स्मृतीगंध……..ट्रेक नंबर १०……पांडवगड

स्मृतीगंध

सह्याद्रीच्या कडांवर उभं राहून
निसर्गाच्या नव्या छटा पाहूया
दूर कुठे त्या क्षितिजावर घेवून जाणाऱ्या
कल्पनेतील नव्या वाटा पाहूया
स्वप्नपूर्ती साठी लढणं झगडणं असतचं गरजेचं
कधी गरजे पलीकडे स्वतःला हरवून पाहूया

ट्रेक नंबर १०
पांडवगड

१७ ऑक्टोबर २०२१

नमस्कार,इच्छा असेल तर मार्ग सापडतो म्हणतात….पण पुढे जावून मी म्हणेन इच्छा असेल तर त्या मार्गावर जाणारे वाटसरू ही आपल्याला भेटत राहतात…आणि क्षणात ते आपले होवून जातात.
असच काही आज घडलं…. गडांची भटकंती हीच मनाला मिळणारी शांती…असचं काही वाटायला लागलं असताना आज आम्हाला साथ लाभली ती इतिहास अभ्यासक श्री स्वप्नील चव्हाण सर आणि त्यांच्या सोबत श्री राजेश शिंगाडे सर यांची. विरांची भूमी सातारा आणि त्यात वीर जवानांची भूमी म्हणजे मिलिटरी अपशिंगे….ह्याच गावचे श्री शिंगाडे सर आणि त्यांच्या सोबत असणारे श्री चव्हाण सर हे दोन्ही दुर्ग अभ्यासक; पेशाने शिक्षक….आणि खरा शिक्षक हा जसा जीवनाच्या प्रवासात कायम काही ना काही शिकवत राहतो तसेच आज ह्या जोडगोळीने बरच काही शिकवलं.गडाची उत्तम माहिती देणारे मार्गदर्शक म्हणून त्यांनी केलेलं आजचे काम हे उल्लेखनीयच. पण वयाची ४५ ओलांडली असताना पंचविशीतल्या तरुणासारखे फक्त चालणं नाही तर बोलणही….! कसं असावं जीवन वाऱ्याच्या झोतासारखं…वाळवंटी मनाला क्षणभर स्पर्श करून जाणारं… पण सुखाची एक मनमोहक लहर बनून कायम स्मरणात राहणारं….अशीच काही आज माझ्या मनाची अवस्था आहे.
आजवर केलेली गडभ्रमंती ही फिरण्याची आवड म्हणून सुरू केलेला एक प्रवास होता.अशा फिरण्याचे फायदे तुमच्या शरीराला नक्कीच फायदेशीर असतील.पण आज समजलं जर योग्य माहिती घेवून,प्रत्येक गोष्ट जाणण्याचा प्रयत्न करून केलेला प्रवास तुमच्या शरीरा सोबत तुमच्या बुध्दीचा पण विकास नक्की करेल…. आपण फिरतो… पण का फिरतो…? का ह्या जुन्या गोष्टी नव्याने पाहतो…? काय त्यातून अर्थ घेतो…? प्रत्येक घडवलेली कलाकुसर…प्रत्येक बांधकाम…ह्याला काही ना काही अर्थ नक्की असणार ना….? मग त्या साऱ्या वस्तूंचे फोटो घेवून किंवा व्हिडिओ बनवून हा साठा स्वतःकडे जतन करणे योग्यच….पण त्या जतन केलेल्या साठ्याचे महत्त्व काय…? मी गेलो…मी पाहिलं….मी साठवून ठेवलं…एवढंच…? तर नाही… आज ह्या वस्तू आणि वास्तूंकडे पाहताना माझा दृष्टिकोन थोडा बदलला आहे ते ह्या दोन मार्गदर्शकांमुळेच.
कदाचित आजचा हा लेख थोडा मोठा वाटेल किंवा वाचताना त्याची भलीमोठी लांबी पाहून टाळला ही जाईल.पण खरचं माझ्यासारख्या नवीन प्रवाशांनी नक्कीच हे सारं वाचलं पाहिजे असं मला वाटतं.
