*ट्रेक नंबर १७*
*पाटेश्वर भाग २*
*उपभाग क्रमांक १*
१२ आणि २६ डिसेंबर २०२१
*भाग १- प्रवासवर्णन आणि वैयक्तिक मते*
*भाग २ – आख्यायिका आणि इतिहास (उपभाग १ आणि २)*
*भाग ३ – पाटेश्वर इतिहास जागृती आवाहन,संशोधन, प्रसार आणि प्रसिद्धी*
ह्या ३ भागात असलेलं लिखाण तुम्हाला हवी तेवढीच माहिती वाचून आपला वेळ वाचावा ह्यासाठी केलेलं आहे.ऐतिहासिक वारसा हा काही ठिकाणी फक्त पुजण्यासाठी तर काही ठिकाणी फक्त झिजण्यासाठी असलेला दिसतोय.हा अनमोल ठेवा योग्यरीत्या जपण्यासाठी आहे.तो पुढच्या पिढीला फक्त वाचून न्हवे पाहून समजायला हवा.त्यासाठी संवर्धन आणि संशोधन दोन्ही हवंय.
*पायी रुतेल जीवघेणा काटा*
*अंगावर येतील विरोधांच्या असंख्य लाटा*
*परी ध्येयास कधी न फुटो फाटा*
*मिळून शोधू भविष्याच्या सुंदर नव्या वाटा*
*जपलं तरच राहणार,खुपलं तर काय होणार*
*भुतलाचे पाहुणे आपण आज आहोत उद्या नसणार*
*जगलो फक्त धुंदीत आपल्या तर पुढची पिढी काय पाहणार*
*म्हणून आजच होऊ दक्ष, देऊ संवर्धनावर लक्ष*
*हे कार्य तुझे न माझे हे कार्य ईश्वराचे*
*साता समुद्रापार घुमावे नाव पाटेश्वराचे*
*भाग २ – आख्यायिका आणि इतिहास*
*उपभाग क्रमांक १*
पहिल्या भागात आपण पाटेश्वर मंदिर आणि इतर लेण्यांत जाण्याचा मार्ग आणि तिथे असणाऱ्या देवतांची नावे पाहिली.पण ह्या भागात मी शिवलिंगाचे प्रकार, त्यावर असणाऱ्या आकृतींचे अर्थ,मूर्तींचा इतिहास, कालखंड,आख्यायिका यावर लिहिण्याचा प्रयत्न करत आहे.ह्यात माझे काही अंदाज चुकीचे असतीलही.पण जेवढं काही समजलं आहे ते तूमच्या पर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे.
देवदेवतांच्या काही गोष्टींचा इतिहास सांगण्याआधी गरजेचं असतं ते त्या संदर्भात असणारी आख्यायिका जाणून घेणं.कारण इथं त्या कारागिरांनी जी शिल्प बनवली आहेत त्यातून खूप काही सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे हे स्पष्ट समजते आहे.
*आख्यायिका*
ब्रम्हपुत्र…प्रजापती राजा दक्ष ह्यांना २ पत्नी होत्या प्रसूती आणि विरणी.त्यातील देवी प्रसूतींना २४ मुली आणि देवी विरणी ह्यांना ६०मुली झाल्या.सर्व मुलींचे विवाह हे चांगल्या श्रीमंत घराण्यात,तसेच काहींचा विवाह योगऋषींसोबत झाला.पण एकमेव पुत्री सती यांनी दक्ष राजाच्या विरोधात भगवान शंकर यांच्या सोबत लग्न केले होते.
