स्मृतीगंध……ट्रेक नंबर १४….किल्ले पुरंदर

स्मृतीगंध

महाराष्ट्राच्या मातीमध्ये कित्येक जन्मले वीर आजवर
रणांगणावर कापले शत्रू,कित्येक वार झेलले छातीवर
मनी मस्तकी बाळगला होता एकच विचार बरोबर
झुकणार ना ही मान कोणा शत्रूसमोर
होतील वार, कटतील माना
पण प्राण अर्पण फक्त स्वराज्यावर
शिवरायांनी पेरलेल्या ह्या विचारांवर
कित्येक उगवले वीर धुरंदर
स्वराज्याची वाढू लागली व्याप्ती
उत्तरेत ही होवू लागली ख्याती
दक्षिणेला ही बसला दणका
मराठ्यांना मिळाला राजा खमका
सरले पावसाळे,संपले हिवाळे
सांगता आली उन्हाळ्याची
१४ मे १६५७ उगवला
अन् पहिली डरकाळी फुटली छाव्याची
मासाहेब बनल्या सावली,सईबाई झाल्या माऊली
ऊर भरून आला स्वराज्याच्या सिंहाचा
पुरंदर ही धन्य जाहला आवाज ऐकून धाकल्या धन्याचा

ट्रेक नंबर १४

किल्ले पुरंदर

२१ नोव्हेंबर २०२१

किल्ले पुरंदर…..जिथे जन्मले छत्रपती संभाजी महाराज…..जिथे मोघलांना झुंजवले आणि स्वराज्यासाठी प्राण अर्पण केले मुरारबाजी देशपांडे यांनी…जिथे घडला इतिहास प्रसिद्ध तह….शहाजीराजांना कैद करून शिवाजी राजांवर चाल करून आदिलशहाने धाडला फत्तेखान त्याला जिथे धूळ चारली……जिथे राजांनी वीर नेतोजी पालकरांना त्यांची चोख कामगिरी पाहून सरनौबत म्हणून निवडलं….असा धुरंदरांनी पावन झालेला किल्ले पुरंदर.
गडभ्रमंतीच्या आवडीमध्ये बऱ्याच ठिकाणी फिरताना मनात सारखा विचार यायचा एक ना एक दिवस बरेच किल्ले पाहून होतील पण जिथे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला तो पुरंदर काय पाहता येणार नाही……कारण ही तसचं होतं….हा किल्ला आपल्या सैन्यदलाच्या देखरेखीखाली आहे….तिथे सैन्य प्रशिक्षण दिलं जातं….मग आपल्या सारख्या सामान्य माणसांना कसे जाता येणार ना तिथे……पण मला अभिमान वाटतो आपल्या सैन्यदलाचा…..ज्यांनी ३ नोव्हेंबर पासून सर्वांसाठी गड खुला केला…..आधीच त्यांना भरपूर कामे असताना….लोक भेटीला येणार म्हणजे सारी तपासणी करणं….ठरवलेल्या नियमांनुसार सारे तपासून घेणं……हे अतिरिक्त काम त्यांनी स्वतःवर घेतलं……नियम ही काही जाचक नाहीत बर का…..सोबत ओळखपत्र असावं,१८ वर्षावरील व्यक्तींनी कोविडच्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत….मास्क हवे….ड्रोन कॅमेरा सोबत नसावा…. आर्मी ने प्रतिबंध घातलेल्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करू नये…..बस एवढं ऐकलं की मग सगळ काही आलबेल आहे.
