*पर्यायी मार्गांत असतील सुखाच्या सुंदर युक्ती*
*तरी त्यामध्ये कधी नसेल समाधानाची शक्ती*
*कितीही ठरवल मनानं की साधं सरळ राहू,*
*आहे त्या गोष्टींमध्ये सारं सुख पाहू.*
*इथे शोधत आहे प्रत्येकजण कसा लावता येईल यावर लगाम*
*पण मिळणाऱ्या सुख सोयींचे खरच होत आहोत आपण सारे गुलाम*
मित्रांसोबत सहज बर्फाचा गोळा खायला परवा गेलो.मला दहीखीस हवा असं सांगून आरामात मग आमचं गप्पांचं सत्र सुरू झालं.तिथे घोंगावणाऱ्या मधमाशांकडे पाहताना सहज मनात एक विचार आला.जीवनाचा आनंद घ्यायला आता कित्येक गोष्टी सहज बाजारात मिळत आहेत.त्यांचा मनसोक्त आनंद आपण घेतोही आणि उगाच पुन्हा मागे म्हणत राहतो की आधीचे जीवन मस्त होते.आता सगळे बदलले.मीही त्यापैकी एक बर का.
पण मिळणाऱ्या सोयींचा मिळेल तेवढा आनंद घेत असताना,काही गोष्टी मिळवण्यासाठी लहानपणी जी कसरत असायची ती आठवली की चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद उमटत असतो.
मग ते आठ आण्याचे (५०पैशाला आम्ही तर हेच म्हणायचो) गारीगार घ्यायला कुठे तरी देशी दारूची बाटली शोधून त्यावर फुकट ते गारीगार खाण्यात जो आनंद होता तो आता ३० रुपये देवून कॉरनॅटो खाताना मिळत नाही.
पण अशीच वर्ष निघून गेली आणि बऱ्याच गोष्टीही बदलून गेल्या.मग हा बदल फक्त माझ्यात झाला….?,दुसऱ्या कोणा एकात झाला…..? या बदलाचे शिकार आपण सगळे झालो…..? की निसर्ग ही आता बदलत चालला आहे….?
याच सहज सरळ एकच उत्तर आहे…..ते म्हणजे सारचं बदलत चाललं आहे.मला बाकी बदलत्या घटकांवर आज काही बोलायचं नाही.पण या मधमाशांना बर्फाच्या गोळ्यासाठी वापरत असलेल्या रंगातून रस शोषताना फार निरखून पाहिलं.निसर्गाने यांना नक्की कोणती शक्ती दिली होती…..?सभोवती असणाऱ्या सगळ्या प्रकारच्या फुलांमधून तो रस टिपणे हीच ना……?मग यातून जो तयार होतो तो खरा मध ना…..? पण यांचं असं बदलत वागणं पाहून मनात विचार आला की मग या माशा कुठेतरी एक पोळं बनवत असतील.त्या बनणाऱ्या मधाच्या पोळ्यातून तरी कसला मध तयार होणार……?मग याला जबाबदार तरी म्हणांव कोणाला…..?माणसाने खायचे रंग बनवले ते स्वतःच्या कलेने ,स्वतःच्या सोयीने,स्वतःच्या आवडीने……मग याच चवीची भुरळ या मधमाश्यांना का पडावी…..? सोयीचं आणि सहज मिळणार हे शस्त्र या माशांनी का वापरावं….? कोणी म्हणेल पाणी पिण्याच्या हेतूने त्या तिथे आल्या असाव्या…..पण मी स्वतः हे पाहत होतो…. तेव्हा मला स्पष्ट दिसून आलं बर्फाचे पाणी बनून त्या गाड्यावर सांडत होते तिथं एकही मधमाशी न्हवती.पण खायच्या रंगांच्या बाटलीवर…..फेकून दिलेल्या ग्लासवर मात्र त्या घोंगावत होत्या.
याची उत्तम माहिती असणाऱ्या जाणकार व्यक्तीने या बदलाची माहिती मला दिली तर छानच.पण या गोष्टीचा संदर्भ मी आज जोडणार आहे तो मानवी जीवनाशी.
सहज आणि सोप्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करण्यात आपण आपली खरी शक्ती… खरी ओळख नक्की हरवत चाललो आहोत का…..?साधारण कोणताही व्यक्ती आरामात कमीतकमी १५ ते २० किलो वजन घेवून अर्धा तास तरी चालत प्रवास करू शकतो…..पण सुविधांच्या मागे धावताना याचा एवढा विसर पडतो की मग मॉल मध्ये पावशेर चहापत्ती घेवून चाक असणाऱ्या बादलीत घेवून ती अर्धा तास सगळीकडे फिरवतो.
पाय खूप दुखतात म्हणून पायऱ्या नको तर लिफ्टने मजले आपण पार करतो…..पण त्या लिफ्ट मधून खाली येवून रोड वर सकाळ संध्याकाळ चालायला जातो….कारण तब्येत चांगली रहावी….दुचाकी गाडीवरून सुसाट वेगाने विना हेल्मेट दिवसा प्रवास करतो आणि शरीराची काळजी म्हणून पहाटे सायकल वर हेल्मेट घालून फिरतो….गाडीपेक्षा जास्त गती यांच्या सायकलला आहे की गाडीपेक्षा जास्त धोके सायकल वर आहेत काय माहित….? हेल्मेट घालने उत्तमच….पण त्याच्या वापराची ही बदलती समीकरणं प्रश्न उभा करतात की दिखाव्याच्या मागे आपण किती धावत आहोत…..
मी काय करतो…..?मला काय करायचं आहे….?मला कशात आनंद मिळतो….?यापेक्षा मी असं वागलो…मी असं केलं तरच मी आनंदी राहीन…..या दुसऱ्यांनी बनवलेल्या आखाड्यात प्रवेश करून त्या आखाड्याच्या मास्तरने बनवलेल्या नियमांत नाचून सुख शोधायचं…… की मग स्वतःच्या मनाभोवती फिरणाऱ्या रींगणाला आपल्या आनंदाचं मैदान बनवायचं…..हा ज्याचा त्याचा विचार…..
शेवटी यातून सांगण्याचा एकच भाग की आपल्यात असणारी ऊर्जा,विचार करण्याची शक्ती,काहीतरी नवीन निर्माण करण्याची ताकत हे सारं….. सभोवती असणाऱ्या अडचणीमुळे नाही संपून जात…… तर जेव्हा आपण आपली कुवत न ओळखुन आरामाच्या गोष्टींचा विचार करू तेव्हा खर आपल्या ऱ्हासाला सुरुवात होते…..मधुमक्षिका हे एक नाममात्र उदाहरण…..उदासीन,अस्वस्थ जगण्याला आहे अधीरता हेच कारण…..सुखाची वाटणारी अधीरताच मग पर्यायी मार्ग पाहते…..पण एक गोष्ट कायम लक्षात असावी……जी आपण अगदी शाळेपासून शिकत आलोय….ती म्हणजे आपल्या डोक्याला सर्वात जास्त त्रास देणारा प्रश्न तोच असतो ज्यात उत्तराला पर्याय असतात……मग जिथे प्रश्नाला उत्तराचे अनेक पर्याय निर्माण होतात……हेच पर्याय मग मनात अनेक प्रश्न निर्माण करतात.
आयुष्याच्या रिकाम्या जागा भरायला कोणत्या पर्यायाची गरज नसतेच मुळी.त्या भरल्या जातात आपोआप जर विचार करणाऱ्या मनात नसेल कोणती पोकळी.
*शब्दसारथी*
*निलेश बाबर*
*९२७१००८८९३*