स्मृतीगंध….ट्रेक नंबर १६…जखिणवाडी मळाई मंदिर.. मच्छिंद्रगड

स्मृतीगंध

भाग १

ऋतू बदलत जातात,बदलत जातो निसर्ग
बदलतात विचारधारा,बदलतात माणसं
काळानुसार बदलताना बदलून गेल्या कित्येक पिढी
बदलून गेलं सारं,बदलून गेल्या रूढी
सामर्थ्याच्या प्रदर्शनात सत्तांनी किती दिले एकमेकांना शह
थोड सांभाळून घेताना घडले किती तह
उभारलेल्या स्वराज्याला ही पुढे पडलं होतं खिंडार
जेव्हा उगारल्या गेल्या होत्या आपल्यांनी आपल्यांवरच तलवार
स्वराज्यासाठी शिवरायांनी शंभूराजांनी अर्पण केले होते सर्वस्व
पण पुढे एकमेकांत भिडली होती स्वराज्यगादी सिध्दकरण्या वर्चस्व
औरंगपुत्र आझमशहाने स्वप्न पाहिले भारी
भिडवून स्वराज्याची गादी मिळवू सत्ता सारी
अहो आले गेले कित्येक जरी धुळीस मिळाले सारे
कारण वाहत होते चोहीकडे फक्त शिवछत्रपतींच्या स्वराज्याचे वारे
भिडवून गादी मिटवू स्वराज्य स्वप्न पाही आझमशहा
विचारांस त्या चपराक बसली नमन त्या वारणेच्या तहा