आजचा आमचा हा ट्रेक देखील अगदी अविस्मरणीय असा वाटला…..स्वतः डॉ प्रवीण जाधव सर आज सोबत येणार होते…. त्यांच्या मित्र परिवाराने राजगडचे नियोजन केलं होतं …. पण त्यांना नकार कळवून आमच्या सोबत पुरंदर पहायला यायचं असंच त्यांनी ठरवून टाकलं…..ग्रुप मधील बऱ्याच जणांनी वेगवेगळे नियोजन आधीच केल्याने पुरंदर भेटीसाठी जास्त लोक येणार नाहीत हे स्पष्ट दिसत होतं.पण जे येतील त्यांच्या सोबत जायचं असं ठरवून शनिवारी रात्री झोपी जाणार तेवढ्यात रात्री १२ वाजता फोन वाजला आणि मित्र गणेश सुभनावळ म्हणाला “मी पण येणार उद्या”….मग काय झालच कामं….५ जण येणार म्हणून सचिन शिंदे सरांची एकच फोर व्हीलर होती त्यातून जायचं ठरलं होतं….कारण अजुन पावसाळा संपला नाही ना….मग टू व्हीलरवर कसे जाणार …ह्या निसर्गाचं चक्रचं जणू उलटं फिरतयं…..सोबत असणारे साहित्य भिजेल म्हणून हा सारा फोर व्हीलरचा घाट घातला होता.पण आता गणा येणार…. मग त्याला जोशी विहिरी जवळ यायला सांगितले.तिथे रायगड इन हॉटेल वर नाश्ता करून बंधू गुरुनाथ बाबर(भाऊ),डॉ प्रवीण जाधव सर,सचिन शिंदे सर,धनंजय कणसे(धनुभाऊ) ही एक टीम फोर व्हीलर मधून आणि मी अन् गणा टू व्हीलर वरून अशा दोन टीम झाल्या…..बोलत बोलत….भिजत भिजत……खंबाटकी बोगदा……खंडाळा….शिरवळ….करत नारायणपूर गाठलं…..आणि पुढे सुरू झाला पुरंदर घाट प्रवास……गडावर जाणारा रस्ता हा आर्मीच्या ट्रेनिंग सेंटर गेट…आणि मग आत घेवून जाणारा असल्याने अगदी उत्तम आहे…..गेट वर व्यवस्थित माहिती पुरवल्यानंतर आम्ही आत आलो…..आर्मीचे जवान अगदी व्यवस्थित सर्व सूचना देत होते……आम्ही ६ जण आत आलो……ते सर्वप्रथम एक तळे दिसले….पहिल्यांदा वाटले हेच की काय पद्मावती तळे….पण ते नाही…..नंतर आपल्याला दिसते एक छोटेसे दत्तमंदिर…पुन्हा शिवमंदिर…..आणि मग लागते एक चर्च……सुंदर रचना असणाऱ्या ह्या चर्च मध्ये काही क्षणचित्रे टिपली की आपण पोहोचतो ते बिनी दरवाजा जवळ….नारायणपूर मधून चालत वर आल्यावर ह्याच दरवाजाने आत प्रवेशाचा मार्ग आहे…पण सध्या तो बाहेरून बंद केला आहे……अगदी मजबूत बांधकाम….पहारेकऱ्यांच्या देवड्या….कमानी जवळ भिंतीतच श्री गणेशाची छान मूर्ती…आणि पायऱ्यांवरून कमानी वर जायला रस्ता…..वरती अगदी २० फूट लांब आणि १० फूट रुंद जागा आहे…..तिथून खाली आलात की सरळ थोडे पुढं आले मी एक चर्च लागते….आणि त्या चर्चच्या समोर म्हणजे पश्चिमेच्या बाजूस आर्मिने सिमेंटचा वापर करून जमिनीवर भारताचा नकाशा बनवला आहे…..तसेच पुढे आल्यावर एक भला मोठा पुतळा दिसतो…..हो….. त्या उंच पुतळ्याकडे मान करून पाहिले की दिसतो एक करारी चेहरा…..दोन्ही हातात तलवार….आणि निधड्या छातीने शत्रूला “आरं….. ए अंगावर नाय तुझं तुकडं केलं तर नावाचा मुरारबाजी देशपांडा नाय……म्या राजांचा सरदार हाय…. तुझा कौल घेतो काय….”म्हणत दिलेरखानावर चालून जाणारा हाच तो पराक्रमी योद्धा…..सरदार मुरारबाजी देशपांडे यांचे ते रूप पाहून आणि कार्य आठवून आपण नतमस्तक होतो.