सर्व मुली मनाप्रमाणे विवाह करून गेल्याने आणि सर्वजणी खूप ऐश्वर्यात असल्याने राजा दक्ष खुश होते.पण सतीने मनाविरुद्ध एका वैराग्यासोबत केलेलं लग्न त्यांना पसंत न्हवते.त्यांनी एक यज्ञ *कनखल(गंगाद्वार/हरिद्वार)* इथे आयोजित केला आणि त्यात सर्वपुत्री आणि जावई तसेच इतर देवदेवता यांना आमंत्रित केले.पण सती आणि भगवान शंकर यांना बोलावले न्हवते.पण सगळ्या बहिणी आल्या आहेत आणि त्यांना ही भेटावं ह्या हेतूने देवी सती यांनी भोलेनाथ जाऊ नको म्हणत असताना ही त्या यज्ञासाठी गेल्या.पण तिथे राजा दक्ष यांनी देवी सतींचा अपमान केला.भगवान शंकरांबद्दल अपशब्द वापरले.पतीचा अपमान सहन करून जगणे म्हणजे महापाप हा विचार मनात आला आणि देवी सती यांनी त्याच यज्ञकुंडात स्वतःला झोकून दिले आणि देहत्याग केला.
भगवान शंकरांना हे समजल्यावर त्यांना क्रोध सहन झाला नाही त्यांनी आपल्या जठेतून *वीरभद्र* ह्यांना प्रकट केले आणि राजा दक्ष ह्यांना मारण्यास धाडले.भोलेनाथांचा क्रोध पाहून आधीच सर्व देवदेवता घाबरले होते.वीरभद्राने दक्ष राजांचे मस्तक उडवले.पण पत्नीचा असा अंत पाहून भोलेनाथांचा क्रोध शांत होत न्हवता.देवी सतींचा मृतदेह घेऊन शिवशंकर क्रोध आणि व्याकूळता ह्या भावनेने पूर्ण वेडे झाले होते.त्यांना शांत करण्यासाठी देवदेवतांनी खूप प्रयत्न केले होते.तो देह असाच घेऊन बसले तर पुढे सृष्टी कशी चालणार ह्या विचाराने भगवान विष्णू यांनी आपले सुदर्शन चक्र सोडले आणि देवी सतींच्या देहाचे तुकडे करणे सुरू केले.त्या देहाचे तुकडे जिथे जिथे पडले तिथे शक्तीपीठं तयार झाली असं म्हणतात.आता त्यातही देवी भागवत नुसार १०८ ,देवी गीता नुसार ७२ ,तंत्र चुडामनी नुसार ५२ तर देवी पुराणानुसार ५१ शक्तीपीठं आहेत.
जेव्हा दक्ष राजाचे डोके उडवले गेले त्यांनतर बऱ्याच देवदेवतांनी विनवणी करून दक्ष राजाला जिवंत करायला लावले तेव्हा एका बकऱ्याचे डोके बसवून दक्ष राजाला जिवंत केले गेले.तेव्हा पासून दक्ष राजाला *अजमुख* सुद्धा म्हणले जाते.
हा तर ह्या आख्यायिकेचा पाटेश्वर मध्ये काय संबंध असा प्रश्न नक्कीच आपल्याला पडत असेल.तर त्यावर आता बोलू.
पाटेश्वरवर असणारी शिवलिंगे ही कोण्या एका काळात बनली नाहीत.तिथे असणारी ब्रम्ह मूर्ती पाहून लक्षात येते की हे काम इ.सन पूर्व ५०० वर्ष असेल.तर तिथे असणारी गणेश मूर्ती पाहून लक्षात येते की हे काम ७व्या शतकानंतर चे असेल.कारण *ललित माधव* मध्ये गणपती बद्दल ७व्या शतकात जास्त लिखाण दिसते.इथे पहायला मिळणारे पाटेश्वर मंदिर,विश्वेश्वर पुष्करणी यांची रचना १८ व्या शतकात छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात *परशुराम नारायण अनगळ* या सावकारांनी केलेली दिसते.त्यामुळे पाटेश्वर संदर्भात आपण निश्चित एक कालखंड नाही ठरवू शकत.पण तिथे वर्षानुवर्षे होत असलेलं हे शिवमहात्म्याचं काम निश्चितच उल्लेखनीय आहे.
