स्मृतीगंध…ट्रेक नंबर १७….पाटेश्वर भाग २ मधील उपभाग २

*ट्रेक नंबर १७*

*पाटेश्वर भाग २*
*उपभाग क्रमांक २*

१२ आणि २६ डिसेंबर २०२१

*भाग १- प्रवासवर्णन आणि वैयक्तिक मते*

*भाग २ – आख्यायिका आणि इतिहास (उपभाग १ आणि २)*

*भाग ३ – पाटेश्वर इतिहास जागृती आवाहन,संशोधन, प्रसार आणि प्रसिद्धी*

ह्या ३ भागात असलेलं लिखाण तुम्हाला हवी तेवढीच माहिती वाचून आपला वेळ वाचावा ह्यासाठी केलेलं आहे.ऐतिहासिक वारसा हा काही ठिकाणी फक्त पुजण्यासाठी तर काही ठिकाणी फक्त झिजण्यासाठी असलेला दिसतोय.हा अनमोल ठेवा योग्यरीत्या जपण्यासाठी आहे.तो पुढच्या पिढीला फक्त वाचून न्हवे पाहून समजायला हवा.त्यासाठी संवर्धन आणि संशोधन दोन्ही हवंय.

*पायी रुतेल जीवघेणा काटा*
*अंगावर येतील विरोधांच्या असंख्य लाटा*
*परी ध्येयास कधी न फुटो फाटा*
*मिळून शोधू भविष्याच्या सुंदर नव्या वाटा*
*जपलं तरच राहणार,खुपलं तर काय होणार*
*भुतलाचे पाहुणे आपण आज आहोत उद्या नसणार*
*जगलो फक्त धुंदीत आपल्या तर पुढची पिढी काय पाहणार*
*म्हणून आजच होऊ दक्ष, देऊ संवर्धनावर लक्ष*
*हे कार्य तुझे न माझे हे कार्य ईश्वराचे*
*साता समुद्रापार घुमावे नाव पाटेश्वराचे*

