स्मृतीगंध….ट्रेक नंबर १७……पाटेश्वर भाग १

*ट्रेक नंबर १७*

*पाटेश्वर भाग १*

१२ आणि २६ डिसेंबर २०२१

*भाग १- प्रवासवर्णन आणि वैयक्तिक मते*

*भाग २ – आख्यायिका आणि इतिहास (उपभाग १ आणि २)*

*भाग ३ – पाटेश्वर इतिहास जागृती आवाहन,संशोधन, प्रसार आणि प्रसिद्धी*

ह्या ३ भागात असलेलं लिखाण तुम्हाला हवी तेवढीच माहिती वाचून आपला वेळ वाचावा ह्यासाठी केलेलं आहे.ऐतिहासिक वारसा हा काही ठिकाणी फक्त पुजण्यासाठी तर काही ठिकाणी फक्त झिजण्यासाठी असलेला दिसतोय.हा अनमोल ठेवा योग्यरीत्या जपण्यासाठी आहे.तो पुढच्या पिढीला फक्त वाचून न्हवे पाहून समजायला हवा.त्यासाठी संवर्धन आणि संशोधन दोन्ही हवंय.

*पायी रुतेल जीवघेणा काटा*
*अंगावर येतील विरोधांच्या असंख्य लाटा*
*परी ध्येयास कधी न फुटो फाटा*
*मिळून शोधू भविष्याच्या सुंदर नव्या वाटा*
*जपलं तरच राहणार,खुपलं तर काय होणार*
*भुतलाचे पाहुणे आपण आज आहोत उद्या नसणार*
*जगलो फक्त धुंदीत आपल्या तर पुढची पिढी काय पाहणार*
*म्हणून आजच होऊ दक्ष, देऊ संवर्धनावर लक्ष*
*हे कार्य तुझे न माझे हे कार्य ईश्वराचे*
*साता समुद्रापार घुमावे नाव पाटेश्वराचे*

