स्मृतीगंध…ट्रेक नंबर १७….पाटेश्वर भाग ३

*ट्रेक नंबर १७*

*पाटेश्वर भाग ३*

१२ आणि २६ डिसेंबर २०२१

*भाग १- प्रवासवर्णन आणि वैयक्तिक मते*

*भाग २ – आख्यायिका आणि इतिहास*

*भाग ३ – पाटेश्वर इतिहास जागृती आवाहन,संशोधन, प्रसार आणि प्रसिद्धी*

ह्या ३ भागात असलेलं लिखाण तुम्हाला हवी तेवढीच माहिती वाचून आपला वेळ वाचावा ह्यासाठी केलेलं आहे.ऐतिहासिक वारसा हा काही ठिकाणी फक्त पुजण्यासाठी तर काही ठिकाणी फक्त झिजण्यासाठी असलेला दिसतोय.हा अनमोल ठेवा योग्यरीत्या जपण्यासाठी आहे.तो पुढच्या पिढीला फक्त वाचून न्हवे पाहून समजायला हवा.त्यासाठी संवर्धन आणि संशोधन दोन्ही हवंय.

*पायी रुतेल जीवघेणा काटा*
*अंगावर येतील विरोधांच्या असंख्य लाटा*
*परी ध्येयास कधी न फुटो फाटा*
*मिळून शोधू भविष्याच्या सुंदर नव्या वाटा*
*जपलं तरच राहणार,खुपलं तर काय होणार*
*भुतलाचे पाहुणे आपण आज आहोत उद्या नसणार*
*जगलो फक्त धुंदीत आपल्या तर पुढची पिढी काय पाहणार*
*म्हणून आजच होऊ दक्ष, देऊ संवर्धनावर लक्ष*
*हे कार्य तुझे न माझे हे कार्य ईश्वराचे*
*साता समुद्रापार घुमावे नाव पाटेश्वराचे*