*भाग २ – आख्यायिका आणि इतिहास*

*उपभाग क्रमांक २*

*पाटेश्वर मंदिर* –
पाटेश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आलो की समोर दिसतो तो एक अप्रतिम नंदी.पण त्या नंदीजवळ जाण्याअगोदर डाव्या बाजूस एक छोटे मंदिर दिसते.त्यात आपल्याला चारमुखी एक मूर्ती दिसते.चतुर्मुखी मूर्ती म्हणजे आपण सहज ती ब्रह्मदेवाची आहे असं म्हणतो.पण हा अंदाज चुकीचा आहे.कारण *ब्रह्मदेवाच्या हातात कमळ,वेद,कमंडलू आणि रुद्राक्ष माळ* अशी एक सर्वमान्य प्रतिकृति मानली गेली आहे.पण तुम्ही निरखुन पाहिले तर ह्या चतुर्मुख मूर्तीच्या हातात कमंडलू आणि रुद्राक्ष माळ दिसत असली तरी एका हातात त्रिशूळ आणि डोक्यावर चंद्रकोर पहायला मिळते.तर गळ्यात रुद्राक्षमाळा दिसतात.यावरून ही मूर्ती चतुर्मुख शिवाची आहे हे तूम्ही म्हणू शकता.मूर्ती समोर एक शिवलिंग आहे.ते पाहून तूम्ही मुख्य मंदिराच्या समोर असणाऱ्या नंदीजवळ आलात की आश्चर्य वाटल्या शिवाय राहणार नाही.अतिशय सुबक,रेखीव अशी नंदीची मूर्ती आपल्या जवळपासच्या भागात कुठेही पहायला मिळणार नाही.नंदीचे कान,नाक,डोळे,अंगावरील नक्षी एवढंच न्हवे अगदी पायाचे खूर देखील खूप सुंदररित्या कोरलेले आहेत.एवढंच न्हवे तर नंदीच्या पुढच्या पायाजवळ एक शिवलिंग कोरले असून त्या शिवलिंगाच्या दोन्ही बाजूस दोन दासी हातात चामर घेऊन बसलेल्या आहेत. *(पाटेश्वर डोंगर चढून वरती आल्यावर दिसणाऱ्या श्रीगणेशा शेजारी देखील एक दासी चामर आणि छत्र घेऊन उभी आहे.तर इथे पाटेश्वर मंदिरात प्रवेश करण्या अगोदर असणाऱ्या शिवलिंगाजवळ दोन दासी चामर घेऊन उभ्या आहेत)*
तिथून आत प्रवेश केलात की सूंदर रेखीव खांब हे पाहण्याजोगे आहेत.तिथे पाटेश्वराच्या मुख्य गाभाऱ्याच्या डाव्या बाजूस भिंतीमध्ये भगवान विष्णूची निद्रिस्त अवस्थेतील अतिशय सुंदर मूर्ती आपल्याला पहायला मिळते.पाठी शेषनाग आहे म्हणून यास*शेषशायी विष्णू* असं देखील म्हणतात.तर गाभाऱ्याच्या उजव्या बाजूस भिंतीमध्ये एक मूर्ती दिसते की ज्या मुर्तीला सोंड आहे.सोंड म्हणलं की आपण सहज म्हणतो की ही श्रीगणेशाची मूर्ती आहे.पण असं नाही.
*वैनायकी*-
