स्मृतीगंध
उंच पुऱ्या वृक्षांचा काय तो अजब थाट
गर्द घण्या जंगलात उभे ते ठेवून कणा ताठ
हरवून स्वतःला ह्या गर्द झाडीत विसरावी नेहमीची ती पाऊलवाट जीवनातही मग येईल सुखाची खरी सोन पहाट
ट्रेक नंबर १३
जंगली जयगड
१४ नोव्हेंबर २०२१
जंगली जयगड…..नाव थोड वेगळं वाटलं ना……मलाही…..जेव्हा हे ऐकलं तेव्हा एक कुतूहल मनात जाग झालं…… की जयगड नाव ठीक आहे पुढे जंगली शब्द कशाला…? का असे नाव असेल…? पण लगेच कानावर बातमी आली “तिथे जाता येत नाही वनविभागाची परवानगी लागते”….हे ऐकलं आणि गडाचा थोडा अंदाज आला….ज्याअर्थी हा भाग राखीव आहे त्याअर्थी नक्कीच तिथे निसर्गाच्या सुंदर छटा पहायला मिळतील…..असा मनोमन कयास लावत गडाची काही माहिती नेटवर मिळतेय का हे पहात…. काही लेख, व्हिडिओ पाहण्यात आल्या.पण म्हणावे असे जास्त काही कोणाचे लिखाण किंवा काही संदर्भ सापडत न्हवते.श्री भगवान चिले सरांनी वर्णन केलेला जंगली जयगड आणि माझ्या सारख्या काही भटक्यांनी बनवलेले व्हिडिओ पाहून देखील जास्त काही हाती येत न्हवते.मग ठरवले हे सुख वाचून नाही तर समोर पाहूनच चांगले अनुभवता येईल.
काही दिवसापासून ह्या भटकंतीच्या वेडात माझ्यासोबत सामील होणारे खूप जण आता भेटत आहेत…..मागे म्हणालो ही होतो जशी तुमची आवड असेल तसे सोबती ही आपोआप तुम्हाला मिळत जातात….पांडवगड भेटीत श्री स्वप्नील चव्हाण सर हे इतिहास अभ्यासक भेटले तर त्याच भेटीत धनंजय कणसे (धनु भाऊ) हा दुर्गवेडा……त्यानेच तर ह्या जंगली जयगड चे मनात भरवले…..त्याने ठिणगी टाकली खरी पण मनात गड भेटीचा वणवा चांगलाच पेटला होता….. मग तिथे पूर्वी गाईड म्हणून काम केलेले श्री दिनेश यादव यांचा नंबर मिळवला त्यांना कॉल करून माहिती घेतली पण अजुन परवानगी देणे सुरू केले नाही….झाले की कळवतो असे ते बोलले.त्यांनीही चांगली मदत केली.सध्या कामानिमित्त मुंबई मध्ये असल्याने त्यांनी सध्या जंगली जयगड भागात फिरण्यास मदत करतील अश्या श्री महेश शेलार सरांचा नंबर दिला…..संपर्क सुरू होताच पण नेमके धनु भाऊ ने संपर्क करून परवानगी ची सोय केली होती…. आता गडाची भेट घडणार हे निश्चित झाले होते.मग सुरुवात झाली ती कोण कोण येणार ह्याचे नियोजन करण्याची…..आणि मी वैद्यकीय प्रतिनिधी असताना पासून ओळख असणारा मित्र विक्रम घाडगे भेटला.मग आता नेहमीच्या ग्रुप मध्ये अजुन काही जण वाढणार होते त्यानुसार विक्रम घाडगे,संदीप पवार,विनय दिघे,विनोद मतकर,सचिन शिंदे सर हे येवून मिळाले.तर राजू ढाणे सरांनी मोठ्या मोठ्या मुक्कामी कॅम्प मध्ये जे विविध प्रकारचे उपक्रम घेतले जातात त्यात रायफल शूटिंग चे ट्रेनिंग देणारे श्री अनिल घाडगे सर यांना आणले. धनू भाऊ ने आपले मित्र साजेश कणसे आणि प्रशांत कणसे ह्यांची भेट घडवून आणली.आणि बाकी मग आम्ही नेहमीचे होतोच…..पण कमी होती ती ट्रेकिंग ची छान आवड असणारे शिंगाडे सर,गणेश सुभनावळ,दिनेश जाधव सर आणि बंधू गुरुनाथ (भाऊ) ची.
