स्मृतिगंध…..ट्रेक नंबर १२….. घेरा दातेगड

स्मृतीगंध

उगारली जरी शस्त्र तुझ्यावर
तरी तू मात्र खचू नकोस
वारसा आहे तुझा संघर्षाचा
माघार कधी तू घेवू नकोस
आली जरी संकटे करण्यास उध्वस्थ
चंचल मनासही सावरावे न व्हावे अस्वस्थ
सुटतील सारी कोडी, संपतील सारे विघ्न
झोकून द्यावे स्वतःला असावे आपल्या कार्यात मग्न.

ट्रेक नंबर १२

घेरादातेगड (सुंदरगड)

३१ ऑक्टोबर २०२१

पाटण तालुक्यात दिमाखात उभा असणारा…. घेरा दातेगड उर्फ सुंदरगड पाहणे एक विलक्षण अनुभव आहे.सुंदरगड अगदी नावाप्रमाणेच सुंदर आहे.
साताऱ्यातून गड पहायला येणाऱ्या गिर्यारोहकांनी….नागठाणे…. तारळे….. सडावाघापूर मार्गे पाटण उतरावे….तसेच जळव मार्गे ही गड पायथ्याला येता येते…पाटण एसटी स्टँड पासून उजवीकडे केर गावातून साधारण १२ – १३ किमी अंतर पार करून आपण गड पायथ्याला येतो…गडाची चढण अगदी सोपी आहे… साधारण १५ मिनिटांमध्ये आपण गडावर पोहोचतो.
उंब्रज मधून देखील पाटणकडे सहज येता येते….पण तारळ्यातून येताना दिसणारे निसर्गदृश्य….सुंदर घाट…. सडावाघापूर…. सुजलॉनचा पवनचक्की प्रकल्प….सुंदर पठार हे पहात पाटण मध्ये उतरणे हा अनुभव मनाला खूप आनंद देणारा ठरतो.
हा सुंदर प्रवास करून जेव्हा गड पायथ्यास येतो तेव्हा तिथे दिसणारी नैसर्गिक कातळात बनलेली तटबंदी सुरुवातीलाच एक सुखद अनुभव देवून जाते….प्रवेशद्वारा अलीकडे कातळात बनलेली गुहा पाहून तिथे थोडा विसावा घेण्यास मन आपोआप प्रवृत्त होते…..मग प्रवेशद्वारा जवळ आलो की समोरच दिसते ती साधारण १० फूट उंच असणारी पूर्ण कातळात कोरलेली हनुमंताची पश्चिमाभिमुख मूर्ती…आणि जवळच दिसते ती दक्षिणाभिमुख गणेशाची मूर्ती…..गणपतीची ही कातळात कोरलेली मूर्ती साधारण ६ फूट उंच असेल…आणि विशेष लक्ष वेधून घेतात ते ह्या मूर्तीचे कान…. कानाचा आकार जास्वंदीच्या पाकळीसारखा असून आजही ह्या दोन्ही मूर्ती अगदी सुस्थितीत आहेत….प्रवेशाची कमान जरी थोडी भग्न झाली असली तरी त्याचे सौंदर्य तसूभरही कमी झालेले नाही हे तुम्ही समोर पाहून सहज अनुभवू शकता.
ह्या दोन्ही मूर्तीचे विशेष असे की सूर्योदयाची किरणे दक्षिणमुखी गणपती मूर्तीवर पडतात तर सूर्यास्ताची किरणे बरोबर पश्चिममुखी हनुमंताच्या मूर्तीवर पडतात….तिथून आशीर्वाद घेवून पुढील प्रवास सुरू होतो ते पूर्णपणे दगडात कोरून बनवलेल्या पायऱ्यांवरून चालण्याचा…..पायरी मार्गावरून वरती आल्यावर डाव्या बाजूस असणारी विहीर ही ह्या गडाचे मुख्य आकर्षण ठरते…..आपण कमळगडावर असणारी….कावेची विहीर पाहिली असेलच….अगदी तसाच नमुना असलेली ही तलवार विहीर…साधारण १०० फूट खोल आणि तेवढीच लांब आहे आणि ८ ते १० फूट रुंद असेल.विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत.त्याची देखील विशेष रचना दिसून येते…..साधारण ४२-४४ मोठ्या पायरी असतील…आणि त्यालाच लागून कमी उंचीच्या छोट्या पायऱ्या केल्या आहेत जेणेकरून मोठ्या पायऱ्यांवरून कोणास चढ उतार करण्यास अडचण होत असेल ते ह्या कमी उंचीच्या छोट्या पायऱ्यांच्या सहाय्याने ये जा करू शकतात…..