बदलती शिक्षण पद्धती आणि शिक्षणाचे होत असलेले बाजारीकरण

*गावात भरणारी यात्रा मनातही एक वेगळीच गर्दी निर्माण करते*

*ज्ञानसागरात पोहताना कशाला हवी भाषेची सक्ती*
*वेचता यावे इच्छित सारे हीच रुजवावी मनात युक्ती*
*इवल्याश्या त्या जीवांच्या बाह्यरुपाला देवून किंमत*
*बिघडणाऱ्या त्यांच्या आंतर्मनाची का पहावी खुशाल गंमत*
*स्पर्धेच्या या युगात पाहता स्पर्धा असावी कोणाची कोणाशी…?*
*पालकांच्या अफाट अपेक्षा पण चिमुकल्यांची नाळ तुटते मातीशी*
*काय आवडते यापेक्षा हेच आवडावे असे बाळकडू मग पाजले जाते*
*कित्येक चिमुकल्यांचे मग जीवन… मात्र वाया जाते*
*सरकारी नोकरी म्हणजे आयुष्याची भाकरी ही म्हण पार रुजलेली*
*पण सरकारी शाळांत मुलांचे भविष्य घडेल ही वाट मात्र मुजलेली*
*सुविधा साऱ्या मिळाव्या सरकारी*
*पण शिक्षणासाठी खाजगी शाळाच बरी*
*बदलणाऱ्या विचारांच्या या पालकांस म्हणावे सुज्ञ*
*की असावेत हे सारे सत्यापासून अनभिज्ञ…..?*

खर तर आता सगळ्या गावांच्या यात्रा जवळपास संपल्या….सरतेशेवटी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भरते ती माझ्या गावची…..खिंडवाडीची यात्रा.साताऱ्याच्या बाहेर या यात्रांचं स्वरूप कसं असतं हे एवढं ठावूक नसले तरी साताऱ्याच्या पंचक्रोशीत असणारी ही यात्रेची धमाल फार जवळून पाहत आलोय.बैलगाडा शर्यती आता पुन्हा नव्याने सुरू झाल्याने जवळपास सगळीकडे एक वेगळंच आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं दिसत आहे.
कोरोनामुळे गेल्या २ वर्षात जी आपल्याच घरच्या लोकांसमोर जायची भीती निर्माण होईल असं वातावरण निर्माण झालं होत ते पूर्णपणे ओसरलेलं यंदा दिसलं.मग बावधनचे प्रसिद्ध बगाड असलेली यात्रा असो, पुसेगावची रथ यात्रा असो नाहीतर कित्येक गावांच्या गाव देवतेवरून भरणारी यात्रा… त्यातील छबिना, सासणकाठ्या,पालखी सोहळा,गुलाल, भंडाऱ्याची मुक्त उधळण असो वा लोटांगण,दंडस्थान असो…. सगळ्याच गोष्टी कशा यंदा आनंदात पार पडताना दिसल्या.
असच खेळीमेळीचे वातावरण… मित्र परिवार आणि पाहुण्यांच्या गाठीभेटी यातून वाढणारा नात्यांतील गोडवा हे सारे विलक्षणच.या साऱ्यात अजून एक भर पडते ती म्हणजे गावच्याच मंडळांनी समाजात काहीतरी संदेश जावा यासाठी सादर केलेलं काही देखावे( सोंगे)…..सातारच्या पंचक्रोशीत बरीच गावे अशी आहेत की जे असे नवनवीन प्रयोग सादर करून यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असतात.मग त्यासाठी लागणारा खर्च,वेळ हे सार काही स्वतः सांभाळून हे सारं दिव्य केलं जातं….त्याला कारण एकच ते म्हणजे गावच्या यात्रेला शोभा यावी.
या साऱ्यात मला आज सांगायचं आहे ते माझ्या गावाबद्दल…..सातारा शहरातून फक्त ४ किमी अंतरावर असणार माझं गाव…..खिंडवाडी….गाव तसं छोटसं पण सैन्यदलात सेवा बजावणाऱ्या जवांनाची संख्या फार. रिटायरमेंट नंतरचे आनंदी जीवन जगणारे… मग गावच्या विकासकामात ही हातभार लावत असतातच.