मनाने आणि बोलण्याने एकदम निखळ असणारे धनंजय पाटील सर आज सोबती होतेच… की ज्यांच्या असण्याने वातावरण एकदम हसरे आणि मजेशीर राहत असते.असे एकूण १३ जण ह्या जंगली जयगड कडे जायला सकाळी ६ वाजता साताऱ्यातून निघालो.
सातारा……उंब्रज….पाटण…. कोयनानगर असा प्रवास करत पुढे गाठले ते आमचे तिथे असणारे गाईड श्री योगेश देसाई(नामदेव) याचे गाव मानाईनगर.पंचविशीच्या ह्या तरुणाला भेटून छान वाटलं कारण भटकंतीची आवड त्याच्यातही मनापासून भरलेली आहे हे त्याच्या देहबोली आणि बोलण्यातून स्पष्ट दिसत होते.
त्याला मानाईनगर मधून घेवून आम्ही गेलो ते पुढे नवजा धबधब्याच्या जवळ……मी तर तिथे पहिल्यांदाच गेलो होतो पण सोबत असणारे सहकारी धबधबा पहायला याआधी ही येवून गेले होते…..तिथे जावून जे दृश्य पाहिले यावर हेच शब्द कानावर येत होते की “काय झालंय राव…हे नवजा हाय वळखून पण यिना…. लय बदल झालाय…..कायच कळत नाय ….आपण हिथ यिवून गेलुय वाटणा अजिबात” मी फक्त ऐकत होतो कारण माझी ही पहिलीच वेळ होती पण सभोवती पाहताना स्पष्ट दिसत होते निसर्गाने केलेलं नुकसान….आइस्क्रीमच्या कप मधून चमच्याने जसा घास बाजूला करतो ना अगदी तसाच ह्या सह्याद्रीचा पडलेला तुकडा….वाहून खाली आलेली माती….भले मोठे दगड… हिरवा शालू नेसलेल्या ह्या नवजाचा… फाटलेला हा पदर पाहून मनात एक विचार आला…. साध्या मुंगीला डीवचले तर प्रतिकार करून ती देखील चावा घेते….मग इथे तर आपण ह्या निसर्गाला सगळ्या बाजूने नुसते टोचत आहोत….मग तो तरी का गप्प बसेल…..हो ना…..? ते काही असेल नाही माहित….पण जेव्हा आमचा गाईड नामदेव…”आम्ही त्याला नामाच म्हणत होतो”…. नामा म्हणाला “यंदा पहिल्यांदा झालय आसं नायतर एवढं नाय कधी तुटलं……अहो इथ एक चौकी हुती आणि बारकी दुकान सगळी गायब हायत….. म्हंजे त्यांचा साधा पत्रा पण अजुन भेटला नाय…का म्हायते का….ह्यो सगळा ढिगारा दिसतोय ना ह्याच्या खाली आसल सगळं” मी फक्त ऐकत होतो आणि नजर फिरवत होतो त्या मातीच्या ढिगाऱ्यावर…वाहणाऱ्या धबधब्यावर…..हिरव्या शालूने नटलेल्या उंच डोंगर रांगांवर….आणि फाटलेल्या शालुच्या त्या पदरावर….मनात हाच विचार येत होता…..निसर्ग पर्यटन हे योग्य आहे कारण सिमेंटच्या जंगलात रोज फिरत असताना हरवून गेलेली मनाची शांतता ही पुन्हा मिळते ती ह्याच निसर्गाच्या कुशीत….पण पर्यटनाच्या नावाखाली सगळीकडे होत असलेली निसर्गाची हानी…..उभे राहत असलेल्या इमारती….खरंच गरजेच्या आहेत का…..? जर निसर्गात राहायचं आहे….तो सुंदर अनुभव घ्यायचा आहे तर का मागणी होत असते आपली… की मला राहायला एसी रूम हवी…ह्याला जबाबदार फक्त व्यावसायिक म्हणावे…..? की अशी मागणी करणारे आपल्या सारखे निसर्ग प्रेमी…? आणि खरच असे छान निसर्गात फिरायला येवून अगदी घरच्या सारखे राहायला मिळावे ही अपेक्षा करणारे आपण नक्की निसर्गप्रेमी…..की निसर्गद्रोही….?