नीट पाहिले की सहज लक्षात येतं की ही गणेशाची स्त्री रूपातील मूर्ती आहे.मग असे का,याचा उल्लेख कुठं आहे हे जर पाहिलं तर *स्कंदपुराणात* ज्या ६४ योगिनी(स्वामिनी) आहेत त्यात ४१वी स्वामिनी ही वैनायकी आहे.हिलाच *गणेशानी*,*विघ्नेश्वरी* असंही म्हणलं जातं.१०व्या शतकात लिहिलेल्या *लिंगपुराण,अग्निपुराण* यात देखील गणेशाच्या स्त्री रूपाचा उल्लेख आढळतो.तर १६ व्या शतकात श्रीकुमार यांनी लिहिलेल्या *शिल्परत्न* यातही याचा उल्लेख आहे.सर्वात प्राचीन अशा *मत्स्यपुराणात* देखील याचे वर्णन आढळते.तर वैनायकी चे दर्शन घेऊन त्यामागील बाजूस उत्तरेकडील भिंतीमध्ये एक स्त्रीरुपधारी मूर्ती दिसते ती देवी *नागराज्ञी* किंवा *सिंहवाहिनीची* असावी.ती पाहून मुख्य गाभाऱ्याकडे आलोत की आत तुम्हाला एक शिवलिंग दिसेल तेच पाटेश्वराचे.गाभाऱ्याचा दरवाजा बंद असल्याने आपल्याला बाहेरून दर्शन घ्यावे लागेल.त्या शिवलिंगाच्या मागील बाजूस एक मूर्ती दिसेल ती देवी *सरस्वतीची* आहे.
मंदिरातुन दर्शन घेऊन बाहेर आलो की आपल्याला एक छोटे मंदिर दिसते त्यात जी १८ हात असणारी मूर्ती आहे ती देवी *म्हैषासुरमर्दिनीची* आहे.तिथे दर्शन घेऊन तुम्ही मंदिराच्या मागील बाजूस जावून पुन्हा उत्तरेच्या बाजूस असणाऱ्या गोमुखातून जे मंदिरातील पाणी बाहेर येते तिथे गेलात की आणखी एक आश्चर्य आपल्याला पहायला मिळेल.ते म्हणजे त्या गोमुखावर एक छोटेसे शिवलिंग आहे.पण तिथे गेल्यावर समजते की ते उचलून घेता येते.भिंतीत योग्यप्रकारे बसवले असल्याने ते बाहेर घेता येत नाही. पण उचलून पाहिले तर त्या मंदिरातुन बाहेर गोमुखाकडे येणारा पाण्याचा मार्ग दिसतो.ती रचना फार अप्रतिम वाटते.हे पाहून मंदिरातुन बाहेर आलोत की डोंगर माथ्याच्या दिशेने जायचे.माथ्यावर आपल्याला भगवान शंकरपुत्र कार्तिकस्वामींचे मंदिर पहायला मिळेल.मंदिर पाहून पुन्हा खाली चालत यायचे.चालत विश्वेश्वर पुष्करणी आणि मठाजवळ आलोत की मठाच्या मागील बाजूस चालत गेलो की एक छोटेसे पाण्याचे टाके दिसेल.ते पाहून थोडे पुढे आलात की आणखी एक लेण्यांचा समूह दिसतो यालाच *बळीभद्र लेणे* असंही म्हणतात.

