स्मृतीगंध…..ट्रेक नंबर ८…..वैराटगड

स्मृतीगंध

रोजचाच हा प्रवास नवा…. भेटतात नवे रोज चेहरे किती…. जेव्हा झाकले मनात स्वतःच्या…. तेव्हा सापडलो माझ्यातील मी

ट्रेक नंबर ८

वैराटगड

साताऱ्यापासून अगदी ३०-३५ किमी अंतरावर असणारा एक छोटेखानी पण अगदी सुरेख असणारा गड म्हणजे वैराटगड……गडावर चढाई करण्याचे २ मार्ग आहेत.पाचवड – वाई रस्त्यावर असणाऱ्या व्याजवाडी गावातून जाणारा एक रस्ता आहे.ह्या मार्गे थोड्या भागात चढाई जरा अवघड वाटते नाहीतर चढाई एकदम सोपी आहे.तर दुसरा मार्ग आहे तो पाचवडच्या थोडे अलिकडून कुडाळ कडे जाणाऱ्या सरताळे- कापसेवाडी गावातून.ह्या मार्गे गडाच्या अगदी पायथ्यापर्यंत गाडी घेवून जाता येते…ह्याच मार्गे गडाची चढाई करण्याचे ठरवले आणि त्यानुसार आम्ही पाच जण वैराटगडाच्या दिशेने मार्गस्थ झालो.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने हिरवळ कुठे पाहता येत नाही…त्यात असलेले वाळलेले गवत देखील जळलले…जाळलेले दिसते….नाकाडावरून गडावर जाणारी पायवाट अगदी स्पष्ट दिसते….पण चढाई पूर्वी सोपी वाटणारी चढण पाय घसरत असल्याने थोडी अवघड वाटते…चढाई चे ३ टप्पे लागतात…थोडी खडी चढाई केली की पुन्हा…सपाट असा भाग…पुन्हा पुढचा टप्पा…असा हा प्रवास….थोडीशी थ्रील…आणि थोडा आराम… अश्या मिश्र स्वरूपाचा वाटतो…बऱ्याच ठिकाणी घसरता भाग आहे आणि तिथे सावरता यावे यासाठी झाडी देखील नाही त्यामुळे एक तर पायातील शूज खूप चांगले असावेत…नाहीतर स्वतःचे स्वतःला तशा भागात सावरता येईल हे कसब अंगी असावे.
प्रत्येक टप्पा पार करताना समोर दिसणारे गडाचे शिखर पाहताना मनाला एक वेगळाच आनंद होत असतो…..आपल्या सह्याद्रीला लाभलेली कड्या कपारीची भक्कम जोड ही खरंच खूप विलक्षण आणि अतुल्य आहे…
गडाची बांधणी ११ व्या शतकात शिलाहार राजा भोज ह्याने केली आहे….नंतर हा गड आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सामील झाला तेव्हा वैराटगड हे एक टेहेळणीसाठी,शस्त्रागार आणि लष्करी ठाणे म्हणून होते…..
गडाचा थोडाफार इतिहास सांगण्यापूर्वी मला सांगायचं आहे ते तिथल्या पाण्याच्या टाक्यांचे वैशिष्ट्य….म्हणतात ना निसर्गापेक्षा मोठा कलाकार कोण असूच शकत नाही….तीच अनुभूती…तोच अनुभव इथे असणारी पाण्याची टाके पाहताना येतो….दगडाची भली मोठी निसर्गाने बांधलेली भिंत…..त्याच्या मुळाशी आहे ते आत खोलवर……पसरलेले पाण्याचे कुंड…..अशी ५ कुंड पाहायला मिळतील…..४ टाकी ही पाण्याने भरलेली तर आहेत…पण त्यात असणारे शैवाल…आणि इतर वनस्पती ह्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य नाही….पण पुढे असणारे एक टाके आहे ज्यात अगदी थंड आणि स्वच्छ असे पिण्यायोग्य पाणी आहे….अंगाची लाही करणाऱ्या ह्या उन्हातून जेव्हा गडाच्या मुख्यद्वारापासून…अलीकडे असणारी ही टाकी दिसतात तेव्हा तिथल्या थंड पाण्याने चेहरा धुतला आणि तिथे थोडा विसावा घेतला की सारा थकवा कसा क्षणात दूर होतो ह्याचा अनुभव हवा असेल तर नक्कीच सर्वांनी वैराटगड सफर करावी.
