सासरातले माहेरपण

*_सासरातले माहेरपण_*

सुखाचा संसार अन् संसारातील सुख
जिथं आपुलकी अन् जिव्हाळ्याची माणसं असावी खूप
समजून घ्यावं प्रत्येकानं….असावी प्रत्येकाच्या बोलण्याला किंमत
क्वचित घडतं असं कुठेतरी बाकी हा विचार म्हणजे नुसती गंमत.
वाटत असतं प्रत्येकाला असावा सुखी संसार
पण उमगत नसते व्याख्या सुखाची
घडतात त्याच चुका वारंवार
मग आत्मपरीक्षण राहते बाजूला आत्माही जातो विठून
सांगा बर पुन्हा उभं रहायला आत्मविश्वास आणायचा कुठून?

*संसार….सासू….सुख….सून….* ही *स….* ची बाराखडी *सुंदर* तेव्हाच होणार जेव्हा कोणत्याही परिस्थितीत ही *साखळी* एकमेकांना *सावरत* राहणार.सुखाचा अर्थ आनंदाचे *सोबती* असा नसून पडत्या काळातही एकमेकांच्या विचारांना *समजून* घेणे आणि उभं रहायला *साथ* देणे असा होतो.
*सासू आणि सुनेच्या* विचारांचा *संगम* होणे……ही खर तर आजवर *स्वप्नवत* वाटणारी गोष्ट असली तरी ती *सत्यात* न उतरण्याची हजारो कारणे घराघरात वेगळी आहेत.मग दोन्ही बाजू ऐकून घ्याव्या आणि कोणा एकाला दोषी ठरवून निकाल लावला जावा अशी सोपी केस तर नसते ना ही. मुळात कोणा एकाला चूक ठरवणे हीच मोठी चूक असते.कारण तिथे त्या व्यक्तीचा आत्मसन्मान डिवचला जात असतो.
माझं ह्या विषयावर बोलणे योग्य आहे की नाही माहित नाही.कदाचित ते काहींच्या भावना दुखवू ही शकते.पण माझं मत हेच असेल की सुखासाठी काही बदल करून बघायला काय हरकत आहे….? तसे एक दुर्दैव हे ही आहे की सोशल मीडिया वरील हे लिखाण सून वर्गापर्यंत जास्त जाईल.कारण सासू वर्ग बऱ्यापैकी यापासून वंचित आहे.
पण कित्येक कीर्तनकार , प्रवचनकार सासू वर्गाला जागे करायचा प्रयत्न करत आहेच की.पण अजून एक गंमत अशीही आहे की
प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांची माहेरची साडी ही फिल्म पाहिली नसेल असा महिला वर्ग फार कमी.पण त्यातील अलका ताईंचा अभिनय पाहून सासूबाई देखील स्वतःला सुनेच्या भूमिकेत पाहत आल्या आहेत.
“हो आसच केलय माझ्या सासूनं…. आशीच वागलिय माझ्याबर……अजिबात देखु खवत न्हवती……जरा म्हणून सुख नाय……. कधी नीट बोलली नाय…..आणि मग डोळयातून पाणी…….चला फिल्म संपली…..टीव्ही बंद आता पुढची तयारी…….आता जी सासू फिल्म पाहताना स्वतःला सुनेच्या रुपात बघत होती ती आता पुन्हा सासू झाली होती.मग जोरात आवाज निघतो ये चहा आण ग तेवढा……हे झालं का ते झालं का….अजून नाय झालं…म्या अशी बसून राहिले असते तर माझ्या सासूने जीव घेतला असता माझा…..तुमचं आपल बर हाय….आम्ही आपल्या भोळ्या भेटलो म्हणून तुमचं चालतंय…..अस म्हणून शेजारच्या म्हाताऱ्या मैत्रिणीपुढे स्वतःच कौतुक स्वतः करून झालं की मग कुठं तरी मनाला आनंद मिळतो.
मग आता दोघींच्या हातात चहाचा कप येतो आणि मग पुन्हा सुरू होतं गप्पांच सत्र…..”बघ ना आपल्या यळला काय हुत…. मर मर मरायचं काम करून आण वरनं सासूच्या शिव्या खायच्या….आमचं ह्य कितीबी सांगा काय फरक नाय.तू गप तू गप म्हणायचं……मग चहाचा घोट घेवून दुसरीचाही सुरात सूर मिळू लागतो…” तुझ काय आण माझं काय… यगळ हाय व्हय…..तुला बया चा तरी मिळतुया हातात माझीला तर काय बोललं की यितिया अंगाव धावून.पोरग तर बापाच्या वरच….. बाप कधी आईला बोलला नाय… आण ह्य पोरग बायकुला जरा काय बोललं की मलाच घालतंय शिव्या…..”मग डोळं पुसत चहाच्या घोटासोबत आपलं दुःख पोटात टाकून….”चल बया निघते…..तुझ बर हाय… सून करून घालतीया तुला.मला सयपाकाचं बघायचय……”चहाचा पाहुणचार घेवून बाईसाहेब निघून गेल्या.
