विचारांचं वाळवंट भाग १

*विचारांचं वाळवंट*
*भाग १*
    
कायम विचारांच्या जाळ्यात अडकेलेले आपण सर्वजण….मग त्याला वाळवंट का म्हणावं ना…..? किती इच्छा,कितीतरी स्वप्न,किती भावना…… साऱ्या विचारांचं कसं क्लिष्ट जाळं अगदी सुबकपणे मनात विणलेलं असतं.मग मनाने विणलेलं जाळं की जाळ्यात अडकेलेलं मन….. हा पण अगदी अवघड आणि न समजणारा प्रश्न आहे ना…..?
        अशाच जाळ्यात अडकलेल्या आपणा सर्वांपैकी मीही एक.मग जाळ्याची एक एक विण समजून घेत गेलो की लक्षात येत गुरफटणाऱ्या विचारांना समजून घेण्याच्या विचारात….मन एवढं विचार करू लागत की….एक वेळ मनात हा विचार येतो की नक्की विचार कोणता करावा….? का करावा….? करावा की नाही करावा…? नाही करावा तर मग करावं काय…? करावा तर कसा मार्ग शोधावा….? आधीच डोक्यात नको एवढे विचार असताना त्यात अजून मी करावा न करावा,काय करावा असे बोलून अजून जास्त ताण देतोय ना तुम्हाला….? पण त्याबद्दल माफी असावी.
         विचारांची सुरुवात इच्छेपासून होते तर इच्छेतूनच स्वप्न पाहिली जातात.स्वप्नांना कसले बंधन नसते पण विचारांना मात्र मर्यादा असतात.ह्या मर्यादा जेव्हा लक्षात येत नाहीत तेव्हा मग सुरू होते एक युद्ध…..! हो युद्धच….! जे स्वतःलाच स्वतः विरूध्द लढवत असतं.मग स्वतः विरूध्द लढायचं म्हणजे सोपी गोष्ट असते का….?तर नक्कीच नसते.त्यात त्याग,समर्पण,अहोरात्र मेहनत आणि एका बहिऱ्यासारखे जगावे लागते…..बहिरा यासाठी म्हणतोय कारण तुम्हाला जोपर्यंत तुमचा आवाज ऐकू येतो तोपर्यंत तुम्ही इच्छित दिशेने जात असता….पण भोवतीच्या जगाने निर्माण केलेल्या नकारात्मक घंटा कानात वाजू लागल्या तर मग सारं ध्येय विसरून आंधळे होवून जगावं लागणाऱ्यांची संख्याही कमी नाही.
       विचारांचा संबंध फक्त ध्येयाशी ठेवण्यापेक्षा इतरांच्या अनुभवाशी जोडून स्वतःच्या वाटा शोधण्यात मनाला जास्त गुंतवले तर ते नक्कीच फायद्याचं ठरतं.मग शेवटी विचार हे विचारच असतात.मग ते सकारात्मक असो वा नकारात्मक.
          आजवर फक्त हेच ऐकत आलो आहे की कायम सकारात्मक विचार करा.कधी नकारात्मक विचार करू नका…….पण अहो विचार हे शेवटी विचार असतात ना.अगदी पाण्यासारखेच की ते.जसे रंग ओतू तसेच ते रंगणार.आगीत हात घातला तर भाजेल….. हाच नकारात्मक विचार त्यात कोंबडी टाकली तर चांगली तंदूर खायला मिळेल इथपर्यंत जातोच की.
         आज या विषयावर थोडं काही लिहिण्याची कारणे ही तशीच आहेत.शेवटी हे माझे विचार आहेत.ते आपल्या विचारांशी मिळतीलच असही नाही.पण मनात आलेले विचार बोलून दाखवले तर त्यावर अजून काही विचार करण्याची ऊर्जा आपोआप मिळते असं मला तर वाटतं.बरेच दिवस मनात घोळणाऱ्या विचारांना आज मी मुक्त करतोय.हे विचार पटो अगर न पटो पण त्याबद्दल आपलेही काय विचार आहेत हे जर सांगता आले तर नक्की सांगा.कारण विचारांची देवाणघेवाणच तर जगाचा कारभार चालवत असते ना….बरोबर ना…?
           आजवर मी जे काही ऐकले असेल वाचले असेल त्यावर एक गोष्ट तर मला नक्की समजली की आयुष्याचा शेवट करून घेणे ह्याला नकारात्मक विचार हेच म्हणलं गेलंय.बरोबर ना….?मग ह्या नकारात्मक विचारात मी काही दिवसापूर्वी माझ्या मित्राला गमावून बसलो,काही ओळखीची माणसं ह्यात जग सोडून जाताना पाहिली,बातम्यांमधून समजणाऱ्या गोष्टी तर अगणित,अगदी मोठे सेलिब्रिटी देखील ह्या नकारात्मकतेचे बळी पडलेले आपण पाहिले आहेत.आपण त्यावरच्या चर्चा ऐकल्या आहेत…. कारणे ऐकली आहेत……सगळे घटनाक्रम समजून घेतले आहेत.मग मला सांगा जे ह्या वाईट प्रसंगाचे बळी पडत आले आहेत त्यांनी नसतील का ओ अशा बातम्या कधी वाचल्या,ऐकल्या.सगळ्या घटनांमधून जर सारांश घेतला तर एकच तर निघतो…. की कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे मनावर येणारे दडपण सहन न झाल्याने जीवनाला पूर्णविराम देताना आजवरच्या सगळ्या जबाबदाऱ्या विसरून क्षणात सारं संपवलं जातं.
          *भिरभिरणाऱ्या डोळ्यांनी पाहिला होता जगाचा कारभार*
*सावरताना स्वतःला घेतला होता कोणाचा तरी आधार*
*तर आपल्यावर विसावलेल्यांचा बनेलेलो असतो आधार*
*विचारांची ही मनात होती नांदी,इच्छेंचा होता मनात भरेलेला बाजार*
*अपेक्षेंच्या पैलतीरावर मांडला होता सुखाचा संसार*
*कष्टाची ही कसली कमी न्हवती जिद्द ही होती बाणेदार*
*झगडणाऱ्या मनाला मात्र टोचत होती हतबलतेची सुई फार*
*आपला माणूस सोडून गेला की दाटून येतो आप्तेष्टांचा कंठ*
*पण जाणाऱ्याच्या विचारांचे झालेले असते वाळवंट*