इ.स.पूर्व काळात कोणती लेखी भाषा जास्त अवगत न्हवती त्यामुळे बरंच लिखाण हे मूर्तीरूपात केलं जायचं.मूर्तीरूपात केलेलं उत्तम लिखाण यासाठी अजंठा वेरूळ लेणी हे उत्तम उदाहरण ठरेल.तर असंच वेगळ्या आकाराची शिवलिंग पाटेश्वरमध्ये आकारून त्यातूनही शिवमहिमा सांगितला आहे.
मी मला ज्याप्रकारे समजले,जे काही वाचले,जे संदर्भ लागले त्यानुसार सुरुवातीला दिसणारी गणेश मूर्ती ते शेवटी वराडघरात असणारी अप्रतिम शिवलिंगं यांचे अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतोय.
देगाव मार्गे वरती आलो की सुरुवातीला एक गेट दिसते.तिथून आत आला की दर्शन होते श्रीगणेशाचे.
*श्रीगणेश*-
पाषणात कोरलेल्या ह्या मूर्तीला अलीकडे भगवा रंग दिला आहे.ह्या श्री गणेशाच्या मूर्तीच्या दोन्ही बाजुला दोन देवी दिसतात त्या पाहून आपला समज हा होतो की त्या गणेशाच्या पत्नी रिद्धी आणि सिद्धी आहेत.पण ते तसे नाही हे तुम्ही मूर्ती नीट पाहिल्या की लगेच लक्षात येईल.गणेश मूर्तीच्या डाव्या बाजुस असणारी स्त्रीरुपी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या डाव्या हातात चामर तर उजव्या हातात छत्र असलेलं दिसेल.आणि ह्या दोन मूर्ती एका पाषणात कोरल्या आहेत.तर गणेशाच्या डाव्या बाजूस असणाऱ्या स्त्री मूर्ती शेजारी एक लहान मूल देखील दिसते.त्या स्त्री मूर्तीच्या हातात दंड दिसतो.आणि नीट निरखून पाहिले की लक्षात येते की ही मूर्ती आणि गणेशाची मूर्ती ह्या भिन्न पाषणात आहेत.*(२ वेगळ्या दगडात मूर्ती आहेत.श्रीगणेश आणि एक स्त्री मूर्ती एका पाषाणात आणि दुसरी स्त्री मूर्ती आणि लहान मूल दुसऱ्या पाषाणात)* यावरून हा अंदाज लावू शकता की तिथे ही दुसरी मूर्ती नंतर उभारली आहे.जर ह्या रिद्धी सिद्धी आहेत असा उल्लेख कारागिराला करायचा असता तर एकाच पाषणात हे दृश्य कोरले गेले असते.आणि हातात चामर,छत्री,दंड हे दाखवले नसते.तसेच श्रीगणेशाची मूल दाखवायची असती तर २ लहान मुलं कोरली गेली असती.कारण *शुभ आणि लाभ* ही गणपतीची २ मूल.आणि दोन पत्नी बाजूस असत्या तर ही दोन मुलं गणेशाच्या मांडीवर अथवा त्यांच्या पायाजवळ असती.असा माझा अंदाज आहे.
त्यामुळे मी म्हणेन श्री गणेश आपल्या वडिलांना म्हणजे भगवान शंकराला भेटीसाठी वरती येत आहेत. येताना सोबत दासी आहे जी छत्र आणि चामर घेऊन सोबत आहे.आणि नंतर दुसरी स्त्री तिथे जोडली आहे.ज्यामुळे रिद्धी ,सिद्धी असा भ्रम निर्माण होत आहे.
