खरच सत्यमेव जयते……?

*खरच सत्यमेव जयते…..????*

सुरुवातच अशी प्रश्नाने तेही सत्यमेव जयते…? नक्कीच खूप विचित्र वाटले असेल.पण असं म्हणत असताना त्याची पार्श्वभूमी पण जाणून घेणं फार गरजेचं आहे.गेली २महिने हा प्रश्न मनात घोंगावत आहे.पण व्यक्त कसे व्हावे हेच तर सुचत न्हवते.
संशय चारित्र्याचा हा लेख लिहिल्या नंतर बऱ्याच प्रतिक्रिया आल्या होत्या.कोणी काही चांगले मार्ग सुचवले,कोणी आलेले अनुभव सांगितले.पण असाच एक मेसेज आला की “फक्त चारित्र्याचा संशय यावर नाही तर नवऱ्याच्या आयुष्यात दुसरे कोण आले तरी संसार मोडतात.मग अशावेळी जी हतबल स्त्री असते ती ना माहेरची राहते ना सासरची.”
जरी हे मनाला पटत असले तरी नक्की त्यांना काय सांगायचे आहे हे मला स्पष्ट समजत नव्हतं.म्हणून मी विचारले की जे काय असेल ते स्पष्ट सांगू शकता का…? म्हणजे तुम्हाला काही हरकत नसेल तरच सांगा.
तेव्हा समोरून उत्तर आले की “सांगून तरी तुम्ही काय करणार….? जे आहे ते मलाच भोगावे लागत आहे.पण जेव्हा स्त्रीची काहीच चूक नसताना तिला संसारातून बेदखल केलं जातं. मग तिचे पुढे काय होईल याचा विचारही समाज करत नसेल तर अशा समाजात जगण्याला खरच काही अर्थ आहे का….?”
तर या लेखात मी पुढे काही लिहिण्या अगोदर *संशय चारित्र्याचा* या लेखात मी नक्की काय मांडले होते ते थोडक्यात सांगतो.एक गरोदर मुलगी जी संसाराच्या वेलीवर आपले आयुष्य फुलवत असताना २ वर्षही झाले न्हवते पण नवरा आणि सासरच्या लोकांनी सुरू केलेल्या संशयाच्या त्रासाला कंटाळून स्वतःचं आयुष्य संपवते….गरिबीमुळे माहेरचे ही कधी साथ देत न्हवते….”तुझी काय चूक नाही ना मग गप कर सहन होईल सर्व ठीक.” याच आश्वासनावर तिचे सांत्वन करत राहिले……”जर संसार मोडला तर आम्ही कुठे तोंड दाखवू” या समाजाच्या अलिखित भीतीने मुलीला कायम सहनच कर हा सल्ला देणारे माहेरचे……मग सासरच्या जाचाने कंटाळलेली आणि माहेरच्या लोकांनी नाकारलेली हतबल तरुण मुलगी स्वतःच्या पोटात असणाऱ्या बाळासहित स्वतःचं आयुष्य संपवते…..आणि आपण स्वतंत्र झालो….आपला देश महान आहे….लोकशाही आहे…..इथे प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा संविधानिक हक्क आहे…..इथे प्रत्येकाला न्याय मिळतो…….भगवान के घर में देर है अंधेर नही…..अशी मोठी मोठी वाक्य बोलत बसतो…..पण शेवट काय……? यात नक्की कोणाला न्याय मिळाला……? जे झालं ते बदलू शकत नाही……एवढा एवढा शासकीय खर्च…..आणि एवढ्या पैशाचा दंड…..संपले सर्व….लागला निकाल……असच तर घडते आहे.
हे सर्व त्या लेखात लिहिल्या नंतर झालेला या व्यक्तीशी संवाद झाला…..त्यांचं मत हेच की…..लिहून काही होत नसते…..ना लढून काही न्याय मिळतो…….जर पैसा असेल तरच नीट जगता ही येत आणि मरता ही येत……अहो पैसे नसतील तर मरणे पण महाग आहे….. तुम्हाला जाळायचे कुठे आणि कोण घेणार ती जबाबदारी इथपासून प्रश्न उभे असताना काय न्याय मिळतो आपल्या या समाजात…..?
हे मनाला टोचनारे पण तितकेच खरे शब्द नक्कीच होते….. *”अहो लिहून काय होते….४ जण तुम्हाला कमेंट करणार…..आणि तुम्हाला त्यातच समाधान मिळणार की मी किती चांगले लिहिले….यापलीकडे तुमच्या लेखाला काय किंमत……* हे जरी माझ्या मनाला लागणारे शब्द होते तरी त्यात सत्यता ही सूर्याच्या तेजाहून प्रखर नक्कीच होती.