*भाग ३ – पाटेश्वर इतिहास जागृती आवाहन,संशोधन, प्रसार आणि प्रसिध्दी*

नमस्कार पहिल्या भागात आपण पाटेश्वरवरील ठिकाणे तर दुसऱ्या भागातील उपभाग १ आणि २ मधुन त्या कलाकृतींचा अंदाजे अर्थ लावून तो इतिहास जाणण्याचा प्रयत्न केला.
खर तर त्या दोन्ही भागाचे विस्तृतपणे लिखाण करावं लागणं हेच दुर्दैव आहे.एवढ्या सुंदर स्थळाची माहिती सहजासहजी उपलब्ध नाही ही फारच मोठी शोकांतिका नाही का..?
सोमवार,महाशिवरात्री याच दिवशी देवाचा आशिर्वाद मिळावा एवढंच महात्म्य ह्या स्थळाचं आहे का..?देगाव गावातून पाटेश्वरवर यायला अगदी चांगला डांबरी रस्ता आहे.त्यामुळे सहजपणे कोणीही मंदिरात येऊ शकत.शासनाने केलेली ही सुविधा उत्तमच.
मुख्य पाटेश्वर मंदिराची स्वच्छता उत्तमच अगदी कोणीही भाविक आला तरी हे सारं पाहून नक्कीच प्रसन्न होईल.मग एवढं सगळं चांगले आहे असं म्हणणाऱ्या मला अडचण काय असा प्रश्न उभा राहतो ना…? एका बाजूला म्हणायचे सार काही उत्तम आणि पुन्हा म्हणायचे दुर्दैव हा विरोधाभास न्हवे का..?
तर वाचकांनो,मित्रांनो आणि वडीलधाऱ्या व्यक्तींनो आणि सर्व मान्यवरांनो मी आपली क्षमा मागूनच काही मुद्दे इथे मांडत आहे.कारण त्यामागे काही छुपी कारणे, बंधने असतील तर ती मी न जाणता तिथं जे काही पाहिलं या आधारावर लिहितोय.मग त्यात माझं काही चुकत असेल तरी अवश्य सांगावं.पण समजून हे घ्यावं की ह्यात मला कोणाला कमी किंवा चूक दाखवून कसला असुरी आनंद घ्यायचा नाही तर एकमेव हेतू हाच आहे की आपल्या साताऱ्यातुन एवढ्या जवळ असणाऱ्या सुंदर स्थळाला चांगली प्रसिद्धी मिळावी.
खर तर मी पहिल्यांदा गेलो ते ट्रेकिंगसाठी जवळचे ठिकाण आहे लगेच बघून होईल या उद्देशाने.सकाळी ७ ला निघालो तरी १० पर्यंत माघारी येऊ अस काय ते नियोजन.कारण काय..?तर तिथं नुसत्या पिंडी आहेत एवढीच माहिती कानावर.मग पिंडी बघायला असा किती वेळ लागतो दर्शन घेऊ आणि निघू.पण तिथं गेल्यावर जे दिसलं,जे अनुभवलं ते फारच सुंदर.
ट्रेकिंग म्हणजे सकाळी लवकर निघणे हे आलंच म्हणून आम्ही ७ वाजता तिथं पोहोचलो.पण तिथं गेटजवळ पोहोचलो आणि बोर्ड वाचला कोविडची सूचना ” भक्तांसाठी दर्शनाची वेळ सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ३ ते ५” म्हणजे इतर वेळेत परिसर बंद राहील.आता ह्यात मी काही चूक काढावी अस नाही.शेवटी देवस्थानाने घेतलेला हा निर्णय आहे.
पण मला एकच सांगायच आहे की पाटेश्वर हे एवढा ऐतिहासिक ठेवा असलेलं ठिकाण फक्त देवस्थान म्हणून का पहावं…? इथे फक्त भाविकांनी यावं देवाचे दर्शन घेऊन जावं एवढं साधं ठिकाण आहे का हे…?
अहो हजारो किलोमीटर अंतर पार करून ,हजारो रुपये खर्च करून,वातावरणाची तमा न बाळगता भक्ती,श्रद्धा,आस्था या गोष्टीसाठी स्वतःच्या शरीराची कमजोरी विसरूनही म्हातारी लोकं का जात असतील अमरनाथ यात्रेला…?,का फिरत असतील चार धाम…?,का करत असतील १२ ज्योतिर्लिंग यात्रा…?कारण फक्त एकच त्या जागेच महात्म्य लोकांपर्यंत पोहोचलय.पिढ्यानपिढ्या सगळेजण ऐकत आले आहेत.तिथली अद्भुत शक्ती,भगवान शंकरावर असणारी श्रद्धा आपोआप सर्वांना खेचते.अगदी वर्षभर यात्रा भरावी अशी सुंदर ठिकाण आपल्या देशात आहेत.इथं जाणारा प्रत्येक भाविक काय फक्त देवाचा आशीर्वाद मिळावा ह्याच हेतूने जात असावा का ओ…?तर कित्येक चौकस बुद्धी,अभ्यासूवृत्ती असणारी मंडळी ह्याच ठिकाणांत लपलेला इतिहास वर आणत असतात.
भक्ती सोबत ,जिज्ञासूवृत्ती ठेवून आजवर कित्येक लपलेली ठिकाणं वर आली आहेत.आता तुम्हाला वाटेल मग या सगळ्याचा इथे काय संबंध…?
