बाळंतपण

*बाळंतपण*
स्त्रीच्या नशिबी आलेली डोळ्यांना सुखद भासणारी पण जबाबदारींनी भरलेली धगधगती मशालच.त्या मशालीचा उजेड अनुभवायला बाजूच्या सर्वांचे डोळे जणू व्याकुळच असतात.पण तेवणाऱ्या मशालीचे चटके अनुभवते ती बाळंतीणच.
खर तर स्त्रिच्या नशिबी लिहिलेलं हे अग्निदिव्य आणि यावर आजवर मांडलेले विचार ,स्वतः अनुभवलेल्या कडू गोड आठवणी, ह्या वेगवेगळ्या टप्प्यांवर स्त्री स्वतः मांडत आली आहेच.मग मी वेगळं काय सांगणार….?
मीही वेगळं असं काही बोलणार नाहीच पण २६ मार्चला बहिणीला मुलगी झाली आणि मी मामा झालो.नऊ महिन्यांत तिच्यात होणारे बदल आणि तो प्रत्यक्ष वेदनांनी भरलेला दिवस आणि नंतर तिच्या चेहऱ्यावर उमटलेले हसू……. आणि आम्ही फक्त आनंदाने आमची नाती जोडू लागलो.त्या सुंदर परीच्या आगमनाने आम्हा सगळ्यांनाच बढती मिळाल्याचा आनंद होता.माझी आई आज आजी झाली. तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद अजूनही डोळ्यासमोर आहे.डोळ्यात पाणी…. पण आनंदाने चेहऱ्यावर उमटलेले एक वेगळेच तेज मी तिच्या चेहऱ्यावर आज पाहत होतो.
मनात विचारांचं एक वेगळंच विश्व तयार होवू लागलं होतं.बघा ना आपल्या जवळची कोणतीही व्यक्ती आपण जेव्हा हॉस्पिटल मध्ये घेवून जातो,जेव्हा ऍडमिट करण्याची वेळ येते तेव्हा ते क्षण जगणे,अनुभवणे हे आपल्यासाठी एक मोठी परीक्षाच असते.पण बाळंतपण ही अशी गोष्ट की आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला आनंदाने ऍडमिट करत असतो.गरोदर स्त्रीला होणाऱ्या त्या वेदना आपल्याला आनंद देत असतात.
*”अरे वा पोटात दुखतेय मस्तच झालं….. गेलं पाहिजे आता हॉस्पिटल मध्ये”* किती सहजपणे आपण सगळे हे बोलून जातो त्यापैकीच मीही एक.
महिने……आठवडे…..दिवस कसे भरकन सरून गेले होते,डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे ,आहार,आराम ,व्यायाम हे सगळं कसं व्यवस्थित जपलं होतं…… आणि आता वेळ झाली होती त्या नव्या जिवाच्या आगमनाची.
पोटात येणाऱ्या कळा ती सहन करत होती….आणि….. मला फक्त मी मामा होणार हेच सुख दिसत होतं.अजूनही कुठेच त्या वेदनांशी माझं नातं कसलं जोडलं गेलं न्हवतचं.सकाळची वेळ उलटून दुपार झाली कळा वाढल्या जाव्यात म्हणून तिला इंजेक्शन दिली जात होती.डोळ्यात पाणी दिसत होत शरीराची तडफड ह्या कुशीवरून त्या कुशीवर अशी वाढत चालली होती. उन्हाळ्याचे दिवस पंखा जोराने सुरू होता पण तरीही घामाचे लोट तिला आणखीच अस्वस्थ करत होते.
ह्या सगळ्यात अजूनही मी याच धुंदीत होतो की आता बहुतेक बाळ होणार.वेळ जवळ आलीय.ह्या वेगळ्याच आनंदात मी रमलो होतो.सिस्टर आल्या आणि मला बाहेर जायला सांगितले.आता तिच्या सोबत फक्त आई होती.मीही आता थोडा बैचेन झालो होतो पण तिला होणाऱ्या त्रासाने नाही तर कधी बाळ होतेय ह्या आशेने.
आता दुपार उलटून सायंकाळ झाली होती.जेवणाचा डबा आणावा म्हणून मी घरी आलो तेच मला बहिणीच्या मिस्टरांचा फोन आला की बहुतेक आता सिजर करावं लागणार आहे.कारण बराच वेळ झाला तरी काही हालचाल नाही होत.बाळाच्या जीवाला धोका पोहोचू शकतो.मी म्हणालो “असे कसे….?”करेल ती सहन.अजिबात सिजर नकोय आपल्याला.बघू मी येतो.आणि पटकन मीही हॉस्पिटल मध्ये पोहचलो.
