आठवण

*आठवण* आठवण…….म्हणजे तरी नक्की काय….? आपल्या आयुष्यात ठरलेल्या प्रत्येक वळणावर नकळत मनाला स्पर्श करून जाणारी भावना म्हणजेच तर आठवण.मग या कडू गोड आठवणींनी बनलेलं असतं तेच तर खर आयुष्य. आपल्या पूर्ण जगण्यावर प्रभाव असतो तो आठवणींचाच.काही आठवणी जगण्याला नवी कारणं देतात….तर काही आठवणी अशा असतात की का जगावं याची कारणं शोधावी लागतात.पण आठवण ही कशीही असली तरी स्वतःला सावरणं,मनाला आवरणं आणि विनाकारण न बावरणं जमलं ना तरच या जगात सर्वांसमोर हसत वावरणं जमतं. आठवणी या आठवायच्या असतात, साठवायच्या असतात.कडू असतात त्या गोठवायच्या असतात तर गोड असतात त्याच पुढे पाठवायच्या असतात. आठवण नेमकी केव्हा येते….?जेव्हा त्या क्षणांना साजेसं असं काही घडतं….मग तेव्हाच ते भूतकाळाचं पुस्तक नव्यानं उघडतं.मग हरवून स्वतःला त्या पुस्तकातच अडकायचं का साजेश्या त्या नव्या क्षणांना सुंदरतेनं घडवायचं हे आपल्याच हाती. मग एका निवांत वेळी शांत ठिकाणी बसावं साठवत हे निसर्गाचं रूप मनात.न्याहाळताना सौंदर्य त्याचे शोधावे आठवणींना ही त्यात.पानांची सळसळ,त्या जवळच वाहणारा तो ओहोळ वाहत राहतो खळखळ…खळखळ.पानांची सळसळ होणारी ती कुजबुज असते आपले हितगुज जपणारी……वाहणाऱ्या पाण्याची नसते ती फक्त खळखळ रोखून मनास पळभर असते ती चाहूल जीवनात पुढे धावण्याची.इथे पडलेल्या फांदीचा देखील असतो झडलेल्या झाडाला आधार….वाढणाऱ्या हिरव्या वेलीचा नसे सुकल्या फांदीस भार.पाहून असं हे निसर्गाचं अनमोल नातं,विसरून सारी दुःख उघडावं जीवनाचं एक नवं खातं. खरच चंद्रलाही लाजवणारं तेज असतं हो आपल्यात पण आपण उगाचचं सूर्याकडे पाहून आपली नजर कमजोर करून घेत असतो.आहे ते स्वीकारून नाही त्याकडे केलेला प्रवास ही प्रगती म्हणू शकतो.पण आपलं कुठं चुकत माहितेय…..?आपण जे आपल्याकडे नाही त्याचाच फक्त विचार करून तेच जिंकायला पाहतो.म्हणून जे आपलं आहे तेच एक दिवस आपल्याला नाकारतं…..आणि मग उरतात त्या फक्त आठवणी. समुद्राला आटताना पाहून कधी घाबरत नसते धरती….कारण तिलाही माहीत असतं पुन्हा नव्याने येणार आहे भरती.असच कोणत्याही संकटात जेव्हा प्रश्नांची मनात होते गर्दी तेव्हा त्यातून बाहेर येताना हे शब्दच मला तारती.कारण मी त्या शब्दांचा अन् शब्द माझे सारथी. आठवणींवर बोलायला जास्त काही आठवावं लागत नाही.कुठेतरी एक धागा सापडला तरी मग आपोआप तो धागा विणला जातो आणि बनते ती त्या सुंदर क्षणांची गोधडी.त्यात हरवून जाताना भान हरपते हे मात्र नक्की.असच वाचता वाचता मग आठवणीतलं काही आठवून काही साठवता आलं… दुःखांना थोडं गोठवता आलं….आणि सल्ला म्हणून मला जरी काय पाठवता आलं तरी अवश्य पाठवा. आठवणींच्या झुल्यावर झुलत सुरू असलेल्या या जीवनप्रवासात भेटू असेच पुन्हा केव्हातरी अशाच एखाद्या मनाला स्पर्श करून जाणाऱ्या विषयाला घेवून. *शब्दसारथी* *निलेश बाबर* *९२७१००८८९३*