मला त्यांना काय उत्तर द्यावे समजत न्हवते…..त्यांचा नक्की काय प्रॉब्लेम आहे तेही माहीत न्हवते…..पण ज्याअर्थी एवढं काही ती व्यक्ती स्पष्ट बोलू शकते त्याअर्थी नक्कीच त्या व्यक्तीने बरच काही भोगलेलं असणार हे जाणवत होते.
मी मनात येईल ते थोडे बहुत लिहिणारा आणि थोडे बहुत काम करून घर चालवणारा समाजातील मध्यम घटकांपैकी एक माणूस.असा साधारण असणारा मी एक व्यक्ती नक्की काय त्यांना जाणून तरी घेणार आणि मदत तरी करणार……आणि मदत तरी काय ओ….ती व्यक्ती काय पैसे मागत होती की….आधार……ती फक्त न्याय मागत होती……
आता न्याय मागताना मी ना वकील ना पोलीस….ना कसली राजकीय ओळख….ना कसले कायद्याचे ज्ञान……मग काय मदत तरी करणार…..पण तरीही त्यांचा नक्की प्रॉब्लेम काय आहे हे जाणून घ्यावं यासाठी…..” मला जे काय असेल ते स्पष्ट सांगाल का हा प्रश्न घाबरत घाबरतच मी विचारला …..”
असेही न्यायाच्या देवालयात हरलेल्या त्यांनी कमीतकमी मन तरी मोकळे करू याच एका विचाराने त्यांनी सर्व सांगण्याचा निर्णय बहुतेक घेतला असावा.आता मी जे काही यापुढे लेखात मांडत आहे ते त्यांच्या आयुष्यात त्यांनी भोगलेले त्रास आणि आपल्या न्याय व्यवस्थेने दिलेला कौल यावर सर्व आधारित आहे….मग लेखाची सुरुवात सत्यमेव जयते आणि त्यापुढे प्रश्न चिन्ह देणे योग्य की अयोग्य ते तुम्हीच सांगा.
घरात सगळ्या मुली त्यात एक मुलगा होता त्याचे अपघाती निधन……मनाने खचलेल्या वडिलांनी मोठ्या मुलींची लग्न लावून दिली होती.पण जी लहान आहे तिचे १० वी मधून शिक्षण थांबवून लग्न लावून दिले.
लग्नाच्या पुजेपासून भांडणाला झालेली सुरुवात….. पण एक मूल झाल की होईल सर्व काही ठीक हा आईने दिलेला दिलासा यावर संसाराला सुरुवात…..मुलगी झाली….तरीही नवरा सांभाळत नाही……मग मुलगा झाला की बघ तुला नीट बघेल हे आईचे शुभ आशीर्वाद घेवून पुन्हा संसाराला सुरुवात…..*पडणाऱ्या अवकाळी पावसाचा कितीजरी राग आला तरी तो सहन करून चिखलातून वाटा काढणारे आपण आणि नवऱ्याने कितीही मारले तरी पुढचा मार्ग चांगला असेल या आशेवर असणारी स्त्री* यात काहीच फरक नाही.
संसारात मार खात….सहन करत मुलगा ही झाला….आता तरी सर्व ठीक होईल या आशेवर असणाऱ्या त्या बाईला नंतर समजले की मुल जसे पोटात वाढत होते त्याहीपेक्षा मोठ्या आनंदात नवऱ्याचे दुसरे प्रेम वाढत होते.
शेवटी माहेरून एकच शिकवण काही झाले तरी सहन करायचे…..होतात अशा चुका….बाईच्या जातीने समजून घ्यायला पाहिजे……कितीही राग आला तरी हे सर्व गप्प सहन करून मनातून तुटले तरी वेड्या आशेने संसाराची स्वप्न पाहणाऱ्या तिने सर्व गृहीत धरून नवी सुरुवात केली.