जर फिरणाऱ्याने मागणीच उच्च केली तर व्यावसायिक ती पूर्ण करणार….हा भाग आलाच व्यवसायाचा….पण जर आपण भटक्यांनी मागण्याच कमी केल्या…तर जेमतेम सुविधा वापरून देखील फिरण्याचा आनंद लुटू शकतो ना……? मला ह्यात कोणाची कमी दाखवून नाही द्यायची….फक्त मत हेच की आपण हे सारं जपायला पाहिजे……मत व्यक्त करून…..किंवा नुसते होकार देवून सगळे होणार नसते….तर तसा प्रयत्न करत गेलो तर नक्कीच हे साध्य होईल असं मला वाटतं.
आखलेलं नियोजन….सुरू झालेला प्रवास….सोबत आलेले प्रवासी…..मनाला वाटत असलेली मतं….हे सारं व्यक्त करून झालं एकदाचं……आता सुरू करू तो जंगली जयगड प्रवास….आधुनिक बदल…..अन् इतिहास….
नवजा जवळ असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून प्रती व्यक्ती रू.३०/- शुल्क देवून आम्ही जवळ असणाऱ्या चेक पोस्ट वर पोहोचलो…..तिथे चेकिंग झाल्यानंतर आम्हाला आत जायला परवानगी मिळाली…गाडी अगदी गडाच्या पायथ्याशी लावून आम्ही सगळे आपापल्या गाडीतून उतरून एकत्र जमलो….आणि नामा काय सांगतो त्या सूचना ऐकू लागलो……”जंगलात लय वेगळे पक्षी … अस्वल….डुक्कर…..गवे….. बिबट्या….साप हायित….सगळे टोळीने चला आणि शांत चाला….”मी मध्येच म्हणलो आपण शांत आवाज न करता गेलो तर भेटेल का काय बघायला…..? नामा लगेच म्हणाला…” मिळलं की पण शांत चालायचं….दंगा नाय करायचा… नायतर पळून जात्याल जनावरं” मग काय सगळेच एकमेकांना म्हणायला लागलो ए बोलू नका ,बोलू नका….आणि बोलू नकाचा हा दंगा आरामात ती शांतता भंग करत होता…..मनात हसू येत होते पण न बोलता राहवत ही न्हवते……चालत चालत आत आलो आणि ऊंचच्या उंच झाडे पाहू लागलो…..घनदाट जंगल….ही उंच झाडे….हे सगळे पाहून मनाने आपोआप निर्णय बदलला…..नको बाबा काय दिसायला समोर… आल एखादं जनावर तर काय करणार….??? अशा चर्चा होवू लागल्या….आणि तेव्हाच लक्षात आलं की….. का हे नाव जंगली जयगड आहे….अशा भयाण घनदाट जंगलात काय हिमंत आहे त्या जनावरापासून पळून जायची….नाही….अजिबातच नाही….. खर तर त्या जंगलात आम्हाला कोणते जनावर आडवे येणार न्हवते तर आम्हीच त्यांना आडवे गेलो होतो….. कुतुहुल का असेना पण त्या उत्सुकतेने त्यांचा अधिवास आम्ही भंग करत होतो……त्यांच्या घरात आम्ही गेलो होतो……कारण फक्त एकच मुक्त हिंडण्याची आवड….. बस एवढच काय ते उत्तर….. बाकी आम्ही कोणी साधू न्हवतो की शांत ध्यान करायला एकांत शोधावा….आम्ही फक्त तिथे अनुभवत होतो ते निरव शांतता….आणि एरवी तोऱ्यात मोठे बनून फिरणाऱ्या आम्हाला आम्ही फक्त कस्पटासमानच आहोत याची जाणीव चांगलीच झाली होती.