” देऊन आपल्या प्राणांची आहुती,
झाले अमर हे वीर मावळे किती,
भाग्य आमचे…पाहतो आज हे स्वराज्य
अन् लावतो कपाळी आपल्या पदस्पर्शाची माती ”
मुरारबाजींचा पुतळा आणि त्याला लागून असणारे त्यांचे समाधी मंदिर पाहून आम्ही पुढे चालत आलो…..आणि दिसले गडावरील पुरंदरेश्वर मंदिर……थोडेफार हेमाडपंथी स्वरूपाचे असणारे हे जुने मंदिर अलीकडे पुन्हा जीर्णोध्दार झालेले दिसते….तिथे असणाऱ्या शिवलिंगाचे दर्शन घेतले….त्यामागे आहे छोटी….साधारण १ फूट उंचीची इंद्रदेवाची मूर्ती आहे….तिथून बाहेर आलो की मंदिराच्या मागे पेशव्यांनी बांधलेले छोटेसे रामेश्वर मंदिर दिसते….तिथून बाहेर आलात की हनुमानाचे एक छोटेसे मंदिर आहे….पुरंदरेश्वर,रामेश्वर अन् हनुमानाचे दर्शन घेतले की पुढे सरळ चालत जायचं….मग एक ब्रिटिशकालीन यंत्र दिसतं…..ते पाहून आम्ही वेगळेच तर्कवितर्क लावत होतो….छपाईचे यंत्र असेल,लोखंड वाकवण्यासाठी वापरले जाणारे यंत्र असेल असे वेगळे अर्थ लावून झाले….आणि शेवटी कंटाळून आर्मीच्या जवानाला विचारले तेव्हा समजले की ते विहिरीतून पाणी काढण्यासाठी वापरले जात होते…जवळच एक विहीर आणि पेशवेकालीन पडका वाडा दिसतो….आता तिथे आल्यावर दोन रस्ते आहेत….एक सरळ पुढे…पद्मावती तलाव…आणि छत्रपती संभाजी महाराज वंदन स्थळाकडे जातो….तर एक रस्ता वरती गडाकडे जातो.
पहिल्यांदा आम्ही गडाच्या दिशेने वरती आलो….सगळीकडे सिमेंटचे असणारे रोड सोडून आता प्रवास सुरू होतो छोटया कच्च्या चिंचोळी वाटेतून…..थोडे वरती आल्यावर ब्रिटिश काळात बांधलेली दोन पाण्याची टाके आणि एक पडकी भिंत दिसते….आणि तिथून ५ मिनिट वर चालत आलात की दिसतो दिल्ली दरवाजा…
होय दिल्ली दरवाजा….उत्तरेकडे तोंड करून असणारा हा दरवाजा…..बाजूच्या भिंतीत कोरलेली हनुमानाची मूर्ती….पाहून मनात एक विचार आला आणि काही वेळ दरवाजाकडे पाठ करून मी पण उत्तरेकडे पाहू लागलो.