*भाग १ – प्रवासवर्णन आणि वैयक्तिक मते*

आपल्या साताऱ्यापासून अगदी १४ – १५ किमी अंतरावर असणाऱ्या देगाव गावातून वरती जाणाऱ्या रस्त्याने आपण पोहोचतो ते पाटेश्वर ह्या मनाला भुरळ घालणाऱ्या आणि अचंबीत करणाऱ्या ठिकाणी.
वयाची बत्तीशी पार केल्यावर अशा सुंदर जागी येण्याचा योग जुळून आला.खर तर अशी सुंदर जागा ह्याची देही ह्याची डोळी पहायला मिळालं हे जेवढं भाग्य म्हणावं तेवढंच इथे यायला एवढी वर्ष लागली हे दुर्दैव म्हणावं लागेल.
सहज कोणाला पाटेश्वर बोलताना ऐकतो तेव्हा कानी शब्द पडतात ” आर बघलं तिकडं नुसत्या पिंडी हायतं,लय पिंडी हायतं,बारक्या मोठ्या लय हाईत” आता मला सांगा हे ऐकल्यावर डोळ्यासमोर काय येणार….
साहजिकच माझ्या मनात हीच कल्पना होती की खडकाळ भाग असेल त्यात साध्या पिंडी कोरल्या असतील.पण हा किती मोठा गैरसमज होता हे तिथे पाऊल ठेवल्यावर लक्षात येतं.त्यामुळं आजचं माझं बोलणं काहींना पटेल किंवा काहींना रागही येईल.पण ह्यात मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत.मला ह्यातून निव्वळ एकच गोष्ट सांगायची आहे की आपल्या साताऱ्यातुन एवढया जवळ असणाऱ्या ह्या अनमोल खजान्याची माहिती सर्वांपर्यंत योग्यप्रकारे पोहोचावी.हया कलेला नुसत्या पिंडीचे स्थान असे म्हणून तिचा प्रचार करणे म्हणजे ह्या अप्रतिम कलेचा निव्वळ अपमान आहे असं मी म्हणेन.
मी सुध्दा पहिल्यांदा १२ डिसेंबर ला डॉ प्रवीण जाधव आणि त्यांचे मित्र डॉ नितीन व्हरे,डॉ मिलिंद शिंदे ह्यांच्या सोबत गेलो तेव्हा नव्याने हे सारे पाहताना काहीच समजत न्हवते.फक्त सुंदर कलाकृती नजरेत साठवत होतो.आणि त्याचवेळी आमचे मित्र धनंजय कणसे ह्यांनी पाटेश्वर संदर्भात असलेली दक्ष राजाची आख्यायिका सांगितली.अगदी सुंदर असणारी ही कहाणी ऐकून मनाला थोडा आनंद भेटत होता की काही तरी माहिती हाती लागतेय हेच छान.पण का कोणास ठाऊक त्या साऱ्या सुबक शिवलिंगांना पाहून मनात अनके प्रश्न ऊभे राहिले होते.लवकर माघारी जावे लागणार होते.त्यामुळे ह्या साऱ्या प्रश्नांना तसेच मनात ठेवून परतीचा प्रवास झाला.
पुढचा आठवडा चकदेव,पर्वत राहता ट्रेक असल्याने पाटेश्वरला येणं लांबणार होतं.पण शेवटी २६ डिसेंबर हा दिवस पुन्हा नव्याने पाटेश्वरकडे घेऊन आला.ह्यावेळी माझ्यासोबत थोडी माहिती होती जी मी इंटरनेटवर वाचून मिळवली होती.
कोणत्या लेण्यांना काय नाव,कोणत्या मूर्तीचा काय अर्थ,ती कशाचे प्रतीक हे सारं तुम्हाला विकिपीडियावर वाचायला मिळेल.
पण मला हवे होते काही गोष्टींचे अर्थ आणि संदर्भ जे कुठे मिळत न्हवते.काही ओळखीच्या जाणकार लोकांकडून देखील थोडी बहुत माहिती मला मिळत गेली.पण खरंच दुर्दैव आहे आपले की योग्य आणि संपूर्ण माहिती मला कुठेही मिळू शकली नाही.