आजवर थिएटर मध्ये अगदी मोठ्या स्क्रीन वर, मोठं मोठ्या अभिनेत्रींनी बाळंतीण होताना होत असणाऱ्या वेदना आपल्या अभिनयातून उत्कृष्टपणे साकारल्या आहेत.पण ती दृश्य फक्त डोळ्यापर्यंत आणि आवाज फक्त कानापर्यंत पोहोचले होते.पण आज ऑपरेशन थिएटर बाहेर उभा असताना आतून बहिणीच्या येणाऱ्या किंकाळ्या मनापर्यंत पोहोचत होत्या आणि नकळत डोळ्यातून पाणी गालांवर ओघळले होते.पण आता सुरू झाला होता तो माझाच अभिनय.आईचा रडवेला चेहरा पाहून…. मला काही वाटत नाही अस दाखवून गप बस रडतीय काय त्यात शांत हो असं वरवरचे बोलणे करून तिला शांत करत होतो.पण माझ्या मनात आज पहिल्यांदा ह्या किंकाळ्यांनी वेगळे घर केलं होतं.
सभोवार आजवर खूप ऐकत आलो नॉर्मल झाली…. सिझर झाली…मुलगा झाला….मुलगी झाली….सिझर झालं का…? मग मुलगा की मुलगी….? मुलगा…! अरे वा बर झाल… म्हणजे सुटली एकदाची.आता काय टेन्शन नाय…मुलगी झाली….सिझर झालं…. आरर बेकार झालं.सिझर झाल्यासारखं मुलगा झाला असता बर झाल असत.हे सारे शब्द आजवर खूपदा कानावर पडत आलेत.पण यामागील भावना मनापर्यंत कधीच पोहोचल्या न्हवत्या.
एका स्त्रीच्या शरीराची होणारी चिरफाड आणि त्या वेदनांची तीव्रता ही मुलगी झाल्यावर जेवढी तीव्र असते तेवढी मुलगा झाल्यावर नाही असा समाजाने बांधलेला अघोषित फरक आज लक्षात येत होता.मीच किती भावना शून्य होतो हेही आजच समजले मला.आजवर मित्र परिवार,नातलग,शेजारचे, ओळखीचे अशा माणसांच्या कित्येक बाळांना मी पाहत आलोय.पण एक असह्य वेदना,जीव नकोसा करून सोडणारा तीव्र आक्रोश पुढे जावून नव्या जीवाला जन्म देतो.ह्या अग्निदिव्यातून तळपून निघणारी कणखर स्त्री आज मनाला पटत होती.
विचारांचं हे चक्र सुरू असताना अचानक ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडला आणि समोर डॉक्टर उभ्या… काय बोलणार…काय सांगणार हे वाटत असताना एकदम त्या म्हणाल्या पिशवीचे तोंड उघडले आहे त्यामुळे आम्ही आता नॉर्मल साठीच प्रयत्न करतोय आणि एवढं बोलून परत त्या आत निघून गेल्या.
आता मनाची अवस्था अशी झाली होती की काहीही करा पण लवकर तिच्या वेदना थांबाव्या.दिवस २६ मार्चचा वेळ संध्याकाळी ८:४५ ची बहिणीच्या ओरडण्याचा आवाज बंद झाला होता पण काय अंदाज लागत न्हवता.हातात मोबाईल घेवून वेळ बघायचा प्रयत्न सुरू होता.८:४८ची वेळ झाली आणि लहान बाळाच्या रडण्याचा आवाज कानावर पडला.काही क्षणापुर्वी बहिणीचा रडलेला आवाज नको वाटत होता.पण आता बाळाचं हे रडणं हवेसे झाले होते.क्षणात तुमच्या भावना कशा बदलतात…..आलेल्या दडपणाचा काळोख क्षणात दूर होवून आनंदाचा लख्ख प्रकाश आता दिसत होता.
मुलगा झाला की मुलगी असा प्रश्न ना माझ्या डोक्यात होता ना आई आणि दाजींच्या.बाळ जन्माला आले ह्याच आनंदात आम्ही तिघे एकमेकांना पाहत होतो. *”मुलगा होवुदे नाहीतर मुलगी आपण पेढेच वाटायचे”* असं आनंदाने आधीपासूनच म्हणणारी माझी आई चेहऱ्यावर हसू,डोळयातून ओघळणारे पाणी ह्या मिश्र भावनेने डोळे बंद करून, हात जोडून देवाचं आभार मानताना पाहून आज माझंही मन आनंदाच्या एका उंचचउंच टप्प्यावर असल्याचं जाणवतं होत.