काही पडलेली झाडे…..काही उंच झाडे….पहात आम्ही ती दृश्ये कॅमेऱ्यात साठवत पोहोचलो ते घोडेतळा जवळ…….ब्रिटिश काळात इंग्रज लोक तिथे आपली घोडी बांधत आणि वर चालत गडावर येत असत…म्हणून ह्या पाणवठ्याला घोडेतळ म्हणतात……तिथेच बाजूला एक चौथरा बांधला आहे…तिथून चालत पुढे आलो……आणि मग लागतो तो एक छोटासा टेहेळणी बुरुज…..त्यालाच ढालकाठी बुरुज म्हणतात…..त्यावरून कुंभार्ली घाट दिसून येतो……तिथून पुढे चालत आल्यावर लोखंडी पाईपने बांधलेला संरक्षक कठडा दिसतो….तो पार करून पुढे आलो की डाव्या बाजूला लांबवर काही तरी बांधलेले आहे हे दिसते….मग नामाला विचारले हे काय…..तेव्हा समजले ते ठिकाण म्हणजे पोफळी…. की जिथे कोयना विद्युत प्रकल्पाची पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याची वीजनिर्मिती होते…..आणि जवळच आहे ती सर्जवेल…… सर्जवेल म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल ना….? मलाही माहीत नव्हतं….पण नामाने सगळे सांगितले …..जेव्हा पाणी मोठ्या फोर्स ने बोगद्यातून येते तेव्हा समजा पाण्याला काही अडथळा आला किंवा हवेचा दाब वाढला तर पाणी तसेच मागे येताना बरेच नुकसान होवू शकते मग अशा सर्जवेल म्हणजे मोठ्या विहिरी आहेत ह्यातून ते पाणी असेल किंवा हवा हे बाहेर येते.
दूरवर असणारी सर्जवेल आणि पहिला दुसरा टप्पा हे लांबून पाहिले पण त्याच्या अलीकडे म्हणजे जयगडच्या डाव्या बाजूच्या पायथ्याला जमिनीवर काहीतरी पांढरे ठिपके…..जाळी…. तारा दिसत होत्या…..त्याबद्दल माहिती घेतल्यावर समजले ते आहेत स्विचयार्ड……जवळ जवळ ७ ते ८ एकर मध्ये पसरलेल्या त्या विद्युततारांबद्दल नंतर काही माहिती वाचली तेव्हा समजले ह्या विद्युततारांमध्ये जवळपास १८ मीटर अंतर ठेवले जाते कारण त्या जवळ येवून कोणता धोका निर्माण होवू नये.त्यामुळे पूर्ण संच चालवताना बरीच जमीन ह्यासाठी लागते….समुद्र सपाटीपासून कोयना धरणाची उंची आहे ५७९ मीटर आणि पोफळी हे ठिकाण आहे ५०० फूट खाली…. ह्याच उताराचा फायदा घेत कोयनेचे पाणी ४५° मध्ये वळवून मोठ्या बोगद्याच्या मदतीने पोफळीकडे आणले आहे….हा बोगदा एवढा मोठा आहे की त्यात समजा ट्रक उभा केला तर तो देखील खेळण्यातला आहे असे वाटेल……एवढ्या मोठ्या बोगद्यातून पाणी जोरात साधारण १४.५ ते २० टन वजनाच्या टर्बाइन्सवर फेकले जाते…ह्या पूर्ण युनिट चे वजन साधारण २०० टन असेल.१४.५ ते २० टनाच्या ह्या टर्बाइन्सवर पडणाऱ्या त्या पाण्याने ते एक सेकंदात जवळपास ३०० वेळा फिरते यावरून त्या पाण्याचा वेग काय असेल याचा अंदाज बघा…..
