स्मृतीगंध…..ट्रेक नंबर १५……भाग १….कल्याणगड अन् सातारा इतिहास

स्मृतीगंध

भाग १

ह्या सुंदर जगाचा काही काळ रहिवासी तू
शोधण्या स्वतःला फिरशील सर्वत्र तू
भेटेल का कधी तुला तूझ्यातील स्वत्व रे
जर नाही उमगले कधी स्वतःचेच महत्त्व रे
भटकशील नुसता भेटतील असंख्य लोक रे
राहशील रिकामा जर ना उमगली जगण्याची रीत रे
विसरून जगाला शोधावा कधी असा एखादा प्रांत
जिथे मनालाही मिळावा थोडासा एकांत
जर असशील निर्भीड तर नसेल कसली भ्रांत
दुःखातही सावरुन स्वतःला करता यावं शांत
शिकवायला तुला बघ हा निसर्ग आहे उभा
फक्त तुला ऐकता याव्या ह्या झाडाझुडपांच्या सभा

ट्रेक नंबर १५

कल्याणगड अन् सातारा इतिहास

२८ नोव्हेंबर २०२१

सातारा……राजधानी सातारा…..आपला सातारा…..इथून अगदी २५ किमी अंतरावर असणारा किल्ले कल्याणगड आणि तिथून जवळच अगदी ७ किमी अंतरावर असणारा साखरगड… ह्या गडांची रविवारी भेट घडली.सकाळी अगदी लवकर जावं आणि दुपारपर्यंत माघारी यावं असा हा अगदी सोपा ट्रेक…..पण आजवर जाणे झाले न्हवते.त्यात एका मित्राला सहज विचारले अरे कल्याणगड पहायला जाणार आहे….त्यावर तो सहज म्हणाला ” य जाऊन भारी हाय… कल्याणगडाव एक लांबडी गुहा हाय त्यात दत्ताची आण पार्श्वनाथाची मूर्ती हाय…बाकी दोन दरवाजे आन समाधी हाय वर ; बाकी काय नाय एवढं बघाय….आन साखरगडाव देवीच दिवुळ हाय…. य बघून लगीच हूयील बघून”
आता ह्यात त्याचं काहीच चुकल नाही…..कारण एवढीच माहिती आपल्यापर्यंत आली आहे ना…..मग तो तरी वेगळे काय सांगणार…..आणि वेगळे काही समजले नाही तर आपण तरी तिथे का जाणार ?
खरच राजांचा प्रत्यक्ष संबंध आलेल्या गडकोटांची माहिती सगळीकडे आहे ……शिलेदारांनी लढविलेल्या गडांची माहिती देखील बऱ्यापैकी आहे ……मग साहजिकच आपल्या भेटी तिथे होणार…..कारण उत्सुकता तेव्हाच राहते जेव्हा आपल्याला तिथलं काही माहित असतं…. पण खर तर अशी अनोळखी ठिकाणं बऱ्याचदा इतिहासाची नव्यानं ओळख करून देतात…..ज्ञान आणि सुख मिळवण्याच्या हेतूने आपण परिचित ठिकाणी जातो हे योग्यच….पण काही अपिरिचित ठिकाणीही बरच काही सुख दडलेलं असतं हे कल्याणगड पाहून समजलं….. जसा पूर्ण चंद्र एक विलक्षण आनंद देतो तशी चंद्रकोर ही नभाला सुशोभित करतेच की…..कारण तिचं अस्तित्व थोड दिसत असलं तरी नभाचं सौंदर्य कमी झालेलं नसतं.
त्यामुळं आज मला ह्या लेखातून सांगावासा वाटतोय तो ह्या दोन्ही गडांबद्दलचा इतिहास…..जो थोडा बहुत मला माहीत आहे.माझ्या वाचनात एक अशी गोष्ट आली की त्यात स्पष्ट लिहिलं आहे…. की गडावर दत्ताची मूर्ती अन् कल्याणस्वामींची समाधी आहे…त्यामुळे इथे पर्यटकांपेक्षा भाविकांची गर्दी जास्त असते…..आणि जसे मी मघाशी म्हणालो तसेच आहे ना…..ज्या प्रकारची माहिती उपलब्ध असेल तसेच घडणार…..आता माहितीच जर फक्त देव अन् समाधीची असेल तर इथे भाविकचं‌ जास्त येणार ना.
गडांचा इतिहास फार जुना आहे….शिवकाळात त्याला खूप महत्त्व आहे…..कारण ह्याच गडकोटांनी राजांच्या स्वप्नातलं स्वराज्य उभं करायला मदत केलीय….पण जसं की आपण ऐकलय १० व्या ११ व्या शतकात शिलाहार राजांनी बरेच गड बांधले आहेत.आणि कल्याणगड देखील कोल्हापूरचे शिलाहार राजा भोज दुसरे यांनी इ.स.११७८ ते १२०९ ह्या काळात बांधला असावा.
राजा भोज दुसरे यांचे आजोबा राजा गंडरादित्य यांची पत्नी राणी कर्णावती ह्या जैन धर्माचे आचरण करणाऱ्या होत्या. त्यामुळे हिंदू,बौद्ध मंदिरांसोबतच जैन धर्मीयांच्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात दानधर्म केला जात होता.हीच परंपरा पुढे त्यांचे पुत्र विजयादित्य,अन् आणि नातू… राजा भोज द्वितीय यांनी सुरू ठेवली.