पायऱ्या उतरून खाली जाताना डाव्या बाजूस एक गुहा दिसते…. साधारण ८ ते १० फूट लांब ६ ते ७ फूट रुंद आणि ६ फूट उंच असणाऱ्या ह्या गुहेत महादेवाची पिंड आणि छान नक्षीदार छोटासा नंदी दिसून येतो….तिथे थोडेसे ध्यान मग्न होवून….शंभू महादेवाला नमन करून पुढे विहिरीत आत उतरावे……असणारी शांतता…..उंचचउंच तिन्ही बाजूने दिसणारी भिंत…..त्यावर पसरलेली हिरवीगार वेली…..असे ते मनमोहक दृश्य मनात साठवत आपण वरती आकाशाच्या दिशेने पाहिले असता……स्वतःच्या डोळ्यांवर लवकर विश्वास बसणार नाही असे एक मनमोहक दृष्य पाहायला मिळते…..ते म्हणजे वज्रमूठसहित तलवारीचे……हो अगदी खर आहे हे……ते सुंदर दृश्य तुम्ही नजरेत आणि कॅमेऱ्यात कैद करून ठेवू शकता…..आणि त्याच क्षणाला तुमचे मन इतिहासात फार खोल बुडायला सुरुवात करेल…..मनात सहज विचार येतील की त्या काळी हा असा विचार करून ही विहीर कशी काय साकारली असेल…..किती कलाकुसरीने तासलेल्या त्या उंच भिंती…मध्येच आडवा दगड उत्तमरीत्या रेंधून वज्रमुठीचा आकार देणे….तलवारीच्या पात्याप्रमाणे….तिरकस असा त्या विहिरीला आकार देणे….पायऱ्यांची उत्तम रचना…….हे सारे त्यावेळी कसे सुचले असेल….? नक्की कमळगड वरील कावेची विहीर आणि ही तलवार विहीर (गेरुची विहीर) बनवणारी व्यक्ती एकच असेल का….? जर ह्या व्यक्ती भिन्न असतील तर त्यातील कोणी ही कला आधी पाहून मग दुसऱ्या गडावर तशीच कलाकृती साकारली का…..? पाण्यासाठी विहिरीच हवी ना….. मग एवढी सुबक रचना करून गडाची शोभाही वाढवावी हा विचार त्यांना कसा सुचला असेल…..? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात….पण बांधणी संदर्भातील तसे काही पुरावे आढळून येत नाहीत….पण काहीतरी संबंध असावा असा तर्क ह्या दोन्ही विहिरी पाहिल्यावर तुम्ही लावू शकता.
विहीर पाहून झाल्यावर वर आलो की तसेच पुढे उत्तरेकडे चालत गेले असता….काही पडलेली बांधकामे दिसतील……एकतर तिथे घोड्यांची पागा असावी नाहीतर धान्याचे मोठे कोठार असे ती रचना पाहून वाटते…पडलेली सदर….. छोटी धान्याची कोठारे….. शिवकालीन शौचकूप…..तटबंदी…हे सारे प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहणे हा एक विलक्षण अनुभव नक्कीच आहे.
घेरादातेगड बद्दल सांगायचं झालं तर पंधराव्या शतकात हा किल्ला शिर्क्यांच्या ताब्यात होता पण मलिक उत्तुजार ह्या सरदाराने शिर्क्यांचा पाडाव करून हा किल्ला जिंकून घेतला आणि त्यावेळी वाढत असलेल्या बहामनी साम्राज्यात तो मिळवून दिला….पुढे बहामनी साम्राज्याचे ५ भाग पडले ……आणि ५ नव्या शाही उदयास आल्या (आदिलशाही,निजामशाही, कुतुबशाही,बरिदशाही, इमादशाही)…..त्यातील आदिलशाहीत पुढे हा किल्ला समाविष्ट झाला.इ.स.१५७२ पासून ह्या गडाची देशमुखी पाटणकरांकडे होती…..कोकणातून…. विजापूराकडून….येणाऱ्या फौजेवर लक्ष ठेवण्यास हे एक उत्तम टेहेळणी केंद्र होते…..पुढे इ.स.१६५९ मध्ये अफजलखानाचा वध झाल्यावर…..