बऱ्याच गावांना यात्रेत ज्या काही जुन्या परंपरा,रीतिरिवाज आहेत त्यानुसार सगळा सोहळा पार पडताना आपण पाहतो.अशीच एक पद्धत मी साधारण १० वर्षाचा असेन तेव्हापासून माझ्याही गावात यात्रेत मी पहात आलोय ती म्हणजे पालखी समोर निघणारी सोंगे(देखावे).
मी जसे ऐकले तसे गावात ही परंपरा फार आधीपासून आहे.पूर्वी अगदी बैलगाडीतून निघणारी ही सोंगे पहायला गावात फार गर्दी जमायची. काळ बदलत गेला तसे या प्रथेत ही बरेच बदल होत गेले.गावात असणारी पाचही मंडळे मग दरवर्षी काही ना काही नवीन दाखवण्याचा प्रयत्न करू लागली आणि मग सुरू झाले ते हलते जिवंत देखावे दाखवण्याचे पर्व.
शिवकाळातील काही प्रसंग असो….. रामायण,महाभारतातील काही घटना असो…..हे करत करत हल्ली समाजात घडणाऱ्या काही हृदयस्पर्शी घटना असोत या दाखवण्याचा प्रयत्न गावातील सगळी मंडळे करत असतात.
मी श्री बाल गणेशोत्सव मंडळाचा सदस्य…..आमच्या मंडळाने आजवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील काही प्रसंगावर देखावे सादर केले आहेतच…..त्यासोबत भारतीय सैन्य दलावर आधारित प्रसंग…शेतकरी आत्महत्या,हुंडाबळी,महाराष्ट्राची लोकधारा,असे कित्येक विषय घेवून आजवर हे जिवंत देखावे दाखवले.या सोंगात त्या कथेचा….विषयाचा भाग म्हणून मलाही आजवर कलाकार म्हणून काम करता आले ही गोष्ट माझ्या मनाला खूप आनंद देवून जाते.
अगदी ट्रॉली ठरवण्यापासून ते लाकडे, फळ्या, लाइट्स,डॉल्बी ठरवणे असो वा कोणत्या विषयावर सोंग करायचे यावर चर्चा असो…..यात्रेच्या एक महिना आधीपासून मंडळाच्या सदस्यांमध्ये होणारी ही चर्चा…..मत मतांतरे….पुढे जावून मग एक विचाराने सगळे ठरवणे…..कोणी कोणती कामे करायची याचा बनवलेला आराखडा….मग जे काम असेल ते वेळेत पार पाडण्यासाठी सर्वांची होणारी धडपड…..हे सारे काही…..जरी यात्रेच्या एक रात्रीपुरते असले तरी त्यामागे मंडळांनी घेतलेली मेहनत ही कित्येक दिवसापासूनची असते.
त्यात गेली दोन वर्ष कोरोनामुळे पडलेला खंड….मग या प्रदीर्घ काळाच्या प्रतीक्षेनंतर गावातील पाचही मंडळे अगदी जोमाने उभी राहिली होती.कारण फक्त एकच….यात्रेत असे ज्वलंत,जिवंत देखावे दाखवण्याची खंडित परंपरा पुन्हा नव्याने सुरू करायची होती.
रावणाचे गर्वहरण,स्त्री भ्रूण हत्या,शाहिस्तेखानाची बोटे छाटण्याचा प्रसंग,मुलींची छेडछाड करणारी मुले आणि त्यातून घडणाऱ्या वाईट घटना असे देखावे घेवून यावर्षी सगळी मंडळे यंदा उभी राहिली.
अगदी सुरेख डेकोरेशन,पात्रांना योग्य तो मेकअप आणि कपडे,चांगल्या आवाजात कथानकाचे रेकॉर्डिंग,आवाजाची मर्यादा सांभाळून आपल्या देखाव्याला योग्य तेवढा आवाज असावा याची काळजी घेत असणाऱ्या डॉल्बी अशा सगळ्या लवाजमासोबत दरवर्षी जशी यात्रा भरते तसेच यंदाही झाले.
आवडणारी सर्वात उत्तम गोष्ट हीच असते की यात्रेसाठी फक्त नातेवाईक ,मित्रपरिवार न्हवे तर ज्यांना असे देखावे पहायला आवडते अशी असंख्य मंडळी गोळा होत असतात.