ट्रेक नंबर १६

जखीणवाडी मळाई मंदिर….आणि मच्छिंद्रगड

५ डिसेंबर २०२१

वारणेचा तह आणि मळाई मंदिरातील तलवार याचा संबंध….. इतिहास आणि प्रवासवर्णन

आठवडा भरात अचानक पावसाने लावलेली हजेरी आणि पुन्हा विस्कळीत केलेलं जीवनमान ह्यात पूर्ण आठवडा गेला होता.आणि आनंदाची पर्वणी घेवून येणारा रविवार उजाडला.पावसाचे वातावरण….कडक थंडी….आणि दाट धुके ह्यात जावे तर कुठे जावे हे ठरत नसताना आमचे मित्र श्री योगीराज सरकाळे सरांनी मच्छिंद्रगड,सदाशिवगड असे नियोजन केले होते.त्यात त्या भागात कधी फिरण्याचा योग न आल्याने मला काहीच माहीत न्हवते.मग आमचे मार्गदर्शक,इतिहास अभ्यासक श्री स्वप्नील चव्हाण सरांना कॉल केला आणि त्या भागातील माहिती घेतली आणि मग त्यानुसार भेटीची ठिकाणे ठरली.
सुरुवात करायची ठरली ती जखीणवाडी गावातून.आता तसे पाहिले तर तिथून जवळ असणाऱ्या आगशीव लेणी सर्वांना माहीत आहेतच.पण आम्हाला जायचं होते ते तिथल्या मळाई मंदिरात.
मंदिर तसे साधेच.अलीकडेच बांधलेले आहे….मग सोबत असणाऱ्या मित्रांना प्रश्न असा पडत होता की ह्यात नक्की पाहण्यासारखे असे काय…?
खर तर हा प्रश्न मलाही होताच.पण जेव्हा दक्षिण बाजूने असणारी आगाशिवची २३ लेणी पाहिली होती.तेव्हा आलेल्या वाचनात जखीणवाडीचा उल्लेख फार महत्वाचा होता.कारण हेच ते गाव जिथे साताऱ्यातून भेटीस निघालेले छत्रपती शाहू महाराज आणि पन्हाळ्याहून निघालेले छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांची भेट २७ फेब्रुवारी १७३१ ला झाली आणि पुढे १३ एप्रिल १७३१ ला एक तह झाला.हाच तो वारणेचा तह.
मग हा तह जखीणवाडी मध्ये १७३१ मध्ये झाला.मग आता तिथे काय…? प्रश्न पडला ना…? उत्तर अगदी सोपं आहे….हो आज तिथे त्या मंदिरात आहे ती छत्रपती शाहू महाराजांनी भेट दिलेली तलवार.
आमचे सुदैव हेच की आम्ही ती तलवार हाती घेवुन पाहू शकलो आणि दुर्दैव हेच की ह्या एवढ्या इतिहास प्रसिद्ध गोष्टीची जास्त माहिती आपल्या पर्यंत नाही.शेवटी आपण वेगळ्या ठिकाणी राहणारे सर्वजण. सगळी माहिती असेलच असे नाही.पण ही गोष्ट गावकऱ्यांना ही माहित नसावी हे खूपच वाईट वाटलं.आम्ही सर्वांनी मंदिरात मळाई देवीचे दर्शन घेतले आणि तलवारी बद्दल विचारणा केली..भेटलेल्या गृहस्थाने प्रश्न केला “लग्न हाय का कुणाचं….?” आम्हाला समजलं‌ नाही ते असं का म्हणत आहेत.मग पुन्हा आम्हीच विचारले असे का विचारत आहात…? त्यावर उत्तर आले….” लग्न आसंल म्हणून तलवार मागतायं असं वाटलं.”
आम्ही समजून गेलो की ह्यांना काही माहित नाही.मंदिराचे ठिकाण विचारत येत असताना बऱ्याच लोकांना विचारलं होतं.पण बऱ्याच लोकांना ह्या तलवारी बद्दल काही माहित आहे किंवा अशी कोणती तलवार तिथे आहे हे माहीतच न्हवतं.असो हा विषय जास्त खोलात घेवून मला कोणते वाद नाहीत निर्माण करायचे.पण एक माफक अपेक्षा हीच आहे की इतिहास प्रसिद्ध असणारी ही घटना आणि त्या घटनेचे प्रतीक असणारी ही तलवार योग्य रीतीने माहिती फलक लावून छान प्रकारे मंदिरात लावली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत अगदी सहजरीत्या हा इतिहास पोहोचेल.