काही वेळ असाच निघून गेला आणि बाहेर आलेल्या सिस्टरने मुलगी झाल्याचे सांगितले.आम्ही सगळे आनंदाने कधी तिला पाहतोय असे बैचेन झालो होतो.स्टेटस ठेव,फोन कर,मेसेज कर असे सगळे उद्योग माझे सुरूच झाले होते.बाळाला सगळ्यात आधी मीच हातात घेणार आणि माझा फोटो काढायचा हा माझा भलताच हट्ट.पण दाजीही काय म्हणाले नाहीत.आता बाळ आणि बाळंतीण दोघेही रूममध्ये आले होते.मी पटकन बाळ हातात घेतले आणि दाजिंनीही आनंदाने माझे बाळासोबत फोटो काढले.
आता गंमत अशी झाली होती मी,दाजी आणि आई तिघेही फक्त बाळाकडेच बघत होतो.काही क्षण आम्हाला त्या बाळंतीणीचा पूर्ण विसरच पडला होता.आम्ही मग काही वेळाने भानावर आलो आणि बहिणीची चौकशी करू लागलो.कशी आहेस…?आता नाही का काय त्रास…? शांत झोप आता एवढेच काय ते आम्हा तिघांचे बोलणे…….हे ऐकून माणूस किती विचित्र प्राणी आहे अस वाटत ना….? बघा ना त्या बाळाची काळजी पण बाळंतीण कशी आहे याची नंतर चौकशी…
पण याहून अजून मोठी गंमत म्हणजे काही वेळापूर्वी जोरात किंचाळणारी ही बाळंतीण एकदम हसत तिच्या बाळाकडे पाहत होती.प्रेम,माया,ओढ किती वेगळी असते ना याचा प्रत्यय अगदी प्रत्यक्ष समोर अनुभवत होतो.सगळ्या वेदना तिही पूर्ण विसरून गेली होती.
सीजर असो वा नॉर्मल पेशंटची त्यावेळची स्थिती,ती असह्य वेदना झेलण्याची क्षमता,बाळाची पोटातील स्थिती,पेशंटचा रक्तदाब,तब्येत अशा कित्येक बाबी समोर ठेवून डॉक्टर योग्य तो निर्णय घेत असतात.अशा हृदयाला पिळवटून टाकणाऱ्या कर्कश आवाजातही स्वतःच्या मनाला शांत ठेवून….आजवर आलेले अनुभव,केलेला अभ्यास आणि गरज पडली तर काही नवीन प्रयोग करून बाळाला हे नवं जग दाखवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सर्व डॉक्टर्स,सिस्टर्स,मदतीस असणारे सर्वजण ह्या सर्वांचे मनापासून आभार.
बाळंतपण हा एक समोर अनुभवलेला प्रसंग इथे वर्णन करून झाला असला तरी ह्या विषयाचा शेवट मनात एका वेगळ्याच प्रश्नाची सुरुवात करतोय…..!!!
बघा ना अशा असह्य वेदना सहन करून बाळाला जन्म देणारी स्त्री ही कणखरतेचं प्रतीक ही आहे,मायेने त्याचं संगोपन करताना ती प्रेमळतेचं प्रतीक आहे,चुकांना पांघरून न घालता त्याला योग्य शासन करून त्याचं भविष्य सुंदर घडावे यासाठी धडपडणारी स्त्री सुसंस्काराचं प्रतीक आहे,पण दुर्दैव हेही आहे की अशा कित्येक गुणांनी संपन्न स्त्री ही पोटच्या गोळ्यासाठी वेगळी आणि सासू सासऱ्यांसाठी वेगळीच आहे.
मरणयातना देवून जन्माला येणारं मूल चेहऱ्यावर हसू आणतं….. पण सासू सासऱ्यांची छोटीसी चूकही जणू ह्या स्त्रीला मरणयातना देतं…… आणि मग जन्म होतो एका नव्याच बाळाचा जगभर ह्याचं एकच नाव गृहकलह……..! मग ह्या बाळाच्या वाढीला पोषक खाद्य घरात रोज मिळत गेले तर त्याची वाढ एवढी होते की मग त्या सर्वांना एका घरात राहायला ती जागा ,ते घर पुरत नाही……आणि मग व्हावं लागत विभक्त…..!
असो यावर जास्त काही बोलत नाही.कारण मी सध्या आहे आमच्या छोट्या परीसोबत जिने मला मामा बनवले.मामा बनवणारी ही आमची परी तीन दिवस हॉस्पिटल मध्ये मुक्काम करून आज मामाच्या घरी आलीय.आठवणीतील कथा,मनातील व्यथा,समाजातील प्रथा तर कधी थोरांच्या गाथा घेवून भेटू असच पुन्हा लवकर.धन्यवाद

शब्दसारथी
निलेश बाबर
९२७१००८८९३