*बळीभद्र लेणे समूह* –
हा ५ लेण्यांचा समूह असून इथे तुम्हाला खूप आश्चर्यकारक अशी शिवलिंग,पट,शिल्प पहायला मिळतील.त्याची विस्तृत माहिती आपण पाहू.आत अंधार असल्याने उजेडासाठी बॅटरी सोबत असणे फार गरजेचे आहे.आतील शिवलिंग आणि पट व्यवस्थित पाहण्यासाठी पावसाळयात जाऊ नये कारण हे सारे पाण्याखाली जाते.
*पहिल्या लेण्यात* प्रवेश केला की एका ओळीत ३ शिवलिंग पहायला मिळतील.पहिले शिवलिंग साधे असून मध्ये असणाऱ्या शिवलिंगावर तुम्हाला, बदाम, सूर्य ,अर्धचंद्र,चांदणी,त्रिकोण,फुल,गोल असे वेगवेगळ्या आकारातील शिवलिंग दिसतील.हे नवग्रह असतील असा समज होत असला तरी त्या शिवलिंगावर एकूण १० छोटी शिवलिंग एका विशिष्ट रचनेने कोरलेली दिसतात.आणि मध्ये एक मोठे शिवलिंग आहे.त्याच्या विशिष्ट रचनेवरून लक्षात येत की ते *चार मुख्य दिशा ,चार उपदिशा, सूर्य आणि चंद्र* असा संकेत देतात.
तर त्याच्याच बाजूस असणारे सयोनी प्रकारचे शिवलिंग आहे.त्यावर 3 भागात शिवलिंग कोरली आहेत.आतील भागात मुख्य शिवलिंगाच्या बाजूस *५ -५ जे ४ समूह आणि १ अशी एकूण २१ शिवलिंग कोरली आहेत.* तर त्या बाहेरील बाजूस एकूण *२६ शिवलिंग* कोरली आहेत.बाहेरील २६ आणि आतील २१ यामध्ये एक शाळुंखा( पिंडीचा आकार) कोरून एक शिवलिंग बनवले आहे.तर हा सर्व शिवलिंगाचा समूह एका मोठया शिवलिंगावर कोरला आहे.मग इथे दिसतात २ शिवलिंगांच्या मध्ये एकूण *(२६+२१=४७ शिवलिंगं.)* मग आता प्रश्न पडतो की ह्या ४७ चा काय संबंध असेल?तर ह्यात *आतील शिवलिंगाची कडा,आणि आतील शिवलिंग,२१ आणि २६ ह्याला विभागणाऱ्या शिवलिंगाची कडा(शाळुंखा)आणि बाहेरील शिवलिंग अशी एकूण संख्या ५१ होते* मग विचार केलात तर सहज लक्षात येतं की ५१ ही शक्तीपीठांची संख्या आहे.
*दुसरे लेणे*-
इथे आपल्याला साधारण ४ फूट उंच आणि ८ फूट लांब असं शिवलिंग पहायला मिळेल.त्याच बरोबर जर त्या शिवलिंगाच्या मागील बाजूस गेलो तिथे दिसणारा पट हा अप्रतिम आहे.विष्णूचे १२ अवतार तिथे कोरलेले आपल्याला पहायला मिळतील.*मत्स्य,कूर्म(कासव),वराह,नृसिंह,वामन श्रीराम,अधिराज पृथु,परशुराम,बुद्ध,कल्की,श्रीकृष्ण आणि ऋषभदेव(जैन आद्य तीर्थंकार)* अशा क्रमाने डावीकडून उजवीकडे पहायला मिळतील.तसे विष्णूचे २४ अवतार पण त्यातील १० परिचित आहेत.पण इथे १२ अवतार कोरले गेले आहेत.
गौतम बुद्ध यांचा जन्म इ.स.पूर्व ५०० वर्ष असून बुद्ध धर्मप्रसार हा सम्राट अशोक यांच्या काळात इ.स.पूर्व २०० वर्षे ह्या काळात जास्त झाला.तर जैन धर्मप्रसार हा यांचे २४वे तीर्थंकार महावीर यांच्या काळात झाला.त्यांचा काळ म्हणजे इ.स.पूर्व ५०० वर्ष.मग इथे कोरलेली मूर्ती आद्य तीर्थंकार ऋषभदेव किंवा शेवटचे तीर्थंकार महावीर यापैकी असावी.पण यावरून हे समजते की *हिंदू धर्मासोबत,जैन आणि बौद्ध धर्म यातील धर्मगुरू यांचा देखील उल्लेख पाटेश्वर मधील लेण्यात असणे याचा अर्थ इ.स.पूर्व २०० वर्ष ते शिलाहार राजा भोज यांच्या आधी म्हणजे १० वे शतक यामधल्या काळात हे काम केले गेले असावे*
