स्मृतीगंध
भाग ३
ह्या सुंदर जगाचा काही काळ रहिवासी तू
शोधण्या स्वतःला फिरशील सर्वत्र तू
भेटेल का कधी तुला तूझ्यातील स्वत्व रे
जर नाही उमगले कधी स्वतःचेच महत्त्व रे
भटकशील नुसता भेटतील असंख्य लोक रे
राहशील रिकामा जर ना उमगली जगण्याची रीत रे
विसरून जगाला शोधावा कधी असा एखादा प्रांत
जिथे मनालाही मिळावा थोडासा एकांत
जर असशील निर्भीड तर नसेल कसली भ्रांत
दुःखातही सावरुन स्वतःला करता यावं शांत
शिकवायला तुला बघ हा निसर्ग आहे उभा
फक्त तुला ऐकता याव्या ह्या झाडाझुडपांच्या सभा
ट्रेक नंबर १५
साखरगड
२८ नोव्हेंबर २०२१
साखरगड इतिहास आणि प्रवासवर्णन
नांदगिरी पासून साधारण ७ किमी पुढे पेठ किन्हईकडे आलो असता आपल्याला दिसतो एक छोटासा,आटोपशीर आणि रुबाबदार गड…. तोच साखरगड.
गडावर जाण्यासाठी पायरी मार्ग आणि डांबरी रस्ता असे दोन्ही मार्ग आहेत. भर दुपारी उन्हाची वेळ आणि काही जणांना लवकर घरी जायचे होते म्हणून आम्ही पायरी वरून न जाता डांबरी रस्त्याने सरळ वरती आलो.
अतिशय सुंदर असा दरवाजा आणि त्यावरील नक्षीकाम,अलीकडे केलेलं रंगकाम ह्याने गडप्रवेशा आधीच मनाला खूप छान वाटत.
गडावर अंबामातेचे खूप सुंदर मंदिर आपल्याला पहायला मिळते.तिथे असणाऱ्या ४ दीपमाळा ह्या अतिशय सुंदर आहेत.त्यातील सर्वात उंच असणारी दीपमाळ इ.स१८५२ मध्ये उभारली असून त्यावर मोराची नक्षी असून दिपमाळेवर वानरांचे शिल्प ही आहे.
आत प्रवेश केल्यावर अंबामातेचे दगडात कोरलेलं आणि अलीकडे रंग दिलेलं शिल्प आहे ज्यात तिने औंधासुराचा वध केलेलं दर्शविले आहे.तटबंदीच्या भिंती मध्ये छोट्या छोट्या दिवळी असून त्यात श्रीकृष्ण,विठ्ठल रखुमाई,शिवलिंग अशा वेगवेगळ्या देवदेवतांच्या मूर्ती आहेत.मंदिर तसे छोटे असले तरी एकदम सुंदर आहे. पूर्वाभिमुख असणाऱ्या ह्या मंदिराच्या समोर एक छोटीसी हनुमान मूर्ती असून त्याच्याच बाजूला शिवलिंग पहायला मिळते.
हे सारे पाहून आम्हा सर्वांनाच छान वाटलं.आणि एकाच दिवशी ह्या दुसऱ्या गडावर देखील आलो याचे समाधान वाटले.मजा आली ती खर राजनंदिनीच्या करामती पाहून.मोठ्या दिसणाऱ्या दीपमाळेकडे पाहून आणि त्यावर असणारे मोराचे नक्षीकाम पाहून तिने त्यावर चढून बसण्याचा हट्ट केला आणि त्यावर बसून बराच वेळ खेळण्याचा आनंद घेतला.
कल्याणगडाची चढाई आणि पुन्हा उतरून ह्या दुसऱ्या गडावर आलो तरी आमच्या सोबतचे लहानगे दिव्यांश आणि राजनंदिनी दोघेही अजिबात थकेलेले न्हवते हेच विशेष.
भाग एक मध्ये कोल्हापूरचे शिलाहार राजा भोज दुसरे यांच्या पासून ते पुढे शिवकाळात आपल्या साताऱ्यात घडलेल्या घटना मांडल्या आहेत.पण शिवकाळापुढे आणि छत्रपती संभाजी महाराजांनंतर… छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळात….. इ.स.१६९० ते १६९९ दरम्यान आपल्या पराक्रमाने किन्हईचे परशुराम त्रिंबक पंतप्रतिनिधी यांनी राजाराम महाराजांकडून सुभालष्कर,समशेरजंग हे खिताब मिळवले होते.त्याच दरम्यान त्यांनी औंध संस्थानाची स्थापना केली.पन्हाळा पुन्हा मिळवून (राजाराम महाराजांच्या काळात) स्वराज्यात आणण्यात परशुराम त्रिंबक पंतप्रतिनिधी यांचे योगदान फार मोठे ठरते.
पुढे श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी ( कार्यकाळ इ.स.१८४८ ते १९०१) ह्यांनी साखरगड वर असणारी उंच दीपमाळ इ.स.१८५२ मध्ये उभारली. तसा उल्लेख देखील ह्या दिपमाळेवर आहे.
आपल्या साताऱ्यातून अगदी जवळ असणाऱ्या ह्या कल्याणगड आणि साखरगडाला अवश्य भेट द्यावी असं मला वाटतं.चढाईला अगदी सोपे आणि पहायला देखील सुंदर असणाऱ्या ह्या गडांचं पावित्र्य देव देवतांच्या असणाऱ्या मूर्ती आणि मंदिरं हे पहायला येणाऱ्या भाविकांमुळे नक्कीच चांगले राहिले आहे.पण दुर्गभ्रमंतीचे वेड असणाऱ्यांनी देखील नक्कीच इथे यायला हवे.
शब्दसारथी
निलेश बाबर
९२७१००८८९३