शब्द….मुक्या भावनांना व्यक्त करणारे एक अस्त्र.

*शब्द*…….मुक्या भावनांना व्यक्त करणारे एक अस्त्र. आपलं जीवन शब्दात बांधता येईल एवढं सोपं कधीच नसतं असं वाटतं ना….?कारण काहींना मनातलं शब्दात मांडता येतं,तर काहींचे शब्द मनातच राहून जातात. कधी डोळे बोलके भासतात तर कधी शब्दही मुके होतात. पण बघा ना धार बनून काळजाला चिरणारे ही शब्दच आणि काळजीने आधार देणारेही शब्दच.लहानपणीचे ते बोबडे बोल,तारुण्यातील प्रेमळ हाक आणि उतार वयात हवे असतात ते आधाराचे शब्द.हे सारंच कसं शब्दात बांधलं गेलंय ना….! खरंच शब्दांनी एखाद्याच्या मनापर्यंत पोहोचता येतं.पण त्याआधी त्या शब्दांपर्यंत पोहोचता यायला हवं ना.कारण काही वेळा शब्दच हरवून जातात.मग का….? कसे….? असे अनेक प्रश्न पडतात ना….? पण अशा निशब्द भावनांवर बोलताना शब्दांत जरासा झालेला बदल हा देखील कित्येक नव्या अर्थांना जन्म देत असतो.मग अशा अनेक अर्थांनी भरलेल्या सोहळ्यात जन्म घेणारे हे शब्द कित्येकदा पूर्ण जन्म निघून गेला तरी मनातील दुरावे दूर करू शकत नाहीत. उब देणारी गोधडी थंडीत जशी हवीशी वाटते तशीच ती उन्हाळ्यात अगदी नकोशी झालेली असते.शब्दांची उब तरी काय अशीच तर असते.योग्य वेळी योग्य त्या शब्दातून व्यक्त झालो तरच ती उब हवीशी वाटते नाहीतर मग भावनाशून्य वाळवंटात तुमच्या आपुलकीच्या गोधडीला दूरवर फक्त टांगते ठेवले जाते कारण त्याखाली बसून…. फक्त सावलीत मिळणारा विसावा अनुभवता यावा म्हणून.मग एखाद्याच्या विरंगुळ्याचं कारण बनून असच हवेत फडफडणाऱ्या शब्दांच्या सावलीला किंमत….. ही फक्त समोरच्याला क्षणभर विश्रांती मिळावी एवढीच.म्हणूनच तर अर्थपूर्ण शब्दही निरर्थक ठरतात कारण त्यांच्या वापराच्या योग्य त्या वेळा साधता येत नाहीत.चुकलेली वेळ आयुष्याचा मेळ पुन्हा बसवेल असे कोणतेच शब्द नसतात.म्हणून योग्य त्या वेळी शब्दांचे बांध फोडत रहा…..कायम व्यक्त होत रहा.आपल्यांसाठी अन् आपल्यांपाशी शब्दांचा झरा कधी आटू देवू नका.तरच नात्यांचा ओलावा कायम टिकून राहील ना. शब्दांच्या या खेळामध्ये सावरताना स्वतःला हे शब्दच मला तारती कारण मी त्या शब्दांचा आणि शब्द माझे सारथी. *शब्दसारथी* *निलेश बाबर* *९२७१००८८९३*