*संशय चारित्र्याचा* अशा संवेदनशील विषयावर लिहिताना नक्कीच माझ्याकडुन लिखाणात बऱ्याच उणीवा सापडतील.पण मला समजून घ्याल ही आशा बाळगून मी आज माझं मत व्यक्त करतोय. *धाग्याच्या सोबतीने सुई नवं वस्त्र निर्माण करते हे सर्वांना माहीत असलं तरी संशयाची सुई जेव्हा संसारात प्रवेश करते तेव्हा मात्र ही सुई संसारच विवस्त्र करते(इथे संसार उघड्यावर पाडते असा अर्थ घ्यावा)* समज,गैरसमज या नाजूक गोष्टींच्या विचाराने मनावर येणारा ताण नक्कीच मेंदूचा समतोल ढासळवू शकतो.हे जरी खरे असले तरी हा सुटणारा संयम फार मोठं पाप हातून घडवून जातोय हे त्या क्षणाला समजत नाही. हे अनेक घटनांतून आपण पाहत आलो आहेच. मग या रागाच्या होळीत कित्येक कुटुंब आजवर जळून खाक झाली.पण द्वेषाची ही होळी कायम पेटलेलीच राहिलीय कारण रोज नव्याने त्यात संशयाच्या घाण्याचं तेल ओतले जातच आहे.कधी आटणार हा घाणा….? आणि कधी विझणार ही होळी….? हे प्रश्न तसे अनुत्तरीतच राहणार कारण संशयाला उगीच टोचणारी सुई म्हणत नाहीत.ती सतत वेदनेला ओलीच ठेवण्याचं काम अगदी व्यवस्थित पार पाडत असते. *”नात्याच्या बहरणाऱ्या वेलीवर जेव्हा* *संशयाच्या सापांचे पडतात वेटोळे* *तेव्हा कोमेजून जातात उमलणारी फुले* *अन् संसाराचे होते वाटोळे”* यावर बोलायला अनेक बाजू आहेत.जेवढ्या घटना…. त्यातील वेगळे अनुभव आणि त्यावर वेगळे निष्कर्ष नक्की मांडणार तरी काय.रागाच्या भरात क्षणात सगळं संपवणारे आपण खूप पाहिले.पण मी आज बोलणार आहे ते क्षणात संपवणाऱ्या बद्दल नाही तर क्षणाक्षणाला थोड थोड मारणाऱ्या बद्दल. मागच्या आठवड्यात अगदी जवळच्या ठिकाणी एक घटना घडली.नाव….गाव….प्रसंग यावर काहीच भाष्य मला करायचं नाही.पण त्याच घटनेचा विचार मी गेली १ आठवडा रोज करतोय.मग त्याला जोडून असणारे इतर दुवे आणि घटनांचा आधार घेवून मला माझी काही मतं आज तुमच्यासमोर मांडू वाटली.प्रतिक्रियेत आपण आपली मते मांडून जरी काही सुधारणा सांगितल्या तरी मला आवडेल.त्यातूनच तर या विषयावर काहीतरी चर्चा होईल. एक मुलगी जेव्हा नव्या संसाराचं स्वप्न बघते तेव्हा तिला स्वतःच जग हे नवऱ्याच्या चष्म्यातूनच बघावं लागतं.हे आजवर आपण सर्वजण पाहत आलोच आहे.नवऱ्याच्या स्वप्नांना उभारी द्यायला आपल्या पंखांची ऊर्जा खर्च करून त्याचे विश्व निर्माण करण्यात धन्यता मानणाऱ्या तिला; त्या बदल्यात हवी असते फक्त मायेची हाक आणि प्रेमाची साथ. स्वतःच्या स्वप्नांना बाजूला ठेवताना तिला एवढं दुःख नसतं पण तिला खरं दुःख या गोष्टीचं होतं की ज्याच्यासाठी सर्वकाही पणाला लावून त्याच्याच स्वप्नांना आपलंसं करताना तिच्या कर्तुत्वाला जराही किंमत न मिळणं. कुणीतरी एक गोष्ट फार छान लिहिली आहे की स्त्री ही तिच्या बालपणात असते तिच्या वडिलांच्या घरात,लग्नानंतर असते ते तिच्या नवऱ्याचे घर आणि उतारवयात असते ते तिच्या मुलाचे घर……या सगळ्या घरघरीत तिचं असं हक्काचं काय असतं….? तिचं असं हक्काचं काही नसलं तरी तिला वाटत असतं हे सगळे मात्र आनंदात असावेत.