श्रीगणेशाचे दर्शन घेऊन पुढे आलात की साधारण १५ ते २० मिनिट चालावं लागतं.आणि मग दिसते *विश्वेश्वर पुष्करणी*
*विश्वेश्वर पुष्करणी*-
एक सुंदर तलाव ज्यात तुम्हाला छान कमळं उमललेली दिसतील(उन्हळ्यात पाणी नसल्याने पावसाळा आणि हिवाळा हे दृश्य पाहण्यास उत्तम).ह्या तळ्याची रचना ही १८व्या शतकातील असणार.तळ्याचा औरस चौरस आकार, बांधणी,चौकोनी दगड एकत्र बांधायला चुन्याचा वापर,यावरून हे काम अलीकडच्या काळातील आहे हे लक्षात येतं.त्यामध्ये दक्षिणेच्या बाजूला शंकराची आणि बाजूला श्री गणेशाची मूर्ती कोरलेली दिसते.जे मी वाचले होते त्यानूसार तिथं असणाऱ्या शंकराच्या मुर्तीला एक पाय आहे त्यामुळे तिला *अज एकपाद* असं म्हणतात असं समजलं.म्हणून मी जवळ जाऊन तिथला फोटो घेण्याचा प्रयत्न केला.पण पाणी जास्त असल्याने नीट तिथे उतरणे जमले नाही.पण मी जो व्हिडिओ पाठवला आहे त्यात नक्की पहा की मूर्तीचे दोन्ही पाय दिसत आहेत.हातात बहुतेक तलवार असावी असे दिसते आहे.मग नक्की ही मूर्ती शंकराची कशी असेल असं मला वाटतं.पण बाजूला असणाऱ्या मूर्तीकडे पाहून ती गणेशाची आहे हे लगेच समजते.हे पाहून झालं की पुढे मठाच्या दिशेने न जाता तळ्याच्या अलीकडे(उत्तर दिशेला) थोडं वरती चढून जायचे.थोडी अडचण असल्याने आणि वाट बंद केली असल्याने तिथं जाणे सहसा टाळले जाते.पण तरीही तुम्ही तिथं गेलात तर तुम्हाला पहायला मिळेल *मरगळ म्हशीचे लेणे* गुडघाभर शेवाळलेल्या पाण्यातून थोडे चालत गेलं की उजवीकडे असणाऱ्या दगडी बांधीव गुहेत जायचं.अंधार असल्याने सोबत उजेडासाठी बॅटरी असणं उत्तम.
*मरगळ म्हशीचे लेणे*-
हे नाव ऐकून जरा वेगळं वाटतं आणि समजत नाही नक्की असं का म्हणले जात असेल.पण थोड्या अडचणीच्या भागातून वाट काढत तुम्ही दगडांनी बांधलेल्या ह्या गुहेत पोहोचला की लक्षात येतं की किती सुंदर कलाकृती तुमच्या नजरेसमोर आहेत.आत प्रवेश केला की डाव्या बाजूच्या भिंतीवर छोट्या अशा एकुण ५ शिवलिंगाचा पट तुम्हाला पहायला मिळेल.ही पाच शिवलिंगे आपली पंचमहाभूते *( पृथ्वी, आप(पाणी),अग्नी,वायु,आकाश)* यांचं प्रतीक मानले जातात.तसेच पुढे गेलो की जमिनीवर ३ शिवलिंग दिसतात.ते पाहून लेण्याच्या उजव्या बाजूला खाली जमिनीवर पाहिले तर जवळ जवळ लागुन अशी अजून एकुण ३ शिवलिंगे तुम्हाला दिसतील.त्यातील पहिले शिवलिंग हे आजवर कुठे न पाहिलेलं असावं असं आहे.सयोनी प्रकारचं हे शिवलिंग असून त्यावर मध्यभागी म्हैशीचा आकार कोरून आणि त्यावर पिंडीचा आकार बनवला आहे.त्यामुळं ह्या लेण्याला मरगळ म्हशीचं लेणं असंही म्हणतात.पण वाचनात आलेल्या गोष्टींवरून भगवान शंकराच्या इतिहासात आणि कोणत्याही आख्यायिकेमध्ये म्हैशीचा उल्लेख मला कुठं आढळून आला नाही.मग नक्की हा नंदी असावा आणि त्याचं जे वशिंड आहे त्यालाच शिवलिंग केलेलं असावं असं मला वाटतं.कारण ह्या लेणी मध्ये नंदिकेश्वर आहे असंही म्हणलं जातं.मग नक्की ह्या शिवलिंगालाच *नंदिकेश्वर* म्हणले जात असावं.