तिने सुरुवात दोन मुलांसोबत त्याच नवऱ्यासोबत केली….मात्र तीच स्वप्न तिच्या नवऱ्याने दुसऱ्या बाईसोबत पाहिली…..मग आता अशा नात्याला नक्की अर्थ काय….?असा प्रश्न विचारावा तरी कोणाला….?कारण आपल्या समाजात एकच म्हण आहे ना….*नाती ही स्वर्गात जोडली असतात…..मग बहुतेक जोडताना काहीतरी क्रॉस कनेक्शन झालेलं असावं अस म्हणून आपण पुन्हा नव्याने कॉल करावा तर आपण चुकीचा नंबर डायल केला आहे असा जर समोरून आवाज आला तर देवाने बनवलेल्या नात्याच्या या नेटवर्कवर विश्वास तरी किती ठेवावा हा प्रश्न पडणे स्वाभाविक नाही का…?*
“मला तू नको आहेस तुझे तू बघ” असे म्हणून नव्या नात्यात गुंतलेला नवरा….भरपूर पैसा पण आता बायको नको…..मग मुलांचे काय…..? दोन मुले पण तीही नको…..मग नक्की बायको नको….. मुल नको….तर नक्की लग्न केलं होत कशासाठी…..? लग्नाआधी आवडली…. मुल जन्माला घालताना नाही खराब वाटली….पण मुलं झाली……दुसरी बाई मिळाली की मग हिचे शिक्षण कमी दिसू लागले……मग शिक्षण कमी तर शिकवायचे होते ना…..पण काय करणार वेळेनुसार गरज बदलली होती…….आणि शेवटी आपल्या समाजात नवऱ्याने सोडलेली बाई माहेरच्यांना ओझे न होणे म्हणजे दुर्मिळच…….आता दोन मुले…त्यांना सांभाळणे…….शिक्षण कमी मग नोकरी तरी कुठे चांगली मिळणार……सल्ले देणारे सांगतात छोटा मोठा व्यवसाय कर…..अरे पण इथे खायचे वांदे असणाऱ्या बाईला स्वतःच कसं बघू….मुलांचे कसे भागवू या विवंचेत जगताना तुम्ही व्यवसायाची स्वप्न कशी दाखवता…..?
पण असो ज्याने त्याने आपल्या परीने सल्ले द्यायचा प्रयत्न केला…..आता….” मी माझे बघेन कसेही पण मुलांचे शिक्षण आणि त्यांना काय लागते तेवढे तरी बघा….” ही साधी अपेक्षा करणाऱ्या तिला नवऱ्याने जराही किंमत देवू नये…..हे कितपत योग्य….? “२लाख देतो पण तुझा माझा पुन्हा कसला संबंध नाही…. मुलं पण तूच बघ आणि गप घटस्फोटाच्या पेपर वर सही कर”….हा एकदम उत्तम मार्ग नवऱ्याने शोधून काढला……
एकतर एका विचित्र आजाराने त्रस्त ही स्त्री….त्यात दोन मुले…..त्यांचा संपूर्ण आयुष्याचा खर्च २ लाख रुपये…..?????? एक स्वाभिमानी स्त्री कशी हे मान्य करेल….? पैसे घेऊन घटस्फोट दिला तर पुढे काय…..? भविष्यात मुलांना खर्च लागणार….आपले एकतर शिक्षण कमी……या २ लाखात काय काय करणार…..? सगळ्या प्रश्नांच्या जाळ्यात अडकलेल्या तिने न्याय मिळावा या हेतूने… सरळ आपली न्यायव्यवस्था गाठली……. न्यायालय……सर्वांना समान न्याय देणारे मंदिर……आता इथे तरी आपले ऐकले जाईल……आपल्याला योग्य न्याय मिळेल या आशेवर त्या तिथे गेल्या तर खर…..पण तिथेही पैसे लागतात ना….रोजचा खर्च आहेच ना……मग एका खाजगी ठिकाणी नोकरी सुरू केली…….नवऱ्याने तिथे जावून ती नोकरी करते तिथले फोटो काढले……व्हिडिओ शूटिंग केले……आणि न्यायालयात हेही दाखवले की ही नोकरी करते……पण मला एक प्रश्न विचारायचा आहे……जरी कामाचे ठिकाण मोठे असले….तरी ही व्यक्ती एकतर शिक्षणाने कमी….त्या व्यक्तिला तिथे काय दर्जाचे काम मिळाले असणार….आणि किती पगार असणार…..? पण न्याय व्यवस्थेने ते ऐकले नाहीच.एकतर कंत्राटी काम….१० ११ महिन्यांचा करार…त्यात सुट्टी मिळणे अवघड……कोर्टाच्या तारखेला येत नाही याचा अर्थ तिला पोटगी ची गरज नाही….ती सर्व स्वतः पहायला सक्षम आहे…..असा युक्तिवाद केला जातो काय…. आणि शेवटी पुरावे असले की त्यावर न्याय दिला जातो….हे तर ठरलेलं आहे…….
न्यायालयाने पोटगी या स्त्रीला मिळणार नाही….पण मुलांच्या शिक्षणाला दरमहा एवढी रक्कम द्यावी असे सांगून केसचा निकाल लावून दिला…पण आता त्या मुलांना कित्येक महिने पैसे मिळाले नाहीत….या निर्णयाच्या विरोधात पुन्हा केस करावी तर मोठ्या कोर्टात जायचे कसे…..?मुलांच्या खर्चाला ठरलेले पैसे मिळत नाहीत हे सांगायला कोर्टात जायचे;तरी पैसे कुठे आहेत…..?नोकरी शोधते तर कमी शिक्षण आणि आजार यामुळे चांगली नोकरी मिळते तरी कुठे….?वकिलाच्या फीचे काय….? सध्या जे कंत्राटी काम होते तेही संपले….आता कोणते कामही नाही….मग पैसा आणायचा कुठून …..जो निकाल कोर्टाने दिला तो मान्य करून स्वतःचे स्वतः बघेन…पण मुलांसाठी पैसे देतो म्हणून अजून देत नाहीत याचे काय करायचे……? असे कितीतरी प्रश्न…..
