*स्मृतीगंध*
*ट्रेक नंबर १६ भाग २*
*कोळे नृसिंहपुर*
*५ डिसेंबर २०२१* आणि
*२५ मार्च २०२२*
डिसेंबर मध्ये भेट दिलेल्या ह्या ठिकाणाबद्दल लिहायला खर तर फारच उशीर झाला.यांनतरही बऱ्याच स्थळांना भेटी दिल्या पण आधी कोळे नृसिंहपुरबद्दल लिखाण करायचे मगच स्मृतीगंध या भ्रमंतीच्या पुढच्या प्रवासाचे वर्णन करायचे हेच मनाशी ठरवून होतो.
अत्यंत सुंदर ठिकाण पण तिथली पूर्ण माहिती नसल्याने काय लिहावं हा सुद्धा मोठा प्रश्न होता.पण तिथे असणाऱ्या ओमकार कुलकर्णी आणि त्यांच्या वडिलांनी खूप मदत केली.बऱ्याच गोष्टी सांगितल्या.संपूर्ण शाळिग्राम मध्ये असणाऱ्या या अंदाजे ५ फूट उंचीच्या नृसिंहमूर्तीचे यथायोग्य सोहळे करून पूजा अर्चा करणाऱ्या या कुलकर्णी कुटुंबाने खूप आपुलकीने घरातही बोलवून पाहुणचार केला.
संपूर्ण माहिती ही ५ डिसेंबर ला गेलो आणि मिळाली असे नाही.तर २५ मार्च २०२२ला पुन्हा तिथे जावून बरीच माहिती घ्यावी लागली.
नृसिंहपुर म्हणजे नक्कीच नरसिंहाचे मंदिर असणार हे मात्र लगेच समजते.पण इथे असणारी मूर्ती,हा परिसर आणि इथला असणारा इतिहास हा फारच रंजक आहे.संपूर्ण माहिती देताना नक्कीच हे सर्व थोडक्यात लिहून होणार नाही.पण हे स्थळ आणि इथला इतिहास आपण मनापासून जर वाचलात.तर नक्कीच तुम्हाला या स्थळाला भेट देण्याची मनापासून इच्छा होईल.असं मला वाटतं.
साताऱ्यातून ७०किमी अंतरावर असणारे हे गाव…..याला अगदी पहिल्या शतकापासूनचा इतिहास आहे.पण अशा पुरातन गोष्टी पाहताना तिथली आख्यायिका माहीत असणे हेही तितकेच महत्वाचे.
*आख्यायिका आणि मूर्ती इतिहास*
कर्नाटक भागातील अंजन गावात असणाऱ्या ब्राम्हण दांपत्याने नृसिंहपुरमध्ये बरीच वर्ष घालवली.कृष्णेच्या या अथांग वाहणाऱ्या पाण्यात नरसिंहाची मूर्ती आहे. ती आपण शोधून काढावी असे त्यांनी राजा भीमदेव कौंडिण्यपूर (कुंडल) यांना सांगितले.
त्यानुसार राजा भीमदेव यांनी इ.स.१०७ मध्ये कृष्णेच्या पाण्यातून ही मूर्ती वरती काढून कोळ्याच्या सिद्ध भूमीवर तिला स्थापन केले.
हा इतिहास पहिल्या शतकातील असला तरी या शाळिग्राम मधील मूर्तीचा इतिहास फार पुरातन आहे. इ.स.पूर्व ५५६१ वर्ष…. एवढ्या वर्ष आधी व्यास ऋषींचे वडील पराशर ऋषींनी आपल्या साधनेने षोडशभुज( सोळा हात ),एका पायावर उभी अशी नृसिंहमूर्ती बनवली.मूर्तीच्या हातांमध्ये,शंक,चक्र,गदा,फुल,बासरी,धनुष्य अशी आयुधे आहेत.या मूर्ती निर्मितीची कथाही तितकीच रंजक आहे.पराशर ऋषींनी केलेल्या कठोर तपश्चर्येेनंतर भगवान श्री विष्णूंनी त्यांना दर्शन दिले. तेव्हा तुमचे नरसिंह अवतारातील मुद्रेचे दर्शन व्हावे हीच इच्छा पराशर ऋषींनी मांडली.नरसिंह रूप हे खूप दाहक आणि तेजस्वी असल्याने ते जास्त काळ नजरेस सहन होणार नाही यामुळे कृष्णा नदीच्या तीरावर काही क्षण भगवान श्री विष्णूंनी नरसिंह अवतारात दर्शन दिले आणि पुन्हा त्यातून तिथे शाळिग्राम ची साधारण ५ फूट उंचीची शोडस भुज मूर्ती तयार झाली.मूर्तीचे तापमान जास्तच होते याकारणें ती तेव्हाच कृष्णेच्या डोहात सोडली गेली.