त्याच शिवलिंगाच्या बाजूला एक आणखी सयोनी प्रकारचं शिवलिंग आहे आणि त्यावर बरोबर ६८ अयोनी प्रकारची शिवलिंगे कोरलेली आहेत. पिंडीच्या मध्यभागी एक उंच दंड गोलाकार कोरला असून ८ अयोनी प्रकारच्या शिवलिंगाची माळ अशा एकूण ८ माळा ( एकूण ६४) त्या मध्यभागी असणाऱ्या दंडगोलाकार भागाकडे चढत्या क्रमाने आहेत.तर शिवलिंगावर पूर्वेस २ तर पश्चिमेस २ अशी एकूण ६८ अयोनी शिवलिंग कोरलेली दिसतात.
मग ६८ च का असा विचार करत असता माझ्या वाचनात एक गोष्ट आली की ही तर तीर्थ स्थानांची संख्या आहे.मग नक्की ह्या ६८ तिर्थांना भगवान शिव यांच्या पुढे वाहणे हा तर कारागिराचा हेतू नसावा असा मनात विचार आला.आणि असा विचार येण्यामागे अजून एक कारण तिथे आणखी एक शिवलिंग आहे त्यावर ६८च शिवलिंगे कोरली आहेत.
हे अद्भुत शिवलिंग पाहिले की त्या बाजूला अजून एक शिवलिंग दिसते.*(सध्या ह्या लेणीत गुडघाभर पाणी असल्याने आणि अंधार फार असल्याने शिवलिंगे जास्त स्पष्ट दिसत नाहीत)* हे सारं पाहून बाहेर आलात की विश्वेश्वर पुष्करणी पासून पुढे यायचं.मठाच्या बाजूने वरती आलात की पायरीवरून थोडं पुढं आलात की मध्येच दोन शिवलिंग दिसतात.
*अयोनी आणि सयोनी प्रकारची २ शिवलिंगे* –
पायरी चढून पाटेश्वर मंदिराच्या दिशेने जाताना एका कोपऱ्यात असणारी ही २ शिवलिंगे भाविकांच्या नजरेतुन सुटतात कारण ती कोपऱ्यात आहेत.पण खरंच तुम्ही ती नीट पहावीत असं मला वाटत.कारण त्यातील सयोनी प्रकारचे जे शिवलिंग आहे *( सयोनी म्हणजे पूर्ण शिवलिंगाचा आकार असलेली पिंड तर अयोनी म्हणजे फक्त उभे जे पिंड दिसते ते शिवलिंग)* त्यावर एकाच दगडात एका ओळीत ९ अशी रेखीव एकूण ६८ शिवलिंगे कोरलेली आहेत.मग आपल्या लक्षात येतं की मरगळ म्हशीच्या लेण्यात असणारं शिवलिंग जे अयोनी प्रकारचं आहे आणि हे जे सयोनी प्रकारचं आहे.यावर मिळून जर पाहिलं तर ६८च संख्या येते .याचाच अर्थ ही ६८ तीर्थक्षेत्र भगवान शिवाला वाहिली आहेत असा मी अर्थ घेतला.
तर त्याच शिवलिंगाशेजारी असणारे एक अयोनी शिवलिंग आपल्याला दिसते.त्यात मध्यभागी असणाऱ्या शिवलिंगावर शंकराची दाढी आणि मिशा असणारी मूर्ती कोरली आहे.आणि बाजूने असणारी शिवलिंगे ही विशिष्ट प्रकारे कोरली आहेत.आणि ती संख्या मोजली तर ६७ भरते.मग थोडा अंदाज लावणे अवघड होते.पण मी हे शिवलिंग मुद्दाम जास्त वेळ पाहिले.त्याचा फोटो घेऊन बराच वेळ त्या रचनेवरून अंदाज लावण्याचा प्रयत्न केला.काही गोष्टी वाचून पाहिल्या तेव्हा कुठे एक अंदाज बांधण्यात यश आलं.कदाचित ते चूक असू शकेल.पण माझे मत मी मांडतो.