त्यामुळे मी लिहिताना आपली क्षमा मागून सुरुवात करतोय.कारण मी जे लिहीत आहे ह्याला विकिपीडिया आणि ती शिवलिंग पाहून त्यावर असणारी संख्या ह्यावर शोध घेत आणि अंदाज लावत मी आज पुढे लिहिणार आहे.हा लेख वाचून नक्की कोणी जाणकार असेल त्यासोबत पुन्हा नव्याने इथे येण्यास आणि जे काही बदल लेखात करावे लागतील ते करून जास्तीत जास्त योग्य माहिती आपणा सर्वांसमोर आणण्यास मी कायम तयार असेन.कारण गेली १ वर्ष साताऱ्यात फिरत असताना बरेच गडकोट,मंदिरे पाहिली गेली आहेत.पण आजवर कुठेच अशी शिल्प शृंखला पाहिली नाही.आज आपल्याकडे लिहायला,बोलायला अनेक माध्यमं आहेत.पण त्याकाळी कारागिरांनी देवतांच्या इतिहासाला ज्याप्रकारे शिल्परूपात मांडायचा प्रयत्न केला आहे तो उल्लेखनीय आणि अविश्वसनीयच म्हणावा लागले.
साताऱ्यातून देगावकडे येताना…अजंठा चौक…देगाव फाटा…अमरलक्ष्मी चौक…चंदननगर…कारंडवाडी…देगाव असा प्रवास करत आलात की उजवीकडे डोंगराकडे जाणारी एक पाटेश्वर कमान दिसते त्यातुन पुढे आलात की असणारा डांबरी रस्ता हा सरळ पाटेश्वर डोंगरावर येतो.काही अंतर अलीकडे आपल्या गाड्या लावून पायी थोडे चालत गेलात की गेट दिसते.कोरोनाच्या वातावरणामुळे सध्या वेळ सकाळी ९ ते १ आणि पुन्हा दुपारी ३ ते ५ अशी वेळ केली आहे.(ह्यावर मला आक्षेप नाही घ्यायचा. पण सहज मनात आले की जर वेळ मर्यादित ठेवली तर गर्दी वाढणार की कमी होणार…? उत्तर तुम्हीच सांगावे)
पाटेश्वर पाहण्यासाठी फ़क्त भाविक नाही तर ट्रेकिंगच्या माध्यमातून काही माहिती,पुरावे गोळा करण्यासाठी कित्येक अभ्यासू लोक देखील येत असतात.मग त्यांच्या सोयी साठी तिथे माहिती फलक अथवा माहिती देणारे कोणी व्यक्ती ह्यांचा असणारा अभाव ह्याच काय…?
असा प्रश्न उभा करून मला कोणाला दोष देण्याचा हेतू नाही.पण ह्यावरून जे चित्र उभे राहते ते एकच की हे देवाचे पवित्र स्थान आहे वेळेत दर्शन घ्या आणि जा.म्हणजे तिथे असणाऱ्या ह्या अद्भुत कलेचा हा अनादर नाही का…? तुम्हीच सांगा.
असो ह्या विषयावर व्यवस्थित आपण तिसऱ्या भागात बोलू.तर आपण गेट मधून आत आल्यावर आपल्याला दिसते ती दगडात कोरलेली गणपतीची सुबक मूर्ती आणि बाजूला दोन स्त्रीवेषधारी मूर्ती त्यातील एक मूर्ती शेजारी लहान बाळ देखील कोरले आहे.ह्यावर सविस्तर माहिती आपण भाग २ ह्या इतिहास सांगणाऱ्या भागात पाहू.
तिथून पुढे आल्यावर आपल्याला साधारण १५ ते २० मिनीट चालावे लागते.मग दिसते आपल्याला एक कमळांनी छान भरलेलं पाण्याचं टाकं त्यालाच नाव आहे *विश्वेश्वर पुष्करणी* आणि ह्या पुष्करणीच्या उजव्या बाजूला चढून वर गेलो की थोडे आत प्रवेश केला की लागते ते *मरगळ म्हशीचे लेणे*(काट्या टाकून झाकलेले आणि तिथे वाढलेल्या झुडुपांमुळे ही जागा दुर्लक्षित राहते.त्यात अजून म्हणजे गुढघाभर पाण्यात थोडे चालत जाऊन आत उजवीकडे असणाऱ्या गुहेत वळावे लागते.मग पाण्याखाली असणाऱ्या सुबक पिंडी तुम्हाला पहायला मिळतील.शेवाळलेले पाणी आणि दगड यामुळे जपून जावे)
