स्मृतीगंध
भाग 2
ह्या सुंदर जगाचा काही काळ रहिवासी तू
शोधण्या स्वतःला फिरशील सर्वत्र तू
भेटेल का कधी तुला तूझ्यातील स्वत्व रे
जर नाही उमगले कधी स्वतःचेच महत्त्व रे
भटकशील नुसता भेटतील असंख्य लोक रे
राहशील रिकामा जर ना उमगली जगण्याची रीत रे
विसरून जगाला शोधावा कधी असा एखादा प्रांत
जिथे मनालाही मिळावा थोडासा एकांत
जर असशील निर्भीड तर नसेल कसली भ्रांत
दुःखातही सावरुन स्वतःला करता यावं शांत
शिकवायला तुला बघ हा निसर्ग आहे उभा
फक्त तुला ऐकता याव्या ह्या झाडाझुडपांच्या सभा
ट्रेक नंबर १५
कल्याणगड
२८ नोव्हेंबर २०२१
कल्याणगड ,साखरगड प्रवासवर्णन
कल्याणगडाला नांदगिरीचा किल्ला देखील म्हणतात….गडाचा इतिहास आपण भाग १ मध्ये पाहिला.आता तो प्रवास आणि आलेले अनुभव ह्या लेखात मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. सातारा….वाढे फाटा……वडूथ….सातारारोड मार्गे…. नांदगिरी पायथ्याला आलो की दोन मार्ग गडावर जातात……तुम्ही गाडी घेवुनही कच्च्या रस्ता असलेल्या मार्गाने महादरवाजा पर्यंत जावू शकता….पण आम्ही थोडे पुढे जावून असणाऱ्या पायरी….आणि पुढे कच्चा असणाऱ्या रस्त्याने चालत गेलो.
आजच्या ट्रेक मध्ये विशेष बाब म्हणजे आमच्या सोबत होती आमचे मित्र श्री योगीराज सरकाळे यांची ६ वर्षाची मुलगी राजनंदिनी आणि माझे मोठे बंधू गुरुनाथ याचा ९ वर्षाचा चिरंजीव दिव्यांश….दोघेही वयाने लहान पण गड चढाई मध्ये आमच्या ही पुढे होते…..योगीराज सरांनी अगदी लहान वयात मुलीमध्ये दुर्गभेटीची निर्माण केलेली ही सवय आणि आवड खूपच कौतुकास्पद वाटली…..त्यांनी सांगितले आजवर तिने १६ गडकिल्ले पाहिले आहेत….आणि मी सहज म्हणालो ६ वर्षात हिने १६ गड पाहिले….पण मी १६ वर्षात ६ गड पाहिले न्हवते……आणि हे खरच आहे.जर लहान वयात अशी आवड निर्माण झाली तर नक्कीच येणारी पिढी ही चांगली घडेल.माझा पुतण्या दिव्यांश देखील गडावरील शिल्प पाहून त्याचं बारीक निरीक्षण करत होता… भले त्या शिल्पातील अर्थ उमगत नसेल….पण त्याकडे कुतूहलाने पाहणे हे देखील उत्तम निरीक्षक होण्याचेच लक्षण न्हवे का….? ह्या दोन छोट्या प्रवाशांसोबत आम्ही सर्वजण गड चढत होतो.
कामाचा ताण आणि रोजचे रूटीन जीवन आपण सगळे जगत असतोच.त्या रोजच्या जीवनाला छेद देत फायनान्स क्षेत्रात काम करत असलेले श्री संदीप भोसले सर देखील आज आमच्या सोबत होते.ह्या ट्रेक मध्ये आम्ही १० जण आणि सोबत २ लहान मूलं होती.गड भेटीची खूप आवड असणारे आमचे मित्र अनिल पोगाडे हे देखील आज नव्याने आमच्या सोबत जोडले गेले.