शासनाचे नियम,वेळेची मर्यादा या गोष्टी जरी महत्वाच्या असल्या वर्षातून एकदा येणारा हा दिवस सर्वांसाठी वेगळाच असतो.मग सगळ्याच गोष्टी मोजून मापून आणि कायद्याच्या चौकटीत बसवून करण्याचा प्रयत्न करत राहिलात तर मग जगणं नक्कीच अवघड होईल. हे देखील सर्वांनी मान्य करायला हवं.कुठेतरी थोडा छेद देवून मर्यादा सांभाळत तुम्ही तुमची सुरू असलेली परंपरा जपण्याचा प्रयत्न करत राहिला तर नक्कीच मग प्रशासन देखील तुमची साथ देते.
यावर्षी देखील बराच वेळ चाललेल्या या सोंगांच्या गाड्यांना पोलीस प्रशासनाने केलेल्या मदतीबद्दल,सहकार्याबद्दल यात्रा कमिटी,संपूर्ण खिंडवाडी ग्रामस्थ आणि मंडळांचे कार्यकर्ते… आम्ही सारे आपले मनापासून आभार मानतो.
यावर्षी आमच्या *श्री बाल गणेशोत्सव मंडळाने* सादर केलेला जिवंत देखावा म्हणजे *सध्या बदलत चाललेली शिक्षण पद्धती….शिक्षणाचे बाजारीकरण आणि शासकीय मराठी शाळांची होत असलेली दयनीय अवस्था…यासाठी जबाबदार घटक आणि बदलत चाललेली माणसांची मानसिकता* हा विषय घेवून आम्ही यावर्षी सोंग काढले.अपेक्षेपेक्षाही जास्त चांगला प्रतिसाद मिळाला यामुळे जे समाधान सर्वांना मिळाले ते अवर्णनीयच.आम्ही मांडलेला विषय कसा होता हे व्हिडिओ मधून तुम्हाला पहायला मिळेलच आणि लेख वाचणाऱ्या प्रत्येकाला माझी विनंती राहीलच की २४ मिनिटांची ही आम्ही सादर केलेली कला तुम्ही नक्की पहावी.
ज्या गोष्टी यात दाखवल्या त्या इथे लिहीत नाही.पण या संदर्भात जे काही माझी मते आहेत ती मी इथे मांडत आहे.कदाचित ही माझी मते चुकीचीही असू शकतील.पण चर्चेत हा विषय येणं गरजेचं वाटतं…..म्हणून हे सारं मांडण्याचा प्रयत्न मी करत आहे.
इंग्लिश स्कूल……इंग्रजी शाळा….याला विरोध असावा अस माझं मत नाहीच.त्यामुळे चुकून जरी कोणते चुकीचे शब्द माझ्या लिखाणातून आले असतील तर त्यात कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही हे कृपया जाणून घ्यावं.
शिक्षणाला सुरुवात झाली…
पुढे जावून स्त्री शिक्षणाला सुरुवात झाली……असुविधा आणि कमी वयात आलेल्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबलेल्यांसाठी गाव पातळीवर रात्र शिक्षणाचे वर्ग भरवले गेले…..हळूहळू शिक्षण ही पण एक जीवनावश्यक गोष्ट आहे हे प्रत्येकाच्या मनात रुजले आणि रुजवले गेले……या सगळ्या प्रवासात अनेक गोष्टींमध्ये सुधारणा होत गेल्या….शाळांची….शिक्षण संस्थांची उभारणी झाली…..तो काळ असा होता जिथे जमिनी असो वा पैसा सहज दान केले जात होते…..त्यातून शिक्षणाचा प्रसार अगदी भराट्याने वाढला….आणि हे योग्यही होतं…. कारण जोपर्यंत वंचित गावे, वाड्या,वस्त्यांपर्यंत शिक्षणाची सुविधा पोहोचत नाही तोपर्यंत शिक्षणाचा प्रसार होणं शक्य ही न्हवते…..या कठीण काळात अहोरात्र मेहनत घेवून शिक्षणप्रसार करणाऱ्या सर्व ज्ञानऋषींचे मनापासून आभार.