जेव्हा कर्नाटक प्रांतातील अंजन गावचे वृध्द दाम्पत्य ज्वाला नृसिंहतीर्थी कठोर तपश्चर्या करत होते तेव्हा त्यांना दृष्टांत झाला.त्यानुसार त्यांनी राजा भीमदेव यांना भेटून कृष्णेच्या डोहातून नृसिंहाची मूर्ती पुन्हा वर काढावी अशी विनंती केली.पण एवढ्या मोठ्या पाण्याच्या प्रवाहात मूर्ती शोधणार कशी हा मोठा प्रश्न राजा भीमदेव आणि त्यांच्या सैन्यापुढे होता.
तेव्हा गवताची काडी प्रवाहात टाकत पुढे ते आले आणि जिथे गवताच्या काडीने पाण्यातही पेट घेतला तिथे मूर्ती असल्याचे संकेत मिळाले.त्यानुसार इ.स.१०७ मध्ये ती मूर्ती पाण्यातून वर काढण्यात आली.
संपूर्ण यथोचित विधी करून मूर्तीची स्थापना करण्यात आली.
यानंतर इ.स.१२७३ मध्ये देवगिरीचे राजा रामदेवराय यादव यांनी हेमाद्री पंत यांच्याकडून मंदिराच्या भुयारी मार्गाचे काम करून घेतले.तीन भुयारे उतरून मग मूर्तीजवळ जाता येते.भूयाराची असणारी अप्रतिम रचना ही खरच पाहण्यायोग्य आहे.
१४ व्या शतकानंतर या ठिकाणी बऱ्याचदा मुस्लिम राजवटींनी मंदिराची आणि मूर्तीची नासधूस करण्यासाठी आक्रमणे केली.पण पहिल्या भुयारात उरतून जेव्हा तिथून खाली दुसरे भुयार लागते तिथे असणारी नृसिंहाची खोटी मूर्ती आणि दगडी शिळेने तिथून खाली उतरण्याचा झाकून बंद केलेला मार्ग यावरून त्यावेळच्या त्या स्थापत्य शास्त्राचे आपण कौतुक केल्या शिवाय राहू शकत नाही.
*मंदिर परिसराची माहिती*
ज्या ज्या वेळी इथे आक्रमणे झाली तेव्हा गावकरी एकत्र या भुयारात जमत असत.वरच्या दोन्ही भुयारात नासधूस करून शत्रू निघून जात होते.यादरम्यान खाली तिसऱ्या भुयारात अंधारात लपून बसलेल्या या गावकऱ्यांना बाहेरची माहिती कशी मिळत असेल हा प्रश्न आपल्याला ही पडत असेल ना…..?
तर तुम्ही नक्कीच या मंदिराला भेट द्या.आता मंदिरात जायला वेगळा मार्ग तयार केला आहे.आणि जुना असणारा भुयारी मार्ग बंद केला आहे.पण तरीही संपूर्ण परिसर तुम्हाला पाहता येतो.
तर महत्वाचे सांगायचे ते म्हणजे इथे असणारा तुळशी वृंदावनाचा भाग. इथे अशी रचना आहे की तुम्ही जर कॉइन किंवा सुपारी जर इथे असणाऱ्या तुळशीमध्ये जी खोबणी आहे तिथे टाकली तर ती सरळ नृसिंह मूर्तीच्या पायाशी पडते.