पहिल्या टप्प्यात २८० मेगावॅट तर दुसऱ्या टप्प्यात ३२० मेगावॅट वीजनिर्मिती होते.वीजनिर्मिती करून झाल्यावर पुन्हा हे पाणी मोठ्या बोगद्याने बाहेर काढून वशिष्ठी नदी पात्रात सोडून गडाच्या उजव्या बाजूला वळवले आहे….तिथे कोळकेवाडी जवळ एक धरण बांधून पाणी अडवले आहे.त्या पाण्यावर तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याची वीजनिर्मिती होते.
तिसऱ्या टप्प्यात ३२० मेगावॅट तर चौथ्या टप्प्यात सर्वाधिक १००० मेगावॅट वीजनिर्मिती होते.
तसे गडावर असताना ही सारी कोयनेची माहिती देणे कितपत योग्य आहे माहित नाही.पण गड माथ्यावर जावून उजव्या बाजूला दिसणारी सर्जवेल डावीकडे दिसणारे कोळकेवाडी धरण…..शेवटच्या टोकावरून तिसऱ्या टप्प्याची दिसणारी सर्जवेल….बोगदे…..रस्ते…….हे पाहून एकाच नजरेत पूर्ण कोयना विद्युत प्रकल्प साठवण्याचा अनुभव फक्त जंगली जयगड वरूनच येवू शकतो हे जाणवते…..
ते पाहून पुढे चालत आलो की दगडाची उंच कपार दिसते…..त्याला स्थानिक लोक दीपमाळ म्हणतात…..तिथे काही फोटो काढून पुढे चालत येताना रस्ता खूप अरुंद आहे.एका बाजूला कपारीचा भाग मध्ये थोडा रस्ता आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी हे पहात हळूहळु पुढे चालत यावे लागते…..तिथे आल्यावर लागते ते मूळ ठाणाई देवीचे मंदिर…..अगदी छोटेसे असे ते मंदिर….बाजूला दगडी दीपमाळ आणि दगडी भांडी….तिथली स्थिती खूपच अडगळीची झालेली दिसते.तरी तिथे थोडी फार सफाई… गवत काढले आम्ही…पण तरीही बऱ्याच प्रमाणात सभोवती वाढेलेले गवत दिसते….देवीचा आशीर्वाद घेवून पुढे आल्यावर गडाच्या पश्चिम टोकावर आपण येतो…तिथे समोर दिसणारी सर्जवेल पाहून पुन्हा परतीचा प्रवास करावा……गडउतार होताना शरीराची बरीच दमछाक झालेली जाणवते.
आम्ही खाली उतरून आल्यावर समजले ते एका वेगळ्याच आणि आश्चर्यकारक ठिकाणाचे…..ते म्हणजे रामबाण……गड उतरून आम्ही त्या ठिकाणी जायचे ठरवून गाडीत बसलो आणि मुख्य रस्त्यात आलो तर रस्त्यात एका भल्या मोठ्या घोरपडीचे दर्शन झाले….पण आम्ही गाडीतून उतरलो नाहीच….कारण ती आमच्या रस्त्यात नाही तर आम्ही तिच्या रस्त्यात आलो होतो….गाडीतूनच तिला कॅमेऱ्यात कैद केले…..आणि थोड्याच वेळात ती देखील नजरेआड झाली……मग आम्ही पुढे निघालो ते रामबाण शीलातीर्थ पहायला…… मुख्य रस्त्याबाजूला गाडी लावून डोंगरात उजव्या बाजूला वरती चालत आलो……चिरा दगडांनी पूर्ण रस्ता बनवला आहे….त्यावरून चालत वरती आलो…..नामाने एक भला मोठा दगड दाखवला….आणि बोलला हा रामबाण दगड…..