ह्या शिवलिंगावर मध्यभागी असणाऱ्या शिवलिंगावर शंकराची मूर्ती असनु पूर्व ,पश्चिम,दक्षिण आणि उत्तर अशा चार बाजूने ८ -८ अशी एकूण ३२ शिवलिंगे आहेत.त्याच्या आतील बाजूस आग्नेय ,नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य अशी २ -२ शिवलिंगे एकमेकांस चिकटून अशी आहेत.त्यात नीट पाहिले की लक्षात येतं की सगळी शिवलिंगे जोडून आहेत पण नैऋत्येस असणारी शिवलिंगे ह्यात अंतर आहे.तसेच बाहेर असणारी शिवलिंगाची संख्या २७ आहे *(३२ + २७ + ८ =६७)* पण ह्या पिंडीवर आणखी एक वेगळा संकेत दिसतो तो म्हणजे पिंडीवर मुख्य चार दिशेला(पूर्व, पश्चिम,दक्षिण,उत्तर) छोटी छिद्र कोरली आहेत.आता तसं पाहिलं तर काहीच लक्षात येत नाही.फक्त कारागिराच कौतुक करावं आणि पुढे जावं यापलीकडे काहीच समजत नाही.पण ती ४ छिद्र, नैऋत्येस असणाऱ्या शिवलिंगात अंतर,३२ शिवलिंगाची चौकोनी माळ,त्या बाहेर असणाऱया २७ची विशिष्ट रचना *( उत्तरेस ८ ,दक्षिणेस २, पूर्वेस ८,पश्चिमेस ५ तर आग्नेय,नैऋत्य, वायव्य ,ईशान्य ह्या चारी दिशेस १-१ असे ४ आणि सर्व मिळून २७)*
तर आता ह्या साऱ्याचा विस्तार पाहू.आपण आख्यायिका वाचली आहेच.त्यानुसार जेव्हा देवी सतीचा देह घेऊन भगवान शिव फिरत होते तेव्हा भगवान विष्णू आपल्या सुदर्शनाने त्या देहाचे तुकडे करत होते.आणि जिथे जिथे हे तुकडे पडले तिथे शक्तीपीठं तयार झाली.अशी एकूण १०८ शक्तीपीठ आहेत.तर सर्वमान्य अशी एकूण ५१ शक्तिपीठं आहेत.तर १२ ज्योतिर्लिंग ही सर्वांना माहीत असून आणि ४ मुख्य दिशेस एक असे एकूण ४ धाम आहेत.आता ह्या साऱ्या ठिकाणांचा आणि ह्या शिवलिंगाचा संबंध जोडू.
शिवलिंगावर कोरलेली शिवाची मूर्ती दाढी मिशा असणारी आहे.म्हणजे देवी सतीच्या विरहात बुडालेले वैरागी शिव असा अर्थ आपण लावू.उत्तरेस असणारी ८ शिवलिंगे याला लागुनच वायव्य आणि इशान्येचं शिवलिंग आहे.अशी सलग १० अशी साखळी उत्तरेस दिसते तर दक्षिणेस २ शिवलिंग आहेत.आणि हे मिळवले तर बरोबर १२ ही ज्योतिर्लिंगाची संख्या होते.सर्वात महत्वाचं म्हणजे ४ धाम *( पूर्वेस- जगन्नाथपुरी,पश्चिमेस- द्वारका, उत्तरेस- बद्रीनाथ तर दक्षिणेस-रामेश्वरम)* म्हणजेच
*शिवलिंगावर असणारी ४ छिद्र ही ह्या चार धामाचे प्रतीक आहेत*
आता प्रश्न राहतो ते ह्या ६७ शिवलिंगांचा तर भगवान शिवाचे प्रतीक असणारी १२ ज्योतिर्लिंग आणि देवी सतीचे प्रतीक असणारी ५१ शक्तीपीठं अशी मिळून संख्या ६३ होते.तर आपण नीट बारकाईने पाहिले तर समजते ४ उपदिशांना जोडुन अशी ८ शिवलिंग आहेत.याचा अर्थ ते शिव आणि सती यांचं प्रतीक आहेत( शक्तीपीठ आणि ज्योतिर्लिंग) आणि नैऋत्येस दोन्हीत अंतर आहे यावरून शिव आणि सतीची ताटातूट दिसते.म्हणजे आतील ८ शिवलिंगे ही दोघांचं मिळून एक अशी जर मोजली तर ८ ऐवजी ४ अशी होतील.मग ही संख्या ६७ ऐवजी ६३ होईल आणि मग समजेल की हे शिवलिंग म्हणजे *शक्तीपीठ, ज्योतिर्लिंग आणि धाम* याचं प्रतीक आहे.याची कोपऱ्यात असणारी अवस्था यावर आपण तिसऱ्या भागात बोलू.
