिळतात पण इथल्या शाळेत खेळायची साधन असल्यामुळे, मुले भरपूर खेळतात, खेळण्यातून संवाद ,शारीरिक श्रम हे सगळं सहज साध्य होतं.
आपल्या सध्याच्या शाळांमध्ये खेळाचा एकच तास असतो त्यातही मुले खेळतांतच असंही नाही. गडबड करतात, गोंधळ करतात, हे कुठेतरी संपायला पाहिजे. आता ही पद्धत अमलात आणायला जरी अवघड असली तरी, त्याचा विचार आम्ही कधी करणार आहोत की नाही?
प्रशिक्षण महाविद्यालयात घेतलेल्या प्रशिक्षणा प्रमाणे आमचे शिक्षक शिकवतात का? किती शिक्षक शैक्षणिक साधने वापरतात,याचा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे.
सिद्धांताप्रमाणे प्रात्यक्षिक झालं तरच शिक्षण सुधारणार आहे.
आजच्या पारंपारिक शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्याचं गृहपाठ सुद्धा काही पालक करतात, मुलाला शिक्षा होऊ नये म्हणून.
कृती नाही, आनंद नाही अशा प्रकारचे शिक्षण मुले घेत आहेत.शिक्षक मानसशास्त्र शिकलेले असतात पण मुलांचे मानसशास्त्र ओळखण्याची आणि ओळखलं तरी त्याची अंमलबजावणी करण्याची संधी शिक्षकांना मिळतच नाही. पारंपारिक शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षकच बोलतात, विद्यार्थी ऐकतात. ग्राममंगल मध्ये वर्गातच सर्व शैक्षणिक साधने असतात आणि ती विद्यार्थ्यांना दिले की गटात विद्यार्थी काम करतात आणि शिक्षक फक्त निरीक्षण करतात. सगळं शांत गडबड गोंधळ न होता चाललेलं असतं.
आजच्या पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये नुसतं माहितीचं पाठांतर केले जातं, ज्ञान व त्याचे उपयोजन या फार दूरच्या गोष्टी आहेत. कोणत्याच प्रकारची कौशल्य घेऊन मुले बाहेर पडत नाहीत हे दुर्दैव आहे.विद्यार्थ्यांना साधे हिशोब येत नाहीत, दुरुस्तीचे काम जमत नाही,श्रमा चे काम जमत नाही,वाचन नाही, संवादाला वाव नाही.
संबोध स्पष्ट झाल्याशिवाय ज्ञान मिळतच नाही आणि हीच आज ची शोकांतिका आहे. शासनाने काहीशाळा ग्राममंगलला चालवायला जर दिल्या तर निश्चित फरक दिसू लागेल. लोकसहभाग आणि देणगीतून शाळा चालू शकतात हे ग्राममंगलने दाखवले आहे.
शैक्षणिक साधनांची विक्री, निर्मिती प्रशिक्षणही ग्राममंगल घेतं. सध्या येना, विक्रमगड पुणे येथे ग्राममंगल शाळा चालू आहेत.वाई येथे विकास गटाच्या माध्यमातून काम चालू आहे.
रमेश पानसे त्यासाठी शहरी भाग सोडून येथे कायम वास्तव्यास आले आहेत आणि शाळा सुंदर करण्याचे त्यांचे स्वप्न आहे आणि ते हळूहळू साकार होत आहे.
कोसबाडच्या टेकडीवरून अनुताई वाघ यांनी दिलेली हाक ऐकून रमेश पानसे हे कार्यरत आहेत. आदिवासी भागात माणसे पेरली की काम ,चळवळ पुढे जाते.
प्रत्येक दिवस तपासणी चा आहे अशाप्रकारे शाळा चांलली पाहिजे ,कधीही, केव्हांही.
मुलांच्या अवांतर वाचना साठी पुस्तकें मांडून ठेवलेली असतात व मुलं पुस्तके वाचतात.
कृती, आनंद, परिसराशी समरसून असणं, त्यात गुंतून असणं, म्हणजेच शिक्षणते इथे पहायला मिळतं. शिक्षण, गट कार्यात मुलं इतके गुंतून गेलेली असतात की शाळा पाहायला कोणी आलंआहे, हे त्यांच्या लक्षातही नसतं, ते शिकत राहतात.
चांगल्या व नाविनपूर्ण शाळा वाढल्या तरच समाजात अपेक्षित बदल दिसायला लागतील.
डॉ.अनिल कुलकर्णी.

मन

वडील..