मग कप बाजूला ठेवत ह्या सासूबाईंच्या मनातले दुसरे विश्व बाहेर निघते…..ज्या मैत्रिणी सोबत पूर्ण फिल्म पाहून…एकमेकींच्या दुःखाचा डोंगर जणू खाली केलेला होता.आता त्याच समदुःखी मैत्रिणीचे बोलणे मनाला लागले होते….मग ती सल बोलून काढायची वेळ झाली होती…..मग स्वतःशीच पुटपुटत……
” आलीय सांगायला मोठी…. सून बुलतिया….बोललं नाय तर काय करल…. हायीच तशी ही…. सासू बोलून बोलून मिली…. पण हिला कसली अक्कल आली नाय…..एक काम धड नाय…..पोराला आधीच नीट वळाण लावलं असतं तर ह्यो दिवस आला असता वय तवा.पण नाय…. कधी दुसऱ्याच नीट बघवत नाय म्हणून ही यळ आलीय… बस आता भोगत…. ” तेवढ्यात आतून सून चहाचा कप उचलायला आली… की मग अजून जोरात आवाज वाढला….. “म्या बर खपवून घिण… एकटीनं उभा केलाय संसार….नवरा कामाला तिकडं ममईला… हिथ पोर टाकून त्यो तिकड… म्या एकटीन बघितलय सगळं….. पोरं काय शिकत्यात ह्य तरी म्हाईत व्हत का त्याला…..म्या शिकिवलय……सासुच काय… जाग्यावं बसून नुसती….तब्येत ठीक नाय म्हणून म्हणून आख्खा जनम बसून काढला…… सासरा तर काय नुसता बैल त्याला काय बोललं तरी नुसता मान हालवून बसायचा….म्या म्हणून सोसलं सगळ…..नायतर टिकतय वय कोण……”सूनेकडे नजर वळवून अजून जोरात….” आमच्या आई बापानं आम्हाला नीट शिकावल म्हणून आम्ही नीट नांदलुया….नायतर आजकालच्या पुरी जरा काय बोललं की भोंगा पसरून सांगत्यात नवऱ्याला….जरा भी भ्या नाय….आई बापच नीट न्हाईत तर पोरगी कसली निघणार…..” असं म्हणून सासूबाई चहाचा कप घेवून जाणाऱ्या सुनेकडे बघत बेड वर आरामात बसून राहिल्या.
आता वेळ आली होती सासूबाईंची फिल्ममेट शेजारीण असणाऱ्या बाईसाहेबांची….. तनतन करत घरात घुसत….”हातात सगळं मिळतया तरी मिजास सुचतिया….आली मोठी सांगायला ह्याव केलं त्याव केलं….काय केलंय…..त्या नवऱ्याला नुसता बैल केलेला…… त्यो आपला बिचारा सगळ हातात आणून द्यायचा…. पण ही औदसा एक शबुद कधी नीट बुलली नाय त्याच्याबर…..सासू बी बिचारी एका जाग्याव बसून…एक शब्दानं कधी उलट बोलायची नाय ….पण मयंदाळं छळलं तिला.बिचारी अजून १० वरीस जगली असती पण हिज बोलण ऐकून खाणं टाकलं बाईन….अशी असती सासू तर पाय धून पाणी पेलं असत तिझं……नाहीतर आमची….. कितिबी करा……तोंडाचा पट्टा चालू म्हणजे चालू …. नखभर दिखु खवत न्हवती….शेवटी मिली कर्मान….पण नशीब भी एवढं जळक मेल…. पॉर भी नीट नाय….. नुसत बायकु बायकु करतंय…..जणू अप्सरा नाय का ही…. माग माग करतंय नुसत….आम्ही नाय का संसार केला…आम्हाला नाय का पोर झाली…..नुसत कौतुक पाहिजे मिलीला……आपलंच नाणं खोटं म्हणायचं आण काय….” असं बोलून घरात पाऊल टाकलं की सुनेचा आवाज…..” हे बर आहे आम्ही बसतो काम करत आणि ह्यांना शेजारी आरामात टीव्ही बघायला जायचं सुचत….मी बोलले की माझं तोंड दिसतं…..पण का बोलते नाही कळणार कोणाला…..ह्यांना पण आईचा पुळका …..तिला नको बोलत जावू म्हणे…..म्हणजे मी काय भांडायला उठलेली असते सारखी……आम्हाला काय अक्कल नाही जणू….” असं म्हणत आदळआपट करत सूनबाई भाजी चिरत बसलेली पाहून……सासूबाई आपला स्वयंपाक अजून बनवायचा राहिला आहे हा विचार डोक्यात घेवून दुसऱ्या रूम मध्ये निघून गेली.