सातारा….वाई….आणि तिथून जवळच असणारे…. मेणवली गाव…नाना फडणवीस यांचा वाडा म्हणून प्रसिद्ध असणारं हे गाव…तिथून उजवीकडे असणारा मार्ग हा सरळ घेवून जातो ते पांडवगड पायथ्याला…. गडावर जायला तसे दोन मार्ग…. दक्षिणेकडून जाणारा मार्ग म्हणजे मेणवली गावातून जाणारा……ही वाट चढणे जरा कठीण पण भटकंतीचा आनंद घ्यायचा असेल तर ह्याच मार्गे जायला हवे…..पण गड सोप्या प्रकारे चढाई करून पहायचा असेल तर उत्तरेकडील बाजू जी वाईमधून मांढरदेव कडे जाताना मध्ये धावडी गाव लागते तिथून देखील तुम्हाला गडावर येता येईल.
दुसरी गोष्ट पांडवगड का पहावा…? राजांचे प्रत्यक्ष वास्तव्य असे काही इथे आढळून येत नाही.तसेच ह्या गडाचा स्वराज्यामध्ये समावेश देखील फार उशिरा झाला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे इ.स.१६७३ मध्ये हा गड स्वराज्यात आला.त्यापूर्वी हा गड आदिलशाही मध्ये होता असे आढळून येते. इ.स.१६७३ मध्ये गड काबीज केल्यानंतर राजांनी गडाची जबाबदारी त्यावेळचे सरनोबत पिलाजी गोळे ह्यांच्याकडे सोपवली. पिलाजींनी गडाची खास काळजी घेतलेली दिसून येते.कारण छत्रपती शिवाजी राजे ,त्यानंतर संभाजी राजे ह्यांच्या मृत्युनंतर देखील हा गड स्वराज्यात होता.ह्याचा अर्थ नक्कीच त्यावेळी जे आक्रमण झाले असतील त्याला चोख प्रत्युत्तर दिले गेले असणार.झालेल्या आक्रमणाची तशी नोंद आढळून येत नाही पण इ.स.१६९९ पर्यंत हा गड स्वराज्यात होता यावरून असा अंदाज आपण बांधु शकतो की नक्कीच मोठ्या धैर्याने गडाची काळजी घेतली गेली असणार.
इ.स.१७०१ मध्ये गड मोघलांच्या ताब्यात गेला ते पुढील ८ वर्ष त्यांच्याकडेच गडाचा ताबा राहिला.पुन्हा ह्या गडाचा स्वराज्यात समावेश इ.स.१७०९ मध्ये झाला.
गडाचा हा इतिहास १६व्या शतकातील दिसत असला तर गडाची बांधणी त्याच्या खूप आधी म्हणजे ११ व्या शतकात शिलाहार राजा भोज ह्यांच्या काळातील आहे.गडावर पाण्याने भरलेले खांब्याचे टाके त्याची रचना पाहून लक्षात येते की हे फार जुने बांधकाम आहे.खडक अगदी २० फूट आत पोखरून आणि लांबी साधारण १०-१२ फूट असणारे दगडात खांब कोरून असणारे हे टाके(पाण्याचा तलाव) पाहिले की त्यावेळी अवगत असणाऱ्या कलेला सलाम केल्याशिवाय मन शांत बसणार नाही.
आम्ही आज गडाची चढाई केली ते दक्षिणेकडून.ह्या मार्गे जाताना पहिली टेकडी पार केल्यावर २ जुनी घर लागतात.एक पूर्ण पडलेल्या अवस्थेत तर दुसरे जरा सुस्थितीत दिसते.तिथून जवळच पाण्याची विहीर आपल्याला पाहायला मिळेल.विहिरीत मुबलक पाण्याचा साठा दिसून येतो.आणि भोवती सपाट जमीन ही दिसते…यावरून तिथे आधी शेतीही केली जात असेल असा अंदाज आपण लावू शकतो.तिथून काही पावले पुढे आल्यावर भैरवनाथाचे छोटेसे मंदिर आहे.आम्ही थोडा वेळ ते मंदिर आणि बाहेर असणारे शिवलिंग पहात विश्रांती घेतली.
पुढे आल्यावर पहिला दरवाजा लागतो..तिथे आता दरवाजा नसून फक्त भिंत आहे.आणि पहारेकऱ्यांच्या साठी असणारी देवडी दिसते.तिथे पूर्वी मोठा दरवाजा असावा असे ती रचना पाहून अंदाज येतो.तिथून आत आले की एक चौथरा लागतो की ज्यावर हलकीशी पिंड कोरलेली दिसते.ती रचना पाहून असे लक्षात येत की नक्कीच तिथे कोणत्या तरी सरदार किंवा कोणी शुर योद्धाला वीरगती आली असेल आणि त्याच्या स्मरणार्थ ती समाधी तिथे उभारली असेल.पण तिथे कोणता स्पष्ट उल्लेख नसल्याने किंवा इतिहासात तशी काही नोंद नसल्याने आपण ठाम असे मत नाही नोंदवू शकत.