पण मग मला सांगा……फक्त हीच केस….हीच घटना एकमेव आहे असे नाही….अशा कित्येक घटना आपण ऐकल्या आहेत की पैसे खर्च करून त्या दाबल्या किंवा पुरावे नसल्याने काही गोष्टी सिध्द करू शकले नाही….मग दोषी व्यक्तीही निर्दोष सुटले…..मग आपण नक्की कोणता आधार घेतो आणि म्हणतो की…..सत्यमेव जयते…..????
काही चांगल्या घटना आहेत…. ज्यात न्याय मिळाला….जय भीम फिल्म पाहिली…त्यात महिलेला कसा न्याय मिळवून दिला हेही पाहिले…..पण अशा बोटावर मोजता येतील अशा घटनांचा दाखला घेवून आपण म्हणायचे का की सत्यमेव जयते……????
न्याय जर सर्वांना मिळत नसेल….पैसाच जर सर्व ठरवत असेल की कोणत्या बाजूने निकाल लावायचा……तर आपण कसे म्हणायचे सत्यमेव जयते……? मला हेही माहीत आहे.हा लेख पूर्ण वाचणारे फार कमी असतील……कारण इन्स्टंट फूड ची सवय झालेल्या आपल्याला हॉटेल मध्ये ऑर्डर देवून १५ मिनिट थांबणे पण जास्त त्रासाचे वाटते…… रिल्स ज्या जमान्यात कोणतीही कला ३० सेकंदाच्या वर पाहणे बोअर होवून जाते….तिथे काय हा लेख तरी वाचला जाईल…..आणि जरी वाचला तरी यावर नक्की काय न्याय मिळेल…..
वाचणारे कदाचित फारच छान लिहिले आहे….उत्तम विचार म्हणतील आणि सर्व विसरून जातील…..आणि जसे त्या म्हणाल्या की लिहून काय होणार ४ कमेंट मिळतील….आणि छान लिहिल्याचा ४ दिवस आनंद घ्याल यापलीकडे काही नाही…..
खरच असेच होणार हे मलाही वाटत असले तरीही आतून कुठेतरी वाटतेय की….. खरच कोणीतरी योग्य व्यक्ती या घटनेचे गांभीर्य समजून घेवून त्या स्त्रीला योग्य न्याय देईल.त्या व्यक्तीला तुमचे पैसे नको आहेत….योग्य काम हवेय…..ज्याने ती तिचे घर चालवू शकते….मुलांना सांभाळू शकते…..नवऱ्याने सोडले आहेच…पण जे मुलांसाठी पैसे मंजूर होत आहेत ते तरी त्याने वेळेत द्यावेत……एवढं जरी कोण करू शकले तर खरच मलाही वाटेल की लेखणीतून समाज बदलू शकतो.
स्वतः बाबासाहेब आंबेडकर साहेब सांगून गेले…..शक्तीने तुम्ही जे काही करू शकत नाही ते सर्व युक्तीने…..शिक्षणाने…..सत्य विचाराने करू शकता…..आज त्यांनी लिहिलेले संविधान सर्वसमावेशक आहेच….पण पैशाचा जोर लावून त्यातून पळवाटा शोधणे हाच जास्त अभ्यास त्यातून होताना दिसतोय….जितकी अवघड केस तितका जास्त पैसा…..आणि तितका जास्त युक्तिवाद….मग पैसा वापरून पुरावे नष्ट तरी करणे…..किंवा खोटे पुरावे सादर करून ते सत्य आहे हे दाखवणे…..असा गैरवापर सर्रास होताना दिसतोय….यात काही मी खोटे बोलतो आहे का….?
शेवटी मी एक सामान्य माणूस आहे…..कोणत्याही प्रकारे या सर्व व्यवस्थेला भिडणे शक्य तर नाहीच….पण ज्या कोणाकडे ते सामर्थ्य आहे त्यांनी कृपया या घटनेला न्याय द्यायचा प्रयत्न केला तर बरे होईल असे मला वाटते.
जर बोलण्याच्या ओघात काही आक्षेपार्ह बोलून गेलो असेन तरी ते समजून मला सांगा….पण मांडलेल्या भवांनाना चुकीचे समजून टाळू नका.

शब्दसारथी
निलेश बाबर
९२७१००८८९३