मेहनतीची पोहोचपावती

*मेहनतीची पोहोचपावती*

यात्रा असो वा गणपती उत्सव; प्रत्येक मंडळ हे काही जिवंत देखावे सादर करून आपल्या प्रेक्षकांना काहीतरी सामाजिक जाणिवेचे भान राखून काही तरी संदेश द्यायचा प्रयत्न करत असते.
यानुसार *बाल गणेशोत्सव मंडळ,खिंडवाडी…..* आम्ही यात्रेमध्ये असणाऱ्या सोंगामध्ये *बदलती शिक्षण पद्धती आणि शिक्षणाचे होत असलेले बाजारीकरण* यावर आधारित एक सुंदर देखावा सादर केला होता.
सर्व ग्रामस्थ,बाहेरून आलेले प्रेक्षक या सर्वांना आवडेल आणि हृदयाला स्पर्श करेल असा सुंदर देखावा आम्हाला सादर करता आला त्याबद्दल आम्ही सर्वजण खूप आनंदी होतो.
पण त्या आनंदात भर म्हणून अजून एक गोष्ट घडली. सोशल मीडिया वर आम्ही आमचे हे छोटेसे नाटक अपलोड केले होते ते पाहून आपल्या सातारा पंचक्रोशीत असणारे क्षेत्रमाऊली परिसरातील बाल गोपाल गणेशोत्सव मंडळ यांनी आमच्याशी संपर्क साधला.
आपल्या नाटकाची आणि सादर केलेल्या विषयाची दाद अशी बाहेरून होतेय ही गोष्ट मनाला जास्तच आनंद देणारी होती.त्यानंतर बाल गोपाल गणेशोत्सव मंडळाचे सदस्य भेटीस आले.संपूर्ण नाटक कसे लिहिले,त्यातून कशाप्रकारे संदेश दिला,लिहिताना मनात काय विचार होते,सादरीकरणात कशा गोष्टींचा विचार करावा यावर बरीच चर्चा झाली.
त्यांना विषय आवडला ही जमेची बाजू होतीच.पण पुढे विषय येतो तो व्यवहाराचा.कारण प्रत्येक मंडळ हे अशा सादरीकरणासाठी बराच पैसा खर्च करत असते.आम्हीही त्यापैकी एक.मग ठराविक रक्कम देवून नाटकाची रेकॉर्ड केलेली मूळ ऑडिओ क्लिप त्यांना दिली.
आम्ही कशाप्रकारे सादर करतो बघायला या असे म्हणून ते निघून गेले.मग आम्हीही आमच्या मंडळाच्या पुढील नियोजनात गुंतून गेलो.काल रात्री अचानक १०.३० वाजता फोन आला की अहो क्षेत्रमाऊली मधून बोलतोय….तुम्ही दिलेल्या विषयावर आम्ही आमच्या पद्धतीने सादरीकरण केले आहे.तुम्ही पहायला या की.
वेळ खूप झाली होती.त्यामुळे नकार देण्याच्या मानसिकतेत मी होतो.पण लगेच पुढून आवाज आला.रात्री १ वाजले यायला तरी या.तुमच्यासाठी पुन्हा शो लावतो.पण या नक्की.
हे ऐकल्यावर नकार द्यायला जीभ उचलली नाहीच.सरळ हो येतो पण वेळ होईल अस सांगून फोन ठेवून दिला.आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना ही माहिती दिली आणि त्यांच्या सोबत गेलो ते थेट बाल गोपाल गणेशोत्सव मंडळाच्या शेड जवळ.
गेल्या गेल्या श्रीफळ देवून आमचा त्यांनी सत्कार केला आणि मग नाटकाच्या सादरीकरणाला सुरुवात केली.
*जेव्हा तुम्ही लिहिलेले,स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड केलेले आणि त्या कथानकात एक भूमिका स्वतः साकारलेले नाटक* आपल्याच समोर एक दुसरा समूह सादर करतोय हे पाहताना मनाला मिळणारा आनंद मला ठीक मांडता येत नाही.पण प्रत्येक कलाकाराचा उत्कृष्ट अभिनय,अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण आपल्या भूमिकेला योग्य न्याय देत होते.
हे सर्व पाहत असताना काही महिन्यापूर्वी आम्ही केलेले ते सादरीकरण त्यासाठी सर्वांनी घेतलेली मेहनत,आलेल्या अडचणी,त्यातून काढलेले मार्ग हे सगळेच डोळ्यासमोरून जात होते.
मूळ कथानकात काही किरकोळ बदल करून त्यांनी सादर केलेल्या या नाटकाला तिथे देखील मिळणारी पसंती सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होती.
नाटक संपल्यावर सर्व कलाकारांसोबत फोटो घेण्याचा मोह झाला आणि तो सुंदर प्रसंग आम्ही कॅमेऱ्यात कैद केला.कसे झाले आमचे नाटक….? झाले का नीट…?आवडले का….? अशा सगळ्या प्रश्नांना एकच उत्तर होत माझ्याकडे…..उत्तम….खरच फार छान केले तुम्ही.
तेव्हा अजून एक गोष्ट लक्षात आली.आपण मेहनत घेतो आणि आपल्या मनाला वाटेल असे सादर करतो.यात खरा आनंद नसतो.आनंद तेव्हाच होतो जेव्हा त्याला प्रेक्षकांच्या पसंतीची दाद मिळते.
खरच कलाकाराला अजून काय हवे असते…..आपल्या कलेला प्रोत्साहन मिळावं यासाठी प्रेमाचे २ शब्द आणि थोडंसं कौतुक.आज आमच्याकडुन ते त्यांना मिळत होत….आणि त्यांचे चेहरे आनंदाने फुलले होते.
पण त्यांच्याहीपेक्षा माझ्या मनात जो एक सकारात्मक उर्जेचा प्रवाह जागा झाला तो मी कधीच नाही विसरू शकत.पुसेसावळी येथे देखील आमच्या या नाटकाचे प्रयोग दाखवले गेले.पण तिथे आम्हाला जाता आले नाही.
लिखाणात सहकार्य करणाऱ्या माझ्या मंडळातील सदस्यांचे जे मार्गदर्शन मिळाले,सादरीकरणात माझ्या सोबतच्या ज्या कलाकारांनी उत्तम अभिनय केले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रेकॉर्डिंग मध्ये ज्या कलाकारांनी आपले आवाज दिले.आज त्या सर्वांच्या मेहनतीला पोहोचपावती मिळाली होती.
सन्मानाने मिळालेले श्रीफळ घेवून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो ते मनात एक वेगळाच आत्मविश्वास घेवून.

निलेश बाबर
शब्दसारथी
९२७१००८८९३