हा…. तर सांगत हे होतो की कच्च्या रस्त्याने आम्ही थोडे वरती चालून गेल्यावर…..पाण्याचे एक खांबटाके दिसले….साधारण ६ फूट लांब दिसणाऱ्या ह्या खांबटाक्यात आत प्रवेश केला तर…. उजव्या बाजूस आतपर्यंत साधारण २० फूट खोदले आहे……आत मध्ये चालत शिरताना पाणी जवळजवळ १ फूट वर लागते… ५ ते ६ खांबांवर असलेले हे टाके आत वाकून गेले की आपल्याला ते सारे व्यवस्थित पाहता येते…. टाक्याची उंची साधारण ३ ते ३.५० फूट असेल.
ते टाके पाहून वर आल्यावर आपल्याला उत्तराभिमुख महादरवाजा दिसतो……आजही अत्यंत सुस्थितीत असणाऱ्या ह्या दरवाजातून आत गेलो असता…..डावीकडे वळायचे……तिथे अलीकडे बांधलेले शेड दिसते……तिथून थोडे खाली उतरलो की उजव्या बाजूला एक छोटेसे मंदिर लागते….आत मध्ये असणारे शिवलिंग पाहून मनाला शांती मिळते…..आजवर मी आणि माझ्या सोबत असणाऱ्या मित्रांनी ज्या ज्या गडांवर गेलो तिथे शिवलिंगाचे दर्शन घेवून पुढे जाणे हाच क्रम असायचा…..पण आज काही वेगळेच घडले होते….डॉ प्रवीण जाधव सरांचे मित्र…..श्री यतिष गुजर सर आमच्या सोबत होते…..त्यांनी आपल्या बॅग मधून तांब्याचा कलश बाहेर काढला आणि पाण्याची बॉटल त्यात ओतली….मला काही समजणार ह्या आधी त्यांनी मंदिरात प्रवेश केला….आणि शिवलिंगावर पाणी ओतून ते छान धुवून घेतले…..सोबत आणलेली फुले वाहून पूजा केली….एवढ्यावर हा कार्यक्रम थांबला नाही तर त्यांनी सोबत तेल अन् कापूर आणला होता…. दिवा लावून कापूर पेटवला आणि मग आम्ही सर्वांनी शंकराची आरती म्हणली…..गडांना दिलेल्या आजवरच्या भेटीत हा एक विलक्षण अनुभव होता…..तिथून असणाऱ्या पायऱ्या उतरून आम्ही खाली आलो….साधारण ४ फूट उंच असणाऱ्या गुहेच्या तोंडात आम्ही प्रवेश केला…..थोडे वाकून आत चालत गेले असता पुन्हा गुहेची उंची ६ फुटांवर जाते……आणि आत दोन्ही बाजूला छोटी भिंत बांधून घेतल्याने पाणी बाजूला अडले जाते….. पूर्वी ते पाणी पायातच येत असे…..चालत आतमध्ये साधारण १०० फूट आल्यावर उजव्या बाजूस सध्या बांधून घेतलेले एक छोटे जैन मंदिर लागते….त्यातच ९व्या शतकात बनवली गेलेली भगवान पार्श्वनाथ यांची मूर्ती दिसते.
