तिच अस्तित्व

स्पर्धेसाठी

आजची स्त्री खरंच मुक्त आहे का?

भारतीय तत्वज्ञाना नुसार अस्तित्वाच्या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला पायाभुत सुविधा व समॄध्दी देणारी लक्ष्मी.दुस-या टोकाला शक्ती देणारी व संरक्षण देणारी महाकाली दुर्गा.आणि त्रिकोणाच्या शिरोबिदूमध्ये ज्ञान कल्पना देणारी महा सरस्वती असते.अशा प्रकारे ह्या तीन शक्तीना महाकाली, महालक्ष्मी,महासरस्वती असे स्थानं दिलेले आहे.स्त्री ही त्याग,नम्रता,श्रध्दा,सुजाणपणा ह्यांची मुर्ती आहे.ती कोणत्याच बाबतीत कमी नाही.पारंपारिक रित्या पुरुषांची समजली जाणारी क्षेत्रे आज महिला काबीज करत आहे आजची स्त्री हि डॉक्टर, इंजिनीयर,शास्त्रज्ञ,प्रशा सकीय अधिकारी वा आमदार अश्या महत्त्वाच्या पदांवर काम करीत असली.तरी ह्या कर्तबगारी पेक्षा ती घरकाम किती करते.ह्या वरुन समाज तीचे मोठेपण व कर्तुत्व आजही ठरवतो. विवाहा पुर्वी जोपासलेल्या कला, छंद, शिक्षण ह्यांकडे विवाहा नंतर दुर्लक्ष केले जाते. संसारातील जबाबदा-या मुळे वेळे अभावी विवाहा पुर्वीची अष्ट्पैलु स्त्री .विवाहा नंतर केवळ चोवीस तासाची बांधिल अशी चाकर मानी ठरते.संपुर्ण जबाबदारीचे एकटीवर पडणारे ओझे आणि सामाजिक दृष्टीकोन यामुळे जबाबदारीची व मोठ्या अधिकाराची पदे बहुसंख्य स्त्रीयांना कुवत पात्रता असुनसुध्दा नाकारावी लागतात.कारण,त्या पदासांठी लागणारा वेळ त्या देऊ शकत नाही.म्हणुन विवाहा नंतर सुध्दा स्त्रीला स्वतंत्र व्यक्तिमत्व विकसित करण्याजोगे परिस्थीती निर्माण व्हायला हवी.आज काही प्रमाणात सार्वजनिक क्षेत्रात स्त्रीयांच्या नैसर्गिक शक्तिंना व गुणांना वाव मिळत आहे.पण,अश्या स्त्रीयांची संख्या खुप कमी आहे.म्हणुन खरंच असं म्हणतात की,स्त्रीला स्वतःच अस कधीच अस्तित्व नसतं .ती मुलगी असे पर्यत पित्याच्या आज्ञेत असते.पत्नी झाल्यावर पतीच्या अर्ध्या वचनात असते.आणि आई झाल्यावर केवळ मुलांकरता जगते.आपल्या कडे लक्ष द्यायला मुळी तीला वेळच होत नाही.आणि मग त्यामध्ये आलेल्या वार्धक्यामुळे ताकद ही संपते.आत्मविश्वास हि उरत नाही.आणि मग आहे ते आयुष्य शेवटच्या श्वासापर्यंत ती रेटत राहते.जन्माला आल्यानंतर समज येत गेल्यावर जी स्वप्न उराशी बाळगुन ती मोठी होत असते.ते स्वप्न वास्तवात न साकारता फक्त स्वप्न बनुन राहतात हे तिच तिलाच लक्षात रहात नाही. आपल्या माणसांच्या नात्यांमध्ये ती इतकी गुरफटुन जाते की,आपलं काही अस्तित्व आपण बनवल होत हे तिच्या लक्षात देखील रहात नाही.आणि मग जीवनाच्या तीन अवस्थां पैकी बालपण मनोरंजनामध्ये जातं.तारुण्य भुर्र्कन उडुन जातं.आणि सर्वात प्रदीर्घ मी वरती म्हटल्याप्रमाणे म्हातारपण सरता सरत नाही.कधी जी स्वप्न उराशी बाळगली होती.ती दुर्दैवाने ती आपल्या सोबतच निघुन जातात. आणि तेव्हा मनात हा प्रश्न येतो की, “आजची स्त्री खरंच मुक्त आहे का?” कारण,माणसांच्या जन्माची सार्थकता तो किती वर्ष किती जगला? यापेक्षा त्या काळात तो कसा जगुन?जगाला त्याने काय दिलं ह्यावर ठरतं असते.