दोन्हीही घरे पैसा,सुखवस्तू सगळ्यांनी भरलेली….. बाहेरून एखादा आला तर ह्या सुखी कुटुंबांची त्याला नक्कीच भुरळ पडेल अशी….पण वरून सुंदर दिसणारं हे फुलाचं झाडं आतून किती पोकरलं आहे हे पाहिलेच तुम्ही.इथे दुर्दैवानं एक गोष्ट मान्य करावी लागतेच की स्त्रीची सर्वात मोठी शत्रू ही स्त्रीच असते.
मला जे वाईट अनुभव आले ते माझ्या सुनेच्या वाटेला येवू नये ह्या विचारापेक्षा ईर्षेने अजून वाईट वागणे ह्यात कसला अर्थ आहे.
सूनेनेही विचार करायला हवा की आईला झालेला त्रास पाहिलेला असतो मग तिला जशी मदत करत आले तशीच मदत सासूलाही करायला हवी असा विचार सुनेने करणे काय चूक आहे.
नवऱ्याच्या अनेक चुकांवर किरकोळ भांडणे होत असली तरी तडजोड करून जी स्त्री संसार करतच असते….स्वतःच्या आईचे आजारपण सहन होत नाही म्हणून तिच्या तब्येतीची चौकशी वारंवार केली जाते.मग सासूचे आजारपण असो वा वयोमानाने आलेला थकवा त्यातून जर काही चुका घडल्या अथवा कामे झाली नाहीत तर सुनेने रागाने घर अगदी डोक्यावर का घ्यावे….?
मला माझी सासू नीट वागवत न्हवती….मीच सगळ बघितलं….मी म्हणून केलं….मग आता सुनेने ही मी म्हणेल तसच रहावं असा विचार सासूने का करावा….? स्वतःच्या नांदणाऱ्या मुलीला तिच्या नवऱ्याने समजून घ्यावे ,कामात मदत करावी,सासूने काही वाईट साईट बोलू नये अशी पोटतिडकीने असणारी अपेक्षा सुनेच्या बाबतीत कुठे जाते…..? आपल्या मुलाने सुनेला केलेली मदत का डोळ्यात खुपते…..?
आपल्या आईला त्रास होवू नये,वहिनींनी सगळे बघावे,आईला आता होत नाही,तिची काळजी घ्यावी,तिला जमले तर करेल नाहीतर बसून राहिली तरी तिला हातात द्यावे अशी वाटणारी सून स्वतःच्या सासूचा असा विचार करते का…..?
मी म्हणून केलं…..मी म्हणून करतेय…..ह्यातला मी पणा कधी संपेल का…..? संसाराला एकसंध बांधून नवं विश्व निर्माण करण्याची शक्ती असणारी स्त्री जेव्हा ह्या मी मधून बाहेर पडेल तेव्हाच खऱ्या संसाराची सुरुवात होईल अस वाटत नाही का….?
काळ बदलतो,वेळ बदलते, बदलत जातात विचार,घरचे प्रश्न मिळून सोडवू यापेक्षा बाहेर केला जातो त्याचा प्रचार…..आपल्या शंका, आपली अडचण समजून घ्यायला कशाला हवेत शेजारचे चारजण….?
हक्काने आपल्या घरच्यांसोबत मोकळे करता यावे आपले मन….
असतील अडचणी,उडतील खटके,
ऐकावे लागत असतील शाब्दिक फटके,
परक्यांना आपली व्यथा सांगण्यात सगळेच होणार व्यर्थ…?
संयमाने घरात संवाद हवा तरच येईल संसाराला अर्थ.
सासू असो सून दोघींमध्येही असावा जिव्हाळा
तरच मायेच्या ओलाव्याला कधी संपवू शकणार नाही रखरखता उन्हाळा.
तू तू मी मी ची नसावी कसली स्पर्धा
कशाला कामाच्या वाटणीत असावा भाग अर्धा अर्धा
सासुत पहावे रूप आईचे का समजावी तिला तिरकस बाई
सूनेमध्ये मुलगी दिसावी का समजावे तिला परकी बाई
हे भेद समजले,तरच उमगले समजावे
सुखी संसाराचे सार
नाहीतर कायम अडकत जावू दुःखाच्या खाईत फार

हे लिखाण समस्त स्त्री वर्गास समर्पित. जर काय चुकले असेल तरी आपलाच मुलगा….आपलाच भाऊ समजून माफ कराल हीच माफक अपेक्षा.कारण शेवटी सासू असो सून ज्या सासरी त्या दोघी आहेत ते घर दोघींना माहेर असल्याचं तेव्हाच वाटेल जेव्हा दोघी आनंदाने मिळून एक असतील.

शब्दसारथी
निलेश बाबर
९२७१००८८९३