ऐकून फार विलक्षण वाटते ना पण हे अगदी खर आहे.तुळशी वृंदावनाच्या बरोबर खालच्या भागात तिसऱ्या भुयारात जाईल असा छोटा रस्ता आहे.त्याकाळी इथून काही संदेश हे खाली टाकले जायचे ते बरोबर मूर्ती शेजारी जावून पडत होते.त्यानुसार तिथे लपून बसलेल्या गावकऱ्यांना बाहेरच्या परिस्थितीची माहिती मिळत होती.
आता आपण तिथे पाहता येणाऱ्या सर्व ठिकाणांची माहिती घेवू.मंदिराच्या पूर्व दरवाजातून आत गेल्यावर आपल्याला समोर दिसते तो छोटासा दिंडी दरवाजा.आत जाण्याचा हा फारच छोटा मार्ग आहे.परंतु तिकडे न जाता उजव्या बाजूला वळले तर अलीकडे बांधण्यात आलेला भला मोठा सभामंडप दिसतो.तो उतरून खाली आलो की दोन मोठ्या दीपमाळा आपल्या नजरेस पडतात.एका दीपमाळेवर हनुमान दुसऱ्यावर गरुडाची मूर्ती कोरलेली दिसते.
दीपमाळेच्या विरुद्ध बाजूस पाहिले तर आपल्याला सध्या नव्याने बनवलेले भुयार दिसते.त्यातून आत प्रवेश केला की तुम्ही सरळ नृसिंह मूर्तीच्या जवळ जाता.छोट्याश्या दरवाजातून आत गेल्यावर आत दिसणारी शाळिग्राम मध्ये असणारी ती भव्य मूर्ती पाहून तुमचे मन नक्कीच प्रसन्न होईल.
*मुर्तीवर्णन*
साधारण ५ फूट उंचीच्या या मूर्तीकडे आपण शांतपणे पाहिले तर आपल्याला दिसेल की सोळा हात असणाऱ्या या मूर्तीच्या हातात शंख,सुदर्शन चक्र, गदा,पुष्प,बासरी,धनुष्यबाण,कलश ढाल अशी आयुधे आहेत.तर मूर्तीच्या मागे असणाऱ्या प्रभावळीवर मध्यभागी भलेमोठे किर्तीमुख कोरले असून त्याच्या दोन्ही बाजूस वराह,मत्स्य,कुर्म( कासव),नृसिंह,वामन, श्रीराम,श्रीकृष्ण,परशुराम, कल्की,बुद्ध,ऋषभदेव,अशी विष्णूरूपे कोरली असून मूर्तीच्या याच प्रभावळीवर वळणावळणाची असणारी महिरप जणू शेषनागाने घातलेला वेढा असावा अशी दिसते.
मूर्तीच्या उजव्या पायाजवळ भुदेवी आणि गरुड तर डाव्या पायाजवळ भक्त प्रल्हाद आणि देवी लक्ष्मी यांची सुरेख मूर्ती कोरली आहे.याबद्दल माहिती अशी आहे की जेव्हा नृसिंहाने हिरण्यकशपूचा वध केला तेव्हा त्यांचा क्रोध काही केल्या शांत होत न्हवता.कोणत्याच देवाला नृसिंह देवासमोर जाण्याचे धारिष्ट होत नव्हते तेव्हा भूदेवी समोर गेली त्यांनतर भगवान विष्णूचे वाहन असणारा गरुड सामोरा गेला,त्यांनतर स्वतः देवी लक्ष्मीने नृसिंहरुपी भगवान विष्णूंचा क्रोध शांत करण्याचा प्रयत्न केला.सर्वांनी केलेले हे प्रयत्न वाया गेल्यानंतर भक्त प्रल्हाद सामोरे जातो तेव्हा कुठे नृसिंहाचा क्रोध शांत होतो.
क्रोधित डोळे,मांडीवर घेतलेला हिरण्यकश्यपू,दोन्ही हाताने फाडलेले त्याचे पोट,उजव्या पायाखाली मुडपलेला हिरण्यकश्यपूचा डावा पाय आणि उजव्या पायाने दाबून धरलेला हिरण्यकश्यपूचा डावा हात,एका हाताने दाबून धरलेले त्याचे डोके तर एका हाताने धरलेला त्याचा उजवा पाय अशाप्रकारे पूर्ण जखडून ठेवलेला हिरण्यकश्यपू भगवान नृसिंहाच्या पुढे पूर्ण हतबल दिसून येतो.