मग सगळ्यांच्या सुखाचा विचार करणाऱ्या तिच्या आनंदाचं काय…..? यावर लिहीत बसलो तर फारच गोष्टी लिखाणात वाढत जातील.म्हणून मी थोडक्यात सांगतो ते सध्या माझ्या मनात घालमेल करणाऱ्या त्या घटनेबद्दल. परिस्थिती कशीही असली तरी आपल्या मुलीला चांगला मुलगा मिळावा म्हणून प्रयत्न करून तिचा विवाह रीतीरिवाजाने चांगल्या प्रकारे करून दिला जातो आणि कन्यादानाच्या फार मोठ्या जबाबदारीतून यशस्वीरित्या मोकळा झालो या आनंदात वडील असतात….यात काही वावगं नाहीच. मुलाचं लग्न झालं…..सून घरात आली आता घरातील थोड्या जबाबदारीतून मी मोकळी झाले…. सासूबाईंना होणाऱ्या या आनंदात ही काय वावगं असं नाही. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संसाराची धुरा सुपूर्त करण्याचा कार्यक्रम म्हणजेच तर लग्न.मग नवीन संसारात दोन वेगळे जीव एकत्र येताना वेगळ्या सवयी,आवडीनिवडी,स्वभाव,मतं व्यक्त करायची पद्धत,भावना समजून घेण्याची कला या नक्कीच वेगवेगळ्या असणार.बघा ना धर्म,जात,प्रांत जरी वेगळे असले तरी रीतसर लग्न कसे ठरवावे याच्याही पद्धती आहेत,लग्न पार कसे पाडावे याचे वेगवेगळे संस्कार आहेत,अगदी मधुचंद्राच्या रात्री पर्यंत सगळे रीतिरिवाज आहेत.पुढे गरोदरपणाचे संस्कार आहेत,बाळ झाले की त्याचे वेगळे संस्कार आहेत…..हे सगळे रीतिरिवाज….धर्म वेगळे असले तरी वेगळ्या प्रकारे का होईना अस्तित्वात आहेत. आता यापुढे मी एक गोष्ट बोलतोय ती सर्वांची माफी मागूनच….मला सांगा या सगळ्या संस्कारात नवी पिढी उत्तम घडते यात मला काहीच शंका नाही.पण काही अघटीत प्रसंग जेव्हा डोळ्यासमोर येतात तेव्हा वाटत….. खरा एक संस्कार सगळीकडेच कमी आहे तो म्हणजे नव्या नात्याला सुरुवात करताना त्या दोन मनांची,दोन जीवांची खरी होणारी ओळख…..मग तुम्ही कितीही म्हणाला की आजकाल दोघांना वेगळे बोलायला वेळ दिला जातो……अहो वेळ दिला जातो यात शंका नाहीच…..पण ती वेळ देताना आधीच कान भरले जातात त्याचे काय …….? हे बघ मुलगा चांगला आहे…..नोकरी चांगली आहे….घरचे चांगले आहेत……आणखी काय हवे……? आणि दुसऱ्या बाजूला ही एक वेगळीच पद्धत असते….हे बघ मुलगी चांगली आहे …..केलीय चौकशी…. साधी सरळ आहे …..दिसायला चांगली आहे ….बाकी काय लफडे बिफडे तसले काय नाही…..घरची कामं येतात सगळी…..अजून काय पाहिजे….? एवढे सगळे बोलून कान भरले जातात आणि एकांतात पाठवले जाते…. बोला काय तुम्हाला बोलायचं असेल ते…..आमची काय हरकत नाही….शेवटी तुम्हाला संसार करायचा आहे……यातून होणारे विवाह अयशस्वी होतात असे मी मुळीच म्हणत नाही.कृपया वेगळा अर्थ घेवू नये.यातून मला एकच सांगायचं आहे की खरच अशाप्रकारे कान भरून पाठवलेले ते दोन जीव आणि हवा भरून हवेत सोडलेले फुगे यात काय फरक आहे …? मग फुगे असो वा ते दोघे अनुकूल वातावरणात मस्त वाहत जाणारच ना.पण जेव्हा काट्यांचा प्रवास सुरू होतो तेव्हा फुटणाऱ्या फुग्यात आणि त्या दोघात काय फरक असतो…..? जोरात आवाज निघतोच ना…..? मग हेच तर होते खऱ्या आयुष्यात ही. सुरुवातीला सगळे आलबेल असताना काही दिवस आनंदात निघून जातात.असेच काही या घटनेत ही आहे.