ह्या टाक्यांपासून थोडे पुढे आले की साधारण…२५ -३० पायऱ्या चढलो की मुख्य द्वार लागते….कमान पूर्णपणे ढासळली असली तरी ती तिच्या अस्तित्वाच्या खुणा स्पष्ट दाखवते…द्वारातून आत आले की लगेच डावी बाजू आहे तिथे लागते ते उताणा मारुतीचे मंदिर….मंदिरात सुबक अशी हनुमानाची मूर्ती आहे…तर त्या मूर्ती शेजारीच आपल्या शिवभक्तांनी एक सुंदर अशी बैठी…छत्रपती शिवाजी राजांची मूर्ती स्थापन केली आहे….मंदिराच्या बाहेर देखील खुल्या जागेत..आणखी एक हनुमानाची मूर्ती आहे…तिथून गडाची पश्चिमेकडील बाजू .. फिरायला जाताना….भग्न अवस्थेत…म्हणजे नुसते अवशेष म्हणले तरी चालू शकेल असे शस्त्रागार…..सरदारांचे वाडे….धान्य कोठार…हे पाहायला मिळेल….तसेच पुढे गेले की दिसणारी चोरवाट…ही मनाला खूप आनंद देवून जाते…आम्हाला देखील त्यातून खाली उतरण्याचा मोह आवरता आला नाही…थोडासा अवघड जरी वाटत असली तरी उत्तम अशी ही चोरवाट उतरणे आणि चढणे हे नेहमीच्या भटकंती करण्याची आवड असणाऱ्या व्यक्तींना खूप आनंद देवून जाईल…नवख्या व्यक्तींनी इथे उतरणे शक्यतो टाळावे…कारण….पूर्ण दगडी आणि निमुळता…खोल असणारा हा मार्ग इजा पण पोहोचवू शकतो….मग फक्त वरून ह्या वाटेला पाहून पुढे ध्वजस्तंभाकडे जावे…तिथून पुढे दिसणारा डोंगर आणि सभोवती असणाऱ्या त्याच्या रंगातून…दिसणाऱ्या पायवाटा सांगून जातात की इथे यायला वेगळ्या मार्गे…वेगळ्या पद्धतीने यायला…लोक आतुर असतात……
तिथून पुन्हा गडाच्या पूर्वेकडे चालताना दिसते ती गडाची भक्कम तटबंदी…एवढ्या वर्षांचा काळ निघून गेला तरी कपारीला असणारी ही भक्कम तटबंदी अभेद्य स्वराज्याची आठवण करून देते…
राजांनी अगदी मूठभर मावळे हाती घेवून गनीमाला कसे रोखले तर हाच अभेद्य सह्याद्री आहे जो एका मावळ्याला हजार हत्तीचे बळ देत होता…ह्याच कड्या कपाऱ्यातील दगड होते जे भेदक शस्त्र म्हणून चालवले जात होते….खरंच आपण सातारकर आहोत…..ह्या सह्याद्रीला जवळून पाहत आहोत..आणि ह्याच भक्कम कडा.. जिद्द ,चिकाटी आणि आपल्या निर्धाराला ठाम करण्याचे बळ आजही देत आहेत.
गडावर पूर्वकडे असणारे वैराटेश्वराचे सुंदर मंदिर १९९४ मध्ये पुन्हा नव्याने बांधले आहे…तिथल्या गाभाऱ्यात… पिंडीसमोर नतमस्तक होवून शांत आणि प्रसन्न वातावरणात स्वतःला स्थब्द करून आत्मपरीक्षण करत बराच वेळ तिथे बसलो की मनाला नक्कीच एक विलक्षण ऊर्जा…आत्मशांती…आणि प्रसन्नता मिळते.
ज्यांनी हा अनुभव घेतला आहे त्यांना नव्याने सांगणे गरजेचे नाही…पण जे कोणी गेले नसतील…त्यांनी नक्कीच साताऱ्यातून अगदी जवळ असणाऱ्या ह्या वैराटगडाला भेट द्यावी….
सरतेशेवटी राहिले ते शिवक्रांती हिंदवी सेनेचे कौतुक…..स्वप्नील धनावडे, सुधीर कांबळे आणि सर्व मावळ्यांचे मनापासून आभार…..गडावर सर्व ठिकाणी…योग्य मार्गदर्शक…मार्गसुचक फलक लावून…खूप मोलाचे काम केले आहे…..त्यामुळे….सोबत कोणी गाईड नसेल तरी खूप आरामात गडाची माहिती घेता येते…..शिवकार्यासाठी सदैव तत्पर…..ना आपली भेट झाली…ना आपली ओळख…पण राजांनी उभे केलेले स्वराज्य…आणि त्याचे पाईक होण्याचा प्रयत्न करणारे आपण सारे….हे एकमेकांचे आहोत ते ह्या शिवबंधनाने…..असेच कार्य सुरू ठेवू…असेच अवघे मिळून राहू…जय शिवराय….

निलेश बाबर
शब्दसारथी