बस एवढे ऐकले….तिथे लिहिलेली सूचना म्हणजे मांसाहार करून किंवा पायात चपला घालून शिलेस हात लावू नये….आम्ही कोणीच मांसाहार केला न्हवता….मग पायातील बूट बाजूला करून शीलेस स्पर्श केला आणि दगडात असणाऱ्या खोबणीत आत पाहिले तर पाणी होते….ते पाणी हातात घेवून आचमन केले….उन्हातून चालत झालेला प्रवास…. थकेलेलं… भुकेलेलं शरीर….आणि मग हातात आलेले हे थंड पाणी …..अगदीच कसं शांत वाटू लागलं.आणि मग सुरू केले ते त्या पाण्याने सोबत आणलेल्या बाटल्या भरणे…..जवळपास १० -१२ बाटली पाणी त्या छोट्या खोबणीतून आम्ही घेतले होते….तरीही पाण्याची पातळी जशीच्या तशी होती……मग खरी सुरुवात झाली त्या आश्चर्याचा विचार करण्याची……
त्या ठिकाणी असणाऱ्या त्या दगडाबद्दल अशी माहिती तिथल्या लोकांकडून मिळते की….जेव्हा श्रीराम लक्ष्मण सीता वनवासात जात असताना तिथे आले होते….. सीता मातेला तहान लागली पण जवळपास कुठेही पाणी न्हवते…..मग श्रीरामाने त्या शिळेस बाण मारला आणि त्यातून पाणी काढले……त्या खोबनीचा आकार अगदी बाणाच्या टोकासारखा आहे….आणि विशेष हे की जमिनी पासून साधारण ४ ते ४.५० फूट उंच अशी ती खोबणी आहे…..आजूबाजूला कुठेही पाणी किंवा तसा ओलावा दिसत नाही…..त्या दगडी शिलेस पूर्ण चक्कर मारली तरी ती कोणत्या कड्याला चिकटलेली दिसत नाही …..पूर्णपणे तो दगड मोकळा आहे…..त्याला कशाचा आधार अजिबात नाही….मग मनात विचार येतो जमिनीपासून ४ ते ४.५० फूट उंचीवर असणाऱ्या त्या खोबणीत पाणी कसे…..? आणि जर तिथे पाणी आहे तर तिथला उपसा झाल्यावर ते कमी का होत नाही…..?आणि जर कोणत्या दाबाने ते पाणी वर येत असेल असे जर म्हणालो तर तर मग तो दाब वाढून पाणी खाली का वाहत नाही…..? पाणी खाली वाहत नाही….पाणी कमी होत नाही …..जमिनीपासून उंचावर……आणि आजूबाजूला कसला शिळेला आधार नाही….जवळ असणाऱ्या त्याच आकाराच्या शिळेत पाणी नाही …….आजूबाजूला ओलावा नाही…..वर्षाच्या बाराही महिने तिथे तेवढेच पाणी राहणे…..ही एक फार मोठी विलक्षण बाब आहे……खरच खूप विचार करायला लावणारे हे ठिकाण पहायला दुसऱ्या देशातून लोक येत असतात….तिथे काही संशोधन देखील केले आहे…पण पाण्याचे गुपित असणारा हा प्रश्न आजवर अनुत्तरीतच राहिला आहे……
रामनवमीला इथे फार मोठी यात्रा भरते.जवळपास असणाऱ्या गावातून लोक येतात आणि हे पाणी तीर्थ म्हणून घेतले जाते….
पुन्हा मनात हाच प्रश्न…. ही एवढी मोठी गोष्ट…..एवढे मोठे आश्चर्य…..ते ही आपल्याच जिल्ह्यात…..पण आजवर माहित नसलेलं……कितीतरी अज्ञानात सुख मानून आपण जगत असतो…..हो ना…?
रामबाण शिळातीर्थ…..जंगली जयगड ची सफर….. हे सारं मनात साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो……नामा आम्हाला आग्रहाने त्याच्या रानातील घरात घेवून गेला…..आम्ही आलेलं पाहून आजींनी पडवी चांगली झाडून घेतली…..एक छोटीशी विहीर….शेती….छोटेसे कौलारू घर…..जवळच दिसणारा कोयनेचा जलाशय…..हे सारे सुंदर दृश्य पाहत….एकमेकांची चेष्टा करत आम्ही जेवणाची पंगत थाटली…..सर्वांनी आणलेले डबे….दिवाळीचा फराळ….भेळ….शेंगा…..असे एकमेकाचे सगळे एकमेकात वाटून गप्पा मारत छान जेवण केले……जेवण केल्यावर चांगलीच सुस्ती सर्वांना जाणवत होती….ते जाणवले म्हणून नामा लगेच म्हणाला आज रहा पाहिजे तर सगळे…..कोंबडा करून घालतो सगळ्यांना….स्वतः माळकरी असणारा साधाभोळा नामा आमचा फक्त गाईड म्हणून राहिला न्हवताच….आपुलकीने बोलणे…..आणि आपले मानून केलेला आमचा पाहुणचार ह्यातच त्याने आम्हा सर्वांची मने जिंकली…..आम्ही पुन्हा येवू आणि राहते येवू असे सांगून मानाईनगरच्या योगेश देसाईचा( नामदेव) निरोप घेतला…आणि परतीला निघालो.