एका अखंड शाळिग्राम दगडात कोरलेली ही मूर्ती जेवढा वेळ पाहू तेवढे कमीच.
*इतर ठिकाणे*
मूर्ती पाहून बाहेर आलो की डाव्या बाजूस एक छोटासा रस्ता दिसेल.त्या छोट्या दगडी चौकटीतून आत आलो की उजवीकडे वळून थोडे अंतर चालत गेलो की समोर एक भिंत दिसते पण तिथून पुन्हा उजवीकडे वळायचे.थोडे अंतर चालून आलो की एक चौकोनी कोरलेली शिळा दिसेल त्यातून वरती यायचे. वरती आलो की बरोबर मागच्या बाजूला एक मूर्ती दिसेल.जी तुटलेल्या अवस्थेत आहे.हीच ती नृसिंहाची खोटी मूर्ती.ती पाहून आत आलो की आपल्याला अंबाबाईचा मंडप दिसतो.त्यात अंबाबाई, गजान्तलक्ष्मी,इतर काही देवदेवता आणि श्री सिध्देश्वर महाराजांची समाधी पहायला मिळेल.तिथे तुम्हाला एक दरवाजा दिसेल पण सध्या तो बंद असतो.इथूनच पूर्वी वरती जाण्याचा आणि खाली उतरण्याचा एकमेव मार्ग होता.
हे पाहून झाले की पुन्हा आहे त्याच मार्गे बाहेर आल्यावर तुम्ही तुळशी वृंदावन,त्याच्या बाजूला असलेले शेजघर पाहू शकता.तिथून पुन्हा बाहेर येवून पूर्वी ज्या मार्गे भुयारात उरतले जात होते तिथे आलो की पहिल्या पायरीवर काही लिहिलेले दिसेल ते असे
*”भानू तुकदेव त्याचा पुत्र*
*गोपाळ भास्कर त्याचा पुत्र*
*भानू गोपाळ”*
तिथून बरोबर नऊ पायरी उतरलो की भुयारात जाणारा पहिला दरवाजा दिसतो की जो सध्या बंद आहे.
हे मंदिर पाहून झाल्यावर तिथून पुढे साधारण ३किमी अंतरावर कृष्णेच्या पाण्यावर बांधलेला घाट हा देखील पाहण्यासारखा आहे.तिथून जवळच आहे रामदास स्वामी यांनी बांधलेले श्रीराम आणि हनुमान मंदिर.
या मंदिराची देखील एक फार मोठी आख्यायिका आहे.पण माझ्या मते ते सर्व मी सांगण्यापेक्षा आपण जर स्वतः जावून हा परिसर पाहिला तर फार उत्तमरीत्या समजेल असे मला वाटते.
तिथल्या स्थानिक लोकांनी सांगितलेली माहिती.बारकाव्याने पाहिलेल्या काही गोष्टी या आधारावर मी हे सर्व लिहिले आहे.यात काही चुकाही असू शकतात.पण आपण त्या समजून घ्याल हीच अपेक्षा.
या सर्व गोष्टी मध्ये मला थोडा बदल करू वाटला तो म्हणजे ही मूर्ती इ.स.५५६१ वर्ष जुनी नसावी. कारण मूर्तीच्या प्रभावळीवर कोरलेली भगवान बुद्ध आणि ऋषभदेव यांची मूर्ती.तसे पाहिले तर यांचा इतिहास एवढा जुना नसल्याने मूर्तीचा इतिहास एवढा जुना नसावा असे मला वाटते.पण हा परिसर, हेमाडपंती बांधकाम,भुयार त्यात अगदी तिसऱ्या भुयारात एवढ्या खाली वारा खेळता रहावा यासाठी केलेली विशिष्ट रचना हे सर्व पाहण्यासारखे आहे.
*शब्दसारथी*
*निलेश बाबर*
*९२७१००८८९३*