तिथून पुढे आल्यावर एक चौकी दिसते.ती नक्कीच पहिल्या दरवाजा बाहेर सुरू असणाऱ्या हालचाली टिपण्यासाठी असणार हे तुम्ही देखील ती रचना पाहून स्पष्ट ओळखू शकता.
तिथून पुढे आल्यावर मन जरा सुन्न होतं.कारण तिथे वाचायला मिळते की प्रायव्हेट प्रॉपर्टी……हो..हे खर आहे.१८१८ मध्ये मेजर थॅचर ने हा गड जिंकून इंग्रज राजवटीमध्ये सामावून घेतला.तिथून पुढे इथे इंग्रज राजवट दिसते.मग सगळे अधिकार मिळवलेल्या ह्या इंग्रजांनी ह्या गडावरील २३एकर जमीन वाडिया नावाच्या पारशी व्यक्तीला विकली.तसे खरेदी पत्र देखील आहे.आता त्यांचे कोणी पुढे आहे की नाही माहीत नाही.पण त्यांच्या वंशजांनी पुढे ही जागा मॅप्रोच्या मालकानां विकली.आता त्याचे मालक श्री मयूर व्होरा आहेत.
मला कायदा किंवा शासन याची जास्त माहिती नाही.पण मनात सहज एक विचार आला की आपले गडकिल्ले….आपल्या राजांनी उभारलेले स्वराज्य….हे सारं आपला श्वास आहेत…आपली अस्मिता आहे असे आपण सगळेच म्हणत असतो….पण शासन दरबारी ह्याच गडांची होणारी हेळसांड ही दिसून येते.त्यावर मला कोणतेही भाष्य करायचे नाही.पण मनातून असं वाटत आहे की…..त्या पारशी व्यक्तीकडून ही जमीन शासनाने का नाही विकत घेतली…? असो असतील काही नियम अटी….पण ही गोष्ट थोडी मनाला न रुचणारी वाटते.
त्या एका दगडावर प्रायव्हेट प्रॉपर्टी हे शब्द वाचून आमचा पुढचा प्रवास सुरू झाला.जवळच ते पाण्याचे टाके दिसते ज्याचा मी वरती उल्लेख केला.त्या भल्यामोठ्या टाक्याला डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवून आम्ही पुढे निघालो.काही पावले पुढे गेल्यावर आणखी एक पाण्याचे टाके दिसेल ते टाके आयाताकृती असून ते बरोबर निसर्गाने निर्माण केलेल्या ह्या भल्या मोठ्या कातळ कड्याला लागून आहे.कदाचित त्याची तिथे असणारी रचना ही कड्यावरून पडणाऱ्या पाण्याने तिथला गडाकडे जाणारा रस्ता वाहू नये, माती वाहून जावू नये यासाठी देखील असू शकते.
तिथून पुढे आल्यावर निसर्गाची अजुन एक किमया तुम्हाला दिसून येईल.ह्याच कातळकड्याला साधारण १.५० फूट रुंद आणि ३ फूट उंच अशी गुफा दिसेल.आम्हाला ती गुफा आतून पाहण्याचा मोह आवरला नाही.म्हणून आम्ही आत गेलो.आत पूर्ण काळोख असल्याने मोबाइलच्या उजेडात आत नीट पाहिले तेव्हा समजले की आत ही गुफा साधारण ५.५० फूट उंच १० फूट रुंद आणि आत ७ फूट लांब आहे.
पुढे गेल्यावर आणखी एक पाण्याचे टाके लागते त्यातील पाणी हे पिण्यासाठी वापरले जाते.मालकी हक्क असणाऱ्या व्होरा कुटुंबाने लोखंडी पाईपच्या सहाय्याने तिथून जवळच बांधलेल्या घरात ते पाणी पोहचवले आहे.तिथे घराची आणि मालकी हक्कात असणाऱ्या जागेची काळजी घ्यायला माणसे ठेवली आहेत.
