चांगुलपण दुर्लभ,दुर्मिळ परी ऐसे जगणे करी जीवन सुफळ

*चांगुलपण दुर्लभ,दुर्मिळ पण*
*तैसे जगणे करी जीवन सुफळ*

चांगलेपणाने जगणे असो, वागणे असो वा चांगले दिसणे असो या सगळ्याचा मोह आजवर कोणाला आवरला आहे…. ? *कस्तुरीचा सुगंध….जो वेड लावे सर्वांना….अवघड होते जीवन जगणे तेच जपणाऱ्या हरणांना.*
खर तर चांगलं राहणं,चांगल्या गोष्टी सोबत राहणं…. हे एक सुंदर स्वप्न असलं तरी हे सारं सत्यात उतरवताना होणारी जीवाची घालमेल… ही म्हणावी तेवढी सोपी नसते. चांगुलपणाची एक वाईट गोष्ट काय असेल माहीत आहे….? तर ती म्हणजे त्या व्यक्तीच्या अस्तित्वात असताना… त्या व्यक्तीचा कधीच स्वीकार होत नाही….. उभ्या आयुष्यात कायम उपेक्षित राहिलेले संत असोत वा थोर रणवीर, योध्ये, महापुरुष असोत…..यांना कायम विरोधालाच सामोरं जावं लागलं.पण पचायला, रूचायला अवघड असणारी त्यांची वाणी असो वा त्यांची करणी… याचा जगजाहीर झालेला स्वीकार त्यांच्या पश्चात दिसून येतो आणि हे सत्य कोणी नाकारू शकत नाही अस मला तर वाटतं.
खरच अशा विचार करणाऱ्या व्यक्ती फारच कमी….म्हणूनच तर म्हणालो की चांगलेपणा हा फार दुर्लभ आहे.ज्ञानेश्वरांची अमृतवाणी जिवंतपणी ना जाणली कुणी,पण अल्पवयात त्यांनी निर्मिलेली ज्ञानेश्वरी आजही पुजली जाते मनोमनी.यावरून एक गोष्ट मात्र चांगली लक्षात येते की व्यक्तीचं शारीरिक आयुष्य किती मोठं आहे यापेक्षा त्याला लाभलेलं विचारांचं वेगळेपण किती भक्कम आहे यावर त्याच खर आयुष्य ठरतं.
तुम्हा आम्हासारख्यांच नक्की अस्तित्व तरी काय….? अजून दोन पिढ्या आपल्याला लक्षात ठेवतील…. कारण वडिलांचे पूर्ण नाव लिहिताना आजोबाच नाव लिहावं लागत….यापलीकडे आपले आयुष्य काय….? मी असा विचार करणं किंवा यावर मत मांडणं कितपत योग्य आहे नाही माहीत.पण ४ दिवसापूर्वी एक प्रसंग डोळ्यासमोर घडला आणि मग मनात विचारांचं सत्र सुरू झालं.
रोज सकाळी मित्रांसोबत डोंगरावर चालायला जाणे हा तसा हल्ली नित्याचा क्रम बनला आहे.मग कधी मोर,लांडोर,कधी ससे तर चुकून कधीतरी उदमांजराचे (रानमांजर)दर्शन हे आता जगण्याचा एक भाग झाले आहेत.२६ मेला रात्री घरी येताना रस्त्याच्या बाजूला एक प्राणी मरून पडला आहे हे दिसले होते.ते मांजर असावे हे समजले होते पण रात्र असल्याने गाडी काही थांबवली नाही.पण दुसऱ्या दिवशी मित्रांसोबत डोंगरात न जाता बायको सोबत रस्त्याने चालत त्या ठिकाणी आलो आणि त्या मेलेल्या प्राण्याच्या जवळ गेलो.तेव्हा समजले की हे एक उदमांजर आहे.दुर्मिळ असणारा हा प्राणी राष्ट्रीय महामार्गाला लागून असणाऱ्या सर्व्हिस रोडच्या बाजूला असे मरून पडलेला पाहणे हे थोडे धक्कादायक वाटले.म्हणून ठरवले की याचे फोटो घेवून वनविभागाला माहिती द्यावी.पण योगायोगच म्हणावा की काय श्री नितीन तुपे साहेब की जे त्या क्षणापर्यंत माझ्या काहीही परिचयाचे न्हवते.ते देखील चालायला सर्व्हिस रोडवर आले होते.त्यांनी आवाज दिला…”माझा नंबर घ्या आणि व्हॉट्सॲप वर मला फोटो पाठवा.”