मंदिराची देखभाल करणे,पूजा करणे ही जबाबदारी तिथे असणाऱ्या ४ गुरव कुटुंबावर आहे.एक एक आठवडा असा त्यांनी वाटून घेतला आहे.आम्ही भेटलो ते ह्या आठवड्यात सेवेची जबाबदारी असणाऱ्या सुरेंद्र काकांना.
तिथे असणारी ही मळाईदेवी… हा विष्णूचा अवतार असून कशाप्रकारे भगवान विष्णूने देवीचे रूप घेवून भस्मासुराचा अंत केला ही आख्यायिका त्यांनी आम्हाला छान प्रकारे सांगितली.
आणि जी गोष्ट पहायला आम्ही सर्वजण आतुर होतो ती तलवार त्यांनी आमच्या हाती दिली.तलवारीचा हाती झालेला स्पर्श आणि त्यावर डोके टेकवून आम्ही सर्वजण जणू त्या इतिहासचे साक्षीदारच झालो.
आमच्या सोबत असणारी ६ वर्षाची राजनंदीनी हिच्या हाती आम्ही ती तलवार देवून सुरेंद्र काकांना सोबत घेवून सगळ्यांनी तो क्षण कॅमेऱ्यात टिपला आणि तिथून निघालो ते मच्छिंद्रगडाकडे.
आता बऱ्याच गोष्टी अनुत्तरित राहिल्या असचं वाटतंय ना…पण ज्या काही गोष्टी मला समजल्या त्या मी तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो.
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलेलं स्वराज्य पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी उत्तम प्रकारे वाढवलं.आतील लोकांचे होणारे छुपे कारस्थानी हल्ले,परकियांचे हल्ले सारे काही पेलून छत्रपती संभाजी राजे लढत राहिले पण काळाने अचानक घातलेल्या फसव्या डावात ते शेवटी अडकले. पण धर्म आणि स्वराज्य ह्याचा अभिमान न सोडता शेवटी त्यांनी मरणाला मिठी मारली….राजांची हत्या झाली. अतिशय क्रुरतेचा कळस गाठत औरंगजेबाने जे केले….. त्याने स्वराज्य संपेल हा त्याचा भ्रम पुढे चांगलाच मोडीत निघाला.
” माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या दोन चुका एक म्हणजे शिवाजीची आग्ऱ्याहून सुटका आणि दुसरी म्हणजे संभाजीची हत्या” असे खुद्द औरंगजेबाचे बोल बरचं‌ काही सांगून जातात.
कारण आग्ऱ्याहून झालेल्या सुटकेनंतर स्वराज्य वृंधीगत होत गेले. कारण राजांची युद्धनिती,गनिमी कावा,दूरदृष्टी सारं काही सर्व जनमानसात पसरलं. तसचं छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर स्वराज्य न संपता उलट आणखी त्वेषाने पेटून उठलं.ह्याच त्या दोन चुका ज्यामुळे अखंड भारताचा बादशहा म्हणवून घेणाऱ्या औरंगजेबाला मरेपर्यंत ह्या महाराष्ट्राच्या मातीत झुंझावं लागलं पण यश काही मिळालं नाही.
संभाजी राजांची हत्या करून औरंगजेबाने आपला मोर्चा वळवला तो स्वराज्याची राजधानी रायगडाकडे.त्याने त्याचा वजीर असद खान ह्याचा मुलगा झुल्फिकार खान ह्याला रायगडाकडे पाठवले….रायगडाला वेढा पडणार होता…..त्यावेळी महाराणी येसूबाई ह्यांनी खूप धीराने निर्णय घेतला.पतीचे छत्र हरवले होते.पण पूर्ण राज्याचा विस्तार सांभाळायची जबाबदारी असणाऱ्या येसूबाई स्वतःला दुःखात बुडवून ठेवणाऱ्या न्हवत्या.त्यांनी छत्रपती राजाराम महाराजांचे मंचकारोहन करून घेतले आणि त्यांना जिंजीला धाडले….कारण फक्त एकच.अमाप सैन्य घेवून आलेल्या झुल्फिकार खानाच्या ताब्यात पूर्ण राजघराणे सापडू नये.छत्रपती राजाराम महाराज पत्नी ताराराणी, राजसबाई,अंबिकाबाई ह्यांना सोबत घेवून जिंजीकडे गेले.आणि स्वतः महाराणी येसूबाई आपले पुत्र शाहू महाराज ह्यांना घेवून मुघलांच्या कैदेत गेल्या.