हे लेणे पाहून पुष्करणी पासून चालत पुढे आलो की मठ लागतो.तिथे आपल्या पायातील वाहने काढून उजवीकडे वरती चालत आलो की पहिल्यांदा तुम्हाला अयोनी आणि सयोनी प्रकारातील दोन शिवलिंग दिसतील त्यातील अयोनी शिवलिंगावर भगवान शंकराची दाढी आणि मिशा असणारी मूर्ती कोरलेली दिसते.ती पाहून पुढे आल्यावर पायरी वरून चालताना दोन्ही बाजूनी असणाऱ्या भिंतींच्या मध्ये असणाऱ्या देवळीमध्ये देखील शिवलिंग आणि काही मूर्ती कोरलेल्या दिसतील.त्या पाहत वरती आलात की पाटेश्वर मुख्य मंदिरात जाणारा छोटासा दरवाजा लागतो.त्याच्या डाव्या बाजूस असणाऱ्या भिंतीतील गुहेत साधारण ४ फूट उंच असणारे सुबक शिवलिंग पाहून मनाला प्रसन्नता लाभते.ते पाहून झाले की मुख्य द्वाराच्या उजव्या बाजूस असणाऱ्या भिंतीतील गुहेत हनुमानाची मुर्ती पहायला मिळते.ती पाहून बाहेर आलात की झाडाखाली मनुष्यरूपी गरुडदेवाची हात जोडून नतमस्तक असलेली मूर्ती दिसेल.ती पाहून त्यामागे असणाऱ्या चाफ्याच्या झाडाखाली एक छोटेसं मंदिर दिसेल.त्यातही तुम्हाला एक शिवलिंग पहायला मिळेल.मंदिरा बाहेर असणारा नंदी तुटलेल्या स्वरूपात आहे.तिथून दर्शन घेऊन झाले की पुन्हा माघारी येवून पाटेश्वराच्या मुख्य द्वारातून आत प्रवेश केला की समोर दिसणारा नंदी पाहून लगेच लक्षात येईल की असा सुबक नंदी पंचक्रोशीत कुठेही नाही.नंदीचे नाक,कान,अंगावरील नक्षीकाम एवढंच न्हवे तर पायाचे खूर देखील अगदी सुरेखरीत्या कोरले आहेत.मुख्य मंदिरात प्रवेश करण्या अगोदर नंदीच्या ही जवळ जाण्या अगोदर डाव्या बाजूस एक छोटंसं मंदीर दिसतं त्यात चतुर्मुखी शंकराची मूर्ती दिसेल.डोक्यावर चंद्र,हातात कमंडलू, आणि त्रिशूळ असणारी ही मूर्ती देखील खूपच सुंदर आहे.तिथून दर्शन घेऊन मुख्य मंदिरात प्रवेश केला की डाव्या बाजूस अग्निकुंड दिसतो.तर सुंदर नक्षीदार खांब पाहिले की लक्षात येतं की त्याकाळी स्थापत्यशास्त्र किती विकसित होतं.मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याअगोदर डाव्या बाजूस असणारी भगवान विष्णूची निद्रिस्त अवस्थेतील मूर्ती आणि शेषनाग *(शेषशायी विष्णु)* आपल्याला पहायला मिळतो.तो पाहून गाभऱ्याच्या उजव्या बाजुस पाहिले की स्त्री रूपातील गणेशाची मूर्ती दिसते.खर तर ती गणेशाची मूर्ती नसून ती आहे *गणेशानी* अथवा *वैनायकी* देवीची आहे.त्याच मूर्ती पासून जवळच भिंतीमध्ये देवीची मूर्ती दिसते ती *नागराज्ञी* अथवा *सिंहवाहिनी* देवीची आहे.तिचे दर्शन घेऊन पुन्हा मुख्य गाभाऱ्याकडे आलो की दर्शन होते पाटेश्वर शिवलिंगाचे.गाभारा बंद असल्याने बाहेरून दर्शन घ्यावे लागते.त्या शिवलिंगामागे देवी सरस्वतीची मूर्ती दिसते.दर्शन घेऊन बाहेर आलो की डोंगर माथ्याच्या दिशेने जायचे वरती गेलो की आपल्याला भगवान शंकर पुत्र कार्तिक स्वामींची मूर्ती असलेलं छोटंसं मंदिर पहायला मिळते.
तिथुन पलीकडे दिसणारा रस्ता जो आहे तो बोरगाव शेती शाळेकडून वरती पाटेश्वरकडे येतो.ट्रेकिंगची आवड असणाऱ्यानां यामार्गे वरती येणे ही एक मनाला चांगली आनंद देणारी गोष्ट ठरते.तिथून पुन्हा खाली येताना भलेमोठे जे वडाचे झाड दिसते त्यावर फोटो घेणे आणि थोडा वेळ आराम करणे हे नक्कीच तुम्हालाही आवडेल.तिथून पुन्हा पाटेश्वर मंदीराच्या पायऱ्यांवरून चालत खाली आलोत की विश्वेश्वर पुष्करणी(कमळांनी भरलेलं पाण्याचं टाकं) आणि मठ इथं यायचं.मठाच्या मागील बाजूस चालत आलो की थोडया अंतरावर पाण्याचं एक छोटंसं टाकं लागतं त्यातील पाणी शेवाळलेलं आहे.