आजच्या काळात ही स्त्री पुरूषां एवढी किंबहुना त्यापेक्षां जास्त शिकलेली असली तरीसुद्धा काहीवेळेस तिच्यावर बंधने हि येत असतात. कारण, बऱ्याच वेळेला स्त्री ही जेव्हा आपण बाहेर पडून पैसे कमवून घराला हातभार लावण्याचे विचार करत असते, तेव्हा तिच्या समोर अनेक गोष्टींच्या अटीचा डोगंर उभा केला जातो. जसे, ” तू ठरावीक वेळेला बाहेर पडून, ठराविक वेळेतच घरी आली पाहिजे.” त्याचबरोबर ऑफिसमध्ये ओव्हर टाईम काम करण्यास परवानगी नसते. नवीन जबाबदाऱ्या घेतांना बाहेरगावी जायची, वेळ आल्यास जाऊ देण्यास नकार असतो. घरच्यांच्या अश्या विचित्र मागण्यांमुळे ती कोलमडून जाऊन शेवटी मिळत असलेल्या नोकरीला नकार देऊन घरीच थांबणे पसंद करते. व आपल्या इच्छा, आकांशाना मुरड घालून आहे ती परिस्थिती आनंदाने स्वीकारते. हे असं नोकरीच्या बाबतीत परिस्थिती दोन्ही बाजुंना म्हणजे माहेरी आणि सासरी सारखीच असते. फक्त फरक असतो बोलणाऱ्या माणसाचा.
लग्नांच्या बाबतीतही नेहमी मुलींनाच एकून घ्यावे लागते. तेव्हा तिची जास्त परिक्षा असते.आमंत्रणाचे फोन करताना सुध्दां हजारो प्रश्न फोनवरचं विचारूनही काहीजण तेवढ्यावरच थांबतात. काही वेळा मुलगी पहाण्याच्या कार्यक्रमाला मुलाला न आणता सर्रास पत्रिकेच कारण सांगून परस्पर नकार देखील कळवून देतात. आज आपल्या भारतातले लोक मंगळावर जाऊन आले आहेत. तरीसुद्धा हे लोक पत्रिकेतील ग्रहांना घाबरतात.आश्चर्य वाटते. काही वेळेला मुलां -मुलींची पसंदी असुनही नुसत्या क्षुल्लक कारणाने लग्न मोडतात. मुलं देखील स्वतः च्या बळावर कुठलाही निर्णय न घेता . घरच्या लोकांवर अवलंबून राहातात. त्यामुळे विवाहाला विलंब होतो.आणि ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणुन मुलींनाच एकूण घ्यावें लागते. मग लवकर लग्न होण्यासाठी मुलीला वेगवेगळे उपाय सुचविले जातात.कधी पूजा कधी उपास कधी एखादे व्रत सुचविले जाते.तेव्हा मनांत एक प्रश्न नक्की वर येतो कि, ” गरज फक्त आम्हां मुलीनांचं आहे का?” ” त्याला का कोणी कुठली पूजा सांगत नाही?” तो आमच्या साठी कधी उपास करतो करतो का? का? फक्त लग्न मुलींनाच करायचे असते का? आणि एवढं करूनही काहीवेळेस काही स्त्रियांचा हुंडयासाठी छळ केला जातो. ते वेगळे !
स्त्री ही विधात्याने घडवलेली सगळ्यात चांगली गोष्ट असं सगळेच मानतात. रूप, बुद्धिमत्ता, पुरुषांच्या तुलनेत तिला मिळालेले सात गुण जास्त या एवढ्या जमेच्या बाजू असतानाही याच दैवानं तिला अनाकलनीय बंधनांच्या कात्रीत का गुंडाळल आहे? एवढ्या मौलिक गोष्टी जवळ असताना त्याचा वापरच न करण्याची तिला करण्यात येणारी सक्ती हा कसला विरोधाभास? आजही काही कारण विवश एकटं राहावं लागणाऱ्या स्त्रीला समाजात मानानं जगता येत नाही. जगताना तिला पुरुषाचा आधार लागतो किंबहुना तो असावाच असा पुरुषी समाजाचा तिला धाक आहे. आज कित्येक स्त्रियांच्या नशिबी सिंगल पेरेंट म्हणून जगणं वाट्याला येतं यात स्वखुशीचा भाग असला तरी तो दरवेळी असेलच असं नाही. मग अशावेळी स्वत्व आणि आपलं वं आपल्या मुलांचं भविष्य अशा दुहेरी कात्रीतून जगण्याची जी जीवघेणी धडपड तिच्या वाट्याला येते याची जबाबदारी आपला तथाकथित समाज कितीवेळा पुढे येउन घ्यायची तयारी दाखवतो? मग कुठल्या आधारावर आपण असं म्हणायचं की आजची स्त्री सबल आहे? खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहे. खरंतर समाजात स्त्री-पुरुष एकमेकांस पूरक असावयास हवे पण आज याचा समाजालाच काय पण खुद्द स्त्रियांनाच विसर पडलेला दिसतो. पण या तथाकथित श्रेष्ठ-कनिष्ठच्या वादात स्त्रियांचं समाजातलं स्थान नेहेमीच धोक्यात राहिलं आहे.