आदिलशाहीमध्ये स्वराज्य आणि राजे यांच्याबद्दल बरीच मोठी भीती बसलेली दिसून येते…त्याच गोष्टीचा फायदा उठवत आपले मावळे सरसकट किल्ले जिंकत दक्षिणेकडे वळले होते त्याचवेळी दातेगड ही स्वराज्यात सामील झाला…..आता गड पायथ्याला जाण्यास डांबरी रस्ता असल्याने गडाची चढण अगदी १५ मिनिटांची राहिली आहे…..पण त्यावेळी घनदाट जंगलातून वर जात मगच हा पायथा लागत असणार……गडाची ही सुंदरता पाहूनच स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी दातेगडाचे नाव सुंदरगड असे ठेवले होते….ह्या गडाची जबाबदारी राजांनी सरदार साळुंखे यांच्यावर सोपवली पण हा पाटण भाग असल्याने साळुंखे हे देखील पुढे पाटणकर नावाने ओळखले जावू लागले….. इ.स.१६८९ मध्ये छत्रपती संभाजी राजांची हत्या झाल्यावर हा गड मोघलांच्या ताब्यात गेला…..पण लगेचच पाटणकर आणि संताजी घोरपडे ह्यांच्या पराक्रमाच्या जोरावर छत्रपती राजाराम महाराजांनी गड पुन्हा जिंकून घेतला…..राजाराम महाराजांच्या काळात इ.स.१६८९ ते १६९७ दरम्यान संताजी घोरपडे हे सरसेनापती होते.
आपले एक दुर्दैव हे देखील आहे की छत्रपती संभाजी महाराजांनंतरचा इतिहास कुठे नीट सापडत नाही…..छत्रपती शिवाजी महाराजांचा बराच इतिहास सापडतो…..आणि छत्रपती संभाजी राजांचा मुद्दाम बराच चुकीचा लिहिलेला इतिहास देखील सापडतो….पण संभाजी राजांचे कार्य…त्यांनी दिलेले बलिदान ह्यावरून सहज त्यांची वीरता…शॉर्य…ह्याचा सहज प्रत्यय येतो आणि त्यांची छबी मलिन करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची मनात आणखी चीड निर्माण होते…..
दुःख ह्याच गोष्टीचे होते की इ.स.१६८९ मध्ये छत्रपती संभाजी राजांची हत्या झाल्यावर जास्त चर्चा….जास्त लेखन दिसते ते पेशव्यांचे…….असो माझाही हाच प्रयत्न असतो की जेवढा जाणता येईल तेवढा इतिहास जाणावा….. जेवढे अंदाज लावता येतील ते लावून तो काळ समजून घ्यावा……आणि हे तेव्हाच जास्त शक्य होते जेव्हा तुम्ही स्वतः ह्या गडकोटांना भेटी देता.
यावेळी आम्हीही सकाळी लवकर नागठाणे…. तारळे….. सडावाघापूर…पाटण मार्गे…..पहिल्यांदा घेरादातेगड पाहिले….तिथून पुढे आगाशिवलेणी…..वसंतगड….आणि तळबीड येथील सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते ह्यांची समाधी असे सारे पाहिले…पण आज लिखाण हे फक्त दातेगडचे केले….. कारण…..आगाशिव लेणी आम्ही फक्त दक्षिण बाजूने असणारी पाहिली.आगाशिव डोंगरात साधारण २२०० वर्ष जुनी असणारी १०१ लेणी इथे आहेत.त्यातील ६४ सुस्थितीत आहेत….त्यापैकी डोंगराच्या दक्षिण बाजूने २३, नैऋत्य बाजूने १९ आणि उत्तर बाजूने २२ अशी एकूण ६४ लेणी आहेत….पण सर्व काही पाहता न आल्याने ह्यावर आज कोणते लिखाण केले नाही….तसेच सूर्य अगदी मावळतीला पोहोचला तेव्हा आम्ही वसंतगड चढला….त्यामुळे गडावरची सारी ठिकाणे पाहणे शक्य झाले नाही.
पण एकंदरीत ह्या प्रवासाचा आलेला सुखद अनुभव….. सोबत असणाऱ्या साऱ्या दुर्गप्रेमींची साथ ह्यामुळे दिवस अगदी आनंदात गेला.

निलेश बाबर
शब्दसारथी