ते पाहून पुढे आलोत की ५ लेण्यांचा एक समूह दिसतो.त्यालाच *बळीभद्र लेणी* म्हणून ओळखले जाते.८ दिशा, सूर्य ,चंद्र, भगवान विष्णुंचे १० अवतार असणारा पट, सुंदर सुबक आणि मोठी शिवलिंगे, ब्रम्हा,विष्णू, महेशाची स्त्री रूपे असलेला पट जो *ब्राम्ही, वैष्णवी, माहेश्वरी* आणि त्यांची वाहने असणारा पट,आणि सर्वात विलोभनीय असे मनुष्य आणि नंदी यांची एकत्रित शिल्प ज्याला *अग्नी वृष* अथवा *अग्नी वृषभ* म्हणतात हे पहायला मिळते.ह्याबद्दल सविस्तर माहिती आपण भाग २ मध्ये पाहू.ह्या ५ लेण्यांचा समूह पाहून थोडं पुढे चालत आलो की २ देवी असणारे एक छोटंसं मंदिर दिसतं स्थानिक लोक त्याला सटवाई देवी म्हणतात. पण त्या दोन्ही मूर्ती चामुंडा देवीच्या आहेत.त्यातील एक मूर्ती चतुर्भुज आहे आणि हातात शस्त्रे दिसतात.
तिथून पुढे थोडं चालत आलो की आपल्याला दिसते वराडघर.त्यासमोर असणाऱ्या दोन दीपमाळा अतिशय सुंदर आहेत.पण सध्या त्यांची थोडी पडझड झालेली दिसते.त्या पाहुन वराडघर ह्या ३ लेण्यांचा समूह पहायला आत जाताना एक छोटासा नंदी दिसतो तो पाहून आत प्रवेश करताच आणखी एक सुबक,रेखीव आणि डोळयांना मोहक वाटणारी नंदीची मूर्ती आपल्याला पहायला मिळते.ती पाहून आत प्रवेश केला की पहिल्यांदा डावीकडे असणाऱ्या लेणीमध्ये प्रवेश केला की विविध आकार आणि वेगळे संदेश देणाऱ्या अनेक सयोनी आणि अयोनी पिंडी आपल्याला पहायला मिळतील.
तिथून बाहेर आलोत की मुख्य लेणीत प्रवेश करायचा.तिथे सुंदर अशी भगवान विष्णूंची १००० नावे आहेत असा संदेश देणारे शिवलिंग पहायला मिळते.त्या शिवलिंगाच्या डाव्या बाजूस भिंतीवर *पार्वतीपट* आहे.ज्यावर अयोनी प्रकारची एकूण ९७२ शिवलिंग कोरली आहेत.तर डाव्या बाजूस भिंतीत सूर्याची १००० नावे असणारा *सूर्यसहस्र नामपट* आणि समोर *विष्णुसहस्र नामपट* आपल्याला दिसतो.आणि दोन्ही खांबांवर शिवदंड पहायला मिळतो.
विष्णुसहस्र नामपटाच्या उजव्या बाजूस ब्रम्हदेवाची मूर्ती दिसते. तर तिथेच खाली अष्ठमातृका पट आपल्याला दिसेल.हे सारं पाहून बाहेर आल्यावर उजव्या बाजूस असणाऱ्या लेणीत जाण्याअगोदर तिथेच बाहेर दोन कुंभ असणारे एक विशिष्ठ आणि वेगळेच शिवलिंग आपल्याला पहायला मिळेल.आणि त्याच्याच बाजूला असणाऱ्या शिवलिंगावर ४ चेहरे कोरले आहेत.ती ब्रम्हा,विष्णू ,महेश आणि सूर्यदेव याची असल्याचे स्थानिक लोक बोलतात.
ते पाहून झालं की आपण डाव्या बाजूस असणाऱ्या लेणीत आत प्रवेश करावा.तिथे देखील आपल्याला वेगळे आकार असलेली शिवलिंगे पहायला मिळतील.हे सारे पाहून वराडघराच्या बाहेर येवून पुढे चालत गेलो की निगडी वरून वरती येणारा कच्चा रस्ता आपल्याला पहायला मिळेल.
पाटेश्वरवर असणाऱ्या ह्या विविध स्थळांची फक्त नावे आणि तिथं जाण्याचा मार्ग एवढं सांगण्यात बघता बघता लेख किती मोठा झाला. यावरून देखील इथे असणाऱ्या अगणित,अद्भुत,अतुलनिय आणि अविश्वसनीय शिल्पांची महती आपल्या लक्षात येईल.म्हणूनच इथे असणारा प्राचीन इतिहास,वेगवेगळी शिवलिंगं आणि मूर्ती यांचे अर्थ याच्या थोड्या सखोल माहितीसाठी आपण भाग २ पाहू.

शब्दसारथी
निलेश बाबर
९२७१००८८९३