जेव्हा कोणी तिला विचारते काय ग आता तुला काय वाटते
तेव्हा हलकेच तिच्या मनात विचार डोकावून जातात आणि सासर माहेर यांची जुगलबंदी सुरू होते..
जेव्हा घरात ती काही बनवते ते सगळ्यांसाठी असते … त्यातही तिला तिचा वाटा तळालाच कुठंतरी मिळतो.. दुसरे कोणी केले तर मात्र कधी रिकाम भांडेच तिच्या वाट्याला येते..तेव्हा तिला ते सासर वाटते आणि माहेर आठवते..
जेव्हा ती दुसऱ्यांना हसताना ,खेळताना,बागडताना बघते आणि तिच्या हसण्यावर, बसण्यावर,खेळण्यावर आणि कधीकाळी झोपण्यावर सून असल्याचा शिक्का लागतो आणि तिचे मोकळे हसू तिथेच खुंटते तेव्हा तिला ते सासर वाटते आणि माहेर आठवते…
जेव्हा तिला आवडीचे काही खाण्याची इच्छा होते पण वेळेची आणि खायच्या सामानाच्या किमितींची जाणीव करू दिली जाते तेव्हा ते सासर वाटते आणि माहेर आठवते…
जेव्हा आईने शिकवलेला स्वयंपाक ती करते पण त्या नाही याच पद्धतीने कर तरच चांगले होते असे वारंवर सांगितले जाते तेव्हा तिला ते सासर वाटते आणि माहेर आठवते..
जेव्हा घरात तिला न आवडणाऱ्या च भाज्या बनतात आणि आत्तापर्यंत नाक तोंड मुरडणारी ती गुमान ताटात आलेले (स्वतःच वाढून घेतलेले ) उसने हसू आणून संपवते.. आपले लाड पुरवायला, हट्ट करायला इथे आपले आई वडील नाही याची जाणीव त्यावेळी तिला होते तेव्हा ते सासर वाटते आणि माहेर आठवते…
जेव्हा आई वडिलांनी रक्ताचे पाणी करुन शिकवलेली ती पण तिच्या पेश्यावर शिक्षणावर तीच्या कर्तृत्वावर नवीन आलेले कोणी प्रश्नचिन्ह उभे करते आणि बोलायचे असते पण आईवडिलांचे संस्कार आठवून मूग गिळून गप्प बसते तेव्हा ते सासर वाटते आणि माहेर आठवते…
तिच्यासमोर जेव्हा तिच्या आयुष्याच्या जोडीदाराला आणि भावंडाना आवडीचे खाण्यासाठी आग्रह केला जातो .. त्यांना आवडते म्हणून ते राखून ठेवले जाते पण तिला मात्र फक्त गृहीत धरले जाते .. तेव्हा ते सासर वाटते आणि सतत खाण्यासाठी आग्रह करणारी हवे आवडीचे करून खायला घालणारी आई आठवते….
एखादी गोष्ट आवडल्या वर अग तू घे चल मी तुला गिफ्ट करतो.. अजून काही हवंय का असे विचारणारे कोणी नसते तेव्हा ते सासर वाटते आणि माहेरतला भाऊ आठवतो..
जेव्हा रुसून बसल्यावर थोड तरी खा अस म्हणायला कोणीच नसते .. काही त्रास झाल्यावर बाळा तुला बरं वाटतं नाही का अस विचारायला कुणीच नसते .. कोणी काही बोलले का अस म्हणून दुःखी मूड गेलेला चेहरा ओळखणारे कोणीच नसते तेव्हा ते सासर वाटते आणि स्वतःच्या जिवापेक्षा जास्त जपणारा ..तोंड भरून कौतुक करणारा .. वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करणारा आणि आईवडील गेले तरी डोळ्यातले पाणी न दाखवणारा मात्र लेकीच्या लग्नात तिच्या गळ्यात पडून ढसाढसा रडणारा बाप आठवतो…
अश्या या माहेर आणि सासर ची सांगड घालून ती चालत राहते ..लोक म्हणतात की स्त्रीने माहेरचे नाव जास्त घेऊ नये पण त्यांना काय माहित..तिच्या नवीन आयुष्याच्या वाटेवर जेव्हा तिचा मार्ग शोधायचा प्रयत्न करत असते तेव्हा तिला तोच आधार वाटत असतो.. त्याच आठवणी मनाला ओलावा देत असतात आणि म्हणून मुलींना माहेरचा हव्यास असतो….
-Sunshine(Kirti)