पुढे ९ जून १६९६ ला छत्रपती राजाराम महाराजांना पत्नी ताराराणी यांच्याकडून पुत्ररत्न प्राप्त झाले त्याच नाव त्यांनी शिवाजी असं ठेवलं.त्यांनतर १६९८ मध्ये पत्नी राजसबाई यांच्याकडून देखील पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचं नाव त्यांनी संभाजी असं ठेवलं.३ मार्च १७०० मध्ये राजाराम महाराजांचा मृत्यू झाला.त्यानंतर वयाच्या चौथ्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज द्वितीय ह्यांना गादीवर बसवून सारा राज्य कारभार स्वतः महाराणी ताराराणी पाहू लागल्या.सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या असणाऱ्या ताराराणी यांनी अतिशय जिद्दीने आणि धाडसाने विस्कळीत होत चाललेली स्वराज्याची घडी पुन्हा बसवली.एक एक उत्तम सरदार नेमून पुढची ७ वर्ष औरंगजेबाला झुंझत ठेवले.त्याच दरम्यान औरंगजेब पुत्र आजमशहा हा देखील लढाईत स्वतः उतरला होता.मराठ्यांची ताकत,अवघड गडकिल्ले, चिवट झुंज देणारे मावळे ह्यामुळे त्यालाही चांगली जाणीव होती की स्वराज्य जिंकणे एवढे सोपे नाही.त्याच्या डोक्यात वेगळेच नियोजन बनत चालले होते. योगायोगाने नेमके ३ मार्च १७०७ म्हणजे राजाराम महाराजांच्या मृत्यूच्या बरोबर ७ वर्षाने औरंगजेबाचा मृत्यु झाला.आणि सत्तेची सर्व सूत्र आझमशहाने स्वतःच्या हाती घेतली.
त्याच्या डोक्यात हाच विचार आला की स्वराज्यात फूट पाडायची असेल तर दोन्ही राजांना एकमेकांविरोधात उभं करायचं.आणि त्याने १ मे १७०७ मध्ये शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली.आझमशहाचे दुर्दैव हेच की तो पुढे जास्त जगला नाही.त्याच्याच सावत्रभावाने ८जून १७०७ मध्ये त्याची हत्या केली.
पण शाहू महाराज कैदेतून सुटले ही खूप मोठी गोष्ट ठरली.पुढे त्यांचे महाराणी ताराराणी ह्यांच्यासोबत काही पटले नाही.छोट्या मोठ्या लढाया होवू लागल्या.१७०८ मध्ये शाहू महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला आणि सातारा ही राजधानी बनवली.
आपसातील हे वाद सहज मिटणारे न्हवते.त्याच दरम्यान छत्रपती राजाराम महाराज यांच्या दुसऱ्या पत्नी राजसबाई ह्यांनी महाराणी ताराबाई यांच्या विरोधात बंड पुकारले.आणि आपले पुत्र संभाजी ह्यांना गादीवर बसवले.मग छत्रपती संभाजी महाराज दुसरे आणि छत्रपती शाहू महाराज ह्यांच्यात सारखी युद्ध होवू लागली.निर्णायक युद्ध झाले ते १७३० मध्ये जे सातारचे छत्रपती शाहू महाराज यांनी जिंकले.पण शेवटी आपलाच भाऊ त्याचा असा पराभव करून नुसती सत्ता मिळवणे हे योग्य नाही.हे चांगल्या प्रकारे छत्रपती शाहू महाराजांनी ओळखले.आणि असा वाद होवू नये या दृष्टीने कसे पुढे जाता येईल हा विचार केला.आणि त्यांनी स्वतः साताऱ्यातून कोल्हापूरला छत्रपती संभाजी महाराज दुसरे ह्यांना भेटायचे ठरवले.तिकडून छत्रपती संभाजी महाराज हे देखील स्वतः पुढे आले.आणि दोन्ही राजांची ती ऐतिहासिक भेट घडली ती २७ फेब्रुवारी १७३१ ला जखिणवाडी मध्ये.त्यावेळी जखिणवाडी ते वाठार एवढ्या भागात साधारण २ लाख जनसमुदाय जमला होता.नंतर संभाजी राजे यांना घेवून शाहू महाराज साताऱ्यात आले.साताऱ्यात असणाऱ्या अदालतवाडा इथे काही दिवस वास्तव्य झाले.बऱ्याच चर्चा झाल्या आणि शेवटी १३ एप्रिल १७३१ मध्ये दोन्ही बाजूने ९ कलमी एक करार झाला.त्या तहालाच वारणेचा तह म्हणतात.