होय म्हणूनच आज मला बोलायचं आहे ते…….विचारांच्या वाळवंटाबद्दलच…… खचलेलं मन जेव्हा हतबलतेचं शेवटचं पाऊल उचलत…. ते नकारात्मक विचाराने न्हवे तर त्या सुकलेल्या मनाला आनंदाचा एक वळीव देखील शांत करू शकत असतो पण त्याच्या नशिबी येतं….. ते भयाणतेचं वादळ……जिद्दीनं पुन्हा उभं राहू शकतो या भावनेचा ओलावा निघून गेलेलो असतो….. कारण…..जाळणाऱ्या विचारांनी मन करपलेलं असतं…….होरपळणाऱ्या या मनाला फुंकर घालावी तरी कशी कारण डोळ्यातील खारं पाणी त्या जखमांची अजूनच लाही लाही करत असतं.
       ग्रासलेल्या या मनाला ओळखावं तरी कसं…? सावरून त्याला पुढे जाण्याचं बळ द्यावं तरी कसं..? कशी समजणार आपल्याला खचलेल्या मनाची व्यथा…..? कोमेजणाऱ्या या झाडाला फुटणार कशी पालवी….? थांबणार कसा हा वाळवंटातील जीवघेणा प्रवास…..?मिळणार कसं या प्रवासाला वाळवंटी जहाज….? जीवघेणं हे सत्र थांबायला तर हवं…. त्यासाठी स्वतःच्या मनानं स्वतःला काय सांगायला हवं….?उत्तराचा शोध घेता प्रश्नच आहेत फार….पण छोट्याशा या जीवनाला करायचं आहे आनंदाने पार….विचार असावेत फुलांच्या सुगंधासम दरवळणारे……   स्वप्न असावीत मोठी…. व्हाव्यात पूर्ण सर्वांच्या इच्छा…..विचारांमध्ये नसावी खोटी……आनंदी जगावं सर्वांनी ह्याच माझ्या सदिच्छा.
       या साऱ्या प्रश्नांवर आता विचार सर्वांचा व्हावा……आपला महत्वाचा अभिप्राय माझ्या कानी यावा…..मत नसावं माझं एकाकी….एकमताने बोलू….हरलेल्या मनाला उभारणारं द्वार नवं खोलू….. वाळवंटातील सुखकर प्रवासाचं जहाज आपण गाठू…..सर्वांच्या विचारांवर विचार करून पुन्हा लवकर भेटू….
लवकरच आपल्या सर्वांच्या मतावर एकमत होवून भेटू दुसऱ्या भागात

माझे इतर लेख तसेच या लेखातील पुढील भाग आपण प्रतिलिपी ॲप वर देखील वाचू शकता.धन्यवाद

शब्दसारथी
निलेश बाबर
९२७१००८८९३