नातं

*नात*

कोण आहे आपण….?काय आहे आपलं अस्तित्व….?जर नसेल कोणाची सोबत तर काय आहे हे जीवन….?आयुष्यात बऱ्याचदा एकांत हवा असतो;पण एकटेपणा कोणाला हवासा असतो….?नाही ना….?म्हणूनच तर प्रत्येकाचं आयुष्य एका अदृश्य धाग्यानं बांधलं गेलयं.त्यालाच आपण म्हणतो नातं.
मग ते कोणते का असेना….ते जोडलं जातं….घडलं जातं….आणि आपुलकीनेच वाढलं जातं…. गैरसमजाने बिघडलं जातं….रागाने मोडलं जातं….प्रेमाने ओढलं जातं….तर तिरस्काराने सोडलं जातं.हे नातच तर असतं जे सारं काही उभारत असतं….मग त्या प्रेमाच्या इमारती असो वा द्वेषाच्या भिंती.
कोणाला हवा असतो नात्यातील दुरावा….?कोणाला वाटतं आपला जीव झुरावा….? सर्वांनाच तर वाटतं असतं सारा भोग सरावा आणि जीवनात फक्त आनंद उरावा….! मग नक्की चुकतं कुठं….?का निर्माण होतात हे दुरावे….?
नात्यांच्या या जाळ्यामध्ये थोडी चढाओढ,रुसवे फुगवे असतात आणि ते असावेत ही.त्यातूनच जीवनाची खरी गोडी ही समजते ना.पण आयुष्याच्या टोकापर्यंत फक्त टोकाचाच विचार करत गेलो ना तर……मागे वळून पाहिल्यावर दूरच्या टोकापर्यंत ही कोणी आपलं दिसणार नाही.कारण हे अंतर कधीही पार न करता येण्यासारखं असतं.
नात्यांची अनेक रूपं आहेत,अनेक छटा आहेत.पण मी आज सांगणार आहे ते एका नाजुकश्या नात्याबद्दल.काय असतं ते नातं….?कसं असावं ते नाजूकसं नातं….?प्रश्न खूप पडतात ना पण उत्तरं ही खूप साधी आहेत ओ.
दोन जीवांना एक जीव बनवणारं, आयुष्य सुरु होताना सुरू होणारं आणि आयुष्याच्या अंतानंतरही राहणारं….!जीवन किती सुरेख आहे हे शिकवणारं,आयुष्याच्या प्रत्येक पावलास साथ देणारं….! चंद्रकोरी प्रमाणं वाढणारं,चांदण्या प्रमाणं अमर्याद राहणारं….! जखमेवरचं औषध बनणारं,जोडीदारासाठी चंदन बनून झिजणारं….!संकटात प्रेरणेचा हाथ देणारं,आयुष्यभर प्रेमाची साथ देणारं,डोळ्यातून सुरू होणारं आणि श्वासापर्यंत जाणारं….!जागेपणी सुंदर स्वप्न दाखवणारं,त्या स्वप्नपूर्तीसाठी झगडणारही….! बुडणाऱ्याला हात देणारं, मरतानाही साथ देणारं,न सांगता ही सर्व काही समजणारं,न बोलता ही सारं काही समजून घेणारं….!शून्यातून विश्व निर्माण करणारं,शरीर न्हवे तर मनं जोडणारं….!तहानभूक विसरायला लावणारं,स्वतः जळून दुसऱ्याला वाट दाखवणारं….! असावं एक नातं नाजुकसं आयुष्यभर पुरणारं आणि पुरूनही उरणारं….!
शेवटी कोणतेही नातचं तर असतं जे एकमेकांना बांधून ठेवतं.फक्त विचार जुळावे लागतात. विचारांवरून एक गोष्ट लक्षात आली….विचार तेव्हाच जुळतात जेव्हा समोरच्याच्या भावना कळतात.मग भावना कळल्या तरच मनं जुळतात.आणि जर मनं जुळली ना की मग नातं कोणतं का असेना त्यातील गोडवा हा कायम टिकून राहतो.
जर वाटत असेल नात्यात कायम टिकून रहावी गोडी तर स्वतः पेक्षा समोरच्याच्या मनाची जाणीव असावी थोडी. जर जाणता येत नसेल समोरच्याच्या मनाची अगतिकता तर उगा वेडेवाकडे बोलण्याची नसावी मानसिकता.दोन गोड शब्द प्रेमाचे पुरे आयुष्य सुखाचे उभारती.मी त्या शब्दांचा अन् शब्द माझे सारथी.
नात्याबद्दलचे मनात आलेले विचार शब्दात मांडताना काही चुकलं असेल काही राहिलं असेल तरी आपलाच एक शब्दांशी जोडलेला नातलग समजून जरी काही सांगू वाटलं तरी अवश्य सांगा.
नात्यांच्या अमर्याद विश्वाचा अदृश्य धागा शोधताना शब्दांशी जोडलेल्या या नात्यात आपण शेवटपर्यंत लेख वाचलात त्याबद्दल आपले मनापासून आभार.

*शब्दसारथी*

*निलेश बाबर*
*९२७१००८८९३*