मंदिरात…..पारावर…..एखाद्याच्या घरात भरणाऱ्या शाळांना पुढे जावून एक स्वतंत्र रूप मिळालं…..मोठमोठी विद्यापीठे स्थापन झाली…..सोयी सुविधांची वाटणारी चणचण हळूहळू कमी होत गेली…..उच्चशिक्षित ज्ञानऋषी….आणि शासनाने एकत्रित मेहनत घेवुन गावोगावी….खेडोपाडी शाळा उभ्या केल्या……आणि मग ज्ञानाचा महासागर सर्वांसाठी खुला झाला.
मग एवढं सगळ सुरू असताना कित्येक अधिकारी,खेळाडू,नोकरदार घडत होते……मग यानंतरच्या काळात सुरुवात झाली ती शिक्षणात असणाऱ्या त्रुटी दाखवत….. खाजगी शाळांची निर्मिती…..”मुलांना इंग्लिश यायला हवं…..त्याने वागावं ,बोलावं कसं याकडे आम्ही लक्ष देवू आणि तुमच्या मुलाचा सर्वांगीण विकास करू….अशी एक वेगळीच चळवळ सुरू झाली…..मग ही स्पर्धा फक्त विद्यार्थांच्या पुरती मर्यादित असती तर एकवेळ समजू शकलो असतो…..पण ही स्पर्धा सुरू झाली ती अशा खाजगी संस्था…..शाळा….उभं करण्याची….. आणि ती उभं करणाऱ्या धन दांडग्यांची….यात कोणाचा वाईट हेतू आहे असं मला म्हणायचं नाहीच.मुलांना काहीतरी चांगले देण्याच्या हेतूने ही स्पर्धा सुरू झाली हेही मी मान्य करतो….त्यातून असंख्य विद्यार्थी घडले….आणि यशाची उत्तम शिखरे गाठली हे मी मान्य करतो….अशा मेहनतीने उभ्या केलेल्या या शाळांनी चांगले शिक्षक निवडले……शिक्षकांनी चांगले विद्यार्थी घडवले….विद्यार्थ्यांनी चांगला देश घडवला….घडवत आहेत…यात काहीच शंका नाही.मग एवढं सगळ योग्य असताना माझा या खाजगी शाळांना विरोध का असावा…..? सर्वच पातळीवर स्वतःचा वेळ,पैसा,आयुष्य खर्च करून उभ्या केलेल्या या शाळांना मी विरोध का करावा….? शासनाच्या कोणत्याही मदतीशिवाय….स्वतःच्या विचारांनी….स्वतः पुढाकार घेवून….समोर असणाऱ्या अनेक धोक्याचा विचार करून त्यावर मार्ग काढत नवीन विश्व निर्माण करणाऱ्या या सत्कर्मी व्यक्तींचा मी विरोध का करावा….?
तर मी म्हणेन नक्कीच नाही….. यात मला काही गैर वाटावं आणि मी त्यात विरोध करावा असं अजिबात नाही….कदाचित मी विचार मांडताना चुकत असेन..पण तुम्ही समजून घ्याल आणि माझे चुकत असेल तिथे सांगाल हीच अपेक्षा ठेवून मी माझे मत मांडत आहे.
मला प्रश्न हा पडतो की……शासनाने शाळा सुरू केल्या…..शिक्षक भरती केले…कामाचा योग्य तो मोबदला म्हणून शिक्षकांना चांगले पगार दिले……दुर्गम भागात सेवेस पाठवून त्या शिक्षकांना लोकांस शिक्षणाचे महत्त्व पटावे यासाठी मेहनत घ्यायला लावली….आणि ती या शिक्षकांनी पार पाडली…..शेवटी व्यक्ती तितक्या प्रवृत्ती…..काही शिक्षक योग्य न्हवते….हे त्या त्या काळात वेगवेगळ्या प्रकारे समोर आलेच…..पण त्या मानाने तुलना केली तर नवी पिढी उत्तम घडवणाऱ्यांचे प्रमाण नक्कीच वाईट प्रवृत्तींपेक्षा जास्तीचे आहे हे मान्यच करावे लागेल.