तिथून पुढे आलो की डाव्या बाजूस देवी पद्मावतीची एक छोटीसी मूर्ती दिसते ती अलीकडच्या काळातील असेल…. तर काही पावलं चालत पुढे आलो की दर्शन होते दत्त दिगंबराचे….संगमरवरी मूर्ती आणि बाजूची भिंत टाइल्सने बांधून घेतल्यामुळे फार सुरेख दिसते आणि ते पाहून गुहेत एवढ्या आत आल्याचे समाधान मिळते…..तिथेही दिवा लावून आम्ही सर्वांनी दत्ताची आरती म्हणली…..आणि मूर्तीच्या बाजूला आम्हाला दिसला एक शंख……आमच्या सोबत पहिल्यांदाच आलेले… आयुर्वेदात चांगले काम करणारे आमचे मित्र श्री योगीराज सरकाळे सर…. त्यांनी तो शंख नसून ती शंखीनी असल्याचे सांगून ती हातात घेतली…आणि शंखनाद केला……गुहेत असणारी भयाण शांतता आणि त्यात झालेला हा शंखनाद आम्हा सर्वांना खूपच आवडला…..मग श्री यतिश गुजर सर आणि धनुभाऊ यांनी देखील त्या शंखीनीचा नाद उत्तम भरला……कधी न्हवे ते समोर हे घडताना पाहून मला ही मोह आवरला नाही…आणि मी ही प्रयत्न केला…..आणि जाणवले की जरी हे दिसताना सोपे वाटत असले तरी तशी अवघड कला आहे….कारण बराच वेळ प्रयत्न करूनही मला काहीच जमत न्हवते…..मग शेवटी हार मानून तो घुमणारा शंखनाद मनात साठवून आम्ही गुहेतून बाहेर निघालो…..पुढे आल्यावर दिसला तो पूर्वाभिमुख दरवाजा…..आणि बाजूला असणारे दोन बुरुज….खूप सुंदर रचना असणाऱ्या ह्या दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे वळलो की लागते ते हनुमानाचे मंदिर….आणि वरती असणाऱ्या कळसावर बनवली आहे ती गणपतीची मूर्ती…ती पाहून तसेच उत्तरेकडील टोकाकडे आले असता लागते एक जुने घर….. ते उघडून आत गेल्यावर एक यज्ञकुंड दिसतो……तिथून वर आलो की उत्तरेकडे पाहिले तर काही पवनचक्की दिसतात…. वरून पाहताना त्यांची फिरणारी पाती चांगलीच मोठी दिसतात…कारण फार जवळून ते आपण पाहत असतो…..ते पाहून पुन्हा दक्षिणेकडे चालत यायचं……मग आपल्याला दिसते ती कल्याणस्वामींची समाधी आणि जवळच एक पाण्याचा तलाव ….पाण्याचा उपसा नसल्याने पाणी एकदम शेवाळलेले दिसते…..तिथून पुढे चालत आलो की लागते एक घर…..जिथे सध्या वास्तव्य आहे ते बलदेव महाराज त्यागी स्वामींचे…..त्यांच्या घरासमोर असणाऱ्या व्हरांड्यावर बसून आम्ही सोबत आणलेला नाश्ता खाऊ लागलो….पण सर्वांनी एकमेकांचे आणलेले पदार्थ एकत्र नीट खाता यावेत म्हणून बलदेव महाराजांनी आम्हाला त्यांच्या जवळ असणारी ताटे दिली. ज्यात आम्ही सर्वांनी मिळून मिसळून गप्पा मारत आणलेला खाऊ खाल्ला.
त्यांच्या घराच्या मागे असणाऱ्या मोठ्या सभागृहाच्या डाव्या बाजूला एक शीळा आहे त्यावर तलवार शिल्प कोरले आहे.अतिशय सुबक असणारे ते शिल्प आम्ही कॅमेऱ्यात कैद करून पुढे गेलो…..तिथून पुढं आल्यावर लागते ते उंच असे वडाचे झाड आणि त्या बाजूला आहे एक कबर…… कोणा अब्दुल करीम याची ती कबर असल्याचे बोलले जाते…..तिथून पुढे दक्षिणेकडे आल्यावर पाण्याचे एक छोटे टाके लागते…..त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही.ते पाहून झाल्यावर सुरू होतो परतीचा प्रवास.
कल्याणगडावरील बऱ्याच आठवणी आम्ही कॅमेऱ्यात कैद केल्या होत्या.सारे फिरुन वेळ झाली होती दुपारी १२ची मग ठरवले इथून जवळच असणारा साखरगड देखील पाहूनच जावू….आणि मार्गस्थ झालो पेठ किन्हईकडे…..साखरगडाची माहिती आपण तिसऱ्या भागात पाहू.
शब्दसारथी
निलेश बाबर
९२७१००८८९३