तर संबंध आहे.अहो आजवर ट्रेकिंगसाठी म्हणून जास्त नाही पण थोडं बहुत आपल्या ह्या सातारा जिल्ह्यात फिरलो.प्रत्येक गडावर काही ना काही जुने अवशेष दिसत असतात त्यांना नजरेत आणि कॅमेऱ्यात साठवून ठेवत असतो.पण मी एवढी सुंदर कलाकृती…नुसती कलाकृती नाही तर त्याच भांडार दुसरीकडे कुठं नाही पाहिलं जेवढं पाटेश्वरवर आहे.
पण मी जे दुर्दैव म्हणतोय ना तो विषय खर सुरू होतो तो आत्ता.कोविड चे नियम सातारा नाही तर पूर्ण जगभर आहेत.काही महिन्यांपूर्वी तुळजापूरला आई तुळजाभवानीचे दर्शन सगळे नियम पाळून घेतले सकाळी ६ वाजता.प्रचंड गर्दी पण तरीही ठराविक अंतर ठेवून,रांगेने गेलो १.३० तास रांगेत वेळ गेला पण छान दर्शन झाले आणि बाहेर आलो.मागच्या महिन्यात रायगडावर गेलो.गडाची पुनर्निर्मिती(उभारणी) सुरू आहे,भारतीय पुरातत्व विभागाकडे सगळी जबाबदारी आहे.त्यानुसार नाममात्र फी घेऊन सकाळी ७ वाजता गड सर्वांसाठी खुला होतो आणि संध्याकाळी ५.३० पर्यंत पाहता येतो.परवा लोहगड पाहण्याचा योग आला तोही पुरातत्त्व विभागाकडे असल्याने नाममात्र तिकीट ठेवून सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत खुला आहे.
म्हणजे यातून मला हे सांगायच आहे की सगळे नियम व्यवस्थित पाळून ही गर्दीची आणि प्रसिद्घ ठिकाणे दिवसभर खुली आहेत आणि तिथं रोज हजारो लोकांची( देवस्थानच्या ठिकाणी रोज तर गडांवर शनिवार रविवार) ये जा सुरू आहे.तरीही सार व्यवस्थीत सुरू आहे.
मग त्यामानाने काहीच गर्दी नसलेल्या आपल्या पाटेश्वरवर असा नियम का..? सूचना फलकावर शेवटचा मुद्दा काय तर बिबट्याचा वावर असल्याने मंदिर परिसरात जास्त वेळ थांबू नये.आता यावर काय बोलावं..दुपारी १२ ते ३ हा बिबट्याचा जेवणाचा वेळ असावा का…? ज्यामुळे चुकून तिथं सापडलो तर आपली शिकार व्हावी.
मला यावर कुचेष्टा नाही करायची पण हा नियम नक्की कोणाच्या सोयीसाठी….? जर तिथं बिबट्याचा वावर आहे तर एखादी फॉरेस्ट खात्याची पोस्ट नसावी का मग…?
तिथं श्री सदगुरू गोविंदानंदांचा मठ आहे.(कृपया माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका.) म्हणजे तिथं मनुष्य वास्तव्य आहे.मी तिथे असणाऱ्या मुख्य गुरूंना भेटलो नाही.किंवा मला त्यांच्याबद्दल काही चूक म्हणायचे नाही.पण आलेला अनुभव मी मांडतोय.
आम्ही ग्रुपने तिथं गेल्यावर ह्या शांत ठिकाणी आमच्या गप्पांमुळे दंगा झाला.आम्हाला दंगा करू नका सांगण्यात आलं.अगदी योग्य आहे हे.पवित्र ठिकाणी दंगा मस्ती नसावीच.मग मी त्या मुलाला विचारले की “अहो मी जी माहिती वाचली होती त्यानुसार इथं मरगळ म्हशीचे लेणे कुठे आहे.”त्याने मठाच्या मागील बाजूस हात करून सांगितले “इथून मागे जावा सगळं तिकडेच आहे.”मी विश्वेश्वर पुष्करणी पाहिली होती मुख्य मंदिर ही पाहून खाली आलो होतो.मठाच्या मागील बाजूस असणारी ठिकाणे ही पाहून आलो पण मी जे विचारले ते मला दिसले न्हवते.मग फिरुन आल्यावर त्याच व्यक्तीला मी विचारलं “अहो नाही मागे.बघा ना कुठे आहे अशी पिंड ज्यावर म्हैस कोरली आहे आणि त्यावरच पिंड आहे”.त्याने नकारार्थी मान हलवून नाही माहीत अस सांगितले.
आता माहीत नसणे ह्यात त्याची काही चूक आहे अस मी म्हणतच नाही.पण मला ती जागा काही करून पहायची होती.मी यू ट्यूब वर पाहिले,नेट वर माहिती पाहिली पण नाही माहिती मिळाली.पण एक संदर्भ मिळाला होता की विश्वेश्वर पुष्करणी जवळ हे लेणे आहे.मग १२ डिसेंबरची अर्धी माहिती मनात साठवून नव्या माहितीसाठी २६ डिसेंबर ला पुन्हा मित्रांसोबत आलो.आधी पाहिलेली सगळी ठिकाणे सर्वांसोबत पुन्हा व्यवस्थीत पाहिली आणि मग जाताना पुष्करणीच्या बाजूला माझ्या घिरट्या चालू झाल्या.तसा मी नियम मोडलाच त्याबद्दल माफी असावी पण काट्या टाकून बंद केलेलं आणि येणं जाणं बंद असल्याने झुडपं वाढलेली एक जागा दिसली.जमेल तशी ती अडचण दूर करून आत गेलो असता मला ते सुंदर दृश्य पहायला मिळालं.