ते सारे पाहून आम्ही पुढे गेलो असता एकामागे एक अशी छोटी मोठी पाण्याची टाके पाहायला मिळाली.गडावर एकूण १४-१५ पाण्याची टाके तुम्हाला पाहायला मिळतील.
आता पुढे जे दिसते ते दृश्य विलोभनीयच.गोमुखी बांधणीचा दरवाजा….गोमुखी याचा अर्थ मलाही आजच समजला.दरवाजाकडे येणारा रस्ता हा सरळ नसून थोडे वळून यावे लागते.नजरेच्या टप्प्यात समोरून पाहताना आधी दगडी तटबंदी दिसणार आणि मग वळून गेले असता मुख्य दरवाजा. अशी असणारी रचना म्हणजेच गोमुखी बांधणीचा दरवाजा.तिथे सध्या दगडी कमान आणि तटबंदी पहायला मिळते.कमान आजही सुस्थितीत दिसते..काही पावले आत गेलो की पुन्हा दिसणारा दरवाजा(म्हणजे सध्या फक्त पडलेली कमान आणि दरवाजा मागे असणारी आडणीची व्यवस्था) म्हणजे त्यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने केलेली उत्तम तयारी हेच म्हणावे लागेल.
आता वेळ येते ते गड माथ्यावर पाऊल ठेवायची.आणि दर्शन होते ते बजरंगबली हनुमानाचे.तिथे नतमस्तक होवून पुढे गेल्यावर आपल्याला पहायला मिळेल चुन्याची घाणी.
गडावर बांधल्या जाणाऱ्या प्रत्येक भिंतीला भक्कम करणारी हीच ती चुन्याची घाणी.आता आपण पोहोचतो ते पांडवजाई देवीच्या मंदिरात.बहुतेक जुने काम पूर्ण पडून गेले असल्याने काही वर्षांपूर्वी हे बांधकाम केलेलं असणार.पण हे देखील पडण्याच्या अवस्थेत आहे असेच दिसते.पण बाहेर जुन्या काळातील दीपस्तंभ,शिवलिंग पाहून तुम्ही आत पांडवजाई देवीचा आशीर्वाद घ्यायला जावू शकता.
त्यांनतर पुढे आल्यावर आपल्याला गडाच्या उंच टोकावर आल्याचा आनंद भेटेल.तिथून पश्चिमेकडे दूरवर दिसणारे धोम धरण त्यामागे असणारा कमळगड,दक्षिणेकडे वैराटगड,पूर्वेकडे असणारा चंदन वंदन,मांढरदेव डोंगर हे सारे डोळ्यात साठवून परतीच्या प्रवासाला आपण निघू शकता.
आता ह्या गडाला पांडवगड नाव का पडले असावे ह्यावर पण अनेक तर्क आहेत.वरती असणाऱ्या पांडवजाई देवीच्या नावावरून असेल….किंवा जेव्हा पांडव अज्ञातवासात असताना विराटनगरीत म्हणजेच आत्ताचे वाई भागात ते होते.गडापासून जवळच पांडवलेणी देखील आहेत.मग नक्की त्यांच्या वास्तव्यामुळे गडाचे नाव पांडवगड पडले असावे असे देखील लोक म्हणत असतात.
असो एकंदरीत पांडवगडास भेट देणाऱ्या प्रत्येकाला हा गड पाहून नक्कीच आनंद मिळेल असे मला वाटते.आपल्या साताऱ्यातून साधारण ४५-५०किमी असणाऱ्या ह्या गडाला भेट द्यायला नक्कीच काही अडचण नसावी.
शेवटी माझ्या सोबत आज नव्याने जोडले गेलेले दुर्गप्रेमी श्री धनंजय कणसे सर,श्री दिनेश जाधव सर,माझे नेहमीचे सोबती श्री राजू ढाणे सर,मित्र गणेश सुभनावळ,बंधू गुरुनाथ बाबर आणि सर्वात महत्वाचे असे आमचे नवे गुरू,सोबती, मार्गदर्शक,श्री स्वप्नील चव्हाण सर आणि राजेश शिंगाडे सर. तुम्हा सगळ्यांमुळे आजचा हा दिवस अगदी स्मरणीय ठरला.
आपली सर्वांची ही सोबत अशीच पुढे रहावी आणि अशा अनेक गडभेटी आपल्या सोबत व्हाव्या हीच आई भवानी चरणी प्रार्थना

शब्दसारथी
निलेश बाबर