आजही पेपर उघडला कि, स्त्रियांच्या बाबतींतली अन्याया बद्दलची (एकतरी)बातमी आपल्याला वाचायला मिळते. नवविवाहितेच्या आत्महत्या, हुंडयासाठी चालू असलेला छळ, बलात्कार , अनेक नैतिक शब्धातून झालेला खुन अश्या प्रकारच्या बातम्या जास्तीत जास्त आजच्या काळांत देखील वाचायला मिळतात. त्यामुळे मन उदास होते. जेव्हा एखादया मुलींचा विवाह होऊन काही वर्षांचा काळ लोटतो. आणि घरात पाळणा हालत नाही . तेव्हा दोष म्हणुन प्रथम स्त्रीकडे बघितले जाते. डॉक्टरांच्या चाचण्या करण्याची सुरुवात प्रथम तिच्यापासुन होते. मूल होण्यासाठी दोघेही जबाबदार असतात. हे माहीत असून सुद्धा स्त्रीला दोष देणारी पहिले स्त्रीचं असते.एखाद्या वेळी स्त्रीला मुलीचं झाल्या तरी देखील तिचाच दोष मानुन मुलांचा दुसरा विवाह करण्याची खटपट करणारे हि काही जण असतात. हे सगळं करण्या इतपत आपला समाज मागासलेला आहे का? मुलाचं संगोपन,शिक्षण,आजार हे सर्व स्त्री जबबादारीने पार पाडत असते.
‘स्त्री-मुक्ती’ चे वारे जगभर वाहायला सुरुवात होऊन अनेक वर्षे लोटली, तरीही स्त्री-मुक्ती या शब्दाचा खरा अर्थ आपल्याला कळलेलाच नाही आहे. स्त्री-मुक्ती म्हणजे स्त्री ची मुक्ती, पण कशाकशातून?? गुलामगिरीतून? अत्याचारापासून? गरीबीतून? लाचारीतून? दुबळेपणातून? की पुरुषांच्या मक्तेदारीतून???.. आणि ही मुक्ती करायला स्त्रीला बांधून,जखडून कुणी ठेवलंय? , तर तिने स्वत:च स्वत:ला बांधून घेतलंय. या सर्व बंधनात ती स्वत:च (मर्जीने किंवा गैरमर्जीने) गुरफटून गेली आहे. क रीयर करणारी स्त्री ही आज ‘पती हाच परमेश्वर’ हेच ब्रीदवाक्य मानत आहे. स्त्री-मुक्ती चळवळीत भाग घेणारी, व्यासपीठावर उभे राहून स्त्रियांच्या जुलुमांना वाचा फ ोडणारी स्त्री च घरी जावून पतीला व मुलांना जेवायला वाढते, घरची कामे क रते, घरातील प्रत्येकाची मर्जी सांभाळते, प्रसंगी अपमानही सहन करते. म्हणजेच ज्या स्त्री-मुक्तीसाठी ही स्त्री झटतेय त्याचा तिला अर्थच कळलेला नाही. स्त्री असण्याचा अर्थ समजावून घेणे, स्त्रीत्व स्विकारणे आणि त्याचा आनंद लुटणे यापासून प्रत्येक स्त्रीची समानतेची कल्पना सुरु होते. आणि याची पुढची पायरी म्हणजे त्या प्रत्येक स्त्रीला जीवनाच्या वळणावर येणारे विविध अनुभव. आज आपल्यातील प्रत्येकीला पुरुषी वर्चस्वाला, जबरदस्तीला, शोषणाला समोरे जावे लागते आणि या सर्वांशी संघर्ष करताना मात्र स्त्री एकटी पडते. जखडलेल्या सामाजिक बांधणीची जोखड सावरत पुढे जाताना तिला, राजकीय खाचाखोचांना देखील सामोरे जावे लागते. या साऱ्याची निष्पत्ती काय?- असेही वाटल्यावाचून मग राहात नाही. महिला दिन साजरा करण्याचे उद्दिष्ट म्हणजे पुरुषांचा स्त्रीबद्दलचा असलेला दृष्टिकोण बदलणे हाच असला पाहिजे. कारण जोपर्यंत हा दृष्टिकोण बदलणार नाही, तोपर्यंत स्त्रिया ख-या अर्थाने मुक्त होणार नाहीत.