ह्या तहातील ५वे कलम फार महत्वाचे ठरते.की ज्यात लिहिले आहे.
“तुम्हाशी जे वैर करतील त्याचे पारिपत्य आम्ही करावे.आम्हाशी जे वैर करतील त्याचे पारिपत्य तुम्ही करावे.तुम्ही आम्ही एकविचारे राज्यवृध्दी करावी.”
ह्या तहाची आठवण म्हणून स्वतः छत्रपती शाहू महाराजांनी जखिणवाडी गावाला जी तलवार भेट दिली तीच ही तलवार.जी पाहण्याचे भाग्य आम्हाला मिळाले.
ही फक्त एक तलवार नसून हा एक इतिहास आहे.जो सांगतो आहे की कितीही परकी सत्तांनी आम्हाला छेडण्याचा,आमच्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरीही आम्ही एक आहोत आणि कायम एक असू.जेव्हा योग येईल तेव्हा अवश्य भेट द्या.सोबत आगाशिव लेणी भेटीचे नियोजन केले तरी हा ट्रेक सर्वांना खूप आनंद देवून जावू शकतो.
दिवसाची सुरुवात ह्या तलवारीच्या दर्शनाने झाली आणि आम्ही पुढे मच्छिंद्रगडाच्या दिशेने मार्गस्थ झालो. रेठेरे मधून कृष्णा साखर कारखाना पार करून आम्ही पोहोचलो किल्ले मच्छिंद्रगड पायथ्याशी.गडावर जायला सिमेंटचा रस्ता असल्याने आम्ही गाडीनेच गडावर गेलो.गडावर चडून आल्यावर मध्यभागी मच्छिंद्रनाथाचे मोठे मंदिर आहे.त्याच्या समोर छोट्या तोफा ही आपल्याला पहायला मिळतात.तिथून जवळच मच्छिंद्रनाथाचे शिष्य गोरक्षनाथ ह्यांचे मंदिर आहे.ते पाहून पुढे गेले असता तुम्हाला बेरडमाची पहायला मिळते.माची पूर्णपणे ढासळली असली तरी तिथे असणारे अवशेष यावरून ती ओळखून येते. मच्छिंद्रनाथाच्या मंदिरामागे एक मोठी विहीर दिसते ज्यात थोडे बहुत पाणी असून ते गढूळ आहे.मंदिरातून दक्षिणेकडे चालत आल्यावर दत्त मंदिर दिसते.ते अलीकडच्या काळात बांधले गेले आहे.गडावर जुने असे काही अवशेष किंवा कलाकृती काही आढळून येत नाहीत.थोडक्यात इतिहास सांगायचा झालाच तर १६५९ मध्ये अफजल खान वध झाल्यानंतर राजांनी दक्षिणेकडे चाल करत बरेच गड किल्ले काबीज केले होते.त्यापैकीच एक मच्छिंद्रगड.पण पुढे सिध्दी जौहरने दिलेल्या वेढ्यात महाराज बराच काळ अडकून पडले होते.त्या दरम्यान हा गड पुन्हा आदिलशाही मध्ये सामील झाला.पण पुन्हा १७७० -७१ मध्ये राजांनी गड पुन्हा जिंकून घेतला.त्यावेळी आपलेच काही सरदार (निंबाळकर,घाडगे) हे आदिलशाहीच्या बाजूने राजांविरोधात लढत होते.त्यांच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवता यावे आणि जरब बसावी ह्या हेतूने राजांनी मच्छिंद्रगड नव्याने बांधून घेतला होता.
तसा ह्या गडाचा काही इतिहास आढळून येत नाही पण १६९३ साली स्वतः औरंगजेब ह्या गडावर आला होता.हा उल्लेख आहे.नंतरच्या काळात हा किल्ला परशुराम पंतप्रतिनिधी ह्यांच्या ताब्यात होता.पण नंतर पेशवे आणि पंतप्रतिनिधी यांच्यात झालेल्या युध्दात बापू गोखले यांनी हा किल्ला जिंकून घेतला. छोटा असलेल्या ह्या गडाला एक भाविक म्हणून नक्कीच भेट द्यावी.आणि मच्छिंद्रनाथाचे,गोरक्षनाथाचे दर्शन घेवून स्वराज्यात असलेल्या ह्या गडाची सफर अनुभवावी.
मच्छिंद्रगड पाहून आम्ही सगळे गेलो ते कोळे नृसिंहपुर मध्ये.तिथे असणारी साधारण ५ फूट उंचीची शाळिग्राम मध्ये असणारी नरसिंहाची मूर्ती आणि मंदिर ह्याबद्दल असणारी माहिती आपण दुसऱ्या भागात पाहू.

शब्दसारथी
निलेश बाबर
९२७१००८८९३