मग आधी बायकोच हवहवसं वाटणारं सौंदर्य नंतर मनात आपोआप घर करायला लागत की….. ही एवढी चांगली म्हणजे ही अजून बऱ्याच जणांना आवडणार…..! मग आधी सुंदर वाटणारी बायको एक वरदान वाटत होती….तीच पुन्हा आपोआप शाप बनू लागते…..तू एवढी छान म्हणजे तुझ्या मागं बरीच पोरं असणारं……मग सांग कोण कोण होतं….????? स्वतःला एका भेटीत पसंत पडणारी मुलगी…..जगात बाकी पुरुषांच्या नजरेतून सुटलेली असणार का….? वयाच्या वेगवेगळ्या टप्यावर ती कोणाला ना कोणाला आवडू शकते यात तिचा दोष असणार का…..? रोज वेगवेगळ्या लोकांच्या नजरेच्या निखाऱ्यातून स्वतःला जपत स्वतःच आयुष्य,सर्वस्व ज्याच्या पायाशी ठेवते…. तो जेव्हा अचानक म्हणतो मला जशी आवडलीस तशी किती जणांना आवडली होतीस सांग…..? मला सांगा या प्रश्नानं तिला कोणता मोठा खिताब मिळाल्याचा आनंद होईल का …..? पायाखालची जमीन सरकल्याच्या भावनेत….अहो अस काय पण का बोलता…..? हेच शब्द तोंडातून बाहेर येतील….? की तू आवडतेस म्हणणारांची यादी वाचून दाखवेल ती…..? बायको सुंदर हवी हा अट्टाहास आणि तिला कधी कोणी विचारले नसावे ही गलिच्छ अपेक्षा…..कसे होणार मग पुढे……? सौंदर्य न पाहता फक्त गुणांकडे पाहून असंख्य लग्न यशस्वी झाली आहेत यात काही शंका नाहीच.मी जे बोलतोय ते काही अपवादात्मक गोष्टींवर.त्यामुळे कृपया कोणीही या गोष्टी वैयक्तिक घेवू नयेत हीच अपेक्षा. आपले सौंदर्य ही आपली छान संपत्ती आहे …..आता संसारात ही नवऱ्याला छान सुखी ठेवू हे स्वप्न पाहणाऱ्या तिला जेव्हा विनाकारण तिचे सौंदर्य हाच जेव्हा शाप वाटेल तेव्हा काय होणार…..?लग्न लावून देणारे घरचे हे मनमोकळे करायला मिळणारे हक्काचे ना…..? मग केले तिथे मन मोकळे…….काय चुकलं का……? नाही ना……?मग यावर प्रतिसाद काय यावा…….?यावर समंजसपणे चर्चा करून विनाकारण विकोपाला जाणाऱ्या वादात घरच्यांनी लक्ष द्यावे की नाही ……? मुलाच्या बोलण्यात तथ्य आहे म्हणून सासू सासरे त्याला दुजोरा देणार……आणि आता तुझे लग्न झालेय… होते असे. वाटते आहे तर वाटू दे…..तुझे नाय ना काय मग नको घाबरु….असे म्हणून एकप्रकारे घरचे तिला टाकूनच देतात….. सुखी संसारात आलेली ही वाईट वेळ….. ना तिचे घरचे समजून घेत ना सासरचे साथ देत……नवऱ्याचा वाढता संशय…..त्यात भर म्हणून सासू सासरे लक्ष ठेवायला…….अगदी घरच्यांना फोन करायची बंदी……त्यात या शंका घेणाऱ्या नवऱ्याचे पोटात वाढणारे बाळ…….होणाऱ्या मातृत्वाचा आनंद घ्यावा…..की जन्माला घातलेल्या या शंकेच्या भुताला तोंड द्यावं….. बर तोंड द्यायला ही तयार… पण नक्की बोलू काय……? सांगू काय….? गरीब परिस्थितीतून शिक्षण घेतलं…..सौंदर्य पाहून चांगलं स्थळ मिळालं…….लग्न करून संसार थाटला…..प्रेमानं सर्व अर्पण केलं……आनंदान पोटात जीव वाढताना…..नवऱ्यानं नवीन कारण काढलं……ज्या काळात तुला काय हवं काय नको हे विचारनं गरजेचं असताना तुला कोणी कोणी विचारलं हा प्रश्न जास्त महत्वाचा वाटणारा नवरा…….