कारण जर शिलाहार राजांच्या काळात हे काम असते तर इथे बुरुज,तटबंदी,दरवाजे हे देखील पहायला मिळाले असते.असं मला वाटतं.तर ह्या लेणीतून तिसऱ्या लेणीत गेला की तिथेही तुम्हाला काही शिवलिंग पहायला मिळतील.पण तिथून पुढे असणाऱ्या चौथ्या लेणीत तुम्ही गेलात की पुन्हा समोर एक मोठे शिवलिंग दिसेल.आणि त्या मागील बाजूस दिसतील २ पट.त्यातील एका पटावर ५ तर दुसऱ्यावर ४ मूर्ती कोरल्या आहेत.त्यातील ५ मूर्ती कोरलेला एक पट पाहिला तर त्यातील एका मुर्तीच्या हातात धनुष्य तर दुसऱ्या मुर्तीच्या हातात गदा दिसते यावरून त्या ५ मूर्ती पांडवांच्या असाव्या असं मला वाटतं.तर जो पट ४ मूर्तींचा आहे.त्यातील पहिली मूर्ती पाहून समजते की ही भगवान शंकरांची असणार कारण गळयात साप कोरलेला आहे.तर त्यातील शेवटची मूर्ती आहे तिचा कमरेखालील भाग हा माशाच्या आकाराचा आहे.यावरून ती मूर्ती भगवान विष्णूंची मत्स्य अवतारातील असावी.मधील २ मूर्ती मला ओळखता आल्या नाहीत.हे सारे पाहून जेव्हा तुम्ही ह्या सलग असणाऱ्या ४ लेण्यांच्या समोर असणाऱ्या ५ व्या लेणीकडे याल तेव्हा त्या लेणी बाहेर एक नंदी दिसेल.तो पाहून लेणी मध्ये आलात की एक सुंदर कला तुम्हाला पहायला मिळेल.
*पाचवे लेणे*-
आत दिसणारी मूर्ती पाहिली की समोरून ती माणसाची वाटते तर बाजूने पाहिल्यावर तो नंदी दिसतो.ह्या मूर्तीची विशेषता सांगायचं झालंच तर समोरून दिसणाऱ्या मनुष्यरुपाला दाढी मध्ये खालील बाजूस दोन छिद्र केली आहेत.जेणे करून ती नंदीची नाकपुडी वाटावी.जर एक हाताने मूर्तीचा चेहरा झाकला तर ती नंदीची मूर्ती आहे असे जाणवते.
ह्यालाच *अग्नी वृष* किंवा *अग्नी वृषभ* म्हणतात.
*ऋग्वेदातील चौथ्या मंडलातील ५८ व्या सुक्तातील तिसऱ्या श्लोकात अग्नी वृषभाचे वर्णन आढळते.* ऋग्वेदात एकूण १०मंडल आहेत. त्यातील चौथे मंडल हे अंगीरसऋषी यांनी लिहिले आहे.हे सर्वात कमी सूक्त असणारे मंडल असून ह्यात एकूण ५८ सूक्त आहेत.त्यात जे वर्णन आहे ते असे
*”चत्वारि शर्डंगा,तरयो अस्य* *पादा,दवे शीर्षे,सप्त हस्तासो अस्य ।*
*तरीधा बद्धो वर्षभो,रोरविती महो देवो मत्यार्या आ विवेश ।।*
याचाच अर्थ *अग्नी हा ४ शिंगे,३ पाय,२ डोकी आणि ७ हात असणारा आहे.तो ३ ठिकाणी बांधलेला महादेवांचा वृषभ (नंदीच) आहे.
त्यानुसारच ह्या मुर्तीला ७ हात आहेत ह्यात वेगवेगळी शस्त्र आहेत.यातील एक हात छातीवर असून त्यात कमळाचे फुल आहे.
ह्या मुर्तीच्या मागे देखील २ पट दिसतील त्यावर ३-३ मूर्ती कोरल्या आहेत.पहिल्यांदा पाहिले की चटकन त्या ब्रम्हा,विष्णू,आणि महेशाच्या आहेत असं वाटत.पण ह्या मूर्ती स्त्री रूपातील आहेत.त्या अष्ठमातृका पैकी *ब्राम्ही,वैष्णवी,माहेश्वरी* ह्या आहेत आणि त्या खाली त्यांची वाहने आहेत.जसे ब्रम्हाचे वाहन हंस,विष्णूचे गरुड आणि शंकराचे वाहन नंदी तीच वाहने ह्या स्त्री रुपात असणाऱ्या मूर्ती खाली आहेत.दोन्ही पट सारखेच आहेत पण त्यातील एका पटात वैष्णवी चे वाहन गरुड असताना तिथे त्याऐवजी हनुमानासारखी मूर्ती कोरली असून त्याच बाजूला जैन तीर्थंकार महावीर अथवा ऋषभदेव यांची मूर्ती कोरली आहे.
हे पाहून बाहेर आलात की पुढे दक्षिणेकडे गेलं असता काही पाऊल चाललो की एक छोटं मंदिर दिसतं.त्यात दोन मूर्ती असून स्थानिक लोक त्यांना सटवाई म्हणतात पण ह्या दोन्ही मूर्ती *चामुंडेच्या* आहेत.दोन्ही मूर्ती चार भुजाधारी असून हातात शस्त्र आहेत त्यातील एका मूर्तीच्या हातात कमंडलू आहे.तर दुसऱ्या मुर्तीच्या पायाखाली मनुष्य आहे.हे पाहून तसेच पुढे दक्षिणेकडे चालत आलो की ३ लेण्यांचा समूह असणारे ठिकाण दिसते यालाच *वराडघर* म्हणतात.