मग एवढे सगळे उत्तम सुरू असताना गरज पडली ती इंग्लिश भाषा ज्ञानाची……हे शिक्षण ५वी पासून मिळत होते…..म्हणून पाया कच्चा राहीला आता मुलांचे भविष्य काय घडणार….यापेक्षा सुरुवातीपासून इंग्लिश मध्ये शिकवले तर ते उत्तम घडतील असा समज रुजू झाला…..त्यात काही गैर आहे असेही मी म्हणत नाही…..शेवटी काळानुसार बदल हा गरजेचा आहेच.
मग आता सुरू होतो प्रवास तो काहीतरी वेगळी भावना मनात ठेवून सुरू केलेल्या शिक्षणाच्या बाजारीकरणाला….हो बाजारीकरणच….कोणी केले का केले हा इथे मुद्दा नाहीच….मुद्दा आहे तो म्हणजे…..कोणतीही शाळा उभी करायची असेल तर शासनाची परवानगी असावी लागते….अशी रीतसर परवानगी घेवून असंख्य खाजगी शाळा उभ्या होत गेल्या….मग जर इंग्लिश ही काळाची गरज होती म्हणून तुम्ही या शाळांना परवानगी देण्याऐवजी……स्वतः शासनाच्या शाळेत हे प्रयोग का नाहीत सुरू केले…..? जेव्हा शाळा न्हवत्या तेव्हा अगदी मंदिरात शाळा भरवल्या गेल्या मग…..शाळांना स्वतःचं असं वेगळं स्वरूप आल्यावर याच शाळांत का नाही शैक्षणिक बदल केले……? जर मुलांना चांगले शिक्षण मिळावे हाच हेतू होता….असेच प्रोजेक्ट्स वाचून धडाधड खाजगी शाळांना परवानगी देत गेला…..मग हाच प्रस्ताव शिक्षण मंडळात मांडून का नाही शासकीय शाळांत बदल केले गेले…..?शासनाकडे भरपूर पैसा होता…. आणि तो नक्कीच आजही भरपूर प्रमाणात खर्च केला जातो यात काही शंका नाहीच… घरात तांदूळ आहे म्हणून नुसता भातच खाऊ एवढी अक्कल शून्य माणसं समाजात नसून त्यापासून इडली,डोसे बनवून ही खाऊ शकतो ही अक्कल अगदी अडाणी माणसात देखील असताना…..शिकलेल्या आणि शिकून शिक्षणाच्या उच्च पदावर बसलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना एवढी अक्कल नसावी का…..? काहीतरी वेगळे निर्माण करणार म्हणून या खाजगी शाळांना परवानगी देत आहोत…..मग आपल्याकडे तर सर्व आहे…सरकारी पैसा आहे….अधिकार आहेत…शिक्षकांची मजबूत फळी आहे…..शाळेच्या इमारती उभ्या आहेत….मग एवढं सगळ तयार असताना….गरज होती ती फक्त मानसिकतेची……का नाहीत मग तेव्हाच बदल करू वाटले या शिक्षण पध्दतीत…..? जर या सरकारी माणसांनाच सरकारी शिक्षण पद्धत चुकीची वाटत होती तर मग का बदल करू वाटले नाहीत…..?आणि मग मनाला कुठेतरी जी गोष्ट टोचत राहते ती हीच…..”माझे सर्व चाललय ना ठीक….कामाचा मोबदला वेळेत आणि मुबलक मिळतोय ना….मग मला काय गरज पडलीय काय बदल करायची….” हीच संकुचित वृत्ती कारणीभूत आहे या शिक्षणाच्या बाजारीकरणाला……
मला कोणाला दोष द्यायचा नाही….पण मला एक सांगा…. समाजात पैशांनी सधन असणाऱ्या कित्येक व्यक्तीच्या खाजगी शाळा आहेत…..कारण काय तर समाजसेवा…..????? मग कसली समाजसेवा ते ही सांगा….” खाजगी आहे मग आम्हाला शासनाकडून काही मिळत नाही….त्यात शिक्षकांचे पगार…एवढ्या सगळ्या बाकी सुविधा आम्ही देतो म्हणून एवढी फी आम्ही आकारतो……” अस अगदी निरागस चित्र एका बाजूला उभ केलं जातं…..आणि ” अगदी बरोबर आहे या सरकारी शाळेत कुठे काय आहे….आता एवढं सगळ जर खाजगी शाळेत मिळतेय मग काय होतेय पैसे ज्यादा गेले तर…..शेवटी कमावतो कुणासाठी…..”अस बोलून त्या चित्रात रंग भरणारे पालक….!!!! अशा चित्र रेखाटणाऱ्या श्रीमंत लोकांनी आणि त्यांनी रेखाटलेल्या चित्रात रंग भरणारे पालक यांच्यामुळे समाजाचे चित्रच बदलून गेले आहे…. बदलून जात आहे…. असं वाटतं नाही का….?