आणि डोळे बंद करून गडाचा भूगोल डोळ्यासमोर आणला…..पूर्व पश्चिम बेलाग पसरलेला पुरंदर….गडाच्या पूर्व सोंडेवर वज्रगड….असा हा किल्ला जणू आपले हात पूर्व पश्चिमेला पसरून छाती ठोकून उत्तरेला सांगतोय….”या मुघलांनो या….मी उभा आहे छातीवर वार झेलायला….माझ्या कुशीत बसलेली ही माझी सह्याद्रीची पिल्ले….माझ्या राजाचे मावळे…..भले संख्येने कमी असतील….पण तुमची लाखाची फौज कापून काढतील….. लढायला अन् हसत हसत मरायला न घाबरणारी ही पिल्ले आहेत माझी….आणि मी अजस्त्र उभा आहे छातीवर तुमच्या तोफांचे वार झेलायला….बघु या समोर कोण अडवतो माझ्या राजाला….मी ठाम उभा आहे…..दक्षिणेतला शत्रू….आदिलशहा…..पाठीवर वार करतोय….माझ्या राजाच्या स्वराज्याची ही…. माझी लेकर कधीच भारी पडली हायत त्याला….म्हणूनच तर तू पण घाबरला हायस औरंग्या आणि तुला भीती आहे तूझ्या दिल्लीच्या तख्ताची…..कारण माझा राजा कधीच काळजात घुसला आहे तूझ्या…..भीतीनं हैराण आहेस तू…..समजत नाही तुला काय करावं…. एवढुस वाटणारं जहागिराचं पोर……आता स्वराज्य उभारायला निघालयं…..जिंकली त्यानं जावळी…. फाडलं त्यानं अफजलखानाला….जेरीस आणलं त्यानं सिद्दी जौहराला…. जिंकला पन्हाळा अन् जणू कापल नाक त्या आदिलशहाचं….बंद केलं त्याचं दार इकडे माझ्याकड यायचं….. आर् वेड केलं त्यानं पुऱ्या आदिलशाहीला…..आता तू ही वेडा झालास अन् घाबरून पाठवलस मिर्झाराजाला….”
खरच राजांचा पराक्रम…..दिल्लीच्या तख्ताला भिडला……म्हणून तर मिर्झाराजा जयसिंगाचा वेढा पुरंदराला पडला.
दिल्ली दरवाजा पाहून वरती आल्यावर सुरक्षेच्या दृष्टीने पत्र्याची भिंत उभी केली आहे…. त्यापलीकडे खोल दरी आहे…..एक खोल दरी…एक कडा…तोच तो खंदकडा….तिथून पुढे आल्यावर आणखी एक पूर्वाभिमुख दरवाजा लागतो….अन् तिथून आत आल्यावर पुन्हा एक उत्तराभिमुख दरवाजा…..असे एकूण ३ दरवाजे पार केले की आत आपण गडावर येतो…..गडाची उत्तर रांग….अनेक बुरुजांनी भक्कम केली आहे…..तर आत पडका वाडा….पुढे पिण्याच्या पाण्याची विहीर……वरती जाताना विहिरीच्या उजव्या बाजूस मोठे पाण्याचे टाके लागते….आणि त्याच्या पलीकडे देखील अजुन एक भलेमोठे टाके आहे….
ज्यात उतरायला पायऱ्या देखील आहेत.त्या पाहून पुन्हा मुख्य कच्च्या रस्त्यावर आलो की सरळ पुढे चालत यायचं…..थोडासा धोकादायक वाटेल असा छोटा रस्ता आहे…आणि त्याच्या डाव्या बाजूला छोटे पाण्याचे टाके आहे….जर पाय घसरला तर त्यात पडू शकतो….ज्यांना भीती वाटते त्यांनी टाक्याच्या अलिकडून एक रस्ता थोडा खाली जातो त्या मार्गाने चालत पुन्हा वरती यावे…..ते पाण्याचे टाके पार केले की पुन्हा आणखी एक टाके लागते….ते पाहून आम्ही चालत पुढे आलो…..आणि मग दिसला एक सुरेख पायऱ्यांचा रस्ता…..अगदी कोरीव आणि साचेबद्ध हे दगडी बांधकाम पहात चालत आम्ही पायरी मार्गाने वरती आलो…..आणि दर्शन झाले घुमटात असणाऱ्या नंदीचे अन् समोर असणाऱ्या त्रिशुळाचे…..पायातील बूट बाजूला ठेवून प्रवेश केला…. तो त्या गडावरील सर्वोच्च स्थानावर असणाऱ्या केदारेश्वर मंदिरात…… शिवलिंगासमोर नतमस्तक होवून क्षणभर आठवला तो इतिहास……विचारांची शृंखला तशीच मनात सुरू ठेवत…. सर्वांशी गप्पा मारत सुरू झाला परतीचा प्रवास….चालत खाली आलो….आणि जिथून दोन वाटा फुटतात…..एक गडावर जाण्यासाठी….आणि एक सरळ छत्रपती संभाजी महाराज वंदन स्थळाकडे…..तिकडे जाताना पहिल्यांदा लागते छोटीशी बाग ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे…..तिथून पुढे आल्यावर आहे…..पद्मावती तलाव…..आणि मग आहे ते छत्रपती संभाजी महाराज वंदनस्थळ…..आपल्या आर्मीने अलीकडेच फेब्रुवारी २०२१ मध्ये त्याचे नितनीकरण केले आहे…..आत मध्ये गडांचे सुंदर चित्र…..तलवारीची माहिती…..संभाजी महाराजांचा जीवनक्रम दाखवणारी चित्र…..स्वराज्याच्या कामी आलेल्या प्रत्येक सरदाराचे नाव असणारा फलक…..हे सारे पाहून आपण बाहेर आलात…..की पुन्हा होतो परतीचा प्रवास…..