‘मी एक स्त्री आहे’ असे विधान जेंव्हा अभिमानाने व आनंदाने प्रत्येक स्त्री करु शकेल तेंव्हाच ‘स्त्री’ या शब्दांत असणारी शक्ती, निर्भिडता, आत्मविश्वास तिच्यांत येईल आणि कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद तिच्यामध्ये आली पाहिजे.स्त्री ही ‘एका क्षणाची पत्नी तर अनंत काळासाठी माता असते.’या वचनाप्रमाणे ही माता आपल्या स्त्री शक्तीचा वारसा येणाऱ्या पुढील पिढयांना देत राहिल, जेणे करुन पुढच्या पिढीतील स्त्रीला ‘महिला दिन की महिला दीन’ या विचारांचा स्पर्शही होणार नाही. ती स्त्री फक्त लढेल ते ‘माणूस’ म्हणून जगण्यासाठी. कारण, स्त्री पुरुष या भेदापेक्षा आपण सर्वजण माणूस आहोत हे विसरुन चालणार नाही. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे या एवढयाश्या हट्टाने पेटलेले आज आपणाकडे बोटांवर मोजण्याइतकेच आहेत आणि खरे तर आज त्यांचीच नितात गरज आहे. आणि हा माणूस फक्त ‘स्त्री’ च निर्माण करु शकते. म्हणूनच ‘जी स्त्री सर्वसामान्य असून प्रचंड अडचणींना धैर्याने तोंड देते, जिच्याकडे स्वत:ला समर्पित करण्याची अमर्याद शक्ती असते आणि जी तिच्याकडे साधनांची कमतरता असूनही स्वत: त्यातून मार्ग काढते आणि इतरांना जगवायला, टिकून राहायला धीर देते,’
सभोवताली अंधार आणि दृष्टी असुनही अंध असलेल्या समाजाला स्त्रियांनी स्वीकारले,केवळ स्वीकारूनच त्या थांबल्या नाही तर प्रेम आणि जिद्दीतुन त्यां अंधारातही प्रकाशमय संसार फुलवून सुखी संसार करायचा प्रयत्न त्या करत असतात. ह्यासगळ्यांवरून वाटतं, कायम स्त्रीचं अन्याय सहन करेल का? ह्या अन्यायाला कुठेतरी पुर्ण विराम मिळणारच नाही का? पेपर मध्ये येणाऱ्या स्त्रियांच्या नकारात्मक बातम्या कुठेतरी थांबतील का?तिला कधीतरी न्याय मिळेल का? पुरुष संस्कृतींमध्ये आता तरी बदल घडतील का? तिला जस जगायचं आहे तसं जगता येईल का? जगण्याचं स्वातंत्र्य आतातरी अनुभवता येईल का? सर्वच क्षेत्रात पुढे जाणारा आपला समाज स्त्रियांच्या बाबतीत कधीतरी बदलेल का? आजच्या आधुनिक काळात हे प्रश्न अनुत्तरीत रहातात. त्यापेक्षां आणखी लाजीरवाणी गोष्ट नाही. ह्यासगळ्यांमध्ये जेव्हा परिवर्तन घडेल, जेव्हा स्त्रिच्या अन्यायाला पुर्णविराम लागेल,जेव्हा स्त्रियांबाबत आदर वाढून ती मनापासुन मोकळा श्वास ह्या समाजात घेईल. आणि आजची स्त्री खरंच मुक्त आहे,हे वाक्य ” का? ” म्हणून न म्हणता ते विरहीत म्हणता येईल .

सौ प्रिया गौरव भांबुरे
पुणे

एक प्रतिक्रिया