महापुरुषांना पूजायला हवे, पण वाचायलाही हवे.

महापुरुषांना पूजायला हवे, त्याबरोबर वाचायलाही हवे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आपण पूजतोय. पुजायलाच पाहिजे. पण मला वाटते त्यापेक्षाही त्यांना वाचायला पाहिजे. माणूस त्याच्या कर्तृत्त्वाच्या जोरावर मोठा होतो. ते असामान्य कर्तृत्त्व बाबासाहेबांचे निश्चितच आहे. युरोपमधील २५-३० देश एकत्र करावेत, तेंव्हा एक हिंदुस्थान बनेल. एवढा मोठा आपला देश आज बाबासाहेबांनी बनवलेल्या संविधानानुसार वाटचाल करतोय. यापेक्षा बाबासाहेबांच्या बुद्धीचातुर्याचे दुसरे कोणते मोठे उदा. असू शकेल?

बाबासाहेब हे व्यक्तिमत्त्व नक्की कसे होते? त्याचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, एकंदरच भारतीय जनमानसावर प्रभाव टाकणारे त्यांचे विचार कसे होते हे त्यांची पुस्तके वाचल्याशिवाय आपल्याला समजणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बाबासाहेब, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, बाबू-गेणू, वासुदेव बळवंत फडके, टिळक, आगरकर, सावरकर, कर्मवीर, महर्षी धोंडो केशव कर्वे, पेशवे. इतिहासात प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान दिले आहे.

पण वरील महापुरुषांपैकी आत्ताच्या पिढीला किती महापुरुष माहिती आहेत? यांच्याबाबत किती माहिती नवीन पिढीसाठी उपलब्ध आहे? यांना आपण फक्त फोटोत आणि गाण्यांतच ठेवले आहे. त्यांचे वारसदार म्हणवून घ्यायला आपल्याला अभिमान वाटतो. पण त्यांच्या विचारांचा प्रसार आपण करतोय का? सर्वप्रथम आपण त्यांना वाचायला हवे. या व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास करून अजून त्यांच्यावर लिहायला हवे.

मध्यंतरी एका सभेत बोलताना राज ठाकरे यांनी सांगितले की जर्मनीत हिटलवर ५००० पेक्षा जास्त पुस्तके वेगवेगळ्या भाषेत लिहिली गेली. त्यामुळे हिटलर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. आजही हिटलरचे चरित्र आपल्याला इंग्लिश, हिंदी अगदी मराठीत पण वाचायला भेटते. हेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज डॉ बाबासाहेब यांच्या बाबतीत का घडत नाही? भारतात एवढे महापुरुष जन्माला आले. पण त्यांना आपण जाती-पातीच्या साखळदंडात जखडून ठेवले. आज भारतरत्न बाबासाहेबांची पुस्तके विविध भाषेत लिहिली गेली असती, तर बाबासाहेब सुद्धा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले असते.

भारतरत्न डॉ अब्दुल कलाम यांचे कार्य आपण कसे विसरू शकतो? विकसनशील असलेल्या आपल्या देशाला त्यांनी जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न दाखवले. फक्त दाखवले नाही, तर त्यादृष्टीने रोडमॅप बनवून त्यांनी पावले टाकायला सुरुवात देखील केली. दुर्दैवाने आज ते आपल्यात नाहीत. पण त्यांचे वारसदार म्हणून तो वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपली नाही का? कलामांनी आपल्या देशाला एवढे शस्त्रसज्ज बनवले की शेजारील चीन, पाकिस्तानसारखे शत्रू देश भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे साहस सुद्धा करू शकत नाहीत. नाहीतर चीनने आपली कधीच वाट लावली असती.

शेवटी काय घ्यायचे आणि काय नाही घ्यायचे हे आपण ठरवायला हवे. आपल्या देशात एवढे महापुरुष जन्माला आले. त्यांनी एवढे कर्तृत्त्व गाजवले. ते आपण जगाच्या पुढे आणले असते तर या महापरुषांच्यावर जगाने पीएचडी केली असती. पण आपल्या संकुचित विचारांनी आपल्याला पुढे सरकू दिले नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. यादृष्टीने अजूनही प्रयत्न केले जाऊ शकतात. हेच खरे बाबासाहेबांना आणि इतर सर्व महापुरुषांना अभिवादन असेल. धन्यवाद

-किशोर बोराटे