मी क्षणभर विचार केला.. काय लोक आहेत असे फोटो घेवून काय करणार आहेत….मी मनात आलेला प्रश्न त्यांना बोलून दाखवला….काय करणार आहे या फोटोंचे….?त्यांनी लगेच सांगितले….माझे काही मित्र आहेत वनविभागात त्यांना पाठवतो हे फोटो……मग मी त्यांना त्यांचे नाव विचारून त्यांचा नंबर घेतला आणि त्यावर हे फोटो पाठवून दिले.
तिथून पुन्हा बायकोला घरी सोडून मित्रांसोबत डोंगरात फिरायला गेलो तिथेही आमची हीच चर्चा सुरू होती.जेव्हा घरी आलो आणि आवरून कामाला निघालो तेव्हा त्या ठिकाणी गेलो तर त्या मांजराचा काहीच पत्ता न्हवता…..मनात अनेक प्रश्न निर्माण झाले….मग लगेच तुपे साहेबांना मेसेज करून विचारले “अहो तिथे ते मांजर दिसत नाही.वनविभागवाले घेवून गेले की काय….?” त्यांचा क्षणात मेसेज आला की “होय ते उदमांजरच आहे…अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ते मेले आहे….”
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तिथे तत्पर भेट देवून त्याची दखल घेतली त्याबद्दल त्यांचे आणि त्याच तत्परतेने ही माहिती वनविभागापर्यंत पोहोचवली त्या श्री नितीन तुपे साहेब यांचे मी मनापासून आभार मानतो.
घडलेली घटना….त्यात मृत पावलेले मांजर आणि त्याची योग्य दखल घेत वनविभागाने घेतलेला निर्णय यातून बरच काही शिकण्यासारखं आहे.स्वतःचा अधिवास विसरून मानवी वस्ती आणि वावर असणाऱ्या भागात स्वतःचा जीव गमावणारे हे एकमेव मांजर नसून काही वर्षांपूर्वी बिभट्या ,काळा बिभट्या हे देखील मेलेले मी जवळून पाहिले आहेत.शिकारीच्या शोधात डोंगर सोडून रस्त्यावर उतरणारे हे प्राणी अचानक येणाऱ्या वाहनाच्या उजेडात गोंधळून जावून हकनाक मृत्यूच्या खाईत जातात.आता यावर माणसाने त्यांच्या अधिवास क्षेत्रात केलेलं अतिक्रमण यावर मला आज काही बोलायचं नाही.
यातून मी ज्या विषयाकडे वळणार आहे तो वेगळाच आहे.बघा ना रस्त्यावर होणारे अपघात… त्यात कुत्री,मांजरं,कोंबड्या या देखील जीव गमावतात.पण दुर्मिळ अस्तित्व असलेले हे उदमांजर किती लक्षवेधक ठरले.जीव तर जीव असतो ना मग तो कुत्र्याचा असो वा या उदमांजराचा…..पण त्याचं मूल्य ठरते हे त्याच्या दुर्मिळ असणाऱ्या अस्तित्वावर.
अनेक वन्यजीव जपले जावेत,जगले जावेत यासाठी अतोनात मेहनत घेताना शासन दिसते.प्रत्येक जीवाला जगण्याचा,नवा जीव जन्माला घालून जतन करण्याचा अधिकार आहेच.पण त्यात काही क्रूर विचार असणाऱ्या व्यक्तींपासून बचावासाठी शासनाला बरेच कडक कायदे करावे लागले आणि ते योग्यच आहे.