*वराडघर*-
पाटेश्वर डोंगरावरील हे शेवटचे आणि अद्भुत लेणं आहे.बाहेर २ दीपमाळ आहेत.ज्या आता थोड्या पडलेल्या अवस्थेत आहेत.पण तरीही त्याची सुबकता तसूभर ही हलली नाही.वराडघरात जाण्याअगोदर बाहेर एक छोटंसं शिवलिंग दिसतं.ते पाहून आत प्रवेश केला की ज्याप्रकारे मुख्य पाटेश्वर मंदिरात सुबक कोरीव नंदी आहे.त्याचप्रकारचा नंदी इथे देखील पहायला मिळतो.तो पाहून आत गेलो की ३ लेणी दिसतील.समोर म्हणजे पश्चिमेकडे एक तर दक्षिण आणि उत्तरेस एक अशा ३ लेणी आहेत.पहिल्यांदा डावीकडील लेणीत प्रवेश केला तर वेगळा आकार,वेगळया संख्या दाखवणारी अशी एकूण ९ शिवलिंग पहायला मिळतील.ह्यातील डावीकडून पुढचे शिवलिंग आणि *मठाच्या बाहेर असणारे शंकराचे दाढीधारी शिवलिंग ह्यात पूर्ण साम्य आहे.वरती जसे वर्णन केले ५१ शक्तिपीठे,१२ शिवलिंगे आणि ४ धाम हाच संदेश यावर पहायला मिळतो* फरक हाच की तिथं शिवलिंगावरील छिद्र धाम दर्शवतात तर इथे चारही मुख्य दिशेला अयोनी शिवलिंग कोरली आहेत.बाकी शिवलिंगावर काहींवर ८ तर काहींवर एका बाजूस ८ आणि दुसऱ्या बाजूस १० अशी संख्या आहे.मग ह्यातून ८ दिशा,आकाश ,पृथ्वी असा काहीसा संदेश असावा असं वाटत.पण इथे अजून एक खूप सुंदर असं शिवलिंग पहायला मिळत जे ह्या लेणीत उजव्या बाजूला पुढेच आहे.म्हणजे लेणीत प्रवेश केला की पहिले हेच शिवलिंग पहायला मिळते.त्यावर ५ अयोनी शिवलिंगांचा छोटा समूह असे एकूण १०९ ( १०*१०=१०० आणि अजून ९ असे १०९) आणि शेवटच्या रांगेत जिथे ५ शिवलिंगांचे ९ समूह आहेत त्या बाजूला एक आणखी अयोनी शिवलिंग आहे.तर ह्या सर्वात मध्ये एक सयोनी शिवलिंग कोरले आहे.पण ह्याचा तसा अर्थ लागत नाही.पण जी १०८ शक्तीपीठ आहेत ती आपण मानली आणि मध्ये असणारे एक सयोनी शिवलिंग आणि त्याच शिवलिंगावर कोपऱ्यात असणारे एक अयोनी शिवलिंग आणि जो ५ शिवलिंगाचा एक समूह उरतो ती पंचमहाभूते असा अर्थ देखील निघू शकतो.
हे लेणे पाहून बाहेर आलात की मधले मुख्य लेणे आहे त्यात जाण्याअगोदर त्याच्या उजव्या कोपऱ्यात २ शिवलिंग पहायला मिळतील.त्यातील एकावर पिंडी ऐवजी २ कुंभ कोरले आहेत.मग त्याचा नक्की काय अर्थ असेल नाही सांगता येत पण पुराणात कुंभाचा संबध हा समुद्र मंथनात येणाऱ्या अमृत आणि विष ह्यातच येतो.आणि त्यातील विषाचा कुंभ भगवान शंकराने पिला होता हाच काय तो संबंध लक्षात येतो.यावरून असाही अंदाज येतो की अमृत आणि विष यापैकी विषाचा कुंभ निवडून तो आपल्या कंठात साठवून ठेवणाऱ्या हे शिवशंकरा तुमच्यामुळे बाकी देवता अमृत प्राशन करू शकली.त्या बाजूस आणखी एक शिवलिंग आहे त्यावर चार दिशेला चार मुख कोरली आहेत.स्थानिक लोकांच्या मते ती *ब्रम्हा,विष्णू,महेश आणि सूर्य यांची प्रतिकं आहेत* तर काहींच्या मते ही शंकराचीच *रौद्र,सौम्य,इंद्रशासित रूप आणि उमेशी म्हणजे पार्वतीशी बोलत असलेलं रूप* अशी ४ रूप आहेत.ती पाहून मुख्य लेणीत आत प्रवेश केला की समोर एक मोठे शिवलिंग पहायला मिळेल.त्यावर लहान अशी एकूण १००० अयोनी शिवलिंगे कोरलेली आहेत.याचा संबंध हा भगवान विष्णुच्या सहस्त्र नावाशी येतो.*विश्वम* ह्या पहिल्या नावापासून ते *सर्वप्रहरणायुध* ह्या हजारव्या नावापर्यंत असणाऱ्या विष्णुसहस्रनाम महात्म्यात भगवान श्रीविष्णूंच्या गुणांचे,रूपांचे,स्वभावाचे सारे वर्णन १०७ श्लोकांत केले आहे.म्हणजे जणू भगवान शंकराचा कोप शांत करण्यासाठी भगवान विष्णुची सारी नावे,रूपे पिंडीला अर्पण केली आहेत.