मला अजून एक प्रश्न पडतो तो म्हणजे….. जर या लोकांना…..खरच मुलांचे भविष्य घडवायचे होते तर आहे त्याच जवळच्या सरकारी शाळांत पैसा देवून का नाहीत बदल घडवून आणायचा प्रयत्न केला….? या श्रीमंतांच्या प्रयत्नात शासनाने एक पाऊल उचलले असते तर काय गरज पडली असती का खाजगी शाळांची…..? सगळे काही याच खाजगी शाळांत मिळायला काय अडचण आली असती….? हव्या त्या सोयी,हवी तशी शिक्षणपद्धती…..हे सगळे शिक्षण विश्व बनवताना काय अवघड झाले असते का…..? तर नक्कीच नसते झाले…..काहीच अवघड झालं नसतं….सगळ्या मुलांना आपल्याच भागात….गावात….वाडीत…. वस्तीत….हवं तसं शिक्षण घेणं सहज शक्य झालं असतं…..
पण स्वार्थाने भरलेल्या मनाचा गळा जरी सोन्याने भरलेला असला तरी खिशात सुध्दा हिऱ्यांची रास असावी अशी मानसिकता झालेली असते.मग वाढती भूक कोणाचं पोषण नाही तर समाजाचं शोषणच करू शकते.
लिहिण्यासारखं अजून बरच काही आहे पण झटपट बनणाऱ्या मॅगीच्या जमान्यात पुरणपोळीचा स्वाद कुठेतरी हरवत चालला आहे.मग वाढत जाणाऱ्या हनुमानाच्या शेपटीसारखे हा लेख वाढवून बाजारीकरणाची लंका तर मी जाळू शकणार नाही.पण कुठेतरी थोडी ठिणगी टाकण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न.
या सगळ्यांतून मला शेवटी एकच सांगायचं आहे की….. बंद आणि ओसाड पडत चाललेल्या सरकारी शाळांना पुन्हा उभारी देण्यासाठी शिक्षकांनी सुध्दा नव्याने सुरुवात करणे गरजेचं आहे….. तर उमेदीने उभ्या राहिलेल्या या शिक्षकांना साथ द्यायला पालकांनी ही सुरुवात करणे गरजेचं आहे.
अफाट पैसा खर्च करूनच उत्तम शिक्षण मिळतं अस नाही. तर ते मिळत असतं शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संतुलित नात्याने….मग यावर पालकांनी विचार करावा की नक्की पैसा खर्च करून तुम्ही तुमच्या मुलाला उभं करत आहात की श्रीमंताच्या नवीन प्रॉपर्टीला….?

टीप:
१)प्रतिलिपिवर हा लेख वाचणाऱ्या माझ्या मित्रांना इथे व्हिडीओ पाहता येणार नाही तर तो पाहण्यासाठी शब्दसारथी या माझ्या यू ट्यूब चॅनल वर ती पहावी लागेल.
२) यात्रेच्या सोंगात असलेले हे नाटक आवाजाची अस्पष्टता आणि बाजूच्या इतर आवाजामुळे व्हिडिओ मध्ये असणारे संवाद नीट ऐकू येत नसल्याने पुन्हा त्यात फेरबदल करून नंतर त्यात मूळ रेकॉर्ड आवाज समाविष्ट केला आहे.त्यामुळे बऱ्याच ठिकाणी हावभाव आधी आणि संवाद नंतर असे जाणवेल.पण आपण तेवढे समजून घ्याल हीच अपेक्षा ठेवतो.

शब्दसारथी
निलेश बाबर
९२७१००८८९३