गडावरील बरीच ठिकाणे सुरक्षेच्या दृष्टीने फिरण्यास बंद केली असली तरी जेवढे आपण पाहतो त्यातही जीवनाचे सर्वात मोठे सुख मिळाले असे वाटल्याशिवाय राहणार नाही.
गडाचा इतिहास सर्वश्रुत आहे त्यामुळे त्यावर जास्त बोलणे योग्य ठरणार नाही.पण सध्या आर्मीने परवानगी दिलीच आहे तर नक्की सर्वांनी भेट द्यावी….कारण आपले वर्तन हे कायम घातक ठरवून जगत असलेला मनुष्य नक्कीच तिथे काही भलते साहस करण्याच्या इराद्याने वागायचा आणि पुन्हा गड आपल्या सामान्यांना बंद व्हायचा असे नको.
कारण समोरच एक घटना अशी झाली की जीवनात पहिल्यांदा असे घडले की छत्रपती शिवाजी महाराज की….असा आवाज कानी आल्यावर जय म्हणू वाटले नाही….तर ते म्हणणाराचा राग आला…..काय चुकले असेल माझे बोलणे तर क्षमा असावी….पण घडलेला प्रकार आपल्या सोबत सांगू वाटतोय….
गड पाहण्याची वेळ सकाळी १० ते ४ केली आहे….आम्ही ३.३० वाजता खाली उतरलो त्यावेळी मुलांचा एक ग्रुप तिथे आला होता…..वेळ खूप झाला असल्याने जवान समजावून सांगत होते की ४ वाजता बाहेर निघावं लागेल…..त्या सूचना ऐकताना मुलं कुचेष्टेने हसत होती…. गप बस कळतय आम्हाला…असे एकमेकांत कुजबुजत होती…काहीजण किंचाळत होती…आणि त्या जवानाने त्याचे तोंड बंद करून सूचना सांगणं बंद करावं या उद्देशाने त्याच्याकडे बघत जोरात छत्रपती शिवाजी महाराज की….हा घोष देत नाचत होती……काश्मीर मध्ये दगडांचा मार खावून देखील आपल्या माणसांवर नजर रागाने वर देखील न करणारे….अनुशासन,मर्यादा,शांतता ह्याचा पूर्ण अभ्यास असणारे जवान शांत बसले खरं….पण हाच का त्यांच्या बद्दलचा अभिमान…. हाच का त्यांचा आदर…..ह्याचा विचार प्रत्येकाने करायला हवा…..आपल्याच अनुशासित माणसांनी….आपल्यासाठी खुला केलेला हा मार्ग…..केलेल्या सुविधा…..आपल्याच लोकांनी जपायच्या की असे वेडे चाळे करुन आपल्याच लोकांची गैरसोय करायची हे आपल्यालाच ठरवायचे आहे.

शब्दसारथी
निलेश बाबर
९२७१००८८९३