पिंडीच्या बरोबर समोरील भिंतीत विष्णुसहस्रनामपट कोरला आहे ह्या पटावर १००० अयोनी प्रकारची शिवलिंग कोरली असून त्यावर भालचंद्र शिव,विष्णू आणि ब्रम्हा ह्या मूर्ती देखील कोरल्या आहेत.तर उजव्या बाजूस असणाऱ्या भिंतीत सुर्यसहस्रनामपट आहे.डाव्या बाजूस भिंतीमध्ये पार्वतीपट आहे त्यावर एकूण ९७२ अयोनी शिवलिंग कोरली आहेत.आता देवी पार्वती आणि ९७२ ह्या संख्येचे काही अर्थ जोडत गेलो की लक्षात येत देवी भागवतपुराण नुसार एकूण १०८ शक्तीपीठं आहेत मग ह्या १०८ शक्तीपीठांना ९ वेळा प्रदक्षिणा घातली असता मिळणारी संख्या ही ९७२ येते.यापटावर देवी पार्वतीची कोरलेली सुबक मूर्ती देखील आपल्याला पहायला मिळते.हे सारं पाहिले की तिथे खाली अजून एक पट दिसतो की जो विष्णू पटाच्या खाली जमिनीवर मांडलेला आहे.यावर *अष्टमातृका* कोरल्या आहेत.त्यांची नावे *ब्राम्ही,वैष्णवी,माहेश्वरी,इंद्राणी,कौमारी,वारही,चामुंडा आणि प्रत्यंगिरादेवी* अशी आहेत.बऱ्यापैकी सगळीकडे सप्तमातृका असतात पण देशात फार कमी ठिकाणी अशा अष्टमातृका पहायला मिळतात.हे सारं पाहून झालं की तिथं असणाऱ्या दोन्ही स्तंभावर नीट पाहिले तर शिवदंड दिसतात. त्यातील एक शिवदंड नागमोडी असल्याने तो सर्प कोरला आहे की काय असा संभ्रम होतो.ह्या शिवदंडांच्या बाजूला स्तंभावर देखील अयोनी प्रकारची शिवलिंग कोरलेली आहेत आणि दंडांवर देवनागरी लिपीत काहीतरी लिहलेलं आहे.पण ते पुसट झाल्याने नीट दिसून येत नाही. तसेच आपल्याला विष्णुपटाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवाची मूर्ती पहायला मिळते.यावरून हे काम इ.स पूर्व ५०० वर्षामागील असावे असाही अंदाज आपण लावू शकतो. कारण त्यानंतरच्या काळात ब्रह्मदेवांची कुठे मंदिरे बांधली गेली नाहीत किंवा सध्याही त्यांची पूजा केली जात नाही.पण त्यापूर्वी ब्रम्हदेवांची पूजा केली जात होती.ह्या लेणीतील एका स्तंभावर काही लिखाण ही दिसते पण काळाच्या ओघात तेही पूर्ण पुसट झालेलं आहे.वऱ्हाडघरातील हे मुख्य लेणे पाहून आपण उत्तरेकडील असणाऱ्या तिसऱ्या लेण्यात( मुख्य लेण्याच्या उजवीकडील लेणे) गेलो की तिथेही छोट्या मोठ्या आकारातील शिवलिंगे आपल्याला पहायला मिळतील.यावर ही पंचमहाभूते,दिशा असे संकेत कोरलेले दिसून येतात.
अशाप्रकारे पाटेश्वर वरील मरगळ म्हशीचे लेणे,बळीभद्र लेणे,वऱ्हाडघर ही ठिकाणे,कार्तिक स्वामी मंदिर आणि मुख्य पाटेश्वर मंदिर हे सारं पाहिलं की ही सारी कलाकुसर कोण्या एका काळात बनली नसुन इथं बरीच वर्षे,वेगवेगळ्या काळात थोडी थोडी काम होत गेली हे समजत.
आख्यायिका, वेगवेगळ्या पुराणातील वेगळे संदर्भ यानुसार कुठे १०८ तर कुठे ५१ असा तर्क लावून आपआपल्या मतांनुसार ही कोरीव काम केली आहेत.आपणही ही पाहताना असे सारे संदर्भ गृहीत धरून जर व्यवस्थित सारा परिसर पाहिला तर नक्कीच मनाला मिळणारा आनंद हा विलक्षण असेल.
खरं तर ह्या साऱ्या लिखाणात बऱ्याच चुकाही असतील आणि हेच तर मलाही दुर्दैव वाटत की एवढया सुंदर कलाकृतीच वर्णन मला अंदाज लावून करावं लागतेय.यावरच काही परखड मतं मला मांडायची आहेत.जी बऱ्याच जणांना पटणार नाहीत.पण त्या लिखाणात मला कोणाला दुखावणे हा हेतू नाही.तर इतिहास जागृती व्हावी, संशोधन व्हावं,जाणकार लोकांनी पुढाकार घेऊन एक जागृती मोहीम हाती व्हावी ह्याच उद्देशाने मी काही मत मांडत आहे ती आपण तिसऱ्या भागात पाहू

शब्दसारथी
निलेश बाबर
९२७१००८८९३