तुला काय खाऊ वाटत…? काय त्रास होतोय का…? हे विचारणं सोडून तुझ्यामुळं माझं पोरगं त्रासात जगतयं म्हणणारी सासू……हे बघ कर आता सहन…. काय बोलून फायदा……पोरीच्या जातीच असच असतं अस म्हणणारी आई ……या सगळ्यात काय अवस्था झाली असेल तिच्या मनाची……? काय वाटलं असेल स्वतःचं आयुष्य संपवून घेण्याचा निर्णय घेताना…..?आपणच नाही तर आपल्या पोटात अजून एक जीव वाढतोय…..हे माहीत असताना….. स्वतःच आयुष्य जेव्हा संपवून घेवू वाटत तेव्हा…. किती एकटी पडलेली असेल ती…..? यात दोष कोणाचा……? प्रवृत्त करणारे सासरचे……? हो ते नक्कीच दोषी आहेत यात काही शंकाच नाही.पण या सोबत अजून बरेच जण याला जबाबदार नाहीत का…..? अशी जेव्हा परिस्थती समाजात निर्माण होते तेव्हा मुलगी म्हणजे परक्याचे धन समजून…..लग्न लावून दिले की जबाबदारी संपते का…..?लग्न झाले म्हणजे तिने असेल ते सहन करून जगावं का…..? तिला तिचे स्वतःचे अस्तित्व नाही का…..? अशाप्रकारे आयुष्य संपवून घेणे हे चुकीचे आहेच…..पण प्रवृत्त करणारी विचारशैली संपायला नको का …..? आज स्त्रीला जगात मानाने जगता यावं यासाठी अवतीभोवती बऱ्याच सामाजिक संस्था कार्यरत आहेत यात काही शंका नाहीच…पण त्याला काही मर्यादा आहेत…..जोपर्यंत त्रासात खचलेली स्त्री स्वतः तिथे पोहोचत नाही….किंवा कोण तिला तिथे पोहोचवत नाही तोपर्यंत या संस्था तरी काय करणार ……? आज एक चांगली मुलगी या जगातून निघून गेली. कारण योग्यवेळी तिच्यापर्यंत कोण पोहोचू शकले नाही……माझी वाचकांना आणि अशा सेवाभावी संस्थांना एक विनंती आहे की आपण या चळवळीला मोठ्या प्रमाणात कसे जागृत करू शकतो यावर मार्ग शोधावा…..जी घटना घडली….कुठे घडली याची मला अजिबात वाच्यता करायची नाही….पण अशी घटना पुन्हा कुठे घडू नये यासाठी आपण काय करू शकतो…..यावर आपण सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे…..जसे तहान लागली की पाणी विकत का होईना उपलब्ध आहे…..असे खरच फार त्रासात असणाऱ्या स्त्रीला पटकन ती ठिकाणं गाठता यावीत ……तिचे योग्य समुपदेशन व्हावे…..यासाठी काही मार्ग निघतील का…..?नक्कीच जेव्हा एखादी स्त्री असे शेवटचे पाऊल उचलायला तयार होते; तेव्हा तिला तिच्या आयुष्याची सगळी दारे बंद झालेली दिसत असतात…..मग अशा अत्यंत नाजूक आणि बिकट परिस्थितीत तिला हक्कांन एक मार्ग मोकळा दिसावा ज्यातून नाती गोती भले काही क्षण लांब जातील पण आयुष्य असे अर्ध्यात संपवले जाणार नाही. *”जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या….अमुक तमुक यांना अटक*” या चार ओळीत तिचे पूर्ण आयुष्य गुंडाळून ती बातमी दुसऱ्या दिवशी रद्दीत जाते.पण रद्दीत जाणाऱ्या या कागदातून अशा घटना कायमच्याच रद्द झाल्या तर खर आपली ही चळवळ यशस्वी होईल अस मला वाटत. या बऱ्याच मोठ्या लेखातून मला एक छोटीच गोष्ट खर तर सांगायची आहे ती म्हणजे मानसिक शारीरिक त्रासाला कंटाळून स्वतःच आयुष्य संपवून घेणं चूकच.पण अशाप्रकारे कोण कोणाला प्रवृत्त करत असेल हे जाणवले तरी तुम्ही स्वतः काही करू शकला नाही तरी समाजाचं काही देणं लागतो हे समजून कमीतकमी ही गोष्ट पोलिसांपर्यंत पोहोचवा. *शब्दसारथी* *निलेश बाबर* *मोबा नं.-९२७१००८८९३*