आता हे एवढं सार सांगण्याचा हेतू स्पष्ट करतो.बघा ना संपूर्ण परिसराची स्वछता करण्याच काम ह्या मठातील व्यक्ती पाहतात.मुख्य मंदिराची स्वछता आणि तिथं जाणारा पायरी मार्ग फारच उत्तमरीत्या स्वच्छ ठेवला आहे.ह्यात काहीच शंका नाही.
पण मरगळ म्हशीच्या लेण्याची अवस्था,मठामागील पाण्याचे टाके,आणि बलीभद्र लेण्यातील पिंडी आणि बाजूचा भाग हा एकदम दुर्लक्षित दिसतो.यात चूक त्या व्यक्तीची आहे किंवा स्वछता पाहणाऱ्या कोण्या एकाची आहे असं नाही म्हणायच मला.
दोष आहे तो आपल्या सगळ्यांचा.कारण योग्य त्या माहितीचे फलक ज्या त्या ठिकाणी लावले गेले तर येणारा भाविक असो वा ट्रेकिंग साठी आलेला कोणी असो.जर माहिती वाचनात आली तरच त्याचा प्रसार आणि जागृती होईल ना…?
जर योग्य माहितीचे फलक सगळ्या ठिकाणी लागले तर पर्यटक फक्त मुख्य मंदिर नाही तर सारा परिसर फिरतील आणि सारा परिसर सर्वांच्या पाहण्यात आला तर आपोआप साऱ्या ठिकाणाची स्वछता ही केली जाईल ना.
आणि माझं एकमेव हेच मत आहे की इथे असणाऱ्या प्रत्येक पिंडीच्या आकारात काही ना काही अर्थ दडले आहेत.आपल्याकडे जाणकार ,अभ्यासू लोकांची कमीही नाही.मग जर सर्वांनी पुढाकार घेऊन अध्यात्माचा अभ्यास असणारे,इतिहास आणि जुन्या भाषेचे ज्ञान असणारे जाणकार इथे आणले… त्यांच्याकडून योग्य ती माहिती घेऊन सरकार दफ्तरी जमा केली. यावर योग्य ती कार्यवाही करून संपूर्ण पाटेश्वर परिसर प्रकाशझोतात आणला तर आज जसे वासोटा एक सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ झालंय तसेच आपले पाटेश्वर होणार नाही का…?
लहानतोंडी मोठा घास म्हणून मी जास्त काही बोलून गेलो असलो तरी माफी असावी.पण मला पाटेश्वर परिसर खूप आवडला आणि यावर काही अजून सखोल माहिती मिळेल अस आमचे मित्र श्री धनंजय कणसे यांनी सांगितले मग मी आमचे बंधू गुरुनाथ यांच्या सोबत आपल्या सातारा येथील वस्तू संग्रहालयात कार्यरत असलेल्या श्री.प्रवीण शिंदे सरांना भेटलो होतो तेव्हा तिथेही काही माहिती उपलब्ध नसून पाटेश्वर पुरातत्व विभागाकडे येत नाही हे समजले.
मी त्यांना सहज म्हणालो अहो तिथं असणाऱ्या सगळ्या पिंडी ह्या पुरातन आहेत हे तर मान्य आहे ना सर्वांना. मग तरीही कस काय नाही येत पुरातत्त्व विभागाच्या अधिकारात…?
तर काही इतर गोष्टी समजल्या.जर आपल्या पाटेश्वरला चांगल्या प्रकारे प्रकाशझोतात आणायचे असेल तर आपल्या सर्वांना एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.विशेषतः देगावकरांनी पुढाकार घेऊन शासनाला निवेदन देणे गरजेचे आहे.तर आणि तरच शासन देखील लक्ष घालेल आणि तेव्हाच ह्या कलाकृतींना ,शिल्पांना योग्य तो न्याय मिळेल.भले आज ती शिल्प कोणी बनवली हा उल्लेख कुठे नसेल.पण ज्या भक्तीभावाने त्या कारागिरांनी ही शिल्प उभी केली ती जगासमोर दिमाखात सादर झाली पाहिजेच ना.
आतील काही गोष्टी समजल्या त्याची मला वाच्यता करायची नाही.पण खरंच सर्वांनी आपले वैयक्तिक हेवेदावे बाजूला सारून प्रयत्न केले तर नक्कीच कास,वासोट्याला लाभलेली जनमाणसांची अभूतपूर्व साथ आपल्या पाटेश्वरला ही लाभेल.
मग पुढच्या गोष्टी सांगाव्या लागतील एवढया अवघड नाहीतच.पर्यटन वाढले की रोजगार वाढणार ह्यात शंकाच नाही.काही चुकीचे शब्द आले असतील तर पुन्हा एकदा माफी मागतो.सर्वांनी मिळून पाटेश्वर एक सुंदर देवस्थान आणि पर्यटनस्थळ बनावं यासाठी एकत्र येऊ.
ओम नमः शिवाय

शब्दसारथी
निलेश बाबर
९२७१००८८९३