इ.स पूर्वी पासून सुरू असणाऱ्या जैन धर्मीयांचे एकूण २४ तीर्थंकार.पहिले तीर्थंकार ऋषभदेव(आदिनाथ) तर २४ वे महावीर आहेत. त्याआधी असणारे २३वे तीर्थकार म्हणजे भगवान पार्श्वनाथ ज्यांचा कार्यकाळ इ.स पूर्व ८७२ ते ७७२ असा आहे.
कल्याणगडाच्या गुहेत असणारी मूर्ती ही भगवान पार्श्वनाथांची आहे.याचा अर्थ इ.स.पूर्व काळापासून चालत आलेला हा जैन धर्म आणि त्यांचे धर्म प्रचारक देशभर भ्रमंती करत असताना त्यांनी ठिकठिकाणी गुहा,लेणी बांधली आहेत. इ.स.पूर्वी पासून असणाऱ्या ह्या लेण्यांचा अभ्यास आजही खूप मोठा आणि विचार करायला लावणारा आहे.
ही झाली जैन धर्म आणि तिर्थकार भगवान पार्श्वनाथ यांची पार्श्वभूमी.आता आपण जर पुन्हा ११व्या शतकात असणाऱ्या कोल्हापूरचे शिलाहार राजा भोज दुसरे यांच्या बद्दल पाहिले तर साताऱ्यात अजिंक्यतारा,चंदन वंदन,पांडवगड,केंजळगड,सज्जनगड,वैराटगड आणि कल्याणगड हे त्यांनी बांधले आहेत.त्यामुळे साताऱ्याच्या इतिहासात त्यांचा उल्लेख असणे फार गरजेचे आहे.
दक्षिण उत्तर पसरलेल्या कल्याणगडावरून पाहिले असता उत्तर टोकावरून चंदन वंदन,वैराटगड,साखरगड दिसतो तर दक्षिण टोकाकडे आल्यावर समोर जरंडेश्वर,आणि लांब दूरवर असणारा अजिंक्यतारा दिसतो.पण प्रत्यक्ष इतिहासात जास्त काही घडामोडी ह्या किल्ल्या बाबतीत दिसत नाहीत.कदाचित चढाईस सोपा असूनही पण जावली खोरे ते कोल्हापूर….विजापुर प्रवासात हा लांबवर असल्याने हा युध्दात दुर्लक्षित राहिलेला असावा.
राजा भोज द्वितीय यांचे वाढते साम्राज्य बघून देवगिरीचे राजा सिंघण यांनी युद्ध करून शिलाहार राजवट संपवली. इ.स.१२१२ मध्ये शिलाहार घराणे संपले त्यांनतर इ.स.१३१८ पर्यंत देवगिरीच्या यादवांचे साम्राज्य दिसते.पण इ.स.१३१८ मध्ये मुबारक खिलजीने….. हरपालदेव यांचा पराभव करून यादव साम्राज्य संपवले.पुढे इ.स.१३४७ पर्यंत खिलजीचे असणारे साम्राज्य बहामनी साम्राज्याने संपवले.
पुढे इ.स.१५२६ पर्यंत बहामनी साम्राज्य पूर्ण दक्षिण भारतावर चांगले विस्तारले होते.पण अंतर्गत वादातून निर्माण झालेल्या ५ शाह्या…. त्यातील आदिलशहाची कारकीर्द फार मोठी ठरली आणि त्याच्याच काळात सातारा हा इतिहास पटलावर जास्त केंद्रित झालेला दिसतो.कारण दक्षिणेत विजापूर मधून राज्यकारभार चालवताना उत्तरेतून येणारा शत्रू….त्याची चाहूल घेणे,…..त्याच्या सोबत युद्ध करून इथेच थोपवणे आदिलशहाला सोयीचे होते कारण…..जावळीचे खोरे…….आणि पूर्ण सातारा परिसर …..हा घनदाट जंगलांनी वेढलेला असल्याने शत्रूचा बिमोड करणे सोपे जात होते.
इ.स.१६५९ मध्ये अफजलखान वध केल्यानंतर दक्षिणेत बरेच गड राजांनी जिंकले त्यात पन्हाळा देखील होता.पण त्यातही कल्याणगडाचा उल्लेख दिसत नाही.पण पुन्हा जेव्हा इ.स. १६७३ मध्ये पन्हाळा नव्याने जिंकला त्या दरम्यान राजांनी कल्याणगड स्वराज्यात सामावून घेतला.
खर तर कल्याणगड भेटीत ही सारी माहिती देणे कितपत योग्य आहे नाही माहित.पण हे सारे सांगण्यामागे एकच उद्देश की ११व्या शतकापासून ते १६ वे शतक संपेपर्यंत संपूर्ण भारतात….विशेषतः दक्षिण भारतात बरेच आक्रमण….बऱ्याच लढाया झाल्या…..ह्या सर्वात ही अत्यंत शांत राहिलेला कल्याणगड म्हणजे एक शांततेचे ठिकाणचं म्हणावं लागेल.
गडावर पाहिलेली ठिकाणे आपण भाग २ मध्ये पाहू.आणि साखरगडाच्या माहितीसाठी भाग ३ चे लिखाण केले आहे.एकच लेख मोठा झाला की वाचण्यात ही कुचराई होते….आणि उगाच लिखाण देखील रटाळ होवून जाते म्हणून ह्या ट्रेक बद्दल ३ भागात लिखाण आणि व्हिडिओ बनवल्या आहेत.भेटू भाग २ मध्ये

शब्दसारथी
निलेश बाबर
९२७१००८८९३