मग ही दुर्मिळता जतन करण्यासाठी शासनाची होणारी ही धडपड आपल्याला नक्की काय शिकवून जाते…..? तर याच उत्तर एकच……” जतन केले तरच जगणार आहे…..जगले तरच टिकणार आहे…. टिकले तरच वाढणार आहे…..वाढले तरच फुलणार आहे..आणि हे जीव असेच फुलत राहिले तरच निसर्गचक्र सुरक्षित राहणार आहे”
मग सहज मनात विचार आला….मानवाच्या बाबतीत ही असेच आहे ना…..चांगले लोक,चांगले विचार दाबले जावेत म्हणून असेच असंख्य प्रयत्न सुरू असतात.त्या व्यक्तींना दाबण्यात, संपवण्यात यश जरी आले तरी ते विचार कधीच संपत नाहीत.छत्रपती संभाजी महाराजांना अगदी हालहाल करून मारण्यात औरंगजेबाला यश आले पण त्या तळपत्या सूर्याचे विचार आणि कार्य आजही जिवंत आहे आणि यापुढेही असेच राहणार,तुकारामांच्या गाथा नदीत बुडवण्यात यश मिळवणाऱ्यांना त्यांचे विचार संपवण्यात यश आले का…? स्री शिक्षणाचा वसा घेतलेल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर शेण,चिखल फेकणाऱ्यांना स्त्रीला यशाची शिखरे गाठण्यापासून कोण रोखू शकले का….?अगदी गरिबीतून उठून देश न्हवे तर जगाच्या पाठीवर नाव कोरलेले कित्येक खेळाडू,वैज्ञानिक,कलाकार यांचं अस्तित्व,त्यांचं कार्य हे कोण मिटवू शकले का…..? तुम्ही कुठून आलात….? तुमच्या जवळ कोणा मोठ्या अधिकाऱ्याची ओळख आहे….? यापेक्षा तुमच्याकडे जगाला देण्यासाठी काय आहे….? स्वतःला इतरांच्या पेक्षा वेगळे सिध्द करून दाखवण्यासाठी काय कला आहेत….? कोणत्याही कठीण परिस्थितीत तुम्ही आलेल्या संकटांचा सामना करून त्यावर कशी मात करता….?म्हणजेच काय तर तुम्ही तुमचं दुर्मिळ असणारं अस्तित्व कसं सिध्द करता यावरच तुमची या जगात किंमत राहते…..मग ती तुमच्या जिवंतपणी आणि तुमच्या पश्चातही……
सोपं नसतं ना सगळ्या बिकट परित्स्थितीचा सामना करून स्वतःला सिध्द करणं…..म्हणून तर प्रवाहाविरुद्ध जाण्याऐवजी प्रवाहासोबत वाहणारे भरपूर असतात…..मग त्या प्रवाहात असणाऱ्या गर्दीत बुडालो तरी कोण असते विचारणारे….?मग स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी इतरांच्या अस्तित्वाला धोका पोहोचवून स्वतःला सिध्द करणारे ही काही कमी नाहीत.पण *चांगुलपणानं निर्माण केलेलं तेज हे इतकं लख्ख असतं की वाईटाचं गर्द धुकं त्याला झाकाळू शकत नाही.म्हणून तर एका वतनदाराच्या पोरानं……. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य, त्यांची ओळख,त्यांचे विचार आजही जिवंत आहेत…..मनामनावर राज्य करणारे छत्रपती शिवाजीराजे आजही प्रत्येक मनात जिवंत आहेत….. तेच देशभर क्रूरता आणि कपट यांचा वापर करून सत्ता मिळवणारा औरंगजेब किती जणांच्या मनात आहे…..?*
म्हणून शेवटी एकच सांगेन चांगुलपणाची असणारी दुर्मिळता भले तुम्हाला प्रसिध्दी कमी देईल,भोवती असणाऱ्या स्तुतीपाठकांची संख्या कमी असेल….पण आपल्या पश्चात आपले नाव निघताना तोंडात चार शिव्या न येता दोन गोड शब्द आले तरच तुमचे जीवन सुफळ ठरले असे मी म्हणेन.

*शब्दसारथी*
*निलेश बाबर*
*९२७१००८८९३*