तर आपण ह्या दोन्ही शिवलिंगाचे दर्शन घेऊन पायरी वरून जाताना १८व्या शतकात बांधलेल्या ह्या पायरी आणि बाजूने असणाऱ्या भिंतीमध्ये ८व्या ते १०व्या शतकांतील पिंडी आणि मूर्ती पाहत आपण मुख्य पाटेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ येतो.
*पाटेश्वर मंदिर आणि परिसर*-
मुख्य प्रवेशद्वार उंचीने खूप लहान असून आत वाकून प्रवेश करावा लागतो.पण त्यापूर्वी द्वाराच्या डाव्या बाजूस पाहिले तर आपल्याला सुबक असे साधारण ४ फूट उंचीचे शिवलिंग पहायला मिळेल.तर द्वाराच्या उजव्या बाजूस भिंतीत आतल्या बाजूस हनुमानाची मूर्ती पहायला मिळेल.ती पाहून बाहेर आलात तर एक सूंदर असे मानवरूपातील गरुडाचे शिल्प तुम्हाला पहायला मिळेल.
गरुड हे भगवान विष्णूचे वाहन पण भगवान शंकराचा वैरी.*( सर्प हे शंकराचे वाहन तर तेच गरुडाचे खाद्य)* पण इथे तुम्ही पाहू शकता गरुडाने दोन्ही हात जोडले आहेत आणि डोळे बंद केले आहेत.पायाखाली असणारा सर्प गरुडाने सोडलेला आहे.याचा अर्थ मी त्या आख्यायिकेशी जोडला.
जेव्हा देवी सतीचे निर्जीव शरीर पाहिले तेव्हा भगवान शिव कोपले होते.तेव्हा त्यांना शांत करायला सगळे देवदेवता प्रयत्न करत होते.त्याच वेळी जन्मजन्मांतरीचा वैरी असणारा हा गरुड देखील नतमस्तक झाला होता हेच ह्या शिल्पातून कारागिराला दाखवायचं आहे असं मला वाटतं.त्याच शिल्पाच्या बाजूला एकाच दगडात शिवलिंग,पंच महाभूते,मत्स्य आणि सुदर्शन कोरलेले आहे.त्यावर मी एक अंदाज बांधला आहे तो सांगतो
*ह्यातून जणू भगवान विष्णू शंकराला सांगत आहेत.हे देवादीदेवा महेश्वरा मी मत्स्य अवतार घेऊन ह्या पृथ्वीवर असणाऱ्या जीवांना महाप्रलयातून वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले.पण तरीही प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस ह्या पंचतत्वात विलीन व्हायचं आहे.देवी सतींचा देह असा घेऊन फिरणे हे योग्य नाही.म्हणून मी ह्या सुदर्शनानाने त्यांचे भाग केले.देवी आता ह्या पंचतत्वात विलीन झाल्या आहेत.मी तुम्हापुढे नतमस्तक होतो पण तुम्ही शांत व्हा*
असा अंदाज लावून तुम्ही त्या मागे असणाऱ्या चाफ्याखाली असणाऱ्या छोट्या मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेऊन.पुन्हा मुख्य प्रवेशद्वाराकडे यावे.पुढील माहिती उपभाग २ मध्ये पाहू
शब्दसारथी
निलेश बाबर
९२७१००८८९३