राग येणे हा एक स्वाभाविक भाव जरी असला, तरी त्याचे स्पष्टीकरण करणे-देणे हे अवघडच असते. सामान्यतः आपला राग हा मनाविरुद्ध घडणाऱ्या घटनांमुळेच येतो किंवा आपल्या स्वभावाचे ते एक दर्पण असते असे म्हणायला हरकत नाही.
राग हा उद्ध्वस्त करणाराच एक भाव आहे, षडरिपू पैकी एक.. ह्या सहा शत्रू पासून स्वतःचे रक्षण करणे आणि साधूत्व प्राप्त करणे आणि तसेच संपूर्ण आयुष्य जगणे माझ्या मते या जन्मात तरी बहुतांश लोकांना अशक्यच. ह्याचा अर्थ असा मुळीच नाही की सहाच्या सहा ह्या रिपू बरोबर समझोता करुन त्यांना आजन्म बाळगणे.
वयानुसार स्वभाव बदलत जातो, आपल्या कामाचं स्वरूप, कामाचे ठिकाण, त्याचा मिळणारा मोबदला आणि मुख्य करुन तिथे आपल्याला मिळणारे कामाचे समाधान
(JOB SATISFACTION) कौटुंबिक जबाबदारी, कुटुंबात असलेलं आपलं स्थान, समाजात असलेली पत-प्रतिष्ठा अशा एक ना अनेक गोष्टींनुसार आपण घडत जातो, आपला स्वभाव बदलत जातो.
तर असो राग येणं हे आपल्या शारिरीक स्वास्थ्यासाठी देखील घातकच आहे. राग अनावर झाला म्हणजे जिभेवरचा ताबा सुटतो, माणूस स्वतःला, कधी कधी समोरच्याला देखील ईजा पोहचवू शकतो. आणि एकदा रागाचं हे वादळ शमल की उद्ध्वस्त झालेल्याचा पंचनामा हा केवळ दिखावाच असतो. त्याची भरपाई मग मनस्ताप करून किंवा माफी मागून होईल हे सांगणे अवघड…
तर करा विचार सगळे सहा शत्रू बरोबर लढायचं का एक एक पायरी चढून एका एका शत्रू वर गनिमी काव्याने मात करत आयुष्य सुकर करायचे, शेवटी निर्णय आपला आणि त्याचा परिणामही आपल्यालाच भोगावा लागेल मग तो चांगला असो वा वाईट!!