आता सांगायचा राहतो तो गडाचा इतिहास……खर तर ह्या गडावर छत्रपती शिवाजी राजे यांचा काही इतिहास आढळून येत नाही…..पण पुढे हा गड औंधाचे पंतप्रतिनिधी यांच्या हाती होता….याचा अर्थ हा गड स्वराज्यात आधीपासून होता…..वर असणारा ढालकाठी टेहेळणी बुरुज आणि एकंदरीत गडाची रचना पाहता ह्या गडाचा उपयोग कुंभार्ली घाटावर लक्ष ठेवण्यासाठी होत असावा…..
इ.स.१७५८-५९ मध्ये पंतप्रतिनिधींकडून पेशव्यांचे सरदार खंडोजी मानकर यांनी हा किल्ला जिंकून घेतला पण पुन्हा पेशवे आणि पंतप्रतिनिधी ह्यांच्यात असणारे वाद थांबले आणि पुन्हा गडाचा ताबा पंतप्रतिनिधी यांच्याकडे आला…..
पुढे परशुराम पंतप्रतिनिधी ( जन्म इ.स.१७७७) कारभार पाहू लागले……वयाची १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत पेशव्यांचे कारभारी कृष्णराव जोशी कारभार पहात होते……पुढे संपूर्ण कारभार स्वतः परशुराम पंतप्रतिनिधी पाहू लागले….पुढे त्यांनी दोन लग्न केली काशीबाई आणि लक्ष्मीबाई या मोठ्या घराण्यातील स्त्रियांशी …..पण सुरुवातीपासून अय्याशी मध्ये जगण्याची सवय असणाऱ्या परशुराम पंतप्रतिनिधी यांचे लक्ष संसारात लागलेच नाही……पुढे त्यांचे संबंध आले ते रमा उर्फ ताई तेलीण हिच्या सोबत…..परशुराम पंतप्रतिनिधी यांच्या वतीने सगळा कारभार ताई तेलीण पहात होती…..पुढे पेशव्यांच्या विरोधात बरीच कामे पंतप्रतिनिधी करत असल्याने त्यांनी सरदार बापू गोखले यांना पाठवले. इ.स. १८०८ ते १८१० च्या दरम्यान झालेल्या युद्धात परशुराम पंतप्रतिनिधी यांचा उजवा हात कलम केला गेला.आणि ते धरले गेले. त्यानंतर ते थोटोपंत म्हणून ओळखले जात होते…पण ह्या युध्दात ताई तेलीण हरली न्हवती…..पण मोठी सैन्य तुकडी आणि जोरदार हल्ला पाहून तिने जंगली जयगड सोडला आणि वासोटा किल्ल्यावर गेली……तिथे ८ महिने किल्ला मोठ्या धैर्याने लढवला…
पण शेवटी हार मानावी लागली…..असाच काही तो थोडाफार इतिहास वेगवेगळ्या संदर्भातून सापडतो…..ह्यात मुख्यत्वे श्री भगवान चिले सर…. श्री सुखलाल चौधरी सर….यांच्या लिखाणाचा सार घेतला आहे.
अतिशय सुंदर पण दुर्लक्षित ह्या गडाला आणि रामबाण शीलातीर्थ ह्या दोन्ही ठिकाणांना अवश्य भेट द्या…..आपले गाईड…मित्र….श्री योगेश देसाई (नामदेव) याचा मोबाईल नंबर
७७७५९६७६१७ / ९४२१९२५२६०
शब्दसारथी
निलेश बाबर